

व्हाट्सअप वरील चॅटिंग प्रकरण
दोघांना मारहाण…१३ जणांविरोधात गुन्हा

आजरा: प्रतिनिधी
पेद्रेवाडी, ता. आजरा येथे निलेश राजाराम हाटवळ ( रा. साईराज बिल्डींग कोपर क्रॉस रोड, डोंबिवली वेस्ट रूम,सध्या मुळगाव पेद्रेवाडी येथे) व त्यांच्या आई श्रीमती सुशिलाबाई यांना गावातील व्हाट्सअप ग्रुपवर झालेल्या चॅटिंग व शिवीगाळ कारणावरून त्यांना घरात घुसून मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी निलेश -हाटवळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तेरा जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी…
पेद्रेवाडी गावातील ‘पेद्रेवाडी ग्रामस्थ मंडळ’ नावच्या वॉट्सअप ग्रुपवर गेले कांही दिवस झालेल्या शिवीगाळ,चॅटींगचे पर्यवसान घरात घुसून व त्यानंतर घराबाहेर ओढत आणून लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली . यामध्ये निलेश -हाटवळ व सुशीलाबाई -हाटवळ हे दोघे जखमी झाले आहेत
या प्रकरणी पोलिसांनी
सागर गोपाळ शिंत्रे , उत्तम बाबू रेडेकर,सौ. लता उत्तम रेडेकर, आकाश उत्तम रेडेकर, गौरव श्रीकांत गाडे,सहदेव गणपती चव्हाण, पृथ्वीराज सहदेव चव्हाण, मनिषा सहदेव चव्हाण, सुनिल विष्णू डोंगरे, साहिल धनाजी आजगेकर,संभाजी अर्जुन देवरकर, आशिष अरु शिंत्रे, निवृत्ती गणपती देवरकर (सर्व रा. पेद्रेवाडी ता आजरा जि. कोल्हापूर)
या तेरा जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.


प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी योजनांचा लाभ घ्या :अनिल फोंडे
देवकांडगाव येथे शेतीशाळा उत्साहात

आजरा: प्रतिनिधी
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना यासह विविध शासनाच्या योजनांचा लाभ घेवून प्रक्रिया उद्योग उभा करावेत. स्वतःच्या कुटुंबाबरोबरच गावचा विकास साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे यांनी केले.
देवकांडगाव (ता. आजरा) येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत ऊस पिकावर महीला शेती शाळा झाली. या वेळी श्री. फोंडे यांनी मार्गदर्शन केले. कारभारवाडी अॅग्रो प्रोड्यूसर कंपनी (ता. करवीरचे) अध्यक्ष प्रा. नेताजी पाटील, आनंदरावद पाटील अॅग्रो प्रोड्यूसर कंपनी काळम्मा बेलेवाडी (ता. कागल) चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील उपस्थित होते.
सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक अमित यमगेकर यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात शेतीशाळेचा हेतू स्पष्ट केला. श्री. फोंडे यांनी कृषी विभागाच्या योजनांची माहीती दिली. प्रा. पाटील यांनी ऊस पिक व काढणी पश्चात तंत्रज्ञान या विषयी मार्गदर्शन केले. महीलांनी गटाच्या माध्यमातून ऊस पिकावर प्रक्रिया उद्योग उभा करावा. विविध उपपदार्थाची निर्मिती करावी. सेंद्रीय गुळ उत्पादने व बाजारपेठ याची माहीती घेवून आर्थिक स्तर उंचवावा. स्थानिक उपलब्ध संसाधनाचा उपयोग करून स्थानिक पातळीवर असे उद्योग उभे करावेत. दिलीप पाटील म्हणाले, अँग्रो प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून महीलांना उत्तम प्रकारे काम करता येईल. छोटे- छोट उद्योग उभे केल्यास समाजाचा फायदा साधता येईल.
प्रगतशील महीला शेतकरी शामल देसाई, तालुकास्तरीय शेतकरी सल्ला समीती (आत्मा) च्या सदस्या गीता देसाई यांनी अनुभव कथन केले. या वेळी स्वप्नाली राणे, रेखा परीट, पूनम राणे, कल्पना कांबळे, रेखा देसाई व स्वाती तेजम यासह महीला उपस्थित होत्या. अर्चना देसाई यांनी आभार मानले.
उद्योगाबरोबर ग्रामसंस्कृतीचे रक्षण करा
उद्द्योगातून उत्पादित शेतमालाचे मूल्यवर्धन व विपनण व्यवस्थापन करावे. गावचे अर्थकारण सक्षम होईलच. पण त्याचबरोबर ग्राम संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करावेत. पैसा हे साधन आहे. पण समाज सदृढ होण्यासाठी विचार व संस्कृतीच्या पातळीवरही काम झाले पाहीजेत असा सल्लाही प्रा. नेताजी पाटील यांनी दिला.


दि.१ मार्च रोजी मुंबई येथे ” घरकामगार सामाजिक सुरक्षा जाहीरनामा परिषद:संग्राम सावंत

आजरा: प्रतिनिधी
राष्ट्रीय घरकामगार चळवळ आणि महाराष्ट्र राज्य घरकामगार यूनियन, तसेच महाराष्ट्र राज्य घरेलु कामगार समन्वय समिती यांच्यावतीने १ मार्च रोजी मुंबई येथे घर कामगार सामाजिक सुरक्षा जाहीरनामा परिषद होणार असून त्यामध्ये जाहीरनामा प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत यांनी दिली.
महाराष्ट्र राज्यातील ४५ लाख घरेलू कामगारांना श्रमिक म्हणून दर्जा मिळावा, सामाजिक सुरक्षा व इतर अधिकार मिळावे म्हणून अथक लढा देत आहे याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम होणार आहे.
परिषदेद्वारे केल्या जाणाऱ्या मागण्या …
मुंबई उच्च न्यायालयाच्या दिनांक १८ फेब्रुवारी, २०२१ च्या आदेशानुसार तात्काळ मंडळाच्या त्रिपक्षीय बोर्ड ची स्थापना करावी
घरेलु कामगार कल्याण मंडळ आर्थिक दृष्टी ने सक्षम व निरंतर रहावे या हेतूने शासनाकडे विचारधिन व मंजूरी साठी मंडळाने पाठवलेला सेस चार प्रस्ताव सभागृहात जाहीर करण्यात यावा.
२००८ च्या कल्याणकारी कायद्याला कामगार हक्क आधारित कायद्यांचे स्वरूप देऊन योग्य त्या तरतुदी करण्यात याव्यात. अथवा मंचातर्फे घरेलू कामगारांच्या कायद्यासाठी एक मसुदा तयार केला आहे तो मसुदा विधिमंडळात चर्चेला घ्यावा.
एक वेळ नोंदीत, ६० वर्षावरील सर्व घरकामगार महीलांना मंडळाची पेन्शन सुरु करावी व मंडळाला कामगार राज्य विमा योजना लागू करण्यात यावा.


पेरणोली येथे विश्वकर्मा योजनेबाबत मार्गदर्शन

आजरा: प्रतिनिधी
पेरणोली येथील भारतीय जनता पार्टी शाखेच्या वतीने जनसंपर्क कार्यालयात प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना संबंधित माहिती शिबिर आयोजित करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाखा अध्यक्ष नामदेव मोहिते होते. प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून फिनिक्स इन्फोटेक आजरा येथील अनिल वाघोजी होते.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक चरणदास जोशिलकर यांनी केले.
यावेळी वाघोजी यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेअंतर्गत १८ प्रकारच्या व्यवसायांना केंद्र सरकार पतपुरवठा करत आहे.तसेच ५ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येते.त्या प्रशिक्षण कालावधी मधील विद्यावेतन प्रति दिवस ५०० रू. प्रमाणे २५०० रू. दिले जातात. त्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येते.
उमेदवाराला साहित्य खरेदी करण्यासाठी रू.१५,०००/- चे ई व्हाउचर देण्यात येते.व्यवसाय सुरू करण्यासाठी रू.१ लाख चे कर्ज ५% व्याजदराने देण्यात येते.अशा प्रकारे योजनेची फॉर्म भरणेपासून प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत ची सर्व माहिती देण्यात आली. भाजप किसान मोर्चा जिल्हा सदस्य जयवंत येरुडकर यांनी आभार मानले.


निधन वार्ता…
सुंदराबाई केसरकर

भादवण ता. आजरा येथील श्रीमती सुंदराबाई नाना केसरकर (वय ८० वर्षे )यांचे वृद्धापकाळाने नालासोपारा (मुंबई ) येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा मुलगी सून जावई नातवंडे असा परिवार असून रमेश नाना केसरकर यांच्या त्या मातोश्री होत. अंत्यविधी सकाळी सात वाजता भादवण येथे होणार आहे.



