mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शुक्रवार  दि. ६ मार्च २०२६

दोन गव्यांचा मृत्यू
वातावरणातील बदलाचा परिणाम…?

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

तालुक्यातील वडकशिवाले परिसरात दोन गवे मृतावस्थेत आढळले असून सदर गव्यांचा वातावरणातील बदलामुळे परिणाम होऊन मृत्यू झाला असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.

गेल्या पंधरा दिवसापासून गव्यांचा मृत्यू आकस्मिकपणे होत असल्याचे प्रकार घडत आहेत. थंडी व उष्णता असा वातावरणातील विरोधाभास वयोवृद्ध गव्यांच्या दृष्टीने हानीकारक असल्याने यामुळेच त्यांचा मृत्यू होत असल्याचे सांगण्यात आले.मृत गव्यांचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले. यावेळी वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

पेरणोली येथे तुकाराम महाराज यांचा बीजोत्सवाचा सोहळा उत्साहात 


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

तुकाराम महाराजांच्या बीजोत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पेरणोली पंचक्रोशी परिसर विठ्ठलमय झाला होता. जानबा-तुका या गजराने सारा परिसर दुमद्‌मून निघाला होता. पेरणोली येथे तुकाराम महाराज यांचा बीजोत्सवाचा सोहळा भक्तीमय वातावरणात व उत्साहात पार पडला.

हिरण्यकेशी नदीच्या काठावर शेकडो विठ्ठल भक्तांचा मेळा या निमित्ताने जमला होता.
तुकाराम बीज हा संत तु‌कारामांचा वैकुंठ गमनाचा दिवस मानला जातो. आणि तो महाराष्ट्रभर साजरा केला चतो. पेरणोली येथे सुमारे पावणे दोनशे वर्षापासून तुकाराम बीजोत्सवाची परंपरा आजही कायम आहे. पेरणोली येथील विठ्ठल मंदिरात तुकाराम बीजोत्सव साजरा झाला. पहाटे विठ्ठल मंदिरात काकडा आरती झाली. त्यानंतर मंदिरात धार्मिक विधी पार पडले.

सकाळी भक्तांसाठी खुले झाले. सकाळी आठ वाजता ज्ञानेश्वरी पारायण झाले. ह.भ.प. भागवत चवरे महाराज यांचे किर्तन झाले. भजनाचाही कार्यक्रम झाला. दुपारी बारा वाजता तुकाराम महाराज वैकुंठ गमनानिमित्त फुले वाहण्याचा कार्यक्रम झाला. संत तुकाराम महारांजाची आरती झाली. प्रसादाचे वाटप झाले. दुपारी नाथाचे अभंग व संध्याकाळी हरीपाठ झाला. सायंकाळी महाप्रसाद वाटप झाला. रात्री ह.भ.प किर्तन झाले.

आजरा तालुक्यासह भुदरगड, गडहिंग्लज, चंदगड भागातील भाविक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निधन वार्ता

बाबूराव पाटील

मडीलगे ता. आजरा येथील बाबुराव महादेव पाटील (वय ५८ वर्षे) यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ,एक मुलगा, आणि एक मुलगी असा परिवार आहे ‌.

आजरा साखर कारखाना कर्मचारी म्हणून गेली ३० वर्षे ते कार्यरत होते.

देवदूत गेला…

वाटंगी येथे डॉ. पाटणे यांना श्रद्धांजली


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

वाटंगी येथे डॉ. सुरज पाटणे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी डॉ.पाटणे यांच्या वाटंगी येथील कार्याचा आढावा अनेकांनी घेतला. वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काम करत असताना त्यांनी सर्वसामान्यांना, रुग्णांना सेवाभावी वृत्तीने वीस बावीस वर्षे अत्यंत प्रेमाची वागणूक दिली .अप्रत्यक्षरीत्या वाटंगीकर बनलेला देवदूतच निघून गेला. त्यांच्या जाण्याने वैद्यकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. यावेळी पण मित्र संस्था समूहाचे प्रमुख अल्बर्ट डिसोजा, आजरा साखर कारखान्याचे संचालक शिवाजी नांदवडेकर, विजय देसाई, एकनाथ गिलबिले भिमराव सुतार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र गुरव यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी व वाटंगी पंचक्रोशीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 प्रभाग क्रमांक १५ मधील रस्ता कामाचा शुभारंभ 


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा नगरपंचायत प्रभाग क्रमांक १५ मधील ख्रिश्चन स्मशानभूमी ते चर्चजवळील विहीर या रस्ता डांबरीकरण कामाचे उद्घाटन नगरसेवक श्री. परशुराम बामणे (भाऊजी) व डॉ. श्रद्धानंद ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. अशोक पोवार, महादेव जाधव, मिनीन डिसोझा, मोतीराम बार्देसकर, पांडुरंग सावरतकर, संतोष भाटले, रवींद्र पारपोलकर, आश्रम सांबरेकर, अनिल पाटील, रामचंद्र पंडित, तानाजी शिंदे, मदन तानवडे जोतीबा आजगेकर तसेच चर्च गल्लीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नगरसेवक श्री परशुराम बामणे (भाऊजी) यांनी संबंधित ठेकेदाराला काम दर्जेदार पद्धतीने करण्याच्या सूचना दिल्या. स्थानिक नागरिकांकडून कोणतीही तक्रार येणार नाही अशा पद्धतीने रस्त्याचे काम पूर्ण करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच या कामाबाबत स्थानिक नागरिकांना काही तक्रार किंवा अडचण असल्यास ती त्वरित कळवावी, अशा सूचनाही नगरसेवक बामणे यांनी नागरिकांना दिल्या. रस्ता बांधकामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. 

अनियमित कचरा उठावामुळे शहराची प्रवेशद्वारे होत आहेत कोंडाळे


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहरांमध्ये नगरपंचायतीची कचरा उठाव यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असल्याने घंटागाड्यांची वाट न बघता स्थानिक नागरिकांसह व्यावसायिकांनी कचरा व टाकाऊ वस्तू गोळा करून त्या थेट व्हिक्टोरिया पूल, रामतीर्थ मार्ग यासह अनेक ठिकाणी टाकण्यास सुरुवात केली आहे. यामुळे शहराची ही प्रवेशद्वारे कोंडाळे बनू लागली आहेत.

मुळातच कचरा उठाव वेळेवर होत असल्याने कचरा किती दिवस साठवून ठेवायचा ? असा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे. कांही शहरवासीय रात्रीच्या वेळी आपल्या दुचाकी व चारचाकी वाहनातून कचरा प्लास्टिक गोण्यांमध्ये भरून तो थेट शहराबाहेर मिळेल त्या झुडपामध्ये व उपलब्ध जागेमध्ये टाकून देत आहेत. परिणामी दिवसभर पक्षी व प्राण्यांकडून कचरा विस्कटून सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य झालेले दिसत आहे.

नगरपंचायतीच्या आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कचरा उठाव यंत्रणा प्रभावीपणे सक्रिय करण्याची गरज आहे.

गिरणी कामगाराचा आज किसान भवन आजरा येथे मेळावा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

गिरणी कामगारांच्या न्याय हक्कासाठी व पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आजरा तालुक्यातील सर्व गिरणीकामगारांना मार्गदर्शक करण्यासाठी मुंबई वरून काँ. उदय भट, काँ. बि.के.आम्रे, काँ. विजय कुलकर्णी येत आहेत. काँ. अतूल दिघे कोल्हापूर याच्यासह गिरणीकामगार नेते पुढील रणनिती ठरवण्यासाठी येत आहेत.तरी तालुक्यातील सर्व गिरणीकामगारानी शुक्रवारी दि. ६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता किसान भवन येथे उपस्थित रहाणेचे अवाहन काँ. शांताराम पाटील यांनी केले आहे. त्यानंतर दुपारी १ वा रवळनाथ मंदिर अडकूर ता चंदगड येथे ही मेळावा आयोजीत असलेचे त्यानी सांगितले.

आज आजरा आयटीआय येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

अल्पमुदतीचा रोजगारक्षम प्रशिक्षण कार्यक्रम (STEP) योजनेअंतर्गत प्रशिक्षित उमेदवारांना तसेच इतर नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार ६ मार्च रोजी आजरा येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे.

६ मार्च रोजी आयटीआय आजरा येथे ELECTRICIAN, SELF EMPLOYED TAILOR, या पदांकरीता अल्पमुदतीचा रोजगारक्षम प्रशिक्षण कार्यक्रम (STEP) प्रशिक्षीत उमेदवार, १० वी, १२ वी, आयटीआय पात्रता असणारे उमेदवार पात्र असणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, आवश्यकतेनुसार रिझ्युम सोबत आणणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे.

आजचे पंचांग

♦ दिनांक : ६ मार्च २०२६
♦ वार : शुक्रवार
♦ माह (अमावस्यांत) : फाल्गुन
♦ माह (पूर्णिमांत) : चैत्र
♦ ऋतु : वसंत
♦ आयन : उत्तरायण
♦ पक्ष : कृष्ण पक्ष
♦ तिथी : तृतीया तिथी (सायंकाळी ०५.५३ पर्यंत) त्यानंतर चतुर्थी तिथी
♦ नक्षत्र : हस्त नक्षत्र (सकाळी ०९.२९ पर्यंत) त्यानंतर चित्रा नक्षत्र
♦ योग : गण्ड योग (सकाळी ०७.०५ पर्यंत) त्यानंतर वृद्धि योग
♦ करण : विस्ती भद्रा करण (सायंकाळी ५.५३ पर्यंत) त्यानंतर भाव करण
♦ चंद्र राशी : कन्या राशी (रात्री १०.१८ पर्यंत) त्यानंतर तूळ राशी
♦ सूर्य राशी : कुंभ राशी
♦ अशुभ मुहूर्त:
♦ राहु काळ : सकाळी ११.२१ ते दुपारी १२.५० पर्यंत
♦ शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.२६ ते दुपारी ०१.१३
♦ सूर्योदय : सकाळी ०६.५५
♦ सूर्यास्त : सायंकाळी ०६.४४
♦ संवत्सर : विश्वावसु
♦ संवत्सर(उत्तर) : सिद्धार्थी
♦ विक्रम संवत: २०८२ विक्रम संवत
♦ शक संवत: १९४७शक संवत

 

संबंधित पोस्ट

Big Breaking…

mrityunjay mahanews

बंदी आदेश झुगारून ‘उचंगी’चे काम बंद पाडण्याचा प्रकल्पग्रस्तांचा प्रयत्न … पोलीस व प्रकल्पग्रस्तांची झटापट

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

गजरगाव बंधार्‍यावरून मोटरसायकल कोसळल्याने एक जण जागीच ठार

mrityunjay mahanews
error: Content is protected !!