




डॉ. अनिल देशपांडे हे विविध क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व : प्रा. अर्जुन आबिटकर

डॉ. अनिल देशपांडे हे सहकार शिक्षण व सामाजिकसह विविध क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. सध्या राजकीय परिस्थिती दिवसागणिक बदलत चालली आहे अशावेळी डॉ. देशपांडे व अशोकअण्णा चराटी यांची धडपड निश्चितच वाखाण्याजोगी आहे. बदलत्या राजकारणात उद्या नेमके काय होईल ते सांगता येत नाही. म्हणूनच शक्य ती विकास कामे आणण्याचा आमदार प्रकाश आबीटकर यांचा प्रयत्न राहिला आहे. कोट्यावधी रुपयांचा निधी आजरा तालुक्याच्या विकासाकरीता मिळवून देण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असून रामतीर्थ पर्यटन क्षेत्रासाठी पाच कोटींचा निधी मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याचे जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबीटकर यांनी सांगितले. ते आजरा येथे आजरा अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ.अनिल देशपांडे यांच्या एकसष्ठीपूर्ती कार्यक्रमानिमित्त आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आजरा अर्बन बँकेचे संचालक विलास नाईक यांनी केले. यावेळी त्यांनी डॉ. देशपांडे यांच्या वाटचालीचा आढावा घेतला. मान्यवरांच्या हस्ते डॉ.अनिल देशपांडे यांचा सत्कार करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी बोलताना अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी म्हणाले, डॉ. देशपांडे यांची तालुक्याच्या विकास कामांमध्ये निश्चितच साथ राहिली आहे. यापुढेही त्यांनी विकास कामांमध्ये आपले योगदान कायम ठेवावे.
अध्यक्षीय भाषणात माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील म्हणाले, आपल्या आमदारकीपासून ते मंत्रीपदापर्यंतच्या प्रवासात अण्णाभाऊंचे योगदान मोठे राहिले आहे. त्यांच्यामुळेच तालुक्यासाठी काहीतरी करण्याची संधी आपणाला मिळाली. अण्णा-भाऊंची उणिव त्यांच्या वारसांनी निश्चितच भरून काढली आहे.
सत्काराला उत्तर देताना डॉ. देशपांडे म्हणाले, काशिनाथ अण्णा व भाऊंचा वारसा सक्षमपणे पुढे नेत संस्था समूहातील संस्था प्रगतीपथावर आणल्या आहेत. यापुढेही संस्था अशाच भरभराटीला आणण्याचा आपला प्रयत्न राहील. पत्नी डॉ. अंजनी देशपांडे यांचेही आपल्या एकंदर वाटचालीत मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी विलास नाईक डॉ. प्रवीण निंबाळकर, सुरेश देशपांडे, आजरा अर्बन बँकेचे सरव्यवस्थापक प्रशांत गंभीर यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम प्रसंगी रमेश कुरुणकर, आजरा कारखान्याचे माजी अध्यक्ष विष्णुपंत केसरकर, माजी पंचायत समिती सभापती मसणू सुतार कारखाना उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी, आजरा सुत गिरणीच्या अध्यक्षा श्रीमती अन्नपूर्णादेवी चराटी, नगराध्यक्षा श्रीमती ज्योत्स्ना चराटी,विजयकुमार पाटील, दशरथ अमृते, नामदेवराव नार्वेकर,सौ,.मनिषा कुरूणकर, मुकुंद तावडे, दिगंबर देसाई, शिवाजी इंजल, राजू पोतनीस, जयसिंग देसाई, विजय बांदेकर, जी. एम. पाटील, किरण कांबळे,समीर चांद, दत्तात्रय मोहिते, मारुती मोरे, शंकर टोपले, डॉ. दीपक सातोसकर, नगरसेविका सूमैया खेडेकर, यासिराबी लमतुरे, सौ. अस्मिता जाधव, अनिकेत चराटी, सुरेश डांग,सौ. मिनल होळणकर, सौ.सौम्या तिरोडकर,डॉ.अशोक फर्नांडीस, गोविंदराव गुरव,प्रकाश देसाई यांच्यासह अण्णाभाऊ संस्था समूहातील मान्यवर व डॉ. देशपांडे यांचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.आनंद बल्लाळ यांनी केले.

ज्यांच्या बरोबर युद्ध तेच सत्तेत…अशोकअण्णा
राज्यातील राजकीय घडामोडी च्या पार्श्वभूमीवर बोलताना चराटी म्हणाले, ज्यांच्याबरोबर आमचे युद्ध आहे तेच आता सत्तेत आल्याने फार मोठी अडचण झाली आहे. आपण मुकुंददादांना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष केले व राष्ट्रवादीतून बाहेर पडलो, तर भविष्यात विष्णुपंत केसरकर यांच्याशी पुन्हा जवळीक करावी लागण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखवली. दादा, तुम्ही शरद पवारांची राष्ट्रवादी मोठी करा… अशा शुभेच्छाही त्यांनी मुकुंददादांना दिल्या.
आमदारांच्या कार्यकर्त्यातही दोन गट नको…
सध्या प्रत्येक पक्षामध्ये दोन गट दिसू लागले आहेत. आमदार साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत, पण तुम्ही आमच्या सोबत नाही. भागातील कार्यक्रम करताना आम्हाला कल्पना द्या. अन्यथा आमदार आबिटकरांच्यात दोन गट आहेत अशी अवस्था निर्माण होऊ नये याची काळजी घेण्याचा सल्लाही चराटी यांनी दिला. यावेळी अशोक अण्णा चराटी यांनी चौफेर टोलेबाजी करत सध्या आम्ही कोणत्या चक्रव्यूहात आहोत हे आम्हालाच समजेना झालेले आहे असे सांगत विष्णुपंत केसरकर, मुकुंदराव देसाई,आ. प्रकाश आबिटकर यांची चांगलीच फिरकी घेतली.
……………………….

गंगामाई वाचन मंदिरातर्फे खुल्या वक्तृत्व स्पर्धा
आजरा…
श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा (जि. कोल्हापूर) संचालित ‘मृत्युंजय’ कार शिवाजी सावंत सांस्कृतिक मंचतर्फे ग्रंथालयाचे माजी अध्यक्ष कै. पांडुरंग बिडकर (गुरुजी) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ खुल्या गटासाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. बुधवार दिनांक २३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता वाचनालयाच्या सभागृहात ही स्पर्धा संपन्न होणार आहेत. पूर्वतयारी वक्तृत्वासाठी खालील विषय देण्यात आले आहेत…
१. कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग आणि भविष्यातील वाटचाल
२. ट्रिपल इंजिन सरकार …
३. मणिपूर हिंसाचाराचा अन्वयार्थ
४. समान नागरी कायदा ५.शिवराज्याभिषेकाची ३५० वर्षे
विजेत्या प्रथम तीन क्रमांकांना अनुकमे रोख रूपये ५००१, ३००१, २५०१ व स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. याचबरोबर लक्षवेधी उत्स्फुर्त भाषणांना विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत. पूर्वतयारी भाषणासाठी १० मिनिटे व उत्स्फुर्त भाषणासाठी ३ मिनिटे वेळ दिला जाईल. पूर्वतयारी व उत्स्फुर्त भाषणांच्या गुणांचा एकत्रीतपणे पारितोषिकासाठी विचार केला जाणार असून स्पर्धेसाठी प्रवेश फी नाही. स्पर्धकांनी आपली नावे २१ ऑगस्ट २०२३ पर्यंत प्रत्यक्ष अथवा फोनव्दारे ( फोन नं ०२३२३ – २४४४७४) नोंदवावीत असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. अशोक बाचूळकर, उपाध्यक्षा गीता पोतदार, विजय राजोपाध्ये यांनी केले आहे.
……………………….

निधन वार्ता
सौ. रत्नप्रभा डोणकर

आजरा येथील सौ. रत्नप्रभा विठ्ठल डोणकर ( वय ७३ ) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. येथील कापड व्यापारी विठ्ठल कृष्णा डोणकर यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन उद्या गुरुवार दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता करण्यात येणार आहे.


