सोमवार दि.२ जून २०२५


आजरा येथून विवाहिता बेपत्ता…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
साई कॉलनी, आजरा येथून ३३ वर्षीय विवाहिता ३० मे पासून बेपत्ता आहे. मुळगाव पेरणोली असणारी व सध्या साई कॉलनी, आजरा येथे राहणारी सदर विवाहिता ३० मे पासून घरातून निघून गेली आहे ती अद्याप परतलेली नाही अशी वर्दी संबंधित विवाहितेच्या पतीने पोलिसात दिली आहे.
आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

लाल परी बळकट व्हावी…
विविध संघटनांच्या शुभेच्छा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गेली ७७ वर्ष लोकांच्या सेवेत असणारी लाल परी आजतागायत सेवा पुरवत आहे. लोकांच्या सोबत तिची नाळ जुळली गेली आहे परंतु सरकारच्या खाजगीकरणाच्या धोरणामुळे बिकट अवस्थेत असणारी लाल परी आजही लोकांच्या मनात स्थान करून टिकून आहे सरकारने जरी तिच्याकडे दुर्लक्ष केले असले तरी सामान्य जनता व सर्व कर्मचारी यांनी तिचे अस्तित्व अजून टिकवून ठेवले आहे लाल परीने ७७ व्या वर्षात पदार्पण केले तिचा असाच प्रवास पुढील वर्षात सुरळीत चालावा व लोकांना तिचा पूर्णपणे लाभ मिळावा याकरता सरकारकडे काही मागण्याची पूर्तता करण्यासाठी निवेदन देण्यात आले व एसटी बळकट करण्याची अपेक्षा आज सर्व संघटनांच्या वतीने सरकारकडे मागणी करण्यात आली.
या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एसटीच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी कॉ. पद्मिनी पिळणकर ,जुल्फीकार शेख,गोपाळ होन्याळकर, दशरथ सोनुले,इर्शाद भडगावकर, प्रसाद पिळणकर ,अमित सुळेकर, कांचन सावंत, जितेंद्र नवार, यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी एसटी महामंडळ कर्मचारी व चालक वाहक उपस्थित होते .
गल्लीभर चिखल… नागरिकांनीच चर खोदून पाणी वळवले...

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
तीव्र उतार असल्यामुळे पाऊस पडल्यानंतर पावसाचे पाणी गटर्समध्ये न जाता ते थेट रस्त्यावर येऊन सर्वत्र केलेल्या खुदाईमुळे चिखल झाला आहे. यामुळे रामदेव गल्लीत रस्त्यावरून ये-जा करणे अडचणीचे झाले आहे.
नगरपंचायतीकडे वारंवार विनंती करूनही याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने स्थानिक रहिवाशांनीच स्वतः पुढाकार घेऊन राईस मिल परिसरातून येणारे पाणी गटर्स मध्ये जाण्याकरिता चर खोदला आहे. काल स्थानिक काही तरुणांनी श्रमदान करून हा उपक्रम राबवला.
तूर्तास रामदेव गल्लीमध्ये राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमामुळे चिखल कमी होईल अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही परंतु शहरभर गल्लीबोळात झालेल्या चिखलाचे काय ? या प्रश्नाचे उत्तर पावसाळभर सापडेल असे वाटत नाही.

तालुक्याच्या पश्चिम भागात पुन्हा पाऊस
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यात पश्चिम भागात दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा संततधार सुरू केली आहे. खोळंबलेली शेतीची कामे आवरून घेण्यासाठी शेतक-यांनी सुरुवात केली असताना पावसाने व्यत्यय आणला.
गेल्या आठ-दहा दिवसांपासून आजरा तालुक्यात सुरू असलेल्या पावसाने मंगळवारी थोडी उसंत घेतली.बुधवारी व गुरूवारी व शुक्रवारी दिवसभरात पावसाने उघडीप दिली. शनिवारीही उघडीप होती. परंतु रविवारी रात्रीपासून पावसाने सुरुवात केली. रविवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू झाल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत.

मुंबईला पाच गड्यांनी नमवत पंजाबचा अंतिम फेरीत प्रवेश

अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी झालेल्या हाय व्होल्टेज लढतीत पंजाबने मुंबईला पाच गड्यांनी नमवले व अंतिम फेरीत प्रवेश केला. २० षटकांमध्ये मुंबईने सहा गड्यांच्या मोबदल्यात दिलेले २०३ धावांचे लक्ष्य पंजाबने १९ पटकात २०६ धावा करत गाठले. पंजाबचा श्रेयस अय्यर सामनावीर ठरला. आता अंतिम लढत उद्या मंगळवारी पंजाब विरुद्ध बंगरूळू अशी अहमदाबाद येथे होणार आहे.

फोटो क्लिक


कोरोना अलर्ट…
कोल्हापुरात कोरोनाने ७३ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला असून नव्या दोन रुग्णांची भर पडली आहे. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या १२ वर पोहोचली आहे.



