mrityunjaymahanews
अन्य

बुधवार – सातच्या बातम्या

बुधवार  दि.३० सप्टेंबर २०२६

मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासह आठवडी बाजार बंद निर्णयाबाबत चर्चेसाठी आजरा शहर एकसंघ व्यापारी मंडळाची नगरपंचायतीकडे धाव

आजरा : प्रतिनिधी

आजरा शहरातील वाढत्या समस्यांबाबत आजरा शहर एकसंघ व्यापारी मंडळाने मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना दोन स्वतंत्र निवेदने दिली.

मोकाट कुत्री व घोड्यांचा बंदोबस्त करा…

शहराच्या मुख्य बाजारपेठ, बस स्थानक आणि गल्लीबोळात मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांना, लहान मुले, महिला यांना चावा घेण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच मोकाट घोडे दुकानांसमोर व रस्त्यामध्ये उभे राहून भाजीपाला व व्यापाऱ्यांच्या मालाचे नुकसान करत आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याला मांस-चिकन विक्रेत्यांनी रस्त्यावर टाकलेले अवशेष आणि कचरा वाहतूक करणारे उघडे ट्रॅक्टर कारणीभूत असल्याचा आरोप मंडळाने केला आहे.

कुत्र्यांची तातडीने नसबंदी व लसीकरण मोहीम राबवणे,मोकाट घोड्यांच्या मालकांचा शोध घेऊन कडक कारवाई करणे, उघड्यावर मांसाचे अवशेष टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे,कचरा वाहतूक करणारे ट्रॅक्टर पूर्णपणे झाकून नेणे बंधनकारक करणे अशा मागण्या केल्या आहेत.

आठवडी बाजार / दुकाने बंदबाबत चर्चा करूनच निर्णय घ्या…

शहराच्या विकास, स्वच्छता, अतिक्रमण व बाजार नियोजनासंदर्भात दुकाने बंद ठेवण्याचे निर्णय घेताना व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याने, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आजरा एकसंघ व्यापारी असोसिएशनला विश्वासात घेऊन सविस्तर चर्चा करावी, अशी दुसऱ्या स्वतंत्र निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

दोन्ही निवेदनांवर अध्यक्ष महेश नार्वेकर, उपाध्यक्ष वाय.जी. इंजल, सचिव सचिन इंदलकर यांच्यासह व्यापाऱ्यांच्या सह्या आहेत.

आजऱ्यात लक्ष्मणबुवा मोरजकर महाराज सप्ताहानिमित्त दिंडी सोहळा उत्साहात

आजरा : प्रतिनिधी

महाराष्ट्रासह कर्नाटक व गोव्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या आजरा येथील ह.भ.प. लक्ष्मणबुवा मोरजकर महाराज यांच्या पुण्यतिथी सप्ताहानिमित्त काढण्यात आलेला दिंडी सोहळा उत्साहात पार पडला.

शिवाजीनगर येथील महाराजांच्या समाधी स्थळावरून दिंडीस प्रारंभ झाला. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि भजनाच्या तालावर दिंडीमध्ये स्त्री-पुरुष भाविकांनी ठेका धरला होता. शिवाजीनगर मार्गावरून मुख्य बाजारपेठ, रवळनाथ मंदिर, राम मंदिर, सोमवार पेठ येथील विठ्ठल मंदिर मार्गे दिंडी रात्री उशिरा शिवाजीनगर येथील मुख्य विठ्ठल मंदिरात परतली.

या दिंडी सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने भजनी मंडळांसह भाविक सहभागी झाले होते.

दरम्यान, आज बुधवारी दुपारी १२ वाजल्यापासून विठ्ठल मंदिर येथे महाप्रसादाचे आणि रात्री ९.३० वाजता तांदळाच्या प्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंदिराचे ट्रस्टी समीर मोरजकर यांनी दिली.

बांधावर जाऊन पीक नुकसानीचे पंचनामे करा : तहसीलदार समीर माने

आजरा :प्रतिनिधी

पावसाने दडी दिल्याने पिक अडचणीत आली असून तालुक्यातील पूर्व भागात पिके करपली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पिक नुकसानीचे पंचनामे करावेत. सात दिवसाच्या आत याबाबतचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल द्यावा. महसूल, कृषी व पंचायत समिती या तिनही यंत्रणानी समन्वयाने काम करावे. अशी सुचना तहसीलदार समीर माने यांनी केली.

येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील सभागृहात आजरा तालुक्यात दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांची बैठक झाली. या वेळी दुष्काळ व पिक परिस्थितीबाबत आढावा घेण्यात आला. तहसीलदार समीर माने बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. आजरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष सावंत, तालुका कृषी अधिकारी भूषण पाटील, पंचायत समितीचे कृषी अधिकारी दिनेश शेटे प्रमुख उपस्थित होते.

तालुका कृषी अधिकारी श्री. पाटील यांनी तालुक्यातील पिक परिस्थीतीची माहीती दिली. याबाबतचा अहवाल वरिष्ठाना दिला आहे. श्री. माने म्हणाले, उद्या बुधवार पासून शेतामध्ये पीक पाहणी होणार आहे. पंचनाम्याच्यावेळी शेतकरी हजर रहाणे आवश्यक आहे. यासाठी संबंधीत यंत्रणांनी ग्रामपंचायतीशी संपर्क साधून पूर्वसूचना द्यावी. जिथे पिके पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत, त्याच पिकांचे प्रामुख्याने पंचनामे केले जाणार आहेत. पंचनामे करतांना कोणावरही अन्याय होणार नाही याबाबत दक्ष रहावे. शेताच्या बांधावर जावून पंचनामे करावेत. वस्तुस्थितीचा अहवाल द्यावा. यासाठी गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांचे पथक पंचनामे करण्यासाठी कार्यरत केले आहे. पंचनामे करताना नुकसानग्रस्त शेतकरी तिथे स्वतः उपस्थित राहीले पाहिजेत. प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानीचे अक्षांश, रेखांशनुसार छायाचित्रे घेऊन मगच पंचनामे होणार आहेत. यासह त्यांनी विविध सूचना दिल्या. यावेळी अन्य अधिकाऱ्यांनीही मार्गदर्शन केले.

ग्रामसेवक तक्रार पार्श्वभूमीवर हाजगोळी येथे ग्रामपंचायतीची कागदपत्रे तपासणी

हाजगोळी : प्रतिनिधी

हाजगोळी खुर्द,ता.आजरा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक येळणे यांच्यावर केलेल्या तक्रारीनंतर तालुक्या बाहेरील कमिटी यांच्या तर्फे चौकशी व्हावी अशी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांतर्फे मागणी केली होती. त्या अनुषंगाने काल मंगळवारी गडहिंग्लज पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी विलास पाटील आणि विस्तार अधिकारी उत्तम पाटील यांच्यातर्फे तपासणी झाली.

यावेळी उप सरपंच प्रशांत कोटकर ,
ग्रामपंचायत सदस्य आदित्य कातकर, ग्रामपंचायत सदस्या मनीषा कांबळे, सरिता केसरकर , लता जाधव, गीता सुतार ,ग्रामस्थ डॉ रोहन जाधव, पांडुरंग जाधव, डॉ. सुधाकर जाधव, संदीप गिलबिले, सुबोध कांबळे उपस्थित होते.

कानोली येथे
नाचणी पिकाचे शेतकरी प्रशिक्षण


कानोली : प्रतिनिधी

मौजे कानोली ता. आजरा येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान-पौष्टिक तृणधान्य (श्रीअन्न) सन २०२६-२७ अंतर्गत नाचणी पिकाचे शेतकरी प्रशिक्षण आयोजित करणेत आले.

प्रमुख मार्गदर्शक श्री. ऋतुराज चव्हाण, सहाय्यक प्राध्यापक यांनी नाचणी पिक तंत्रज्ञानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी लोकनियुक्त सरपंच सौ. सुषमा पाटील , उपसरपंच श्री. चंद्रकांत पाटील, वि.का.स. सेवा संस्था, कानोली चे चेअरमन श्री. दिलीप पाटील, मंडळ कृषि अधिकारी श्री. प्रमोद मोने, ग्रामपंचायत अधिकारी स्नेहदीप देसाई,सहाय्यक कृषि अधिकारी श्री.योगेश जगताप व नागेश काळे तसेच कानोली गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरपंच सौ. सुषमा पाटील यांनी आभार मानले.

निधन वार्ता
जानबा पावले

आरदाळ ता.आजरा येथील जानबा केरबा पावले यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पाश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. उत्तर कार्य ४ ऑक्टोबर रोजी आहे.

विजय पिळणकर

आजरा येथील विजय धोंडीबा पिळणकर (मुळगाव चंदगड) यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. सिद्धेश पिळणकर यांचे ते वडील होत.रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी नऊ वाजता होईल.

महादेव गाईंगडे

हांदेवाडी तालुका आजरा येथील महादेव गणपती गाईंगडे हंदेवाडी ( वय ७४ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ,तीन बहिणी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.गोखले महाविद्यालयाचे प्रा. अजित गाईंगडे यांचे ते वडील होत.

रक्षा विसर्जन गुरुवारी सकाळी नऊ वाजता हंदेवाडी गावी आहे.

शिला गुरव

हरपवडे ता.आजरा येथील ह. प.भ. श्री शंकर राऊ गुरव यांच्या पत्नी शिला शंकर गुरव यांचे आकस्मीत निधन झाले त्याना दोन मुलगे नातवंडे असा मोठा परिवार आहे.

रक्षा विसर्जन गुरुवार दि.१ रोजी सकाळी ९ वाजता आहे .

आजरा महाविद्यालयात ‘ड्रग्ज अंमली पदार्थांच्या धोक्याबाबत जाणीव जागृती व समुपदेशन ‘ व्याख्यान

आजरा : प्रतिनिधी

आजरा महाविद्यालय, आजरा येथे अण्णाभाऊ स्मृती पंधरवडा
निमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘ ड्रग्ज व अंमली पदार्थांचा धोका जाणीव जागृती व समुपदेशन या विषयावर प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. शिंत्रे यांनी विद्यार्थी व युवकांमध्ये अंमली पदार्थांचे सेवन ही केवळ व्यक्तीची समस्या नसून त्याचे गंभीर सामाजिक परिणाम होत आहेत अंमली पदार्थांच्या सेवनामुळे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, शिक्षण व करिअरवर होणारा परिणाम, कौटुंबिक व सामाजिक जीवनात निर्माण होणाऱ्या समस्या तसेच व्यसनाधीनतेमुळे होणारे आर्थिक नुकसान याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

यावेळी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी Role Play, प्रश्नोत्तर, संवादात्मक कृती आणि ‘माझे स्वप्न–माझा निर्णय’ या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी व्यसन विरोधी अशी सामूहिक प्रतिज्ञा घेतली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य दिलीप संकपाळ होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजीत पवार यांनी केले, तर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी रत्नदीप पवार यांनी आभार मानले.

आजचे पंचांग 

दिनांक : ३० सप्टेंबर २०२६
वार : बुधवार
माह (अमावस्यांत) : भाद्रपद
माह (पूर्णिमांत) : आश्विन
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : चतुर्थी तिथी (दुपारी ०२.५५ पर्यंत) त्यानंतर पंचमी तिथी
नक्षत्र : भरणी नक्षत्र (सकाळी ०७.३६ पर्यंत) त्यानंतर कृत्तिका नक्षत्र
योग : वज्र योग (१ ऑक्टोबर रात्री १२.१९ पर्यंत) त्यानंतर सिद्धि योग
करण : बलवा करण (दुपारी ०२.५५ पर्यंत) त्यानंतर कौलव करण
चंद्र राशी : मेष राशी (दुपारी ०१.१३ पर्यंत) त्यानंतर वृषभ राशी
सूर्य राशी : कन्या राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी १२.२८ ते दुपारी ०१.५८ पर्यंत
सूर्योदय : सकाळी ०६.३०
सूर्यास्त : सायंकाळी ०६.२७
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत


आज महाप्रसाद

हा.भ.प. लक्ष्मणबुवा मोरजकर महाराज यांच्या सप्ताह सोहळ्यानिमित्त आज बुधवारी दुपारी बारा ते तीन या वेळेत शिवाजी नगर विठ्ठल मंदिर येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

mrityunjay mahanews

कै. केदारी रेडेकर हे लढवय्या कार्यकर्ते…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!