गुरूवार
१ ऑक्टोबर २०२६

गतवर्षीच्या ऊसाला आणखी प्रति टन शंभर रुपये दिवाळीपूर्वी देणार : अध्यक्ष मुकुंद देसाई ; आजरा साखर कारखान्याची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न…

आजरा : प्रतिनिधी
वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने २०२५-२६ सालाकरिता गाळप झालेल्या उसाला प्रति टन शंभर रुपये आणखी देण्यात येणार आहेत. हे पैसे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील. कामगार वर्गाची देणीही टप्प्याटप्प्याने देण्याचे संचालक मंडळाचे नियोजन आहे असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद देसाई यांनी केले. ते वसंतराव देसाई आजरा शेतकरी साखर कारखान्याच्या ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
उपाध्यक्ष अनिल फडके यांनी स्वागत केले. संचालक रणजीत देसाई यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. पाच गटातील तसेच कार्यक्षेत्राबाहेर जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. कार्यकारी संचालक संभाजी सावंत यांनी नोटीस वाचन केले. कार्यालय अधीक्षक अनिल देसाई यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचले.
प्रास्ताविक करताना अध्यक्ष मुकुंद देसाई म्हणाले, आजरा साखर कारखान्याला सभासद, कर्मचारी व ऊस उत्पादक, मुंबईकर सभासद यांचे नेहमीच मोलाचे सहकार्य राहिले आहे. साखर कारखानदारी सध्या अडचणीच्या अवस्थेतून वाटचाल करत आहे. त्यामुळेच गतवर्षी एनसीडीसीच्या माध्यमातून कारखान्याला १२२ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर झाले. सध्याच्या काळात साखरेचे दर वाढले मात्र त्याचा कारखान्यांना कोणताही लाभ झाला नाही. आगामी सन २०२६-२७ या हंगामात साखर कारखान्याने चार लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. तालुक्यातील सर्व ऊस उत्पादकांनी पिकवलेला सर्व ऊस आजरा कारखान्यालाच पाठवावा त्यामुळे कारखाना सक्षमपणे चालवण्यास हातभार लागेल.

यावेळी माजी अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई, इंद्रजीत देसाई, सुनील शिंदे,संजय देसाई यांनी कारभाराबाबत सूचना केल्या. यावेळी जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई, संचालक वसंतराव धुरे, विष्णूपंत केसरकर, उदयराज पवार, मधुकर देसाई, सुभाष देसाई, मारुती घोरपडे, दीपक देसाई, संभाजी पाटील, शिवाजी नांदवडेकर, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, सौ.रचना होलम,सौ. मनीषा देसाई, काशिनाथ तेली, अशोक तर्डेकर, हरी कांबळे, नामदेव नार्वेकर दिगंबर देसाई यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई, पंचायत समिती सदस्य विकास चोथे, तालुका संघ अध्यक्ष महादेव हेब्बाळकर, माजी संचालक राजेंद्र सावंत, जनार्दन टोपले, विक्रमसिंह देसाई, विठ्ठल देसाई,राजू होलम,विक्रम देसाई, सचिन पावले यांच्यासह सभासद व कर्मचारी उपस्थित होते.
एकनाथ गिलबिले यांनी सूत्रसंचालन केले. संचालक राजेंद्र मुरकुटे यांनी आभार मानले.

पाणी नाही तर पाणीपट्टीही नाही ; मलिग्रे ग्रामपंचायतीला ग्रामस्थांचा इशारा

मलिग्रे : प्रतिनिधी
नळपाणी कनेक्शनला सुरळीत व समप्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याने त्रस्त झालेल्या मलिग्रे येथील खडकवाडी वसाहतीतील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला जाब विचारत पाणी मिळाले नाही तर कोणताही महसूल व पाणीपट्टी भरणार नाही असा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन दि. २९ रोजी विद्यमान प्रशासक व ग्रामसेवक यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे. खडकवाडी वसाहतीमधील काही ठराविक कुटुंबांना समाधानकारक पाणी मिळत नाही. ही समस्या यापूर्वी तोंडी तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून तत्कालीन सरपंचांच्या निदर्शनास आणून दिली होती. ग्रामसभेत वारंवार हा मुद्दा उपस्थित केला तरी ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे.
ग्रामपंचायतीने आकारलेली पाणीपट्टी व घरफाळा इतर लोकांप्रमाणेच आम्हीही दरवर्षी भरतो, मग आम्हालाच पाण्यापासून वंचित का राहावे लागते, असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. इतरांना जितके पाणी मिळते तितके पाणी आम्हालाही मिळाले पाहिजे, अन्यथा त्रस्त कुटुंबे कोणताही महसूल किंवा पाणीपट्टी भरणार नाहीत आणि याला सर्वस्वी ग्रामपंचायत जबाबदार राहील, असा इशारा निवेदनात दिला आहे.
या निवेदनाची प्रत गटविकास अधिकारी, आजरा यांनाही देण्यात आली आहे. निवेदनावर स्वप्निल बबन भगुत्रे, रामदास राऊ भगुत्रे, लक्ष्मण धोंडीबा चौगुले, बबन राऊ भगुत्रे, संगीता महादेव तोडकर, सुनिता अशोक बुगडे, प्रकाश भैरू बुगडे, नंदा दत्तात्रय चौगुले, संतोष कागिनकर, संदीप कागीनकर आदी खडकवाडी येथील ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
ग्रामपंचायतीच्या टाक्या गेल्या कुठे…?
ग्रामपंचायत मालकीच्या दोन टाक्या गेल्या कुठे हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे संबंधितांनी या टाक्या वैयक्तिक न वापरता ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या ग्रामस्थांकरता वापराव्यात अशीही मागणी केली जात आहे.

आजरा महाविद्यालयात मोफत आरोग्य शिबिर ; १२० जणांची रक्त तपासणी

आजरा : प्रतिनिधी
आजरा महाविद्यालय, आजरा येथील एन.सी.सी. विभाग, प्राणीशास्त्र विभाग आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटगी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात एकूण १२० जणांची रक्त तपासणी करण्यात आली.
शिबिराचे नियोजन व मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. किरण पोतदार, उपप्राचार्य श्री. दिलीप संकपाळ, पर्यवेक्षक श्री. मनोजकुमार पाटील, कार्यालयीन अधीक्षक श्री. योगेश पाटील, एन.सी.सी. प्रमुख लेफ्टनंट डॉ. संजय चव्हाण आणि प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. विनायक आजगेकर यांनी केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटगीचे प्रमुख डॉ. संतकुमार तनवर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती सुतार, श्री. एम. एस. सय्यद, श्री. डी. आर. हरणे, श्रीमती सुचिता वर्धन, श्रीमती मनीषा परीट, श्री. स्वप्नील माने आणि श्री. राहुल नाईक यांनी आरोग्य तपासणी केली. यावेळी उपस्थितांची आरोग्य तपासणी करून १२० रक्तनमुने घेण्यात आले आणि तपासणी अहवाल सादर करण्यात आले.
विद्यार्थी व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटगी येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यात आले.

संत तुकाराम दूध संस्थेला ७२ हजाराचा नफा
६ वी सर्वसाधारण वार्षिक सभा… प्रतिलिटर ४ रुपये रिबेट वाटप

आजरा : प्रतिनिधी
पेरणोली येथील संत तुकाराम दूध संस्थेत सभासदांना प्रती लिटर ४ रूपये प्रमाणे सन २५- २६ सालाकरिता रिबेट वाटप केले.असून संस्थेला ७२ हजार ६१५ रूपयाचा नफा झाल्याची माहिती अध्यक्ष राजेंद्र सावंत यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना दिली.
तसेच एकूण खेळते भांडवल १३ लाख १६४८५ हजार रुपये असल्याचे सांगितले. सचिव तानाजी कांबळे यांनी अहवाल वाचन केले.
यावेळी दूध उत्पादन वाढविणे, म्हैस खरेदी करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. दूध उत्पादनात मंगेश सावंत (प्रथम), विठोबा सासूलकर (द्वितीय), विठोबा नावलकर (तृतीय), रंगराव नावलकर (चतुर्थ), तानाजी सासूलकर (पाचवा) क्रमांक आलेल्यांचा व क्रिडा शिक्षक पदी निवड झाल्याबद्दल प्रतिक्षा सासूलकर, प्रणाली सासूलकर व सीईटी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल अपूर्वा सावंत यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सर्व संचालक व सभासद उपस्थित होते.अमित सावंत यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष मंगेश सावंत यांनी आभार मानले.

निधन वार्ता
गणपती गुरव

आजरा : प्रतिनिधी
हरपवडे ता.आजरा येथील गणपती दत्तू गुरव (वय ७२ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा , मुलगी, सुन व नातवंडे असा परिवार आहे .
विद्यामंदीर हरपवडे शाळा शिक्षण कमिटीचे अध्यक्ष श्री. सागर गणपती गुरव यांचे ते वडील होत.

छाया वृत्त …

जोल्ले ग्रुप संचलित श्री बिरेश्वर को ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड, एक्संबा (मल्टी- स्टेट) शाखा – आजराचे शाखा व्यवस्थापक श्री. दत्तात्रय सुतार यांच्या पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी मुख्य कार्यालयाकडून देण्यात येणाऱ्या वैद्यकीय मदतीच्या मंजुरीचे पत्र शाखा अध्यक्ष ज्योतिप्रसाद सावंत यांच्या हस्ते व संचालक सुरेश मिटके, महेश कुरुणकर, सुशांत निकम, तानाजी डोणकर, अनिकेत शिंत्रे व विठोबा मंदिर नबापूरचे ट्रस्टी समीर मोरजकर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
यासंदर्भात जोल्ले ग्रुप चे संस्थापक माजी खासदार व बेळगावी जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री.अण्णासाहेब जोल्ले , सहसंस्थापिका, माजी मंत्री व आमदार सौ. शशिकला जोल्ले यांनी विशेष सहकार्य केल्याचे शाखा अध्यक्ष ज्योतिप्रसाद सावंत यांनी सांगितले.

आजचे पंचांग
दिनांक : १ ऑक्टोबर २०२६
वार : गुरुवार
माह (अमावस्यांत) : भाद्रपद
माह (पूर्णिमांत) : आश्विन
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : पंचमी तिथी (दुपारी १२.३५ पर्यंत) त्यानंतर षष्ठी तिथी
नक्षत्र : रोहिणी नक्षत्र ( २ ऑक्टोबर सकाळी ०४.२६ पर्यंत) त्यानंतर मृगशीर्ष नक्षत्र
योग : सिद्धि योग (रात्री ०९.१७ पर्यंत) त्यानंतर व्यातीपात योग
करण : तैतुला करण (दुपारी १२.३५ पर्यंत) त्यानंतर गराजा करण
चंद्र राशी : वृषभ राशी
सूर्य राशी : कन्या राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०१.५७ ते दुपारी ०३.२७ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०४ ते दुपारी १२.५२
सूर्योदय : सकाळी ०६.३०
सूर्यास्त : सायंकाळी ०६.२६
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत
