मंगळवार दि. १७ डिसेंबर २०२४


किटवडे व सुळेरान येथे पट्टेरी वाघाची दहशत..
तीन पाळीव जनावरे मृत्युमुखी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील किटवडे आणि सुळेरान येथे पट्टेरी वाघाच्या हल्ल्यात बैल, व म्हैशीसह तीन जनावरे मृत्युमुखी पडली असून या हल्ल्यामुळे तालुक्यातील पश्चिम भागात पट्टेरी वाघाची दहशत निर्माण झाली आहे.
किटवडे आणि सुळेरान येथे आठ दिवसापूर्वी चरण्यासाठी सोडलेली गाय आणि म्हैस अर्धवट खालेल्या अवस्थेत आढळून आली होती. त्यानंतर पुन्हा रविवारी एका म्हैशीवर हल्ला चढवून तिला ठार केले आहे.बचाराम विष्णू चव्हाण, मधुकर पांडुरंग राणे ( किटवडे ) व रघुनाथ भाऊ पाटील ( सुळेरान ) अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे आहेत.
वन विभागाने याचा अधिक तपास केला असता मृत जनावरांच्या आजूबाजूला पट्टेरी वाघाच्या पायाचे ठसे आढळून आलेले आहेत. वनविभागाने मृत जनावरांचे पंचनामे करून नुकसान भरपाईच्या पार्श्वभूमीवर अहवाल वरिष्ठांकडे दाखल केले आहेत.
या भागातील ज्यांची शेती जंगलालगत आहे अशा सर्व लोकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन वन विभागाने केले केले आहे. संध्याकाळी शेतात थांबू नये असेही आवाहन वनविभागाने केले आहे.
आंबोली लगतच्या भागात पट्टेरी वाघांचा संचार
आंबोली परिसरामध्ये पट्टेरी भाघांचा वावर असल्याचे पंधरावड्यापूर्वी स्पष्ट झाले होते. सुळेरान, किटवडे हा परिसर आंबोली लगतच असल्याने पट्टेरी वाघांचा वावर या परिसरात असल्याचे अधोरेखित झाले आहे.

बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणुका घ्या
आज-यात ईव्हीएमच्या तिरडी मोर्चाद्वारे मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
इंडिया – महाविकास आघाडीच्या वतीने आजरा येथे ईव्हीएम विरोधात तिरडी मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर
छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले. शरद पवार राष्ट्रवादी गट, कॉंग्रेस, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट, मित्रपक्ष व पुरोगामी संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. माजी आमदार के. पी. पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई, यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला.
सरकार व ईव्हीएम विरोधात जोरदार घोषणाबाजी करत येथील छ. संभाजी चॏकात मोर्चा आला. माजी आमदार पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीचा निकाल चुकीचा आहे. राधानगरी मतदार संघातच नव्हे संपूर्ण राज्यात ईव्हीएम मशीनच्याद्वारे निकालाचे चित्र बदलण्याचा प्रयत्न झाला आहे. महाविकास आघाडीच्या बाजूने जनमत होते. पण ईव्हीएममध्ये छेडछाड करत सरकार आणले आहे. आजही कोणत्याही गावात मतपत्रिकेवर मतदान घेतल्यास महाविकास आघाडीची सत्ता येईल. मतपत्रिकेवर मतदान घेतले तरच लोकशाही व देश वाचेल. यासाठी महाविकास आघाडी रस्त्यावर उतरली आहे. सरकारने याचा गांभिर्याने विचार न केल्यास जनतेत उद्रेक होईल कॉ. संपत देसाई म्हणाले, जनतेच्या मनात ईव्हीएमच्या विरोधात खदखद आहे. आगामी निवडणुक मतपत्रिकेवर घेतल्यास लोकशाही जिवंत राहील. प्रा. शिंत्रे म्हणाले ईव्हीएम विरोधात सर्वत्र असंतोषाचे वातावरण आहे. सरकारने आपली विश्वासार्हता जपण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे.
यावेळी प्राथमिक स्वरूपातील ईव्हीएम मशीनची तिरडी जाळण्याचा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच झटापट झाली.
आंदोलन प्रसंगी गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, उदयराज पवार, रणजित देसाई, युवराज पोवार, किरण कांबळे, सिद्धार्थ तेजम, संजूभाई सावंत, भिकाजी विभुते, नारायण राणे, शिवाजी इंगळे, शिवाजी पाटील, महेश पाटील, डॉ. नवनाथ शिंदे, डॉ .रोहन जाधव, शिवाजी गुरव,कॉ. शांताराम पाटील, रविंद्र भाटले, रवी तळेवाडीकर, समीर चॉंद, दिनेश कांबळे, राजू होलम, प्रकाश मोरुस्कर, विक्रमसिंह देसाई, हरिबा कांबळे यांच्यासह पदाधिकारी व इंडिया महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अखेर हरीभाऊंनी चप्पल घातले…
माजी आमदार के. पी. पाटील निवडून आल्याशिवाय पायात चप्पल घालणार नाही असा निर्धार केलेले आजरा साखर कारखान्याचे संचालक हरिभाऊ कांबळे यांना मोर्चा प्रसंगी आमदार के.पी. पाटील यांनी चप्पल जोड देऊन आपण विजय झालो आहोत. केवळ ईव्हीएम घोटाळ्यामुळे तांत्रिक पराभव झाला असल्याचे सांगत हरिभाऊंना चप्पल घालण्याची विनंती केली. हरीभाऊंनी ही विनंती मान्य करत चप्पल घातले.

अन्याय निवारणचा पाणीप्रश्नी २७ डिसेंबर पर्यंत अल्टिमेटम्
२८ ला उपोषण करणार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरातील रेंगाळलेली नवीन पाणीपुरवठा योजना व जुन्या पाणीपुरवठा योजना लागलेल्या गळत्यांमुळे अनेक भागातील नागरिकांना पाणीपुरवठ्याची समस्या भेडसावत असून यामध्ये नगरपंचायतीने २७ डिसेंबर पर्यंत गांभीर्याने लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी न लावल्यास २८ डिसेंबर रोजी उपोषणाचा इशारा अन्याय निवारण समितीने दिला आहे.
अन्याय निवारण समितीची आजरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्याशी आजरा शहर व उपनगरातील बहुतांशी समस्यांवर विस्तारित चर्चा झाली, त्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाईपलाईन फुटलेले आहे व त्यांचेमुळे त्या विभागांमधील पाणी पुरवठा बंद पडला आहे त्या विभागात कॉन्ट्रॅक्टरने स्वखर्चाने टँकरने पाणी पुरवण्याचे ठरले. तसेच बळीरामजी देसाई नगर व समर्थ कॉलनीचा पाण्याचा प्रश्न २७ तारखेपर्यंत पुर्णपणे सोडविण्याचे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले. दिलेल्या कालावधीत पाणीप्रश्न न सुटल्यास अन्याय निवारण समिती २८ डिसेंबर रोजी उपोषणाला बसणार असा इशारा देण्यात आला.
तसेच महामार्गावरील पदपथावर झालेले अतिक्रमण बाबतीत दोन दिवसात प्रशासक कारवाई करणार असल्याची व शुक्रवारी बाजारादिवशी बाजारपेठेतून मध्ये बसणारे व्यापारी हे दोन्ही बाजूंनी बसतील याचेही नियोजन करण्यात येईल याची ग्वाही दिली .
नविन पाणीपुरवठा योजनेच्या कॉन्ट्रॅक्टरशी दूरध्वनीवरून संपर्क करून त्यांच्याशीही बोलणे झाले व लवकरच गाव मीटिंग घेण्याचे ठरले. ज्या ठिकाणी पाईपलाईन फुटल्यामुळे पाणी येत नाही त्या लोकांनी अन्याय निवारण समितीशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, वाय. बी. चव्हाण. जावेद पठाण, पांडुरंग सावरतकर, जोतिबा आजगेकर, गौरव देशपांडे, दिनकर जाधव, अतुल पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मराठा महासंघाकडून निषेध.

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मस्साजोग ता. केज जि बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांचे दिनांक ८ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करुन अमानुष हत्या केली आहे .आजरा तालुका अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने याचा जाहिर निषेध करण्यात आला. याबाबतचे लेखी निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.
सरपंच संतोष देशमुख हे लोकनियुक्त सरपंच होते. सरपंच देशमुख यांची हत्या बीड जिल्हयात फोफावलेल्या राजकीय गुंडगिरीतून झाली आहे. देशमुख हत्याकाडांत, राजकीय हस्तक्षेपातून अपहरणाची तात्काळ फिर्याद दाखल न करुन घेणे, अपहरणाचा तपास न करणे, खून प्रकरणातील संशयित आरोपीला चौकशी करुन तात्काळ अटक न करणे आदीमुळे पोलीस चौकशी संशयाच्या भोवऱ्यात आहे. तरी कायदा व सुव्यवस्थेबददल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
पोलीस अधीक्षक स्तरावर गुन्हयाचा तपास होऊन सर्व संशयित गुन्हेगारांना तात्काळ अटक करुन चौकशी होऊन आरोपीला कठोर फाशीसारखी शिक्षा व्हावी. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे अशी मागणीही करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, तालुका अध्यक्ष बंडोपंत चव्हाण, तालुका उपाध्यक्ष शिवाजी पाटील, शंकरराव शिंदे, महिला अध्यक्षा मीनल इंजल यांच्यासह शिवाजी इंजल व कार्यकर्ते उपस्थित होते.

पेरणोली येथे बांधकाम कामगारांना भांडी वाटप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भाजपा, शाखा पेरणोलीच्या वतीने
पेरणोली पंचायत समिती मतदारसंघातील बांधकाम कामगारांना भांडी वाटप कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी अरुण देसाई होते.
यावेळी देसाई यांनी केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन उपस्थित सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते,लाभार्थी यांना केले. भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मलिककुमार बुरुड यांनी मार्गदर्शन करताना भाजप शाखा पेरणोलीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोविंद जाधव यांनी केले तर आभार जयवंत येरूडकर यांनी मानले. यावेळी पेरणोली पंचक्रोशीतील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निधन वार्ता
मारुती इंगळे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मडिलगे ता.आजरा येथील मारुती दाजी इंगळे ( वय ७२ वर्षे) यांचे आकस्मिक निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते मुंबई गिरणी कामगार संघटनेचे पदाधिकारी होते. मुंबई मंडळ व गावात विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.





