mrityunjaymahanews
अन्य

सोमवार – सातच्या बातम्या

 

सोमवार

दि.५ ऑक्टोबर २०२६

देवस्थानच्या परंपरागत कामांना मुहूर्त कधी?
गावस्कीच्या जबाबदाऱ्यांवर पुन्हा बैठकीची मागणी

उत्तूर : मंदार हाळवणकर

गावातील देवस्थान व गावस्कीशी संबंधित पूर्वापार चालत आलेल्या परंपरागत जबाबदाऱ्या पुन्हा नियमितपणे पार पाडण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. देवस्थानची पूजा-अर्चा, गाभाऱ्याची निगा, गावपाटीलकीची कामे, खोत इनामाच्या सेवा, वाजंत्री तसेच पालखी व यात्रेची व्यवस्था अशा विविध जबाबदाऱ्या परंपरेने निश्चित आहेत.

देवस्थानातील पूजा, अभिषेक, नैवेद्य, आरती व पूजाविधीची जबाबदारी गुरवांकडे असून गाभाऱ्यातील धार्मिक व्यवस्था, स्वच्छता व निगा यासह संबंधित पारंपरिक कामेही निश्चित आहेत. याबाबत यापूर्वी ग्रामपंचायतीत बैठक झाली होती.

दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर देवस्थानची स्वच्छता, दिवाबत्ती, पूजासाहित्य, नैवेद्य व धार्मिक विधींची तयारी करण्याची वेळ आली आहे. मात्र ही व्यवस्था केवळ दसरा-दिवाळीपुरती मर्यादित नसून वर्षभरातील सण, उत्सव, पालखी, यात्रा-जत्रा आणि धार्मिक कार्यक्रमांशी संबंधित आहे. या परंपरागत सेवांसाठी गावपातळीवर तसेच प्रशासनाकडून पूर्वीपासून मोबदला दिला जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे परंपरेने निश्चित केलेली कामे व जबाबदाऱ्या संबंधितांकडून नियमितपणे पार पाडून जुनी व्यवस्था सुरळीत करण्याची गरज व्यक्त होत आहे.

सामाजिक कार्यकर्ते संतोष रावण यांनी या विषयाकडे वेळोवेळी लक्ष वेधले आहे. देवस्थान व गावस्कीबाबत ग्रामपंचायतीने पुन्हा बैठक घेऊन संबंधितांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट कराव्यात आणि वर्षभरातील धार्मिक कार्यक्रमांची व्यवस्था निश्चित करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. देवस्थानच्या परंपरागत सेवा पूर्वीप्रमाणे सुरू राहाव्यात. हा विषय केवळ दसरा-दिवाळीपुरता न ठेवता वर्षभरातील सण, पालखी व यात्रांच्या व्यवस्थेशी जोडून पाहावा.असे रावण यांनी सांगितले.

आजरा साखर कारखान्याकडे सभासदाची ‘भन्नाट’ मागणी ; म्हणाले – मुलीच्या वाढदिवसाला गणवेशातील १० कर्मचारी द्या !

आजरा : प्रतिनिधी

सहसा सभासद कारखान्याकडे ऊस बिल, तोडणी किंवा सभासदत्वाबाबत मागणी करतात. पण आजरा साखर कारखान्याच्या एका सभासदाने केलीय एकदम हटके मागणी, आणि त्यामुळे कारखाना वर्तुळात एकच चर्चा रंगलीय.

काय आहे मागणी ?

कोरीवडे येथील सभासद संतोष शामराव पाटील यांनी कारखान्याचे चेअरमन आणि कार्यकारी संचालकांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी   त्यांच्या मुलीचा वाढदिवस आहे. या कार्यक्रमासाठी कारखान्याचे गणवेशातील १० कर्मचारी* पाहुण्यांचे स्वागत आणि व्यवस्थापनासाठी उपलब्ध करून द्यावेत.

निवेदनात थेट सवाल…

पाटील यांनी निवेदनात एक मुद्दा उपस्थित केलाय. ते म्हणतात, “यापूर्वी कारखान्याचे संचालक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या खाजगी कार्यक्रमांसाठी कारखान्याचे कर्मचारी उपलब्ध करून दिले जातात. जर संचालकांच्या कार्यक्रमाला कर्मचारी मिळत असतील, तर सभासद हा कारखान्याचा मालक आहे, त्याच्या मुलीच्या वाढदिवसाला कर्मचारी का मिळू नयेत?”

संतोष पाटील यांच्या या अजब मागणीमुळे कारखाना प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता सर्व सभासदांचे लक्ष लागले आहे. ६ ऑक्टोबरला मुलीच्या वाढदिवसाला गणवेशातील कर्मचारी हजेरी लावणार का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आजरा तालुक्यात ६३ नवरात्रोत्सव मंडळांची लगबग सुरू; होम मिनिस्टर, कीर्तन, प्रवचनासह विविध कार्यक्रमांचे नियोजन

आजरा : प्रतिनिधी

आजरा तालुक्यात यंदाच्या नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. तालुक्यात एकूण ६३ सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळे असून सर्वच मंडळांचे कार्यकर्ते मंडप उभारणी, मूर्ती स्थापना आणि वर्गणी संकलनाच्या कामाला लागले आहेत.

नवरात्र म्हटली की केवळ देवीची आराधनाच नव्हे, तर सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांची पर्वणी असते. यंदा बहुतेक मंडळांनी केवळ डीजे आणि लाइटिंगवर भर न देता दर्जेदार कार्यक्रम देण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.

महिलांसाठी खास ‘होम मिनिस्टर, ह.भ.प. यांचे कीर्तन, प्रवचन, भजन स्पर्धा आणि धार्मिक व्याख्यानमाला आयोजित केल्या जाणार आहेत. तरुण पिढीला अध्यात्माकडे वळवण्यासाठी हा उपक्रम असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

अनेक मंडळांनी यावर्षी रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, स्वच्छता अभियान असे सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. रांगोळी स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, निबंध स्पर्धा, कराओके गायनरेकॉर्ड डान्स पारंपरिक गरबा व दांडिया स्पर्धांचे नियोजन कार्यकर्त्यांकडून सुरू आहे.

पोलीस प्रशासनानेही सर्व ६३ मंडळांना परवानगी, ध्वनी प्रदूषण, सुरक्षा आणि मिरवणूक मार्गाबाबत सूचना दिल्या  असून तालुक्यात नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

धर्मवीर नवरात्र उत्सव मंडळाच्यावतीने आजऱ्यात भव्य ओपन रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन

आजरा : प्रतिनिधी

गांधीनगर, आजरा येथील धर्मवीर नवरात्र उत्सव मंडळाच्यावतीने नवरात्र उत्सवानिमित्त भव्य ओपन रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर  रोजी संध्याकाळी ठीक ९ वाजता धर्मवीर नवरात्र उत्सव मंडळ, गांधीनगर येथे दुर्गामातेच्या मंडपासमोर होणार आहे.

या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास रु. ७००१/-, द्वितीय क्रमांकास रु. ५००१/-, तृतीय क्रमांकास  रु. ३००१/-तर दोन उत्तेजनार्थ रु. १००१/- प्रत्येकी अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेचे प्रवेश शुल्क रु. २०१/- असणार आहे.

अधिक माहितीसाठी श्री. विक्रम गायकवाड , श्री. महेश खेडेकर ,श्री. दयानंद कालेकर , श्री. विठ्ठल बुरुड  यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

कानोली – हारूर येथे दुष्काळी पिकांचे पंचनामे…

कानोली: प्रतिनिधी

कानोली व हारूर येथे दुष्काळच्या पार्श्वभूमीवर तालुका कृषी अधिकारी भूषण पाटील व कृषी अधिकारी योगेश जगताप, ग्राम महसूल अधिकारी अजयसिंह किल्लेदार ग्रामपंचायत अधिकारी स्नेहदीप सरदेसाई यांनी खरीप पिकांची पाहणी व पंचनामे केले, यावेळी सरपंच सौ. सुषमा पाटील, उपसरपंच चंद्रकांत पाटील, सदस्य अनिल पाटील सौ. आरती देसाई सौ. माया लोहार यांच्यासह विलास सुतार, सुरेश रेडेकर सुभाष पाटील, सचिन नलवडे, अनिल कदम नेताजी कळसकर उपस्थित होते.

गावातील शेतकरी बांधव यांचे शेतात जाऊन पीक पाहणी आणि पंचनामे केले, शेतकरी यांच्या शेतातील भात, भुईमूग नाचणी पिकाची पाहणी यावेळी करण्यात आली..यावेळी त्यांनी सर्व शेतकरी बांधवाना मार्गदर्शन करून. ई पीक पाहणी आणि खरीप पिकांचे जास्तीत जास्त पंचनामे करून घेण्याचे आवाहन केले.

शासकीय योजनांची कामे मलिग्रे
सि ए सी सेंन्टर मधून घ्यावीत : तहसिलदार समिर माने

आजरा : प्रतिनिधी

आजरा तालुक्यातील पुर्व भागातील, जनतेच्या सोयीसाठी शासनाच्या विविध योजनांची कामे वेळेवर होवून पैसा व वेळेची बचत होण्यासाठी मलिग्रे येथे सिएसी सेन्टर सुरू होत आहे. याचा लाभ घेण्यासाठी शासकीय योजनांची कामे जनकल्याण सेन्टर मधून घ्यावीत असे आवाहन तहसीलदार समीर माने यांनी उद्घाटनप्रसंगी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे संचालक अशोक तर्डेकर होते.

उपस्थितांचे स्वागत सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी केले. यावेळी तहसीलदार माने यांनी शासनाच्या विविध योजना अंमलात आणण्यासाठी तालुक्यात जाण्यासाठी वेळ व पैसा खर्च करण्यापेक्षा संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य किशोर जाधव यांच्या माध्यमातून सुरू केलेल्या जनकल्याण आपले सेवा केंद्रातून फार्मर आयडी , उतारे, व विविध प्रकारचे दाखले व शासनाच्या सर्व योजनाची माहिती या सेन्टर मधून पुर्व भागांतील नागरीकांनी घ्यावी असे आवाहन केले.
अशोक तर्डेकर यांनी, गावच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सेवा सुविधा प्रामाणिकपणे लोकांच्या पर्यंत पोहचवण्याचे काम किशोर करत असल्याने जनतेने विविध योजना लाभ घ्यावा.

यावेळी रामदास भगुत्रे यांनी मलिग्रे पाझर तलावाच्या वरील बाजूस शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कायमस्वरूपी रस्ता मिळावा अशी मागणी केली. लिलाबाई बुगडे यांनी व्यक्तीगत रेशन व पेन्शन संदर्भातील अडचणी मांडल्या.

यावेळी जेष्ठ वारकरी विष्णू आसबे, आनंदा बुगडे, शंकर नेसरीकर,कृष्णा जाधव, राजाराम नावलगी, चाळू केंगारे, राऊ बुगडे, सुनिल सावंत, शिवाजी ईक्के, नाना नेसरीकर, सचिन सावंत, सिकंदर मकानदार, बबन बुगडे यांच्या सह मलिग्रे कागिनवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.आभार किशोर जाधव यांनी मानले.

छाया वृत्त

आजरा शहर नवीन न पाणीपुरवठा योजना जॅकवेल परिसरात चित्री नदीपात्रात पाणीच नसल्याने शहरातील पाण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. पाटबंधारे विभागाच्या पाणी आवर्तनावर आता शहरवासीयांच्या पाण्याचे वेळापत्रक अवलंबून राहणार आहे. ऑक्टोबर महिन्यातच बंधाऱ्यात पाणी अडवण्याची वेळ आली आहे.

आजचे पंचांग

दिनांक : ५ ऑक्टोबर २०२६
वार : सोमवार
माह (अमावस्यांत) : भाद्रपद
माह (पूर्णिमांत) : आश्विन
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : दशमी तिथी (६ ऑक्टोबर रात्री ०२.०७ पर्यंत) त्यानंतर एकादशी तिथी
नक्षत्र : पुष्य नक्षत्र (रात्री ११.०९ पर्यंत) त्यानंतर आश्लेषा नक्षत्र
योग : शिवा योग (सकाळी ०९.५१ पर्यंत) त्यानंतर सिद्ध योग
करण : वाणीजा करण (दुपारी ०२.५८ पर्यंत) त्यानंतर विस्ती भद्रा करण
चंद्र राशी : कर्क राशी
सूर्य राशी : कन्या राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०७.५९ ते सकाळी ०९.२९ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०३ ते दुपारी १२.५०
सूर्योदय : सकाळी ०६.३१
सूर्यास्त : सायंकाळी ०६.२२
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

Admin

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

डॉ. अनिल देशपांडे यांचा एकसष्ठीपूर्ती कार्यक्रम उत्साहात

mrityunjay mahanews
error: Content is protected !!