सोमवार दि. २८ जुलै २०२५

पावसाचा दणका
पाच गावे अंधारात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यात गेले चार दिवस सुरू असणाऱ्या पावसाचा जोर थोडा कमी झाला आहे. थोडीफार विश्रांती घेत पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाचा मारा व वाऱ्यामुळे वीज वाहीन्यावर झाडाच्या फांद्या कोसळल्या आहेत. यामुळे तालुक्यातील पाच गावे अंधारात आहेत. वीज वितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दुरुस्ती करण्यात येत आहे.
साळगाव जवळ वीज वाहीन्यांवर झाडांच्या फांद्या कोसळल्यामुळे तालुक्यातील पेरणोली, हरपवडे, कोरीवडे, देवकांडगाव व विनायकवाडी ही पाच गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. शुक्रवार (ता. २५) पासून या गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. तब्बल अठ्ठेचाळीस तास या गावातील वीज गुल झाली आहे. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी झाडांच्या फांद्या काढण्यात व्यस्त आहेत. दुरुस्तीचे कामही युध्द पातळीवर सुरु आहे. पावसाच्या माऱ्यामुळे या कामात व्यत्यय येत आहे-पावसाचा जोर थोडा कमी झाल्याने साळगाव बंधाऱ्यावरील पाणी ओसरले आहे. या मार्गावरील वहातुक पूर्ववत सुरळीत झाली आहे.

युवकांना व्यसनातून मुक्त करणे काळाची गरज : माजी आमदार राजेश पाटील

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
तालुक्यातील झालेला विकास सर्वसामान्य जनतेला माहिती असून युवकांना मात्र विकासाची माहिती न देता केवळ गुटखा, मटका व व्यसनाकडे वळविण्याचे सुरू आहे. त्यासाठी युवकांना व्यसनातून मुक्त करणे व तालुक्यातील झालेल्या विकास कामांची माहिती देणे ही काळाची गरज असल्याचे मत माजी आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केले. मलिग्रे येथे सोलर हायमास्टच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. येथील मलिकार्जुन मंदिरासमोर परिसरामध्ये कार्यक्रम पार पडला.
स्वागत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर जाधव यांनी केले. प्रास्ताविकात माजी सरपंच अशोक शिंदे यांनी ४.४१ लाखाचा हायमास्ट दिवा लावण्यात आला असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, आजरा साखर कारखान्यासाठी माजी आमदार नरसिंगराव पाटील यांनी नॅशनल हेवीच्या माध्यमातून विशेष लक्ष घालून कारखाना तालुक्यात उभा करण्यासाठी मोठे योगदान दिले. गेल्या २५ वर्षापासून लटकलेला उचंगी प्रकल्प आपल्या अखत्यारित पूर्ण केला आहे. यापुढे मलिग्रे गावातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी योजना सुरू आहे. याच्या पुर्ततेसाठी विशेष लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आजरा साखर कारखाना उपाध्यक्ष सुभाष देसाई, संचालक अशोक तर्डेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आजरा कारखाना संचालक अनिल फडके, संभाजी पाटील/ हात्तिवडे, राजेंद्र मुरूकटे, मार्केट कमिटीचे माजी अध्यक्ष अभय देसाई, माजी सरपंच गजानन देशपांडे, दत्ता परीट, सदाशिव माणगांवकर, शिवाजी कागिनकर, मारूती इक्के, वामन दरेकर, उत्तम पारदे, सुनंदा बुगडे, सुमन सावंत, शोभा घोरपडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
विश्वास बुगडे यांनी आभार मानले.
वाटंगी येथे प्लास्टिक संकलन केंद्राचे उद्घाटन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मुख्यमंत्री गतिमानता अभियानांतर्गत तालुकास्तरीय प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट युनिट /(प्लास्टिक संकलन केंद्र) वाटंगी येथे उभारण्यात आले.प्लास्टिक संकलन केंद्राचे उद्घाटन सरपंच इंदूबाई गोविंद कुंभार यांचे हस्ते करण्यात आले.
वाटंगी गाव हे प्लास्टिक मुक्त गाव करण्यासाठी गावातील दुकानदार ,हॉटेल व्यावसायिक शाळेतील व शाळेतील विद्यार्थी यांच्यामध्ये प्लास्टिक हटाव व पर्यावरण बचाव या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी उपसरपंच सुनीता सोनार, ग्रामपंचायत सदस्य व पंचायत समितीचे अधिकारी वर्ग उपस्थित होता.

बालकांच्या सदृढ आरोग्यासाठी मार्गदर्शन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पामार्फत अंगणवाडी विभागाने लोकाभिमुख उपक्रम राबविला आहे. सदरच्या उपक्रमांतर्गत आजरा पंचायत समितीमधील वरिष्ठ अधिकारी यांनी उंचीनुसार तीव्र व मध्यम कमी वजनाच्या बालकांना यांनी दत्तक घेतले आहे. त्यांच्या पालकांना बालकांच्या सदृढ आरोग्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे.
आजरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, पंचायत समिती बांधकाम विभागाचे उपअभियंता सुर्यकांत नाईक, बालविकास प्रकल्प अधिकारी जयश्री नाईक, पर्यवेक्षीका मनिषा कांबळे, लतिका देसाई, लता केसरकर, मीना नागरगोजे, शुभांगी पोवार, गीता माजगावकर तसेच पंचायत समितीचे अन्य वरिष्ठ अधिकारी यांनी कमी वजनाच्या बालकांना दत्तक घेतले आहे. अधिकारी दत्तक बालकांच्या घरी भेट देत आहेत. बाळाच्या आई वडीलांशी संवाद साधून बालकांच्या आरोग्यवाढीसाठी मार्गदर्शन करत आहेत. यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी जयश्री नाईक आणि अंगणवाडी सेविकांनी मोलाची भूमिका घेतली आहे.
स्वखर्चातून फुड बास्केटचेही वाटप
दत्तक पालक अधिकाऱ्यांनी केवळ मार्गदर्शनच नाही तर स्वखर्चातून दत्तक बालकांना फुड बास्केटही दिले आहेत. बास्केटमधे अंडी, बटाटे, गुळ, शेंगदाणे, खजूर, काळे मनुके, राजगिरा लाडू यासह बाळाच्या पोषणासाठी आवश्यक पदार्थ आहेत.

इटे येथील चिमुकलीचे वाचले प्राण…
गतिमानता अभियान आले मदतीला…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान २०२५ अंतर्गत आर बी एस के ग्रामीण रुग्णालय आजरा व छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय कोल्हापूर यांचे मार्फत मौजे इटे ता. आजरा जि. कोल्हापूर येथील चिमुकली कु. अनुश्री सागर पाटील हिची हृदय शस्त्रक्रिया मुंबई येथील कोकिलाबेन हॉस्पिटल येथे मोफत करण्यात आली.
याकरिता महाराष्ट्र शासनाच्या आर बी एस के कार्यक्रमांतर्गत तिच्यावर अंदाजे तीन लाख रुपये खर्च असणारी शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करून दिले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे व अजित पवार तसेच आरोग्य मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री प्रकाश आबिटकर यांचे त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालय आजरा येथील वैद्यकीय अधीक्षक अमोल पाटील व आरबीएसके पथकातील डॉ. सुरजित पांडव डॉ. स्वाती रेडेकर फार्मासिस्ट सारिका शिंदे नर्सिंग ऑफिसर सुषमा साठे यांनी विशेष प्रयत्न केले.

सिरसंगी प्राथमिक शालेय कमिटीच्या अध्यक्षपदी संतोष कांबळे
उपाध्यक्षपदी प्रतीक्षा चौगले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सिरसंगी केंद्र शाळेच्या शालेय कमिटीच्या अध्यक्षपदी संतोष यशवंत कांबळे यांची तर उपाध्यक्षपदी प्रतीक्षा दिपक चौगले यांची निवड करण्यात आली.
मुख्याध्यापक एस. आर. बोलके यांच्या अध्यक्षतेखाली सदर निवड करण्यात आली.
यावेळी शालेय कमिटी सदस्य संतोष चौगले, आनंदा टकेकर, पांडुरंग टकेकर, महादेव कुडव, पांडुरंग कांबळे, राजेंद्र मयेकर, संतोष सुतार, अर्जुन पाटील, शितल देसाई रेखा चौगुले, सुप्रीया सागर कुंभार, सुप्रीया उत्तम कुंभार , संतराम केसरकर संजय केसरकर उपस्थित होते .
शिवाजी बोलके यांनी आभार मानले.

निधन वार्ता
शेवंता पाटील

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पोश्रातवाडी ता. आजरा येथील, शेवंता निंगाप्पा पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ९० वर्षे होते.
त्यांच्या पश्चात आठ मुली, दोन मुले, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. नागोजी निंगाप्पा पाटील यांच्या त्या आई होत.

छायावृत्त…

निसर्गरम्य अशा रामतीर्थ परिसरात मुख्य मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारानजीक पर्यटकांना ये-जा करण्यासाठी अडचण होत असल्याने व्यावसायिकांना बसू देऊ नये यासाठी स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी विरोध दर्शवला असतानाही नगरपंचायतीने अखेर विक्रेत्यांना व्यवसायासाठी या प्रवेशद्वारानजीकच दुकान, टपऱ्या, गाडे उभारण्याची व्यवस्था करून दिली आहे. याबाबत निसर्गप्रेमी व पर्यटकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.


