mrityunjaymahanews
अन्य

शनिवार – सातच्या बातम्या

शनिवार 

३ ऑक्टोबर २०२६

शाळा वाचवा शिक्षण वाचवा आंदोलनासाठी ५०० कार्यकर्ते जाणार …

आजऱ्यात बैठक

आजरा : प्रतिनिधी

मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू होणा-या आंदोलनासाठी आजरा तालुक्यातून ५०० कार्यकर्त्यांनी जाण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा वाचवण्यासाठी पालकांनी सहभागी होण्याचे आवाहन येथील बैठकीत करण्यात आले.

यावेळी काँ. संपत देसाई म्हणाले,शाळा मोडीत काढण्याचे धोरण शासनाने अवलंबले असून, भविष्यात मुले शिक्षणापासून वंचित राहणार आहे. ४३ लाख मुले शिक्षणाच्या प्रक्रियेतून बाहेर आहेत. शासन निर्णयाचा मोठा फटका बसला आहे. शिक्षणाचा हक्क नाकारला जाऊन खासगीकरणाला प्रोत्साहन दिले जात आहे. याबाबत शासनाला निवेदन दिले आहे.

काँ. संजय तर्डेकर म्हणाले,आज-या पासून सावंतवाडी पर्यंतच्या लाँगमार्च मुळे काही काळ २० पटाखालील शाळा वाचल्या. प्रत्येक वाडी वस्तीवर शाळा पाहिजे.शाळा वाचविण्याबाबत ठाम निर्णय झाल्याशिवाय माघारी परतायचे नाही. यावेळी सुनील शिंदे, मायकेल फर्नांडिस, बजरंग पुंडपळ,काँ.दत्ता कांबळे,प्रकाश मोरूसकर यांनी चर्चेत सहभाग घेतला.

यावेळी वंदन जाधव, भिमराव माधव, रविंद्र दोरूगडे, युवराज जाधव, शिवाजी आढाव आदी उपस्थित होते.

उत्तूर व आजऱ्यात रक्तदान शिबीर

उत्तूर : प्रतिनिधी

महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान, सेवा संकल्प अभियान तसेच ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियान २०२६ अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र उत्तूर व ग्रामपंचायत उत्तूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (२ ऑक्टोबर) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात १५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद कोल्हापूरचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई, पंचायत समिती सदस्य विकास चोथे, आजरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सावंत, उत्तूरचे सरपंच किरण आमणगी, ग्रामपंचायत सदस्य महेश करंबळी, भैरू कुंभार, संजय हत्तीरगे, सौरभ वांजोळे आदी उपस्थित होते.तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडील डी. के. पाटील, श्रीमती बंडगर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, परिचर, गटप्रवर्तक, आशा सेविका व नागरिकांनी शिबिरास उपस्थिती लावली.

सी.पी.आर. रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या पथकाचे स्वागत वैद्यकीय अधिकारी डॉ. सौरभ कसबे यांनी केले. आरोग्य सहाय्यक अनिल कुरणे यांनी आभार मानले.


आजरा‌ : प्रतिनिधी

महात्मा गांधी जयंतीनिमित्त राहत खिदमत फाउंडेशन, आजरा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ८३ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

शिबिरात युवकांसह विविध क्षेत्रातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

यावेळी समाजासाठी उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या आजरा सरकारी रुग्णालयातील रुग्णवाहिका चालक विलास शिंत्रे व अभिजित माने, तसेच आजरा नगरपंचायतीचे सफाई कामगार सदगोंडा कांबळे यांचा फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी राहत खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष मौजूद अहमद युसूफ माणगांवकर यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या मागण्यांसाठी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

आजरा : प्रतिनिधी

गेली १८ वर्षे इमाने इतबारे ग्रामविकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या ग्रामरोजगार सहाय्यकांच्या न्याय मागण्या मान्य कराव्यात, यासाठी ग्रामरोजगार सहाय्यक संघटना कोल्हापूर जिल्हा यांच्यावतीने पंचायत समिती आजरा येथे  गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम ग्रामरोजगार सहाय्यक करतात, मात्र त्यांच्या समस्या शासन स्तरावर दुर्लक्षित आहेत असे संघटनेने स्पष्ट केले असून ०३/१०/२०२५ चा शासन निर्णय जसाच्या तसा लागू व्हावा, ८०००+२००० रु. मानधन तात्काळ वैयक्तिक खात्यावर DBT प्रणालीद्वारे मिळावे, रोजगार सहाय्यकांवर कारवाईचे अधिकार ४ सप्टेंबर २०१७ च्या शासन निर्णयानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यात यावेत,मनुष्य दिवसाची अट हवीतर रोजगार सेवकांऐवजी ग्रामपंचायतीस असावी यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

या निवेदनावर जिल्हा संघटक सचिन कांबळे (राधानगरी), दयानंद सपकाळ (राधानगरी), नंदकुमार गरुडकर (राधानगरी), सतिश पाटील (आजरा), प्रकाश पाटील (गगनबावडा), बाबुराव कोळेकर (गगनबावडा), संदिप पेणुकर (चंदगड), मधु जाधव (चंदगड), सुनिल घोंडगे (गडहिंग्लज), अमर पाटील (भुदरगड), शिवाजी घोगरे (पन्हाळा), दिलीप नरतवडे (भुदरगड), अनिल डंर (भुदरगड), मारुती वठरे (करवीर), चंद्रकांत चव्हाण (करवीर), सुंदर कांबळे (करवीर), अजित कांबळे (हातकणंगले), अशोक शेणगे (कागल), प्रकाश कांबळे (शिरोळ), विलास गुडेकर (शाहूवाडी), अशोक कळकांबकर (चंदगड), पांडुरंग पाटील (चंदगड) यांच्या सह्या आहेत.

हाजगोळी खुर्द येथे ऊस पेटला : १० लाखांचे नुकसान

हाजगोळी : प्रतिनिधी

आजरा तालुक्यातील हाजगोळी खुर्द येथे शॉर्ट सर्किटमुळे ऊस फडाला आग लागली यामध्ये ६ शेतकऱ्यांचे सुमारे १० लाखांचे नुकसान झाले आहे.

हाजगोळी खुर्द येथील शेतावरुन विद्युत तारा गेल्या आहेत. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दोन वायरींचे घर्षणामुळे शॉर्ट सर्किट झाले.आगीच्या ठिणग्या उसावर पडल्याने आग लागली . पांडुरंग संभाजी पाटील,आनंदा गणपती तांबेकर, बाळासाहेब गणपती तांबेकर,पांडुरंग बाबू पंडित, इंदुबाई ईश्वर भादवणकर व रवींद्र विष्णू गिलबिले यांच्या शेतातील ऊसाने पेट घेतला.सुमारे ४-५ एकरातील ऊस जळाला असून सुमारे १० लाखांचे नुकसान झाले आहे.

राष्ट्रपित्यास व लालबहादूर शास्त्रींना अभिवादन…

आजरा साखर कारखाना…

 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यावर, संचालक श्री. गोविंद पाटील यांच्या हस्ते फोटो पूजन करून महात्मा गांधीजीना अभिवादन करण्यात आले.

यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री संभाजी सावंत, डेप्युटी चिफ अकौंटंट श्री. रमेश वांगणेकर, श्री. जक्रीया तकीलदार व अन्य स्टाफ उपस्थित होते.

व्यंकटराव शिक्षण संकुल…


येथील व्यंकटराव शिक्षण संकुलात राष्ट्रपिता महात्मा गांधी व हरितक्रांतीचे जनक लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त
आजरा महाल शिक्षण मंडळाचे चेअरमन श्री. जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या जगाला आज खरोखरच गांधी विचारांची गरज आहे. गांधीजींच्या अहिंसा तत्त्वाचा विचार संपूर्ण जगाने आज घेतला ही खरी मोठी आपल्या भारताची पोचपावती आहे असे विचार श्री जयंतराव शिंपी यांनी बोलताना आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

‘जय जवान जय किसान’ चा नारा देणारे लालबहादूर शास्त्री यांचे सुद्धा देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान असल्याचे मतही त्यांनी मांडले. यावेळी पंचायत समिती शिक्षण विभाग माझ्या यांच्या परिपत्रकानुसार नशामुक्ती या विषयावरील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले.

यावेळी आजरा महाल शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष के. जी. पटेकर खजिनदार सुनील पाटील संचाल उच्चक सुधीर जाधव , सचिन शिंपी अशोक पोवार प्रभारी प्राचार्य चंद्रकांत पन्हाळकर ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य संजयकुमार पाटील पर्यवेक्षिका व्ही.जे. शेलार, ज्येष्ठ शिक्षिका श्रीम.एन ए. मोरे, सौ. एस. डी. इलगे व सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते सूत्रसंचालन आर पी होरटे यांनी केले.

आजरा हायस्कूल…

आजरा हायस्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून आजरा परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक श्री. ए. आर. व्हसकोटी व उपस्थित शिक्षकांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा व स्वच्छतेच्या विचारांची तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, देशभक्ती व कर्तव्यनिष्ठेची माहिती देण्यात आली.
महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याचा भाग्यश्री पाटील , तर लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याचा संजीवनी कुराडे यांनी आढावा घेतला. माधवी शेलार यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

पं. दीनदयाळ विद्यालय…

पं. दीनदयाळ विद्यालय मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक देसाई एस. वाय, राजोपाध्ये व्ही. व्ही यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन केले. देसाई एस. वाय. यांनी क्रोधावर शांततेने विजय मिळविता येतो तसेच एखाद्या अन्यायाविरुद्ध शांततेने लढा दिला तर विजय हा आपलाच होतो असे गांधीजींचे आदर्श विचार आपल्या मनोगतातून व्यक्त केले. लालबहादूर शास्त्रीजींनी देशाला ‘जय जवान जय किसान’ हा प्रेरणादायी संदेश दिला. देशाच्या संरक्षणासाठी जवानांचे योगदान जितके महत्त्वाचे आहे तितकेच देशाला अन्नधान्य पुरविणाऱ्या शेतकऱ्याचे ही योगदान महत्त्वाचे आहे. हा संदेश त्यांनी आपल्या घोषणेतून दिला असे विचार राजोपाध्ये व्ही. व्ही. यांनी आपल्या मनोगतून व्यक्त केले.

मा. बाळासाहेब ठाकरे दूध संस्था, भादवणची वार्षिक सभा संपन्न

भादवण : प्रतिनिधी

शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे सह. दूध संस्था, भादवणची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली.

सध्या संस्थेचे रोज २०० लिटर दूध संकलन होत असून चांगल्या प्रतीचे म्हैस दूध उत्पादक शेतकरी जोडले गेले आहेत.

सचिव श्री. अमोल कांबळे यांनी स्वागत केले, तर संस्थापक अध्यक्ष श्री. संजय पाटील यांनी अहवाल वाचन केले. खर्च वजा जाता १ लाख ६२ हजार रुपये निव्वळ नफा झाल्याचे सांगण्यात आले.

सभेत गणेश बचत म्हणून लिटरला १० रुपये कपात करण्याचा, दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादकांना सभासद करून घेण्याचा आणि दूध पुरवठा न करणाऱ्या सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याचा ठराव घेण्यात आला.

यावेळी व्हा. चेअरमन अर्जुन कुंभार, संचालक ओंकार मुळीक, संभाजी कांबळे, शिवाजी कृष्णा गोईलकर, लक्ष्मण पाटील, वंदना कोलते, सुनंदा पाटील, शिवाजी शंकर गोईलकर, चंद्रकांत कोलते, सुधीर सुतार, बाळासाहेब कदम, चंद्रकांत पाटील, बाळू वांगणेकर, श्रीकांत गाडे, पांकोश बारदेस्कर व इतर सभासद उपस्थित होते.

जास्त व चांगले दूध पुरवठा केल्याबद्दल बाबूराव डोंगरे, अर्जुन कुंभार, बाळू गाडे, लक्ष्मण पाटील यांचा परितोषक देऊन सत्कार करण्यात आला. आभार संचालक ओंकार मुळीक यांनी मानले.

आजचे पंचांग 

दिनांक : ३ ऑक्टोबर २०२६
वार : शनिवार
माह (अमावस्यांत) : भाद्रपद
माह (पूर्णिमांत) : आश्विन
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : सप्तमी तिथी (सकाळी ०७.५९ पर्यंत) त्यानंतर अष्टमी तिथी
नक्षत्र : आर्द्रा नक्षत्र (४ ऑक्टोबर पहाटे ०१.२९ पर्यंत) त्यानंतर पुनर्वसू नक्षत्र
योग : वरीयान योग (दुपारी ०३.२१ पर्यंत) त्यानंतर परिघ योग
करण : भाव करण (सकाळी ०७.५९ पर्यंत) त्यानंतर बलवा करण
चंद्र राशी : मिथुन राशी
सूर्य राशी : कन्या राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०९.२९ ते सकाळी १०.५८ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०४ ते दुपारी १२.५१
सूर्योदय : सकाळी ०६.३१
सूर्यास्त : सायंकाळी ०६.२४
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

निधन वार्ता…

मारूती होन्याळकर


बुरुडे ता. आजरा येथील मारुती लक्ष्मण होन्याळकर (वय ८८ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, ‌ दोन मुले. एक मुलगी. सूना व नातवंडे असा परिवार आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

मंगळवार – सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

निवडणूक विशेष… ताराराणी आघाडी

mrityunjay mahanews
error: Content is protected !!