mrityunjaymahanews
अन्य

शुक्रवार – सातच्या बातम्या

शुक्रवार 

२ ऑक्टोबर २०२६

संस्थेच्या वादात अडकलेल्या १७ विद्यार्थ्यांना दिलासा.

जे.पी. नाईक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास  परवानगी.

उत्तूर : मंदार हाळवणकर

उत्तूर येथील जे.पी. नाईक महाविद्यालयातील प्रशासकीय व संस्थात्मक वादामुळे परीक्षा अर्ज भरता न आल्याने अडचणीत आलेल्या १७ विद्यार्थ्यांना अखेर शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा अर्ज भरण्यास विशेष परवानगी दिली आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना आता परीक्षा अर्ज भरता येणार असून त्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाविद्यालयातील अंतर्गत वाद आणि प्रशासकीय कामकाजातील अडथळ्यामुळे विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज रखडले होते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्याची संधी मिळावी, यासाठी २ सप्टेंबरपासून शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य स्वागत परुळेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. विद्यापीठ प्रशासनाशी संपर्क साधून विद्यार्थ्यांची अडचण मांडण्यात आली.

दरम्यान, महाविद्यालयात जाऊन संचालकांशी संपर्क साधण्यात आला. मात्र विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्जाबाबत आवश्यक ती जबाबदारी घेऊन विद्यापीठ प्रशासनाशी संपर्क साधण्याची कार्यवाही महाविद्यालयाकडून झाली नसल्याचे समोर आले. अखेर विद्यापीठ स्तरावर करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश आले असून एकूण १७ विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्याची परवानगी मिळाली आहे.

अण्णाभाऊ पंधरवडा व गांधी जयंतीनिमित्त आजरा महाविद्यालयाचे स्वच्छता अभियान

आजरा : प्रतिनिधी

अण्णाभाऊ स्मृती पंधरवडा व महात्मा गांधी जयंतीनिमित्त जनता शिक्षण संस्था संचलित आजरा महाविद्यालय, आजरा हायस्कूल, रवळनाथ प्राथमिक विद्यामंदिर, अण्णाभाऊ इंग्लिश मीडियम स्कूल व आदर्श बालक मंदिर यांच्यावतीने संयुक्त स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

या मोहिमेत महाविद्यालय परिसर, पोलीस स्टेशन, एस.टी. डेपो व स्टँड, पंचायत समिती, मोरजकर महाराज समाधी व घाट परिसर, छ.शिवाजी महाराज पुतळा परिसर आदी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.

सुरुवातीला संस्थेचे सचिव श्री. रमेशअण्णा कुरुणकर  व संचालक श्री. अनिकेत चराटी यांच्या हस्ते अवजारांचे पूजन करून उद्घाटन झाले. कनिष्ठ विभागाचे NSS अधिकारी प्रा. रत्नदीप पवार यांनी स्वच्छतेची शपथ दिली.

यावेळी प्राचार्य डॉ. किरण पोतदार , उपप्राचार्य प्रा. डी. पी. संकपाळ, पर्यवेक्षक मनोज पाटील, अधीक्षक  श्री. योगेश पाटील, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाने आयोजित केलेल्या या अभियानातून ‘स्वच्छ परिसर, सुंदर परिसर’चा संदेश देण्यात आला. आभार वरिष्ठ विभागाचे NSS अधिकारी डॉ. अविनाश वर्धन यांनी मानले.

 

तीन वर्षांत एकता गृहतारण संस्थेच्या ठेवी ४ कोटी ५२ लाखांवर
लवकरच शाखाविस्तार : संस्थापक संतोष जाधव


पेरणोली : प्रतिनिधी

ग्रामीण भागात आर्थिक सेवा देणाऱ्या एकता सहकारी गृहतारण संस्था मर्या., पेरणोलीने अवघ्या तीन वर्षांत ४ कोटी ५२ लाख रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठला आहे. आजरा तालुक्यातील ग्रामीण भागात अल्पावधीत अशी कामगिरी करणारी ही पहिली संस्था असल्याचा दावा संस्थेने केला आहे. वाढत्या आर्थिक व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर लवकरच शाखाविस्तार करण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक संतोष जाधव यांनी दिली.
रवळनाथ मंदिर, पेरणोली येथे संस्थेची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. संचालक अविनाश जोशिलकर यांनी दिवंगत सभासद व मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्याचा ठराव मांडला.

चेअरमन पंकज देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक करत संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला. संस्थेकडे ४ कोटी ५२ लाख रुपयांच्या ठेवी असून ३ कोटी २९ लाख रुपयांचे कर्जवाटप व १ कोटी ३२ लाख रुपयांची गुंतवणूक आहे. निधी व वसूल भागभांडवल २० लाख रुपये असून संस्थेला २ लाख २८ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. संस्थेकडून पहिल्या वर्षापासून सभासदांना ८ टक्के लाभांश देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सभासद, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतकांच्या विश्वासामुळे संस्थेची प्रगती शक्य झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सभासदांसह इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संचालक सुनील चव्हाण, सभासद शिवाजी बिद्रे व पत्रकार रणजीत कालेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
मॅनेजर राजेंद्र कळेकर यांनी मागील सभेचा वृत्तांत वाचून दाखविला. त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. त्यानंतर विषयपत्रिकेवरील विविध विषयांवर चर्चा करून आवश्यक ठराव मंजूर करण्यात आले.

संस्थापक संतोष जाधव यांनी आर्थिक पत्रकांची माहिती देताना ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक सक्षम व विश्वासार्ह आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्यावर संस्थेचा भर असल्याचे सांगितले. वाढत्या व्यवहाराचा विचार करून नवीन शाखांच्या माध्यमातून संस्थेचा विस्तार करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

सभेस व्हा. चेअरमन अनिल पारदे, संचालक शेखर कळेकर, कृष्णा सासुलकर, रणजीत फगरे, युवराज कांबळे, संजय गुरव, प्राजक्ता फगरे, सल्लागार मंडळाचे सदस्य तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वन्यजीव सप्ताहाचे उत्साहात उद्घाटन ; प्रस्तावित हत्ती संगोपन केंद्राची पाहणी व AI कार्यशाळा

आजरा : प्रतिनिधी

दि. १ ते ७ ऑक्टोबर २०२६ वन्यजीव सप्ताहाचे उद्घाटन प.पू. काडसिद्धेश्वर स्वामी, कणेरी मठ यांच्या हस्ते, श्री. विलास काळे ,सहाय्यक वनसंरक्षक कोल्हापूर व श्री. सचिन सावंत परीक्षेत्र वन अधिकारी, आजरा यांच्या उपस्थितीत वनपरीक्षेत्र कार्यालय आजरा येथे झाले.

यावेळी श्री. कृष्णा डेळेकर ,वनपाल उत्तर आजरा), श्री. संदीप शिंदे ,वनपाल दक्षिण आजरा, श्रीमती कविता सावंत वनपाल धनगरमोळा, श्रीमती संगीता राठोड ,वनरक्षक आजरा, श्रीमती प्रियांका पाटील ,वनरक्षक मडीलगे,श्रीमती सरिता बावस्कर ,वनरक्षक साळगाव, श्री. संग्राम खापरे, लेखापाल आजरा व कर्मचारी उपस्थित होते.

त्यानंतर प.पू. काडसिद्धेश्वर स्वामी यांनी मौजे घाटकरवाडी येथील प्रस्तावित हत्ती संगोपन केंद्राची पाहणी केली. यावेळी श्री. धैर्यशील पाटील, उपवनसंरक्षक कोल्हापूर , AI तज्ज्ञ सौरव मोईत्रा, श्री. विलास काळे, श्री. सचिन सावंत व श्रीमती कविता सावंत उपस्थित होते.

या केंद्रात हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी AI कॅमेरे व AI ड्रोन वापरण्यात येणार असून, हत्ती गावाजवळ आल्यास ग्रामसंस्कार वाहिनी व वनविभाग नियंत्रण कक्षाला माहिती मिळेल, अशी माहिती  श्री. धैर्यशील पाटील यांनी दिली.

त्यानंतर आजरा, चंदगड व पाटणे येथील जलद कृती दल व हत्ती हाकारा गटासाठी AI आधारित वन्यजीव निरीक्षण प्रणालीबाबत कार्यशाळा घेण्यात आली. यात  श्री. धैर्यशील पाटील व सौरव मोईत्रा  यांनी मार्गदर्शन केले.

अनंत विद्यामंदिर सोहाळे या शाळेत आजी-आजोबांचा आनंद मेळावा उत्साहात साजरा

सोहाळे : प्रतिनिधी

सोहाळे, ता. आजरा येथील अनंत विद्यामंदिर सोहाळे येथे आज दिनांक १ ऑक्टोबर २०२६ रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ‘आजी-आजोबा’ दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमास  सरपंच सौ. भारती डेळेकर या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या. यावेळी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक श्री.मायकल फर्नांडिस, श्री. सत्यवान सोन्ने, सौ. समीक्षा निकम  व सौ. निर्मला आजगेकर  उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांचे औक्षण करून पुष्प देऊन स्वागत केले.

यावेळी अनेक आजी-आजोबांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शाळेने दिलेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत त्यांनी नातवंडांना संस्कार व शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

सरपंच सौ. भारती डेळेकर यांनी आपल्या भाषणात आजी-आजोबांचे कुटुंबातील महत्त्व विषद केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गीते व भाषणे सादर केली.शेवटी विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत त्यांना मनापासून प्रणाम केला.

पंडित दीनदयाळ विद्यालय मध्ये ‘ज्येष्ठ नागरिक दिन’ साजरा

आजरा : प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन’ पं. दीनदयाळ विद्यालय मध्ये साजरा करण्यात आला. प्रथम उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचे स्वागत करण्यात आले.  आजच्या युगात ज्येष्ठ व्यक्तींकडे दुर्लक्ष न करता आपण आपले दोन प्रेमाचे शब्द ,थोडा वेळ आणि आपली साथ ज्येष्ठांसाठी खूप महत्त्वाची असते. ज्येष्ठांचा आदर करा असा संदेश मुख्याध्यापक देसाई एस .वाय .यांनी दिला.

प्रभू पी .जी यांनी संस्कारांचे विद्यापीठ म्हणजे आपले आजी-आजोबा. जीवनात आई-वडिलांबरोबरच आपल्या आजी-आजोबांना मानाचे स्थान देऊन आपल्या कुटुंबाचे आणि समाजाचे अनुभव संपन्न आधारस्तंभ आहेत . ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे ही केवळ आपली जबाबदारी नाही तर आपल्या संस्कृतीची सुंदर परंपरा आहे असे विचार आपल्या मनोगतातून व्यक्त केले. ए एन पाटील यांनी आपल्या मनोगतात आपले पहिले गुरु आपले आजी-आजोबा असतात. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी, त्यांचे अनुभव या आपल्या आयुष्याची शिदोरी आहे. असे विचार व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिक शिवाजी बिरजे गुरुजी यांनी आपल्या बालपणातील अनुभव सांगून आजी-आजोबांचे आपल्या आयुष्यातील स्थान किती महत्त्वाचे आहे हे सांगितले. पूर्वी मोठे कुटुंब असायचे त्यामुळे कुटुंबामध्ये ज्येष्ठ व्यक्तींचा कुटुंबाला सहवास मिळत असे .मात्र आजच्या काळात शिक्षण ,नोकरी यामुळे अनेक कुटुंबे लहान झाली आहेत .आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करा. ज्येष्ठ नागरिकांकडे अनुभवांची शिदोरी असलेली व्यक्ती म्हणून पाहिले पाहिजे. असे विचार मांडून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

ज्येष्ठ नागरिक आक्रम नेसरीकर यांनी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेऊन देशाचे चांगले नागरिक बना असे आवाहन केले. कार्यक्रमासाठी विद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनी ,शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्मळ एस. ए. तर आभार कांबळे एस.पी. यांनी मानले.

आजचे पंचांग 

दिनांक : २ ऑक्टोबर २०२६
वार : शुक्रवार
माह (अमावस्यांत) : भाद्रपद
माह (पूर्णिमांत) : आश्विन
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : षष्ठी तिथी (सकाळी १०.१५ पर्यंत) त्यानंतर सप्तमी तिथी
नक्षत्र : मृगशीर्ष नक्षत्र (३ ऑक्टोबर पहाटे ०२.५४ पर्यंत) त्यानंतर आर्द्रा नक्षत्र
योग : व्यातीपात योग (सायंकाळी ०६.१७ पर्यंत) त्यानंतर वरीयान योग
करण : वाणीजा करण (सकाळी १०.१५ पर्यंत) त्यानंतर विस्ती भद्रा करण
चंद्र राशी : वृषभ राशी (दुपारी ०३.४० पर्यंत) त्यानंतर मिथुन राशी
सूर्य राशी : कन्या राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी १०.५८ ते दुपारी १२.२८ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०४ ते दुपारी १२.५२
सूर्योदय : सकाळी ०६.३०
सूर्यास्त : सायंकाळी ०६.२५
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

फोटो गॅलरी…

 

संबंधित पोस्ट

निंगुडगे येथील श्री. बसवेश्वर विकास सेवा संस्थेत सरपंच कृष्णा कुंभार यांची आघाडी विजयी…अजिंक्य देसाई यांचा समाजरत्न पुरस्काराने गौरव

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा छेडछाड प्रकरणी दोघाना अटक. – दोन दिवसांची पोलीस कोठडी.

mrityunjay mahanews
error: Content is protected !!