mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरगुन्हाठळक बातम्याभारतमहाराष्ट्रराजकीयरोजगारसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

शुक्रवार   दि. १९ सप्टेंबर २०२५   

 

आजऱ्यात ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत स्मृतिदिन उत्साहात


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा नगरीचे सुपुत्र, ख्यातनाम साहित्यिक ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरातर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत स्मृतीदालन आजरा येथे शिवाजी सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते करण्यात आले. वाचनालयाचे अध्यक्ष वामन सामंत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पत्रकार ज्योतिप्रसाद सावंत, डॉ. शिवशंकर उपासे व चंद्रशेखर बटकडली यांनी यावेळी आपल्या मनोगतातून शिवाजी सावंत यांच्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी नगराध्यक्षा ज्योत्स्ना पाटील चराटी, डॉ. शिवशंकर उपासे, इंजिनीअर विजयकुमार पाटील, पत्रकार सुनिल पाटील, चंद्रशेखर बटकडली, आप्पा पावले, संभाजीराव सावंत, शैला टोपले, वाचन मंदिराच्या उपाध्यक्षा विद्या हरेर, कार्यवाह कुंडिलिक नावलकर, सहकार्यवाह रविंद्र हुक्केरी, संभाजीराव इंजल, विजय राजोपाध्ये, सदाशिव मोरे, महंमदअली मुजावर, बंडोपंत चव्हाण, विनायक आमणगी, डॉ. अंजनी देशपांडे, सुचेता गडडी, गीता पोतदार, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर, राजेंद्र सावंत, गौरव देशपांडे, संयोगिता सुतार, प्रेमा साठे, शुभांगी चोडणकर, निखील कळेकर, महादेव पाटील, महादेव पोवार यासह स्वामी विवेकानंद विद्यामंदिर आजरा चे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते.

शिवाजी सावंत यांच्या स्मृतिदिनानिमित्त ग्रंथालयाच्यावतीने दिनांक १६ व १७ सप्टेंबर रोजी शालेय व खुल्या गटाच्या वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन कारण्यात आले. या स्पर्धाना विद्यार्थी, शिक्षक, पालक यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. तसेच दिनांक १६ ते १८ सप्टेंबर पर्यंत वाचनालयात ग्रंथप्रदर्शन आयोजित कारण्यात आले. या प्रदर्शनास आजरा शहरातील व तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थी, शिक्षक व ग्रंथालयाच्या वाचकांनी भेट देऊन प्रदर्शनाचा लाभ घेतला.

पंडित दीनदयाळ विद्यालयामध्ये ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांना अभिवादन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

पंडित दीनदयाळ विद्यालयामध्ये ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. शिवाजी सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक संजीव देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. शिवाजी सावंत यांचे आजऱ्यातील बालपण ,त्यांचे शिक्षण, त्यांनी लिहिलेले साहित्य याची माहिती विजय राजोपाध्ये यांनी विद्यार्थ्यांना सांगितली. शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजय ,अशी मने असे नमुने, छावा तसेच युगंधर या कादंबऱ्यांची ओळख त्यांनी करून दिली. कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.

आजऱ्यात सोळावा आंतरराष्ट्रीय बांबू दिन उत्साहात साजरा

बांबू हस्तकला मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

भूगोल व पर्यावरण शास्त्र विभागाच्या वतीने १६ व्या जागतिक बांबू दिनानिमित्त आजरा महाविद्यालय, आजरा येथे “बांबू हस्तकला मार्गदर्शन व प्रशिक्षण” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे स्वागत प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे यांनी केले, तर प्रास्ताविक
श्री. रणजीत कालेकर यांनी मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बांबूचे पर्यावरणीय, आर्थिक आणि सामाजिक महत्त्व अधोरेखित केले.

या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक मा. रितेश ढोले (बांबू डिझायनर व टेक्स्टाईल इंजिनिअर, नागपूर) होते. त्यांनी बांबूच्या विविध प्रजाती, त्यांचे उपयोग, तसेच बांबूपासून तयार होणाऱ्या हस्तकलावस्तूंचा सखोल आढावा घेतला. विशेषत: बांबूपासून बनणाऱ्या वस्तूंची निर्मिती कौशल्य, निर्मिती मूल्य व बाजार मूल्य, स्थानिक , राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, त्यांची विक्री क्षमता व मूल्य याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती दिली.
तसेच हिरण्यकेशी बांबू ग्राम विकास गट व अश्वघोष बांबू रोपवाटिका व स्टुडिओचे चे बांबू अभ्यास सतीश कांबळे यांनी आजऱ्यामध्ये असणाऱ्या व माणगाव व मेसकाठी या प्रजातीच्या बांबूपासून विविध प्रकारचे वस्तू निर्मिती प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र पोवार इंडस्ट्रीज येथे दिले जाते

कार्यक्रमासाठी ICAR, बेंगळुरू येथील संशोधक विद्यार्थी यशवंत कुमार, किशोर यादव, सुधा सुमन व हर्षद देसाई यांचा सहभाग विशेष ठरला ‌.

झेप अकॅडमीमुळे मिळाले पहिल्या प्रयत्नात यश

कु. सिद्धी देसाईचा  विशेष सत्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

गडहिंग्लज येथील ज्ञानदीप प्रबोधिनी संचलित झेप ॲकॅडमीच्या आजरा येथील अभ्यासिकेमध्येच ग्रामीण मुलांच्या करिअरसाठी सर्व सुविधा उपलब्ध झाल्या.यामुळेच पहिल्या प्रयत्नात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत विक्रोकर निरीक्षक पदाचे यश मिळाले असे मत’ झेप’ची विद्यार्थीनी कु. सिद्धी अनिल देसाई हिने व्यक्त केले

ज्ञानदीप प्रबोधिनीचे अध्यक्ष श्री. एम. एल. चौगुले यांच्या मार्गदर्शनानुसार झेप अकॅडमीच्या शाखा आजरा येथे आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी सत्काराप्रती कृतज्ञता व्यक्त करताना ती बोलत होती. आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य महादेव नागुर्डेकर हे प्रमुख अतिथी तर ज्ञानदीप प्रबोधिनीचे सहसचिव प्रा. व्ही. के. मायदेव अध्यक्षस्थानी होते.

प्राचार्य नागुर्डेकर म्हणाले, मध्यमवर्गीयांना अर्थसहाय्य करुन रवळनाथ हौसिंग फायनान्सने अनेकांची घरे तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन झेप ॲकॅडमीने अनेक कुटुंबे उभी केली आहेत. त्यामुळे प्रामाणिक प्रयत्न करत राहील्यास निश्चितच आपल्याला यश मिळते.

प्रा. व्ही. के. मायदेव म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थी परिस्थिती आणि सुविधांच्या अभावामुळे मागे राहू नयेत यासाठी त्यांना आपल्या परिसरातच करिअरसाठी सर्व शैक्षणिक सुविधा मिळाव्यात या उद्देशाने ज्ञानदीप प्रबोधिनी संस्था कार्यरत आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमधून मिळवलेले यश ही या संस्थेच्या कार्याची खरी पोहोच पावती आहे.

प्रारंभी कु. सिद्धी देसाई यांचा प्राचार्य महादेव नागुर्डेकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला, यावेळी रवळनाथचे हौसिंग फायनान्सचे आजरा शाखा सल्लागार प्रा. डॉ. नवनाथ शिंदे, प्रा. राजीव टोपले व श्री. गौतम सुतार, श्री. अनिल देसाई, शाखाधिकारी श्री. दिपक शिदे यांच्यासह झेपचे विद्यार्थी, प्रशिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. झेपचे प्रशिक्षक श्रो. विवेक दड्डी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले झेप ॲकॅडमीच्या अधीक्षक गौरी बेळगुद्री यांनी सुत्रसंचलन केले. सीमा साठे यांनी आभार मानले.

बेकायदेशीर दारू विक्री प्रकरणी एका विरोधात गुन्हा नोंद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मडिलगे तालुका आजरा येथील तानाजी राजाराम पवार हे ३५२० रुपयांच्या देशी दारूची बेकायदेशीररित्या विक्री करत असताना पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडून मुद्देमाल ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

पोलीस हवालदार पांडुरंग येलकर पुढील तपास करीत आहेत.

निधन वार्ता
सखाराम पवार

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

धामणे ता. आजरा येथील सखाराम हरी पवार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते इंदुमती दूध संस्थेत सेक्रेटरी म्हणून कार्यरत होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, एक मुलगा व सहा नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

विष्णू आजगेकर


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

पेंढारवाडी तालुका आजरा येथील विष्णू जोती आजगेकर (वय ७० वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तिन विवाहीत मुले,व एक विवाहित मुलगी,सुना व नातवंडे असा परिवार आहे.

येथील ग्रामपंचायत सदस्य मिलिंद आजगेकर यांचे ते वडील होत.

उत्तूरमध्ये सेवा पंधरवड्यानिमित्य विविध उपक्रम.


उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
( मंदार हळवणकर)

उत्तूर येथे महसूल विभागाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन (दि. १७ सप्टेंबर) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती (दि. २ ऑक्टोबर) या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमात पहिला टप्पा पाणंद रस्ते सर्वेक्षण, दुसरा टप्पा सर्वांसाठी घरे आणि तिसरा टप्पा नाविन्यपूर्ण उपक्रम असा तीन टप्प्यांत कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करून त्यांची नोंद गाव नकाशावर घेण्याचे काम सुरू झाले असून त्यासाठी प्रत्येक गावात ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या आहेत. रस्त्यांची माहिती महसूल विभागाकडे नोंदवही स्वरूपात उपलब्ध होणार असून गावनिहाय अचूक नकाशे तयार केले जाणार आहेत. या प्रक्रियेमुळे गावातील प्रत्येक पाणंद रस्ता व पायवाट यांची स्पष्ट नोंद राहणार आहे.
उत्तूर मंडळातील मासेवाडी व चव्हाणवाडी या दोन गावांची या उपक्रमासाठी निवड करण्यात आली. मासेवाडीत आयोजित ग्रामसभेला प्रांताधिकारी हरेश सुळ, तहसिलदार समीर माने, मंडळ अधिकारी गीता कुंभार व ग्राम महसूल अधिकारी अशोक कुंभार उपस्थित राहून मार्गदर्शन केले. शिवार फेरी दरम्यान ग्रामस्थांकडून प्रत्यक्ष माहिती घेऊन तिचे नोंदवहीत रूपांतर करण्यात आले. तर चव्हाणवाडीत ग्राम महसूल अधिकारी एकनाथ मिसाळ यांनी ग्रामसभेत सेवा पंधरवड्याची माहिती दिली. त्यांनी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व ग्रामस्थांसह शिवार फेरी करून पाणंद रस्ते व पायवाटांची तपशीलवार माहिती गोळा केली.

या उपक्रमामुळे महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक होणार असून गावनिहाय अचूक माहिती उपलब्ध झाल्यामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास ग्राम महसूल अधिकारी एकनाथ मिसाळ यांनी व्यक्त केला.

सभासदांना १२% लाभांश देणार : चेअरमन शिवाजीराव देसाई
बळीराजा कुरकुंदेश्वर पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

बळीराजा कुरकुंदेश्वर पतसंस्था पेरणोलीची वार्षिक सभा उत्साहात उत्साहात पार पडली. यावेळी तेरीज, ताळेबंद व नफा तोटा पत्रकाचे वाचन मॅनेजर श्री. नेताजी पाटील यांनी केले.

अहवाल सालात संस्थेकडे १ कोटी १० लाख २४ हजार ४४५ इतके वसुलभागमंडवल असुन, १ कोटी ३३ लाख ६२ हजार ५४३ रूपयांचा राखीव व इतर निधी आहे संस्थेकडे १२ कोटी ७६ लाख ४८ हजार ९९२ इतक्या ठेवी असुन, सभासदांना १० कोटी १० लाख ३१ हजार ७८३ इतके कर्ज वितरीत केले आहे. संस्थेने तरलतेपोटी इतर बँका व संस्थामध्ये ५ कोटी २८ लाख ३२६ इतकी गुंतवणुक केलेली आहे संस्थेकडे १७ कोटी ४१ लाख ३१ हजार ३४० इतके खेळते भांडवल असुन, चालु आर्थिक सालात संस्थेला २४ लाख ७५ हजार २३० इतका निव्वळ नफा झाला आहे. सभासदांना १२% लाभांश देणेचे निश्चित केलेले आहे अशी माहिती चेअरमन शिवाजीराव देसाई यांनी दिली.

यावेळी गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार करणेत आला. यावेळी सभेला व्हा. चेअरमन सर्व संचालक मंडळ शाखेचे सर्व सल्लागार मंडळ, सभासद वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता. यावेळी शाखा अडकुरचे सल्लागार श्री. जयवंत देसाई, सभासदामधुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई, रविंद्र देसाई (सर), दिगंबर पाटील, उत्तम देसाई यांनी मनोगत व्यक्त केले.

स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे संचालक श्री इनास फर्नाडिस यांनी केले.सुत्रसंचालन दिपक देसाई यांनी केले, श्रध्दाजंली ठराव सुभाष पंडीत यांनी मांडला.आभार सुधिर निकम यांनी केले.

हनुमान विकास संस्थेची वार्षिक सभा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मौजे कोळिंद्रे येथे श्री हनुमान विकास सेवा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन श्री. सुरेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

अहवाल व आर्थिक पत्रके वाचन सचिव श्री. अमर मोरे यांनी केले
चालू आर्थिक वर्षात संस्थेला ५,२४,९०५ रूपये इतका नफा झाला आहे. संस्थेनं सभासदांना ७% लाभांश वाटप जाहीर केले आहे

सभेला व्हा चेअरमन सौ. जया पाटील , संचालक, रमेश बुगडे , आनंदा पाटील, जोतिबा बोर , जोतिबा पाटील , बबन जाधव, वंदना सावंत, आनंदी देसाई , एकनाथ लोहार, अशोक परिट, बाबू ठाणे उपस्थित होते.सभासदांच्या वतीने , सुभाष सावंत , प्रकाश पाटील , शिवाजी जाधव, राजाराम मोहिते यांनी प्रश्र्न विचारले.

आभार रमेश बुगडे यांनी मांडले.

छाया वृत्त…

धर्मवीर ची आई माऊलीचा पाद्यपूजन सोहळा आजरा येथे धर्मवीर नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने संपन्न झाला. या सोहळ्यासाठी स्वराज्य तालीम आजरा,जय शिवराय मंडळ आजारा, वाघाची तालीम आजरा, खंडोबा तालीम आजरा, दी लायन्स किंग आजरा या सर्व मंडळांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

डॉ. दीपक सातोसकर यांचा वाढदिवस उत्साहात

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

तोडणी ठेकेदारांकडून 8 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक : आजरा पोलिसात दोन ठेकेदाराविरोधात गुन्हा नोंद

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

पोश्रातवाडी येथून वृद्ध बेपत्ता….

mrityunjay mahanews

आजऱ्यात मधमाशांच्या हल्ल्यात 50 वर जखमी

mrityunjay mahanews
error: Content is protected !!