


आजरा येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण

आजरा : प्रतिनिधी
आजरा येथील कुंभार गल्ली परिसरातून एका १५ वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना आजरा पोलिसात नोंद झाली आहे.
दोन दिवसापूर्वी सदर घटना घडली असून मुलीच्या पालकांनी आजरा पोलीस स्टेशनला याबाबत वर्दी दिली आहे. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अपहृत मुलीला फूस लावून तिचे अपहरण केले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आजरा पोलीस पुढील तपास करत आहेत.


वासनांध योगेश पाटील अखेर गजाआड

आजरा:प्रतिनिधी
शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याप्रकरणी भादवण येथील आशाताई मारुती खुळे या ४३ वर्षीय विवाहितेचा गळा दाबून खून करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथील संपूर्ण ऊस पेटवून देणारा वासनांध योगेश पांडुरंग पाटील (वय४३) अखेर गजाआड झाला आहे.
गुरुवारी सदर घटना घडल्यानंतर संपूर्ण भादवण पंचक्रोशी हादरून गेली होती. अवघ्या २४ तासात सदर घटनेची पाळेमुळे काढून आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.
याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने स्थानिक सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक होत आहे.


दोन टन साखर जादा भरून वाहन सोडले…
दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई

आजरा: प्रतिनिधी
आजरा साखर कारखान्यातून साखर उचल केली जात असताना तब्बल दोन टन जादा साखर वाहनांमध्ये भरून ती कारखान्याबाहेर गेली असल्याचे निदर्शनास येताच तातडीने संबंधित वाहन चाळोबा नजीक अडवून कारखान्यातील अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन वजनाची शहानिशा केली असता तब्बल दोन टन साखर जादा भरली असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी कासारकांडगाव व खेडे येथील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
याबाबत प्रभारी कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकरणाला त्यांनी दुजोरा दिला असून संबंधितावर कारवाई करण्याबरोबरच वाहन ताब्यात घेतले असल्याचेही त्यांनी सांगितले.
तब्बल दोन टन साखर कारखान्याच्या बाहेर जाते कशी ? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे.


हिरलगे येथील खुल्या हरिपाठ स्पर्धेत बागीलगेचा रवळनाथ संघ प्रथम

आजरा:प्रतिनिधी
हिरलगे (ता. गडहिंग्लज ) येथील श्री हरिकाका गोसावी कला, क्रीडा, आणि सांस्कृतिक मंडळ आयोजित भव्य खुल्या हरिपाठ स्पर्धेत बागिलगे ता. चंदगड येथील रवळनाथ बाल हरिपाठ मंडळाने प्रथम क्रमांकाचे रु. ११,१११/- चे रोख बक्षीस पटकावून विजेता ठरला. या स्पर्धेत १६ संघानी सहभाग नोंदवला होता. हरिपाठ स्पर्धेचा शुभारंभ श्री हरिकाका गोसावी ऋग्वेदी भागवत मठाचे पीठाधीश डॉ. आनंद गोसावी यांच्या हस्ते झाला. पस्तीस हजाराहून अधिक रकमेची बक्षिसे ठेवण्यात आली होती. बक्षीस वितरण चीफ ट्रस्टी वेणूगोपाल आनंद गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी डॉ. आनंद गोसावी म्हणाले, हरिपाठ स्पर्धेच्या माध्यमातून अध्यात्मिकता जपण्यासाठी पठण , संगीत, गायन आणि वादन याद्वारे हरिपाठातून आत्मिक बळ आपल्याला मिळते. हरिपाठातुन् समाजातील सर्व घटकांवर चांगले संस्कार होतात. तालुकास्तरीय समूह गीतगायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त विद्या मंदिर हिरलगे प्रशाला संघातील विद्यार्थी आणि शिक्षकांचा यावेळी गौरव करण्यात आला.
प्रास्ताविक विश्वस्त प्रा. डॉ. सुनील देसाई यांनी केले. सूत्रसंचलन दिनकर खवरे, नंदकुमार देसाई यांनी केले. आभार महेश देसाई यांनी मानले.
कार्यक्रमास राम पाटील, नंदकुमार माळी, उमेश दंडगे, सागर देसाई , संभाजी देसाई, महेश दंडगे, राजाभाऊ कुलकर्णी, नितीन निकम , आदित्य दंडगे, अशोक देसाई, प्रसाद कुलकर्णी, सत्यजित मोलदी, आदिंसह हिरलगे ग्रामस्थ , विविध संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीहरीपाठ स्पर्धा निकाल् असा…
प्रथम क्रमांक : रवळनाथ बाल हरिपाठ मंडळ बागिलगे ता. चंदगड
द्वितीय क्रमांक : लक्ष्मी महिला हरिपाठ मंडळ, दुंडगे ता. चंदगड
तृतिय क्रमांक : अष्टविनायक महिला हरिपाठ मंडळ, कुद्रेमनी
चतुर्थ क्रमांक : लक्ष्मी महिला हरिपाठ मंडळ, दुंडगे (चंदगड),
पाचवा क्रमांक. विठ्ठल रखुमाई हरिपाठ मंडळ, पेरणोली ता. आजरा
सहावा क्रमांक : रवळनाथ हरिपाठ मंडळ सातवणे. ता. चंदगड
उत्कृष्ट गायन : सानिका पाटील रवळनाथ बाल हरिपाठ मंडळ, बागीलगे ता. चंदगड.
उत्कृष्ट पखवाज : श्रावण पारसे रवळनाथ हरि पाठ मंडळ, सातवणे ता . चंदगड
उत्कृष्ट आणि शिस्तबद्ध संघ : माऊली हरि महिला भजनी मंडळ. म्हाळेवाडी, ता. चंदगड
उत्कृष्ट पावला परफॉर्मन्स-, राजु पाटील सरोळी ता आजरा.


भादवण हायस्कूल मध्ये गुरु-शिष्य स्नेह मेळावा उत्साहात

आजरा : प्रतिनिधी
भादवण हायस्कूल, भादवण येथे सन १९८९ मध्ये दहावी होऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांचा गुरु- शिष्य स्नेह मेळावा पार पडला. शाळा कालावधीतील आठवणींचे किस्से, मनोरंजन व बऱ्याच दिवसांनी एकत्र आल्याचा आनंद व्यक्त करत शाळेसाठी वेगळा उपक्रम राबवण्याचा संकल्प यावेळी विद्यार्थ्यांनी केला. या कार्यक्रमाचा खर्च कमी करून त्या ऐवजी विद्यार्थ्यांकडून जमा झालेली रक्कम बँकेमध्ये ठेव स्वरूपात ठेवून त्याच्या व्याजातून शाळेतील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना दत्त घेऊन त्यांना मदत करण्याचे निर्धार यावेळी करण्यात आला.
माजी प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी यावेळी पन्नाशी नंतरचे जीवन, संस्कृती, समायोजन व प्रेरणा या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक व मेळाव्याचे अध्यक्ष बी.टी. सुतार यांनी जगाबरोबर आपण बदलले पाहिजे तरच आपण आनंदी राहू असे स्पष्ट केले.
यावेळी ॲड. सरिता पंडित-पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. मेळावा यशस्वी पार पाडण्यासाठी जयसिंग खोराटे, अरुण ढवळे, पांडुरंग भादवणकर, बबन गोइलकर, उत्तम रेडेकर, विजय माने आदींनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमप्रसंगी टी.ए. पाटील, के. ए. देसाई, बी.बी. गुरव, जी.बी. ढेकळे, बाबुराव आयवाळे, आर.टी. जाधव, सुरेश खोराटे या तात्कालीन शिक्षकांसह माजी शिक्षण अधिकारी आनंदराव जोशीलकर हे देखील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. एन. एस.मासाळ यांनी केले तर प्रा.ए.डी. कांबळे यांनी आभार मानले.


छायावृत्त

येथील तालुका खरेदी विक्री संघामार्फत आजरा साखर कारखान्याच्या नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला.

आजरा तहसील कार्यालया समोर संकेश्वर-बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या वतीने प्रलंबित प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी गुरव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

केंद्रशाळा सिरसंगीचे खोखो,कब्बड्डी, रिले तसेच धावण्याचा खेळामध्ये सांघिक यश मिळवलेल्या सर्व खेळाडू व सर्व शिक्षक
यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.






