रविवार दि.५ आक्टोंबर २०२५


तिघांना मंगळवार पर्यंत पोलीस कोठडी
बोगस सोने प्रकरण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मुथुट फिनकॉर्प कंपनीच्या आजरा शाखेत खऱ्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करून त्याजागी बनावट सोने ठेवून फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी एरीया मॅनेजर संदीप जामदार यांनी फिर्याद दिल्यानंतर यातील मुख्य संशयित दिनकर रामचंद्र वडर (रा. कानडेवाडी, ता. गडहिंग्लज) याच्यासह स्नेहल शिवाजी माडभगत (रा. दर्डेवाडी, ता. आजरा) व नोवेल लोबो (रा. आजरा) या तिघांना पोलीसांनी अटक केली आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी दिली.
संशयितांना आजरा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना मंगळवार दि. ७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खऱ्या सोन्याच्या दागिन्यांच्या जागी बनावट दागिने ठेवून २१ लाख ५२ हजार १८३ रूपयांचा अपहार करण्यात आला आहे. यातील अन्य संशयित इरशाद अहमद चाँद (रा. आजरा), शांताराम पांडूरंग कोबळे (रा. कानडेवाडी, ता. गडहिंग्लज), गणेश आनंदा सावंत (रा. अवचितनगर, बांबवडे, ता. शाहुवाडी), गुणाजी विष्णू नेवगे (पोळगांव, ता. आजरा) है बिजय तानाजी देसाई (रा कानडेवाडी) यांचा पोलीस शोध घेत आहेत.

वनश्री रेस्टॉरंटचे आज उद्घाटन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गडहिंग्लज येथे नव्याने सुरू होत असलेल्या वनश्री फॅमिली रेस्टॉरंट चे उद्घाटन आज रविवारी सायंकाळी सहा वाजता होत आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री नाम. हसन मुश्रीफ व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री नाम. प्रकाश आबीटकर यांच्या हस्ते होत आहे.
भडगाव रोड, गडहिंग्लज येथे सुरू होत असलेल्या या रेस्टॉरंट मुळे शाकाहारी व मांसाहारी खवैय्यांची चांगली सोय होणार आहे. सदर उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन उद्योजक सुरेश होडगे, संदीप दावणे यांनी केले आहे.

भगवा रक्षक नवरात्रोत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम
पूरग्रस्तांना दिला मदतीचा हात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील भगवा रक्षक नवरात्रोत्सव मंडळाने मराठवाडा येथे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नवरात्र उत्सव कालात भपकेबाजपणा टाळून ६०० उपयोगी साहित्याची पूरग्रस्थांसाठी समारंभपूर्वक पाठवले. मंडळाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी मंडळाचे संस्थापक संजयभाऊ सावंत, पत्रकार ज्योतिप्रसाद सावंत अध्यक्ष रवी तळेवाडीकर, सचिव प्रदीप पाचवडेकर, उपाध्यक्ष रोहित नार्वेकर, सिद्धेश नाईक, परेश पोतदार, कौस्तुभ देसाई, अमित महाडिक, प्रसाद ओतारी सुमित सावंत,विश्वजीत सावंत, शशिकांत अंगणे, विजय नेवरेकर, संदीप नेवरेकर, दत्ता गोवेकर, दीपक हरणे, अभिजीत भातखंडे, सुनील शेवाळे, अतुल पाटील, अरविंद पारपोलकर, सुमेध वालावलकर, सुधाकर मनोळकर, देवदत्त नाईक,निशिकांत सावंत, ओंकार पाचवडेकर यांच्यासह पोलीस कर्मचारी व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यरंडोळ येथे महिला नेतृत्व विकास कार्यशाळा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
यरंडोळ ता. आजरा येथे कोकण विकास सोसायटी, पणजी व सामाजिक संवेदना संस्था, आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने आजरा तालुक्यातील महिलांची नेतृत्व विकास कार्यशाळा पार पडली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच सरिता पाटील यांनी “सावित्रीबाई फुले” यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून सुरुवात केली.याप्रसंगी तहसीलदार आजरा समीर माने, गटविकास अधिकारी सुभाष सावंत, कोकण विकास सोसायटी पणजीचे डायरेक्टर फा.रॉयस्टन, कॉ.संपत देसाई सामाजिक कार्यकर्त्यां लता पाकले, स्टेट समन्वयक सोपीया, कार्यक्रम समन्वयक राजेंद्र कांबळे, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश मंडळ अधिकारी जाधव,ग्राम महसूल अधिकारी निकम,उपसरपंच भीमराव माधव, पेरणोली सरपंच, पारपोली सरपंच हाळोली-मेढेवाडी सरपंच उपस्थित होते.
उपसरपंच भीमराव माधव यांनी एरंडोळ गावात welead ची महिलांच्या नेतृत्व विकास कार्यशाळा होत असल्याबद्दल आनंद होत असल्याचे सांगूनहआपल्या गावची निवड केल्याबद्दल कोकण विकास सोसायटीचे आभार मानले.
कार्यक्रमाचा उद्देश,प्रस्तावना सामाजिक संवेदना संस्थेचे कार्याध्यक्ष प्रकाश मोरुस्कर यांनी केले.आजरा तालुक्यातील पारपोली,पेरणोली, एरंडोळ,हाळोली- मेंगडेवाडी,गवसे व कानोली या “महिला सरपंच ” असलेल्या ग्रामपंचायत कार्यक्रमामध्ये कोकण विकास सोसायटीच्या सहकार्याने महिलांच्या नेतृत्व विकास, कार्यक्षमता, सक्षमीकरण व बळकटीकरण यांच्या वाढीचा कार्यक्रम “तीन”वर्षे घेण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्यात निवड केलेल्या प्रत्येक गावात ओळख,जागरूकता कार्यक्रम,महिला सरपंच, महिला सदस्य यांचे पंचायत राजविषयी प्रशिक्षण, पुरुष सदस्य व युवा वर्ग यांचेही प्रशिक्षण घेण्यात येईल.यशदाच्या सगळ्यात चांगल्या संस्थांच्या प्रशिक्षकामार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
समीर माने, तहसीलदार आजरा यांनी करतांना “welead “या महिलांच्या विकास नेतृत्वाची कार्यशाळा आजरा तालुक्यात घेत असल्याबद्दल आनंद होत असल्याचे सांगितले. कुटुंब, ग्रामपंचायत आणि सामुदायिक जागांमध्ये निर्णय घेण्यावर भर देत नेतृत्वाच्या भूमिकेत महिलांच्या सहभागाचे महत्व अधोरेखित केले.महिलांना सक्षम,बळकट करण्यासाठी आणि स्थानिक प्रशासन घडवण्यात सक्रीय योगदान देणारे म्हणून पुढे येण्यास प्रोत्साहन दिले.
गटविकास अधिकारी सुभाष सावंत यांनी आपल्या भाषणात राष्टीय ग्रामीण उपजीविका अभियान(NRLM) आणि शाश्वत विकास निर्देशांकवर भर देऊन, राज्य सरकारच्या विविध योजनांच्या विषयी माहिती दिली.अशा उपक्रमांमुळे महिला सक्षमीकरण आणि शाश्वत समुदाय विकासात थेट कसा हातभार लागू शकतो यावर त्यांनी भर दिला.
यावेळी कॉ.संपत देसाई यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी समन्वयक राजेंद्र कांबळे, ग्रामपंचायत क्षेत्रातील महिला सदस्य,नेतृत्व घडवू पाहणाऱ्या विविध ग्रामपंचायत क्षेत्रातील महिला, शासकीय अधिकारी,गावातील पदाधिकारी उपस्थित होते.
आभार उपसरपंच भीमराव माधव यांनी मानले.

आजरा साखर कारखान्यामार्फत शेतकरी मेळावा…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.अमृतनगर गवसे च्या वतीने सर्व ऊस उत्पादक शेतक-यांना ऊस पीक व सरासरी एकरी ऊस उत्पादन वाढीबाबत माहिती देणेसाठी शुक्रवार दि.१० रोजी सकाळी ११ वाजता जनता सहकारी बैंक लि. आजरा या बँकेच्या हॉलमध्ये शेतकरी मेळाव्याचे आयोजन कारखान्यामार्फत केले आहे. सदर मेळाव्यात ऊस पीक वाढविणेसाठी टिश्यू कल्चर, सेंद्रीय व रासायनीक खतांचा वापर, ठिबक सिंचन इ. विषयावर कृषि विभागाचे सहसंचालक श्री. बसवराज भिमाप्पा मास्तोळी तसेच वसंतदादा शुगरचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडलक, व शास्त्रज्ञ डॉ. कपिल विजयराव सुशीर व जिल्हा कृषी विभागाचे अधिकारी श्री. जालींदर मुरलीधर पांगरे, श्री. नामदेव शिवाजी परीट, श्री. किरण जयसिंग पाटील, श्री. भुषण पंडीत पाटील व भारती ग्रीनटेक प्रा.लि.चे अधिकारी श्री. विनय भालचंद्र पोळ हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी सदर शेतकरी मेळाव्यास ऊस उत्पादक शेतक-यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे कारखान्याचे चेअरमन श्री. मुकुंदराव देसाई यांनी आवाहन केले आहे.
उत्तूर–बहिरेवाडी रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा ! प्रशासनाचे दुर्लक्ष कायम

उत्तूर : मंदार हळवणकर
उत्तूर ते बहिरेवाडी हा प्रमुख रस्ता सध्या खड्डेमय झाला असून नागरिकांचे हाल होत आहेत. या रस्त्यावर १०० मीटरच्या अंतरावर शंभराहून अधिक खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे प्रवाशांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरू आहे. उत्तूर ते मुम्मेवाडी रस्त्याचे चौपदरीकरण सुरू असल्याने वाहतुकीचा मोठा भार या मार्गावर वळवण्यात आला आहे. परिणामी या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात वाहतूक होत असून, खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता वाढली आहे.दरवर्षी बहिरेवाडी जवळील रस्ता पावसाळ्यानंतर पूर्णतः खराब होतो. तरीही प्रशासनाकडून केवळ तात्पुरते, दुय्यम पद्धतीचे काम करून विषय मिटवला जातो.
नागरिक, विद्यार्थी व चाकरमानी रोज या मार्गावरून प्रवास करत असल्याने त्यांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे.
या मार्गावर असलेल्या कॉलेजमध्ये अनेक विद्यार्थी ये-जा करतात. त्यामुळे रस्त्याची असुरक्षित स्थिती त्यांच्या जीवितास धोका निर्माण करते. पर्यायी मार्ग नसल्याने नागरिकांना या खड्डेमय रस्त्यावरूनच प्रवास करावा लागत आहे.
खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे ? हा प्रश्न आता नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. उत्तूर–बहिरेवाडी रस्ता नॅशनल हायवेला जोडला गेल्यामुळे येथे सतत वाहतुकीचा ताण असतो. तरी देखील प्रशासनाचे या गंभीर विषयाकडे संपूर्ण दुर्लक्ष दिसून येत आहे.रस्त्याचे तात्काळ दुरुस्ती काम हाती घ्यावे,कायमस्वरूपी डांबरीकरण करून प्रवाशांचा जीवितास असणारा धोका टाळावा,
चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. अशी नागरिकांची मागणी सध्या जोर धरत आहे.
बहिरेवाडी – आलूर रस्त्याची ही दुर्दशा
केवळ उत्तूर- बहिरेवाडीच नाही तर बहिरेवाडी ते आलूर रस्त्यावरही प्रचंड प्रमाणावर खड्डे पडले आहेत. हे खड्डे इतके मोठे आहेत की या मार्गावरून प्रवास करताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर असणाऱ्या या रस्त्याची त्वरित डागडूजी होणे आवश्यक आहे.

आजरा महाविद्यालयातील तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्राजक्ता चौगुले तर निबंध स्पर्धेत रसिका सुपल प्रथम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा महाविद्यालयात झालेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्राजक्ता चौगुले तर निबंध स्पर्धेत रसिका सुपल यांनी प्रथम क्रमांक मिळविला. अण्णाभाऊ स्मृती पंधरवडानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. निबंध स्पर्धेसाठी २३ तर वक्तृत्व स्पर्धेसाठी १७ स्पर्धकांनी भाग घेतला.
स्पर्धेचे उद्घाटन जनता एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे व संचालक विजयकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत सौ.व्ही.एस.देसाई यांनी केले. प्रास्ताविक उपप्रचार्य डी.पी. संकपाळ यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.आर. आर. पवार तर आभार श्रीमती एस. आर.माने यांनी मानले.
वक्तृत्व स्पर्धेत…. प्रथम – प्राजक्ता नामदेव चौगुले, द्वितीय – आदिती सुजय चव्हाण, तृतीय – ज्योती परसू नाईक तर उत्तेजनार्थ ओवी विशाल रेळेकर यांनी क्रमांक मिळविला तर निबंध स्पर्धेत प्रथम – रसिका विठोबा सुपल, द्वितीय – अमृता विजय करंबळी, तृतीय – प्रियांका युवराज सुतार तर उत्तेजनार्थ सानिका सोनबा पारपोलकर यांना मिळाला. सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.एन. सादळे, उपप्राचार्य डी.पी. संकपाळ, अधीक्षक योगेश पाटील, पर्यवेक्षक एम. एस. पाटील यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सहभागी सर्व शाळांना स्मृतीचिन्ह व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

निधन वार्ता
विलास पोवार

कोवाडे ता. आजरा येथील गिरण व्यावसायिक विलास महादेव पोवार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, सून असा परिवार आहे.


