गुरुवार २३ एप्रिल २०२६

‘त्या’ दुर्घटनाप्रकरणी घर मालकावर गुन्हा नोंद करा…
मृत मुलीच्या कुटुंबीयांसह नाभिक संघटना आक्रमक

तीन दिवसांपूर्वी घडलेल्या दुर्घटना प्रकरणी घरमालकास आरोपी करण्याची मागणी मयत मुलीचे वडिल तुकाराम/उत्तम बाबुराव भोसले , त्यांची कुटुंबीय व नाईक गल्ली येथील नागरिकांनी आजरा पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्याध्यक्ष यांनी या प्रकरणी पोलीस प्रमुखांची भेट घेऊन कारवाईची मागणी करणार आहे तर नाभिक संघटनाही हा विषय उचलून धरणार असल्याचे सांगितले गेले.

घर पाडण्याच्या कामात निष्काळजीपणा झाल्याने दोघांचा हकनाक बळी गेला आहे. घरमालक डॉ. देशपांडे हे सुशिक्षित असूनही कोणतीही उपाययोजना न करता घर पाडले गेले. प्रशासनाची परवानगीही घेतली नाही. सार्वजनिक रस्त्यावरुन लोकांची रहदारी असताना धोकादायक काम सुरू होते असे निवेदनात उल्लेख असून घरमालकांना आरोपी करावे अशी मागणी केली आहे.संपूर्ण नाभिक समाज या प्रकरणी आक्रमक झाला आहे.
दरम्यान जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर, माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी-पाटील, नगरसेवक असिफ सोनेखान यांनी मयत मुलीच्या घरी भेट देऊन सांत्वन केले.

रामतीर्थ परिसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन
पर्यटकांना सावधानतेचा इशारा…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
रामतीर्थ परिसरामध्ये तिसऱ्या वेळी बिबट्याने स्थानिक नागरिक पर्यटकांसह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दर्शन दिले आहे. यामुळे या परिसरात बिबट्याचे अस्तित्व अधोरेखित झाले आहे. सदर बिबट्या हा मादी बिबट्या असून त्याच्यासोबत दोन बछडेही असल्याचे सांगितले जाते.
रामतीर्थच्या प्रवेशद्वारापासून सुमारे १०० मीटर अंतरावर स्थानिक नागरीक कचरा आणून टाकू लागले आहेत. यामुळे या परिसरात कुत्र्यांचा वावर वाढला आहे. भक्ष्याच्या शोधार्थ फिरणाऱ्या बिबट्या कडून नागरिकांवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सर्व सभासदांना सरसकट सवलतीच्या दरात साखर द्या…
शिवसेनेची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
साखर कारखान्याची सध्या सवलतीच्या दरात साखर वाटप प्रक्रिया सुरू आहे पाच ते सहा हजार शेअर्स रक्कम असणारे अ व ब वर्ग १७४०८ सभासद स्थापनेपासून कारखान्याच्या वाटचालीत योगदान देत आहेत. एकूण २५३३८ अशा सभासदांना साखर मिळत नाही. हा सदर सभासदांवर अन्याय आहे. सदर सभासदांना शेअर्स रकमानुसार १५/२५/५० देण्याची व्यवस्था अथवा सरसकट ५० किलो साखर देण्याची व्यवस्था करावी. अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने कारखाना प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख संजय पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्रसिंह सावंत काका देसाई आदी उपस्थित होते.

“देव ओळखण्याची पात्रता धर्म संस्कारांतून निर्माण करूया :डॉ.आनंद महाराज गोसावी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ब्राह्मण सभेच्या वतीने भगवान परशुराम यांची जयंती उत्साहात साजरी झाली.
हत्तरगी मठाचे मठाधीश डॉ.आनंद महाराज गोसावीजी यांच्या हस्ते भगवान परशुराम प्रतिमा पूजन व षोडशोपचार पूजा करण्यात आली. शिवजयंतीचे औचित्य साधून हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री शिव छत्रपती महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व महात्मा बसवेश्वर यांनाही अभिवादन करण्यात आले.
डॉ.आनंद महाराजांनी देव ओळखण्याची पात्रता धर्म संस्कारातून निर्माण करूया धर्म, धर्मआचरण, संस्कार आणि आदर्श जीवन पद्धतीसाठी अंगीकाराव्या लागणार्या मूल्यांविषयी उद्बोधक भाष्य केले.
ब्राह्मण सभा आजरा मंडळाच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
सूत्रसंचालन व आभार शंकर आपटे यांनी केले.
यावेळी डॉ. दिपक सातोस्कर, डॉ. अनिल देशपांडे, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, श्रद्धा कुलकर्णी डॉ. अंजनी देशपांडे,शुभदा जोशी, जयवंत केळकर, ब्राह्मण सभेचे खजिनदार संदीप वाटवे, सचिव विनय फाळणीकर, सौ. चेतना केळकर, गौरव देशपांडे, नरेंद्र जोशी, अवधूत सबनीस, सोमनाथ भातखंडे, दीपक जोशी उपस्थित होते.

रामतीर्थ येथील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बुधवार दिनांक १५ एप्रिल ते बुधवार दिनांक २२ एप्रिल अखेर श्री क्षेत्र रामतीर्थ येथे जगद्गुरु तुकोबाराया आणि भजन कीर्तनादी सेवा व्यासपीठ अधिष्ठान ह.भ.प. अर्जुन जाधव महाराज शिप्पूर ता हुपरी जि. बेळगाव व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला..
या सोहळ्यानिमित्त दररोज सकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत काकडा आरती, सकाळी ८ ते ११ व दुपारी एक ते चार गाथा पारायण, सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ व रात्री आठ ते दहा किर्तनाचे कार्यक्रम झाले.
काल्याचे किर्तन ह.भ. प.श्री.अर्जुन जाधव महाराज शिप्पूर यांनी केले. ह.भ.प. डॉ. एस.डी. पन्हाळकर महाराज उत्तुर यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीधर जाधव महाराज, रानमाळे महाराज, अर्जुन जाधव महाराज/ पन्हाळकर, धनाजी शिंदे, दशरथ पंडित, चंद्रकांत शिंदे, उदय सावंत, पारखे महाराज, डॉ. शंकर पारपोलकर, गुरु गोवेकर यांनी विशेष कष्ट घेतले.

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात महात्मा बसवेश्वर जयंती व ग्रंथप्रदर्शन कार्यक्रम संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महान तत्वज्ञ, समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांची जयंती श्रीमंत गंगामाई बाचन मंदिरातर्फे उत्साहात साजरी करण्यात आली. महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन व ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन चंद्रशेखर बटकडली व डॉ. शिवशंकर उपासे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष वामन सामंत होते. चंद्रशेखर बटकडली यांनी वाचनालयास बसव व शरण साहित्याची २०० पुस्तके भेट दिली. या पुस्तकांचे प्रदर्शन दिनांक २० ते २२ एप्रिल पर्यंत वाचनालयात आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनास ग्रंथालयाचे सभासद, वाचक व शालेय विद्यार्थ्यांनी भेट देऊन प्रदर्शनाचा लाभ घेतला.
यावेळी बोलताना डॉ. उपासे, चंद्रशेखर बटकडली यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
स्वागत व प्रास्ताविक संचालक सुभाष विभुते यांनी केले. कार्यवाह कुंडलिक नावलकर यांनी सुत्रसंचालन केले. यावेळी वाचन मंदिराच्या उपाध्यक्षा विद्या हरेर, सहकार्यवाह रविंद्र हुक्केरी, संभाजीराव इंजल, विजय राजोपाध्ये, महंमदअली मुजावर, बंडोपंत चव्हाण, विनायक आमणगी, डॉ. अंजनी देशपांडे, गीता पोतदार, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर, तातूअण्णा बटकडली, कृष्णा सडेकर, अस्मिता बटकडली, सारिका बटकडली, डॉ. गौरी भोसले, पुष्पलता घोळसे, निखील कळेकर, महादेव पाटील, महादेव पोवार यासह नागरिक, शालेय विद्यार्थी उपस्थीत होते.
निधन वार्ता
राजाराम पाटील

साळगाव ता. आजरा येथील राजाराम विजय पाटील ( वय ६८ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून, एक विवाहित मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
येथील शिव सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या सामाजिक संस्थेचे दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांचे ते वडील होत.
तुकाराम शिवणे

आरदाळ ता. आजरा येथील ज्येष्ठ नागरिक तुकाराम ( वय ८० वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
वायरमन असणाऱ्या शिवणे यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, एक विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. तानाजी शिंदे यांचे ते वडील होत.

आजचे पंचांग
दिनांक : २३ एप्रिल २०२६
वार : गुरुवार
माह (अमावस्यांत) : वैशाख
माह (पूर्णिमांत) : वैशाख
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : सप्तमी (रात्री ०८.४९ पर्यंत) त्यानंतर अष्टमी तिथी
नक्षत्र : पुनर्वसू नक्षत्र (रात्री ०८.५६ पर्यंत) त्यानंतर पुष्य नक्षत्र
योग : धृति योग (२४ एप्रिल पहाटे ०३.३१ पर्यंत) त्यानंतर शूल योग
करण : गराजा करण (सकाळी ०९.४५ पर्यंत) त्यानंतर वाणीजा करण
चंद्र राशी : मिथुन राशी (दुपारी ०३.२२ पर्यंत) त्यानंतर कर्क राशी
सूर्य राशी : मेष राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०२.१२ ते दुपारी ०३.४७ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१२ ते दुपारी ०१.०२
सूर्योदय : सकाळी ०६.१७
सूर्यास्त : सायंकाळी ६.५७
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

आयपीएल न्यूज
राजस्थान कडून लखनौचा ४० भवानी पराभव. २९ चेंडू त्४३ धावा काढणारा रवींद्र जडेजा ठरला सामनाविर.
आजचा सामना
मुंबई विरुद्ध चेन्नई
स्थळ : मुंबई
वेळ : सायंकाळी ७.३० पासून


