गुरुवार दि. १९ मार्च २०२६


चितळे येथे मधमाशांचा हल्ला
आठ जखमी : एक गंभीर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
चितळे ता. आजरा येथे चितळे – भावेवाडी मार्गावर बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास दुचाकी स्वारांसह मार्गावरील ग्रामस्थांवर मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात आठ जण जखमी झाले असून यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.
याबाबत अधिक माहिती अशी…
बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास अचानक चितळे – भावेवाडी दरम्यानच्या रस्त्यावर मधमाशांनी या रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी स्वारांसह इतर वाहन चालकांवर थेट हल्ला चढवला. या हल्ल्यात अशोक तुकाराम गावडे (वय ४० वर्षे ) , संध्या अशोक गावडे (वय १२ वर्षे ) , निलेश पांडुरंग पारपोलकर (वय २८ वर्षे/आजरा ), धनाजी कृष्णा माळवकर ( वय ५४ वर्षे ) , वत्सला धनाजी माळवकर (वय ५० वर्षे ), लखोबा गावडे ( वय ४० वर्षे/ कुरणी ) , जानू बाबू कोकरे (वय ६० वर्षे /आवंडी धनगरवाडा क्रमांक ३ ) , व मारुती पाटील (वय ६०/या.मडूर) हे जखमी झाले. जखमींवर आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
यापैकी मारुती पाटील यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आजऱ्याला पावसाने धुतले.,.
गारपिटीसह प्रचंड पाऊस

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहर व परिसरात बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पावसाने विजांच्या कडकडाटासह अचानक हजेरी लावून अक्षरशः शहर व परिसराला धुवून काढले. प्रचंड गारपिटीसह झालेल्या या पावसाने संभाजी चौकासह सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.
पावसाचे कोणतेही वातावरण नसताना अचानकपणे दुपारी जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसाने सर्वत्र पाणी झाले होते. मोठ्या प्रमाणावर झालेल्या गारपिटीमुळे आंबा व काजू पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पावसाच्या हजेरीमुळे दुपारनंतर रंगपंचमीही संपुष्टात आली. हवेमध्ये गारवा निर्माण झाला होता.

आजऱ्यात रंगपंचमीची धूम…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संगीताच्या ठेक्यावर आजरा शहर व परिसरात रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रथेप्रमाणे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी आजरा शहरांमध्ये रंगपंचमी साजरी केली गेली. रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी डॉल्बी व इतर संगीताचा तरुणाईसह बालगोपाळांनी आनंद लुटला. मुळातच आठवडा बाजार बंदचा दिवस असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट होता. दुपारी तीन नंतर पावसाने हजेरी लावली.
शाळकरी मुले, महिला, तरुणाईनेही रंगपंचमीचा आनंद लुटला. रंगपंचमी दरम्यान शहर व परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आजरा तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक दिन उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
तहसील कार्यालय, आजरा येथे जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आजरा तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार श्री. म्हाळसाकांत देसाई होते. तसेच या कार्यक्रमासाठी श्री. विकास कोलते, महसूल नायब तहसीलदार, श्री.एम. डी सुतार अध्यक्ष आजरा तालुका ग्राहक पंचायत, श्री गुंडू परीट तालुका अध्यक्ष आजरा अखिल भारतीय ग्राहक पंचायत, श्री बंडोपंत चव्हाण तालुका अध्यक्ष ग्राहक फाउंडेशन यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीमती सोनाली चिमणे, पुरवठा निरीक्षक यांनी ग्राहकांचे हक्क व अधिकार, कायद्यातील तरतुदी याची माहिती दिली. या कार्यक्रमाचे नियोजन श्री. संदीप चव्हाण पुरवठा निरीक्षक व श्रीमती अलका फुपरे यांनी केले.या कार्यक्रमास विविध ग्राहक पंचायतीचे सदस्य व सचिव उपस्थित होते तसेच रेशन धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष श्री. संजय येसादे तसेच नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते.
पुरवठा लिपिक संदीप पाटील यांनी आभार मानले.

सर्फनाला धरण व प्रकल्पग्रस्तांच्या इशाऱ्यानंतर सोमवारी बैठक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सर्फनाला मध्यम प्रकल्पातील प्रकल्प प्रवर्तकांच्या पुनर्वसन संदर्भातील विविध प्रलंबित प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांच्या वतीने बैठकीची मागणी करण्यात आल्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी सोमवार दिनांक २३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकाऱ्यांच्या गारगोटी येथील दालनामध्ये प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता, तहसीलदार, आजरा व मंडल अधिकारी गवसे विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक बोलवण्यात आली आहे.
सर्पनाला धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झालेला असूनही प्रकल्प प्रवर्तकांचे बरेचसे प्रश्न मार्गी लागलेले नाहीत. याबाबत तातडीने बैठक न बोलावल्यास सोमवार दिनांक २३ मार्चपासून सर्फनाला धरणाचे चालू असलेले काम व लाभ क्षेत्रात सोडले जाणारे पाणी बंद करण्याचा निर्णय प्रकल्पग्रस्तांनी घेतला होता. या पार्श्वभूमीवर लेखी पत्रही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते.
त्यानंतर प्रशासकीय पातळीवर हालचाली होऊन २३ मार्च रोजी याबाबत बैठक बोलवण्यात आली आहे.
प्रमुख प्रश्न…
१. नवीन वसाहत देवरे व शरद मधील नागरी सुविधा सुस्थितीत करून मिळाव्यात.
२. लाभक्षेत्रात वाटप केलेल्या जमिनीचे सातबारा/ आठ अ आदेश झाले आहेत परंतु कब्जा पट्टी झालेली नाही. कब्जा पट्टी देऊन जमीन ताब्यात द्यावी.
३. लाभक्षेत्रात वाटप झालेल्या जमिनींचे नकाशे बदली करावे.
४. देवर्डे नवीन वसाहत जंगल सीमेला लागून असलेल्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधून द्यावी.
५. दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी कलम २८-अ चा निवाडा मंजूर झालेला असून त्याचा निधी प्रांत कार्यालयाकडे पाठवावा.
६. देवर्डे व शेळप या दोन्ही वसाहतींना महसूल दर्जा मिळावा.
७. देवर्डे वसाहतीतील शिल्लक भूखंड २०% राखीव ठेवून उर्वरित भूखंड प्रकल्प प्रवर्तकांना शासनाच्या दराने द्यावेत.
आजरा शहरातील अतिक्रमणांविरोधात कारवाईची मागणी : अन्याय निवारण समितीचा नगरपंचायतीला इशारा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शहरातील मुख्य बाजारपेठ व महामार्ग परिसरात वाढलेल्या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी तीव्र होत असून नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आजरा अन्याय निवारण समितीच्या वतीने नगरपंचायत प्रशासनाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
समितीने नगरपंचायत आजरा येथील मुख्याधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बाजारपेठेत अनेक व्यापाऱ्यांनी गटारांवर, रस्त्याच्या कडेला तसेच फुटपाथवर अतिक्रमण करून व्यवसाय सुरू ठेवला आहे. काही ठिकाणी ग्राहकांसाठी खुर्च्या ठेवून रस्ताच व्यापण्यात आला आहे. तसेच हातगाड्या, जाहिरात फलक व विविध साहित्य रस्त्यावर ठेवण्यात येत असल्याने वाहतुकीस गंभीर अडथळे निर्माण होत आहेत.
पंचायत समिती ते आजरा न्यायालय या महामार्गावरील रहदारीत मोठी वाढ झाली असून अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे. शहरात अनेक बँका, शासकीय कार्यालये व व्यापारी आस्थापने असल्याने दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिक व कर्मचारी दुचाकी वाहनांनी ये-जा करतात. मात्र, नियोजनबद्ध पार्किंगची सुविधा नसल्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा अधिकच बोजवारा उडत असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सम-विषम तारखेनुसार एकाच बाजूस पार्किंग व्यवस्था लागू करून तिची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी समितीने केली आहे. तसेच अतिक्रमण हटविताना कोण गरीब, कोण प्रभावशाली किंवा कोणाचे राजकीय पाठबळ आहे, याचा विचार न करता कायद्याच्या चौकटीत सर्वांवर समान कारवाई करण्यात यावी, असा ठाम आग्रहही व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, नगराध्यक्षांनी निवडणुकीपूर्वी बाजारपेठ व महामार्गावरील अतिक्रमणे हटविणे हे प्राधान्याचे काम राहील, असे जाहीर केले होते. त्या अनुषंगाने आता नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच आवश्यक असल्यास आजरा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संयुक्त कारवाई मोहीम राबवून अतिक्रमणे हटविणे गरजेचे असल्याचे समितीने नमूद केले आहे.
तत्काळ कारवाई न झाल्यास नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही समितीने दिला आहे. दरम्यान, दिनांक १७ मार्च २०२६ रोजी नगराध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
या निवेदनावर नगरसेवक श्री. परशुराम बामणे यांच्यासह पांडुरंग सावरतकर, जोतीबा आजगेकर, बंडोपंत चव्हाण, दिनकर जाधव, रविंद्र नेवरेकर, संजय जोशी, संतोष बांदिवडेकर व जावेद पठाण यांच्या सह्या आहेत.

उत्तूरच्या महिला आता कबड्डीच्या मैदानात.

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर (ता.आजरा ) येथील महिला पारंपरिक सामाजिक बंधने तोडून कबड्डीच्या मैदानात बाजी मारत आहेत. कब्बडी खेळणा-या या महिलांनी कौटुंबिक आणि सामाजिक अडथळ्यांवर मात करून आत्मसन्मान आणि शारीरिक क्षमता सिद्ध केली आहे. हा खेळ त्यांच्यासाठी सक्षमीकरणाचे साधन बनला आहे.
राजश्री शाहू महाराज कला अकादमीच्या कार्यकर्त्या निता घोरपडे यांनी उत्तूर गावातील तळागळातील महिलाना कबड्डी खेळण्यासाठी प्रोत्साहीत केले.
सोनारवाडी(ता. चंदगड) येथे महिलांच्या कब्बडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नामांकित संघ यामध्ये सहभागी झाले होते. या संघाला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. संघातील सर्व खेळाडूंचा सन्मान पत्र व पदक देऊन सन्मानित करण्यात आले. या संघात
अश्विनी कृष्णा शिंदे, सुनीता दशरथ आरेकर, ऋतुजा रजिंद्र चव्हाण, शीतल बाळकृष्ण भाईगडे, वैशाली राजेंद्र बामणे,मनिषा गजानन कुंभार, आयेशा विश्वास माने.स्वाती बाहुबली हजारे.सवीता गणपती चव्हाण यांचा समावेश आहे .
तेजस्वीनी राजेंद्र बामणे यांनी मार्गदर्शक (कोच) म्हणून काम पाहिले.

गौरव…

येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील शिक्षक श्री.ए.वाय.चौगुले यांना राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशन व राजमाता जिजाऊ समिती कागल यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. विक्रम सिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

आजचे पंचांग
दिनांक : १९ मार्च २०२६/गुढीपाडवा
वार : गुरुवार
माह (अमावस्यांत) : फाल्गुन
माह (पूर्णिमांत) : चैत्र
ऋतु : वसंत
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : अमावस्या तिथी (सकाळी ०६.५३ पर्यंत) त्यानंतर प्रथम तिथी
नक्षत्र : उत्तराभाद्रपदा नक्षत्र (२० मार्च पहाटे ०४.०४ पर्यंत) त्यानंतर रेवती नक्षत्र
योग : शुक्ल योग (२० मार्च पहाटे ०१.१६ पर्यंत) त्यानंतर ब्रह्म योग
करण : नागवा करण (सकाळी ०६.५३ पर्यंत) त्यानंतर किंस्तुघना करण (सायंकाळी ०५.५५ पर्यंत) त्यानंतर भाव करण
चंद्र राशी : मीन राशी
सूर्य राशी : मीन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०२.१७ ते दुपारी ०३.४७ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.२२ ते दुपारी ०१.१०
सूर्योदय : सकाळी ०६.४५
सूर्यास्त : सायंकाळी ०६.४८
संवत्सर : विश्वावसु
संवत्सर(उत्तर) : सिद्धार्थी
विक्रम संवत: २०८२ विक्रम संवत
शक संवत: १९४७ शक संवत.

छायावृत्त…

पावसामुळे आजरा महागाव मार्गावर केलेल्या रस्ता खुदाईमुळे या मार्गावर अनेक ठिकाणी अवजड वाहने चिखलामुळे अडकून पडली होती.
फोटो क्लिक…

पहिल्याच पावसाने शहरातील गटर्स स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

भीती इंधन टंचाईची… गुढीपाडवा व रमजान ईदच्या तोंडावर इंधन टंचाईची भीती असल्यामुळे नागरिकांनी काल बुधवारीही गॅस सिलेंडर वितरण केंद्रावर गर्दी केली होती.


