mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरगुन्हाठळक बातम्यामहाराष्ट्रराजकीयसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

मंगळवार  दि. २९ जुलै २०२५         

मोबाईलवरून चित्रीकरण

साळगाव येथील एका विरोधात गुन्हा नोंद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

वीस वर्षीय तरुणींचे मोबाईल वरून चित्रीकरण करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी साळगाव तालुका आजरा येथील सौरभ कांबळे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे अशी माहिती आजरा पोलिसांनी दिली.

संबंधित पिडीत तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून सदर गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास हवालदार मुगडे करीत आहेत.

वाघाच्या हल्ल्यात हरपवडे धनगरवाडा येथील म्हैस ठार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

हरपवडे (ता आजरा) येथील धनगरवाड्यावर वाघाने केलेल्या हल्ल्यात म्हैस ठार झाली आहे. गत महिनाभरात वाघाच्या हल्ल्यात चार जनावरांचा मृत्यू झाला आहे. वाघाच्या वावराने हरपवडे धनगरवाड्यावर भीतीचे वातावरण आहे.

येथील धोंडीबा लहू झोरे यांनी आज दुपारी जनावरे चरायला सोडून घरी परत आले होते. संध्याकाळी जनावरे घरी परत आणण्यासाठी गेल्यावर त्यांना म्हैस मृत अवस्थेत आढळली. पंधरा दिवसापूर्वी नागेश झोरे यांची जनावरे वाघाने फस्त केली होती.वनविभागाने पंचनामा केला होता. अरे पुढे जंगल परिसरात वाघाचा वावर असल्याने ग्रामस्थ भीतीचे वातावरण पसरले आहे.

अखेर रामतीर्थ परिसरातील ‘त्या’ व्यावसायिकांना हटवले
प्रशासनाची कारवाई

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

निसर्गरम्य अशा रामतीर्थ परिसरात मुख्य मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारानजीक व्यावसायिकांना बसू देऊ नये यासाठी स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी विरोध दर्शवला असतानाही  विक्रेत्यांनी व्यवसायासाठी  प्रवेशद्वारानजीकच दुकान, टपऱ्या, गाडे उभारण्याची व्यवस्था केली होती. याबाबत निसर्गप्रेमी व पर्यटकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. अन्याय निवारण समितीने याबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर वनविभाग, पंचायत समितीचा बांधकाम विभाग व नगरपंचायतीने मुख्य फटका शेजारील व्यावसायिकांना इतरत्र जागा उपलब्ध करून दिली.

यामुळे निसर्गप्रेमी मंडळीतून समाधान व्यक्त होत आहे.

शहरासह ग्रामीण भागात विजेचा शिमगा…
तालुक्यातून संतप्त प्रतिक्रिया

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहरासह तालुक्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने तालुक्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये तर दिवस दिवसभर वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरू आहेत. अनेक शासकीय कार्यालयात कामात निमित्त येणाऱ्या तालुकावासीयांचे खंडित वीज पुरवठ्यामुळे प्रचंड हाल होत आहेत. आजरा शहरामध्ये तर यामुळे पाणीपुरवठा योजनेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडून गेले आहे. एकीकडे भरमसाठ वीज बिले येत असताना दुसरीकडे वीज पुरवठा सुरळीत नसल्याबद्दल तालुकावासींयातून नाराजी व्यक्त होत आहे. विशेषता विद्यार्थी वर्गाचे यामध्ये प्रचंड हाल होत आहेत.

रॉकेल मिळत नाही, मेणबत्ती परवडत नाही

रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडित होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. शासनाकडून रॉकेल मिळणे बंद झाले आहे. मेणबत्ती परवडत नाही आणि रॉकेल मिळत नाही… अशी अवस्था अनेक कुटुंबीयांची आहे.

प्रकल्पग्रस्तांनी केले ‘चित्री’चे पाणीपूजन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

चित्री प्रकल्प दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी लवकरच भरला. दरवर्षीप्रमाणे पंचक्रोशीतील चित्री धरणग्रस्तांनी श्रावणातील पहिला सोमवारी चित्रीच्या  पाण्याचे पूजन केले व चित्रामाईकडे चित्रीवर अवलंबून असणाऱ्या प्रत्येकाचे आयुष्य सुखी आणि भरभराटीचे कर असे गाऱ्हाणे घातले.

यावेळी एकत्रित येऊन चित्रीच्या धरणग्रस्तांच्या प्रलंबित विविध प्रश्नांसाठी एक समिती गठीत करून येणाऱ्या काळात न्याय हक्कासाठी लढा उभा करण्याचे आवाहन श्री. नामदेव फगरे यांनी केले. तसेच चित्रीच्या धरणग्रस्तांसाठी लढणारा आणि जमीन राखणी आंदोलन यशस्वी करून चित्रीच्या उर्वरित जमिनी वाचवणाऱ्या दिवंगत श्री.राजाराम चौगुले यांना सर्वांतर्फे आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी श्री. नामदेव घोगरे, रामचंद्र पाटील, रणजीत सरदेसाई, अंकुश चौगुले, बाबू येडगे, बयाजी येडगे, आबा पाटील यांच्यासोबत चित्री धरणग्रस्त उपस्थित होते.

अध्ययन प्रक्रियेत पालकांची भूमिका महत्त्वाची : ज्योतिप्रसाद सावंत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

सद्यस्थितीस शासनाची प्राथमिक शिक्षणाबाबतची बदलणारी धोरणे पाहता शिक्षण प्रक्रिया ही विद्यार्थी, शिक्षक, पालक व शालेय परिसर यावर बऱ्यापैकी अवलंबून आहे. अध्ययन प्रक्रियेत शिक्षकांना स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याशिवाय पर्याय तर नाहीच परंतु शिक्षकांपाठोपाठ पालकांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची ठरत आहे. शहरीकरणापासून दूर असणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची प्रगती साधण्याच्या अनेक संधी असून पालकांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य, अभ्यास व संगती यावर विशेष लक्ष दिल्यास वाड्या – वस्त्यांवरील विद्यार्थी स्पर्धेत पुढे जाऊ शकतो असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार ज्योतिप्रसाद सावंत यांनी केले.

विद्या मंदिर रायवाडा येथे पालक मेळाव्यात शिक्षण प्रक्रियेत पालकांची भूमिका या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा संपदा राणे होत्या. कार्यक्रम प्रसंगी शैक्षणिक साहित्याचे वाटप श्री.सावंत व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक रावसाहेब पाटील यांनी केले. प्रास्ताविकपर भाषणात प्रकाश बडे यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धेत शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला. शाळेतील विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये चमकत असल्याचे सांगितले.

यावेळी सावंत पुढे म्हणाले, विस्थापितांच्या गावांमध्ये शाळा चालवताना अनेक आर्थिक मर्यादा येतात. त्यातूनही रायवाडा प्राथमिक शाळेने वेळोवेळी आपला दर्जा अधोरेखित करून दाखवला आहे. निसर्गरम्य परिसर, प्रशस्त मैदान, स्वच्छ पाणी, स्वच्छ स्वच्छतागृहे, सीसीटी व्ही, डिजिटल फलक यासारख्या अत्याधुनिक सुविधा शाळेमध्ये उपलब्ध आहेत हे निश्चितच कौतुकास्पद आहे. पालकांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य व नियमित अभ्यास याकडे विशेष लक्ष द्यावे असेही त्यांनी सांगितले.

यावेळी उपसरपंच आनंदा राणे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अमृत कुरळे, सिंधुताई राणे यांच्यासह पालक विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

किंमत नसलेली घरे गिरणी कामगारांच्या माथी मारणे बंद करा : कॉ. अतुल दिघे

आजऱ्यात गिरणी कामगारांचा मेळावा संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

मुंबई येथील गिरणीच्या जागेतील ६०० एकर जागेपैकी २०० एकर जागा गिरणी कामगारांना देण्याचा निर्णय झाला होता. परंतू शासनाने गिरणी मालकांना जादा जागा देऊन केवळ २६ एकर जागेत गिरणी कामगारांना घरे बांधून देण्याचा निर्णय घेतला. अडीच लाख गिरणी कामगारांनी घरासाठी अर्ज केले असून त्यापैकी १४ हजार घरे गिरणी कामगारांना मिळाली आहेत. मुंबईत गिरणीची जागा अजुनही शिल्लक असताना दलालांमार्फत किंमत नसलेली घरे गिरणी कामगारांच्या माथी मारण्याचा उद्योग बंद करावा असा इशारा कॉ. अतुल दिघे यांनी दिला. आजरा येथील किसान भवन येथे झालेल्या गिरणी कामागारांच्या मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

प्रास्ताविक नारायण भडांगे यांनी केले. यावेळी दिघे म्हणाले, मुंबई येथे झालेल्या ९ जुलैच्या आंदोलनात शासनाला ठणकावून सांगितले असून ते शासनाने मान्य केले आहे. मुंबईमध्ये एकूण १४ गिरणी कामगार संघटनासह राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळाला असून गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळाल्याशिवाय या संघटना स्वस्थ बसणार नाहीत, अंबानी व अदानी यांना हजारो एकरची जमीन विनामुल्य देत असताना मुंबई सोन्याची करण्यात ज्यांचा सहभाग आहे. त्या गिरणी कामगारांना हक्काची जागा का देत नाहीत ? असा सवाल त्यांनी केला. म्हाडा ऑफीसमधून बोलतोय, असे सांगून गरीब गिरणी कामगारांच्याकडून कागदपत्रे व ओटीपीची मागणी केली जात आहे. हे बेकायदेशीर व फसवणूक असून त्यासंदर्भात ज्या-त्या तालुक्यातील पोलीस ठाण्याला गुन्हा नोंद करावा यासाठी संघटना तुमच्या पाठिशी राहिल असे त्यांनी सांगितले.

यावेळी कॉ. शांताराम पाटील यांनी गिरणी कामगारांना मुंबईतच घरे घेतल्याशिवाय ही संघटना स्वस्थ बसणार नाही. तुमचा विश्वास आणि ताकद या जोरावरच संघटनेची आंदोलन सुरू असून सातत्याने आंदोलनाला सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी महादेव होडगे, कॉ. धोडिंबा कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले. या मेळाव्याला नारायण राणे, निवृत्ती मिसाळे, तानाजी पाटील, हिंदूराव कांबळे, बाबू केसरकर, महादेव पोवार, अनिता बागवे, सोनाली तेजम, सजाबाई देसाई, केरूबाई शिंदे, सुगंधा पन्हाळकर, काशिनाथ मोरे यांच्यासह गिरणी कामगार व वारसदार उपस्थित होते. कॉ. संजय घाटगे यांनी आभार मानले.

छायावृत्त...

संकेश्वर -बांदा महामार्गावरील आजरा एम. आय. डी. सी. जवळील टोलनाक्यामुळे आजरावासियांना नाहक टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार असलेने हा टोलनाका तालुक्याच्या टोकाला हलवा किंवा आजरेवासियांना टोलमधून मुक्ती द्या अशा आशयाचे निवेदन आजरा तहसीलदार समीर माने यांना आजरा सरपंच परिषदेने दिले आहे.

यावेळी सरपंच परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

निधन वार्ता
राजलक्ष्मी कांबळे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

वाटंगी तालुका आजरा येथील सेवानिवृत्त अंगणवाडी शिक्षिका सौ. राजलक्ष्मी रामचंद्र कांबळे यांचे अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, पती, विवाहित मुलगा, सून असा परिवार आहे.

संबंधित पोस्ट

चंद्रकांत सांबरेकर यांचे अपघाती निधन

mrityunjay mahanews

तीन महाविद्यालयीन तरुणींवर गव्याचा हल्ला.. दोघी जखमी .. आजरा तालुक्यातील घटना

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

error: Content is protected !!