mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


दि. ८ सप्टेबर २०२४


विरोधक ठरेना…
आ.आबिटकर करणार विक्रम ?

ज्योतिप्रसाद सावंत

      एकीकडे महाविकास आघाडीमध्ये उमेदवारी करीता असणारी रस्सिखेच, त्यातून सुरू असणारी अंतर्गत धुसफुस, उमेदवार निवडीचा असणारा पेच तर दुसरीकडे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांनी थेट कार्यकर्त्यांची संपर्क ठेवून सुरू केलेला विकास कामांचा धडाका व शिंदे गटातून निश्चित असणारी त्यांची विधानसभेची उमेदवारी असे परस्परविरोधी चित्र पहाता यावेळीही आम.आबिटकर पुन्हा एक वेळ बाजी मारतील अशी परिस्थिती दिसत आहे.

       सलग दहा वर्षे आमदार प्रकाश आबिटकर राधानगरी- भुदरगड मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. कार्यकर्त्यांशी असणारा थेट संपर्क हा नेहमीच त्यांच्या पथ्यावर पडत आलेला आहे. कार्यकर्त्यांशी थेट संपर्क व कधीही भेटणारा आमदार अशी प्रतिमा असणाऱ्या आमदार आबिटकर यांनी केल्या दहा वर्षात मतदार संघाचा चेहरा- मोहरा बदलून टाकला आहे. शिवसेना शिंदे गटात गेल्यानंतर सुरुवातीला त्यांच्यावर टीकेची झोड उठवली गेली, परंतु शिंदे गटात गेल्याने अनेक विकास कामे मार्गी लागण्यास मदत झाली हे पटवून देण्यात ते बऱ्याच अंशी यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे या टीकेची धार हळूहळू कमी होत गेली आहे.

      कागल विधानसभा मतदारसंघातील समरजीतसिंह घाटगे यांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटातील प्रवेशासाठी दस्तूरखुद्द ‘थोरले’ पवार यांनी हजेरी लावून चार दिवस राजकीय जोडण्या घातल्या. यावेळी राधानगरी- भुदरगड च्या पार्श्वभूमीवर बिद्रीचे अध्यक्ष के. पी. पाटील ए. वाय. पाटील राहुल देसाई यांनीही त्यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली. महाविकास आघाडी अंतर्गत असणाऱ्या तडजोडीनुसार नैसर्गिक न्यायाने ही जागा शिवसेना उ.बा.ठा. गटाकडे जाते. यामुळे संबंधितांशी संवाद साधूनही शरद पवार यांनी कोणालाही निश्चित असा शब्द दिला नसल्याचे वृत्त आहे.

       महाविकास आघाडीतून उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरीची शक्यता असल्याने महाविकास आघाडीची नेतेमंडळी या मतदारसंघाबाबत सावध भूमिका घेताना दिसत आहेत.सलग तीन वेळा या मतदारसंघातून कोणीही आमदार निवडून गेलेला नाही. २०१४ साली माजी आमदार के. पी. पाटील यांना ही संधी होती. परंतु एकदा अपक्ष म्हणून पराभूत होऊन दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात शिवसेनेच्या चिन्हावर उतरलेल्या आबिटकर यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर विधानसभेच्या राजकारणात के.पी. पाटील बॅकफूटवर गेले.

        लोकसभा निवडणुकीतील या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला मिळालेले मताधिक्य आम.आबिटकर यांच्या दृष्टीने धोक्याचा इशारा होता. आबिटकर यांना रोखण्याची संधी चालून आली असताना महाविकास आघाडीमधील अंतर्गत धुसफुस या संधीपासून महाविकास आघाडीला दूर घेऊन चालली आहे. आबिटकर यांनी गेल्या पाच वर्षात जिल्हास्तरीय नेतेमंडळींवर टीका- टिप्पणी न करता आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशीही त्यांनी जुळवून घेतले आहे.

      महायुतीतून शिवसेना उ.बा.ठा. गटातूनच उमेदवार दिला जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. माजी आमदार के.पी. पाटील यांनी उ‌.बा.ठा. गटातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवल्याचेही समजते. परंतु के.पी. यांची उ.बा.ठा.तून उमेदवारी शिवसैनिकांच्या पचनी पडणार का ? हा प्रश्नही महत्त्वाचा आहे.

       एकास एक लढत झाली व महाविकास आघाडीतील सर्व मंडळी एकत्रितरित्या आमदार आबिटकर यांच्या विरोधात निवडणुकीला सामोरी गेली तर आबिटकर यांच्या अडचणी वाढू शकतात. परंतु सुरू असणाऱ्या घडामोडी पाहता तसे काही घडण्याची चिन्हे नाहीत.जर-तर वर राजकीय निकष बांधणे केवळ अशक्य ठरत जाते. त्यामुळे पुन्हा एक वेळ आबिटकर आमदारपदी विराजमान होतील अशी शक्यता दिसत आहे.

ठिकठिकाणच्या नेते मंडळींची गोची…

      येणारी विधानसभा निवडणूक ही एका विचित्र वळणावर येऊन ठेपली आहे. राज्य पातळीवर घडलेल्या अनपेक्षित घडामोडीही याला कारणीभूत आहेत. गेली पाच वर्षे ज्याच्या विरोधात काम केले त्याच मंडळींच्या प्रचाराचे झेंडे नाचवण्याची वेळ अनेकांवर येणार आहे.नेते मंडळी निवांत आहेत. पण कार्यकर्त्यांमध्ये आतापासूनच सोशल मीडिया वॉर सुरू झाले आहे.

आज-यात बाप्पांचे जल्लोषात स्वागत

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा शहरासह तालूक्यात बाप्पा मोरयाचा जयघोष, पारंपारीक वाद्ये,फटाक्यांची आतषबाजी,साऊ़ंड सिस्टीम व बेंजोच्या निनादात गणरायाचे जल्लोषी वातावरणात स्वागत करण्यात आले.

       शहरातील विविध भागात घरगुती गणेश मुर्त्या  नेल्या जात होत्या. सकाळपासूनच येथील कुंभार गल्लीत भक्त मंडळींनी मोठी गर्दी केली होती.तालूक्यातही बहुतांशी गावात आजरा शहरातूनच मुर्त्या नेल्या जात होत्या. देवर्डे,गवसे,मेढेवाडी,माद्याळ,दाभिल आदी गावांत आजरा शहरातून मुर्ती नेण्यात आली.तर पेरणोली,हरपवडे,कोरीवडे ,देवकांडगाव आदी गावांत साळगाव‌ मधून मुर्त्या नेण्यात आल्या.घरगुती गणपतीची गेले दोन दिवसापासून तयारी सुरू होती.तर मंडळांच्या  गणेश स्वागताची गेल्या महिनाभरापासून तयारी सुरू होती.

     तालुक्यात १०७ ठिकाणी सार्वजनिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे तर ५० गावांमध्ये ‘ एक गाव… एक गणपती ‘ उपक्रम राबविण्यात आला आहे.

सोयाबीन पिकाला प्रतिक्विटल ६ हजार ९४५ रुपयांची खरेदी हमी मिळावी

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      सोयाबीन पिकाला प्रतिक्विंटल ६ हजार ९४५ रुपयांची खरेदी हमी मिळावी अशी मागणी भारतीय किसान संघाने केली आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्याना पाठवण्यात आले असून आजरा तहसीलदारांच्याकडे निवेदन दिले आहे. निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनी निवेदन स्विकारले.

      निवेदनात म्हटले आहे, राज्यात यावर्षी सोयाबीन पिकाचे सुमारे पन्नास लाख हेक्टरचे क्षेत्र असून राज्यातील दुसऱ्या नंबरचे नगदी पिक आहे. राज्याची सरासरी उत्पादकता हेक्टरी १४. ५६ क्विंटल आहे. राज्यातील सोयाबीन पिकाचा सरासरी उत्पादन खर्च ६ हजार ३९ रुपये क्विंटल आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकारने कृषी मूल्य आयोगकडे प्रति क्विंटल ६ हजार ९४५ रुपयांची खरेदी हमी इतका दर दिला जावा अशी शिफारस केली असून रास्त व योग्य आहे. त्यामुळे राज्य शासनाने शिफारस केलेला दर दिला जावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. बाजारात यावर्षी सोयाबीन खरेदीदारांनी संघटीत प्रयत्नातून दरावर नियंत्रण ठेवून दर साडेचार हजाराच्यावर जावू दिलेला नाहीत. अशा परिस्थितीत जर शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर लाभदायक किंमत मिळत नसेल तर राज्य सरकारने बोनसच्या माध्यमातून फरक देण्याची व्यवस्था करावी.

     किडरोग व अन्य कारणामुळे सोयाबीन पिकाच्या सरासरी उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला घामाचा दाम मिळावा. बाळगोंडा पाटील, सचिन जाधव, सचिन देशपांडे, रणधीर माने, प्रकाश रावण यांच्यासह शेतकऱ्यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

गणेश दर्शन

भाजी मंडई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, आजरा

अध्यक्ष-आनंदा फडके                         उपाध्यक्ष- रमेश बुरुड खजिनदार -रामचंद्र पाचवडेकर
सचिव-उमेश पारपोलकर
मूर्ती देणगीदार- मंदार मारुती बिरजे

गणेश कला क्रीडा संस्कृती मंडळ, गवसे

अध्यक्ष- युवराज भागवत पाटील
उपाध्यक्ष- भिकाजी दत्ताराम पाटील
सचिव- रवींद्र सखाराम पाटील
खजिनदार- गोरखनाथ लाड
मूर्ती देणगीदार- जगदीश भीमराव पाटील


 

 

संबंधित पोस्ट

बेपत्ता शेतकऱ्याचे प्रेत विहिरीत आढळले

mrityunjay mahanews

विनापरवाना बांधकामांची माहिती तातडीने सभागृहास सादर करा ….आजरा नगरपंचायतीच्या मासिक सभेत नगरसेवकांनी  बांधकाम विभागाला विभागाला धरले धारेवर… जनता बँक उत्तूर विभागासाठी विकासगंगा बनेल : के. पी. पाटील यांचे प्रतिपादन : जनता बँक आजराच्या उत्तूर शाखेचे उद्घाटन…. दुध उत्पादनात वाढ करण्यासाठी आधुनिकतेची जोड द्यावी:अंजनाताई रेडेकर….आज-यातील दहीहंडीवर ‘संघर्ष’ ने कोरले नाव … डाॅ.नरेंद्र दाभोळकर यांच्या खुन्याचा शोध घेण्याची मागणी

mrityunjay mahanews

शिवाजीरावांनंतर मानसिंगरावांची भूमिका स्पष्ट

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

बेकायदेशीर गाळे प्रकरणी सत्ताधारी नगरसेवकाचे उपोषण सुरू…. रामतीर्थ परिसरात लिंबुटाचन्यांचा खच…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!