mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

रविवार 

४ ऑक्टोबर २०२६

दुष्काळ पार्श्वभूमीवर महसूल विभागाकडून पीक पंचनामे सुरू


आजरा : प्रतिनिधी

तालुक्यात गेले दीड महिना पावसाने दडी मारल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाकडून तालुक्यात पीक पंचनाम्याला सुरुवात करण्यात आली आहे.

इटे, मडीलगे, कानोली, लाटगाव, खेडे, सुलगाव, हाजगोळीसह तालुक्यातील विविध गावांमध्ये पीक पंचनामे करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली जात आहे.

या पंचनाम्यावेळी तहसीलदार समीर माने, नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, विकास कोलते, मंडळ अधिकारी कुरणे, सुंदर जाधव यांच्यासह स्थानिक तलाठी, ग्रामपंचायत पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंचनाम्यांचे अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे यावेळी तहसीलदार समीर माने यांनी सांगितले.

विधायक…

आता नवरात्रही डॉल्बी मुक्त


आजरा : प्रतिनिधी

गणेशोत्सव विसर्जन मिरवणूकांमध्ये आजऱ्याच्या मंडळांनी आदर्श घालून दिला असताना आता दुर्गामाता प्रतिष्ठापना व विसर्जन डॉल्बीमुक्त करण्याचा निर्णय सहा मंडळांनी घेतला आहे. या सकारात्मक निर्णयामुळे तालुक्याची विधायक दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.

जिल्हा पोलीस प्रमुख व स्थानिक पत्रकारांच्या आवाहनानुसार गणेशोत्सव मंडळांनी विसर्जन मिरवणूका डाॅल्बीमुक्त केल्या. मिरवणूका पारंपारिक वाद्यात काढण्यात आल्याने या मिरवणुकांचा आनंद बालगोपाळांसह वयोवृद्ध नागरिकांनी घेतला होता

गणेशोत्सव मंडळांनी दिलेला प्रतिसाद पहाता दुर्गामाता प्रतिष्ठापना व विसर्जन डॉल्बीमुक्त करण्यासाठी आजऱ्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांनी आजऱ्यातील सहा मंडळांना आवाहन केले. यालाही सकारात्मक प्रतिसाद आजऱ्यातून मिळाला असून दुर्गामाता प्रतिष्ठापना व विसर्जन डॉल्बीमुक्त करण्याचा निर्णय सहा मंडळांनी घेतला आहे.

यामध्ये धर्मवीर नवरात्र उत्सव मंडळ गांधीनगर, क्रांतीकारी नवरात्र उत्सव मंडळ चाफेगल्ली, सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, दि लायन्स किंग नवरात्र उत्सव मंडळ,भगवा रक्षक तरुण मंडळ व छत्रपती शिवाजीनगर नवरात्र उत्सव मंडळ यांचा समावेश आहे.

यावर्षी पोलिस खात्याने मिरवणूक डॉल्बीमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. याला आजरा शहरातून प्रतिसाद मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीस अश्विन डोंगरे, सुजित देसाई, ज्योतिप्रसाद सावंत,  विजय/बाळासाहेब सावंत, रवी तळेवाडीकर, संदीप पारळे, गौरव देशपांडे, सागर पाटील, ओंकार माद्याळकर, सतीश पवार, सुयोग बेळगुंदकर, संदीप गिरी, आकाश शिंदे, संकेत पाटील, श्रीधर पवार, स्वप्निल रांगणेकर, प्रसाद ओतारी विकी रॉड्रिग्ज ,प्रथमेश काणेकर यांच्यासह नवरात्रोत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

नदी-ओढ्यांना कोरड, दुर्गा माता मूर्तींचे विसर्जन करायचे कुठे ? आजरा तालुक्यात मंडळांसमोर प्रश्न

आजरा : प्रतिनिधी

तालुक्यात गेले दीड महिना पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी चित्री नदीचे पात्र कोरडे पडले असून, अनेक ओढे-नाल्यांमधील पाणी आटले आहे. दुष्काळ पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने धरणांमधील पाणी आवर्तनाबाबत सावध भूमिका घेतली आहे.

दुसरीकडे शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी दुर्गा माता प्रतिष्ठापनेची मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दरवर्षी नवरात्र उत्सवानंतर नदीपात्रात मोठ्या उत्साहात दुर्गा मातेच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते. मात्र यंदा नदी-ओढ्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी पाणीच नसल्याने व जेथे आहे तेथे अत्यल्प असल्याने मूर्तींचे विसर्जन करायचे कुठे? असा प्रश्न मंडळांसमोर उभा राहिला आहे.

आजरा शहरातील तसेच नदीकाठच्या गावांतील अनेक मंडळे दरवर्षी चित्री नदीपात्रात विसर्जन करतात. पाणी टंचाईमुळे यंदा विसर्जनाचा मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

या बाबत प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गजरगावचे सरपंच आनंदा कांबळे यांच्या अपात्रतेस विभागीय आयुक्तांकडून स्थगिती

आजरा : प्रतिनिधी

गजरगावचे सरपंच आनंदा रानकू कांबळे व त्यांच्या कुटुंबीयांचे सरकारी रस्त्यावर अतिक्रमण असल्याच्या कारणास्तव त्यांना ग्रामपंचायतीचे सदस्य व सरपंच म्हणून राहण्यास कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी २० ऑगस्ट च्या आदेशानुसार अपात्र ठरवले होते.

या निर्णयाविरोधात कांबळे यांनी अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे यांच्या न्यायालयात दाद मागितली आहे. अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे यांनी सदर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला पुढील सुनावणी होईपर्यंत स्थगिती दिली आहे.

गजरगाव येथील जगदीश अर्जुन पाथरवट यांनी कांबळे यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली होती.

आजरा महाविद्यालयात जलसंवर्धन व शाश्वत विकास विषयावर व्याख्यान


आजरा : प्रतिनिधी

अण्णाभाऊ स्मृती पंधरवड्यानिमित्त आजरा महाविद्यालय, आजरा येथील भूगोल व पर्यावरण शास्त्र विभागाच्या वतीने ‘जलसंवर्धन व शाश्वत विकास’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, गडहिंग्लज येथील प्रा. डॉ. डी. जी. चिघलीकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी. पोतदार होते. प्रमुख उपस्थिती म्हणून उपप्राचार्य दिलीप संकपाळ उपस्थित होते.

यावेळी डॉ. चिघलीकर यांनी जलसंवर्धन ही काळाची गरज असून पावसाच्या पाण्याचे नियोजन, भूजल पुनर्भरण व पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले. प्राचार्य पोतदार यांनी जलसंवर्धनाची अंमलबजावणी दैनंदिन जीवनात व्हावी व शाश्वत विकासासाठी भावी पिढ्यांचा विचार करावा, असे सांगितले.

कार्यक्रमाचे स्वागत प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांनी केले, प्रास्ताविक डॉ. रणजीत पवार यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. रत्नदीप पवार यांनी तर आभार प्रा. तेजस्विनी जाधव यांनी मानले.

कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निधन वार्ता
महादेव सुर्यवंशी

सुळे ता. आजरा यैथील महादेव भिमा सुर्यवंशी (वय ७४ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

आजचे पंचांग 

दिनांक : ४ ऑक्टोबर 2026
वार : रविवार
माह (अमावस्यांत) : भाद्रपद
माह (पूर्णिमांत) : आश्विन
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : नवमी तिथी ( ५ ऑक्टोबर सकाळी ०३.५३ पर्यंत) त्यानंतर दशमी तिथी
नक्षत्र : पुनर्वसू नक्षत्र (५ ऑक्टोबर रात्री १२.१३ पर्यंत) त्यानंतर पुष्य नक्षत्र
योग : परिघ योग (दुपारी १२.३१ पर्यंत) त्यानंतर शिवा योग
करण : तैतुला करण (दुपारी ०४.५१ पर्यंत) त्यानंतर गराजा करण
चंद्र राशी : मिथुन राशी (सायंकाळी ०६.३१ पर्यंत) त्यानंतर कर्क राशी
सूर्य राशी : कन्या राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सायंकाळी ०४.५४ ते सायंकाळी ०६.२२ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०३ ते दुपारी १२.५१
सूर्योदय : सकाळी ०६.३१
सूर्यास्त : सायंकाळी ०६.२३
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

बुधवारच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सर्फनाला प्रकल्पाचे  प्रकल्पग्रस्तानी बंद पाडले.

mrityunjay mahanews
error: Content is protected !!