
सरपंचांमध्ये गाव बदलण्याची ताकद:भारत पाटील
आजऱ्यात नूतन सरपंच व सदस्यांचा सत्कार

आजरा: प्रतिनिधी
सरपंचपद हे शोभेसाठी नसून ते कामासाठी आहे. सरपंचानी ठरवले तर गाव बदलू शकते. आदर्श गाव झाले तर सरपंचाची कारकिर्द देशाच्या नकाशावर कोरता येवू शकते. त्यामुळे सरपंचानी गावात विविध अभिनव उपक्रम राबवून गाव बदलण्याचा संकल्प ठेवावा, असे आवाहन पंचायत राज अभ्यास समिती सदस्य व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील यांनी केले.
येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र) शाखा आजरा यांच्यावतीने नूतन सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार झाला. या वेळी श्री. पाटील यांनी मार्गदर्शन केले. सरपंच परिषदेचे आजरा तालुका अध्यक्ष संदीप चौगले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सरपंच परिषदेचे प्रदेश सरचिटणीस राजाराम पोतनीस, जनता बँक आजराचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश शेटे प्रमुख उपस्थित होते.

श्री. पोतनीस यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात सरपंच संघटनेच्या वाटचालीचा आढावा घेतला. सुलगाव, चांदेवाडी, पेरणोली, हरपवडे, बुरुडे, मेंढोली, मसोली, वेळवही, देऊळवाडी या गावातील नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर सरपंच संघटनेचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त सरपंच पांडुरंग तोरगले, शिक्षक उत्तम कोकीतकर यांचा सत्कार झाला.
श्री. पाटील म्हणाले, सरपंचाने विविध योजनांचा अभ्यास केला पाहीजेत. त्याने अभ्यासूपणा अंगी बाळगायला हवा त्याशिवाय पूढे जाता येत नाही. तो कृतीशील असला पाहीजे. वेळ पडल्यास सरकारच्या विरोधात भांडता आले पाहीजेत. शासनाच्या विविध योजना ग्रामस्थ व शेतकऱ्यांपर्यंत पोहचवल्या पाहीजेत. गावच्या विकासासाठी जिल्हा नियोजन मंडळ, लोकप्रतिनिर्धीच्याकडून निधी आणण्याची धमक त्याच्यात असावी. आवक जावक रजिस्टरवर त्यांचे नियंत्रण असावे, प्रोग्रेस रिपोर्टबद्दल त्याला माहीती असावी. निधी कसा लावला जातो याचेही ज्ञान असावे. त्यामुळे गावच्या विकासात मोलाचे योगदान हे सरपंच देवू शकतात.
यावेळी श्री. चौगले यांचे भाषण झाले. संभाजी सरदेसाई, जी. एम. पाटील, भारती डेळेकर, पांडुरंग तोरगेल, नामदेव जाधव, सविता जाधव, युवराज पाटील, सी. डी. सरदेसाई, समीर पारदे, सी. आर. देसाई, संभाजी इंजल, बंडोपंत चव्हाण, निवृत्ती कांबळे, नामदेव जाधव यांच्यासह सरपंच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
अनिल कांबळे यांनी सूत्रसंचलन केले तर शारदा गुरव यांनी आभार मानले.


जिजाऊंनी मोडली प्रतिगामी वागणूक :प्रा. शिवाजीराव भूकेले
आज-यात मराठा महासंघाच्यावतीने व्याख्यान

आजरा: प्रतिनिधी
राजमाता जिजाऊ यांनी महीलांनी विविध क्षेत्रात पुढाकार घ्यावा यासाठी प्रेरीत केले. यासाठी त्यांनी महीलांना मोठी ताकद दिली. महीलांना दिली जाणारी प्रतिगामी वागणूक त्यांनी मोडून काढली. महीलांना सन्मान दिला. असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक प्रा. शिवाजीराव भुकेले यांनी केले.
येथील श्रीमंत गंगामाई बाचन मंदिरात मराठा महासंघाच्यावतीने आयोजीत जिजाऊ जयंतीच्या कार्यक्रमात प्रा. भुकेले यांनी जिजाऊंच्या जीवन कार्याची माहीती दिली. या वेळी महीलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम झाला मराठा महासंघाचे आजरा तालुका अध्यक्ष बंडोपंत चव्हाण यांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन झाले. मराठा महासंघाच्या महीला आघाडीच्या आजरा तालुका अध्यक्षा मीनल इंजल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
प्रा. भुकेले म्हणाले, तत्कालीन समाजात महीलांना सन्मानाची वागणूक दिली जात नव्हती महीलांना प्रतिगामी वागणूक दिली जात होती. राजमाता जिजाऊ यांनी त्यावेळीच मोडून काढण्याचा प्रयत्न केला होता. समाजामधील विविध क्षेत्रात पुढाकार घेण्यासाठी त्यांनी महीलांना प्रोत्साहीत करून ताकद दिली होती. जिजाऊंना समाजात होणारा अन्याय सहन होत नव्हता, अन्याय, अत्याचार संपवण्यासाठी शिवरायांच्या मार्फत उभ्या महाराष्ट्राला न्याय देत रयतेच्या मनात स्वराज्यांबददल आत्मियता निर्माण करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.
या वेळी उपाध्यक्षा सौ. भैरवी सावंत, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, तालुका अध्यक्ष बंडोपंत चव्हाण, सी. आर. देसाई, सी. डी.सरदेसाई, शंकरराव शिंदे, संभाजी इंजल, शिवाजी गुडूळकर, गणपतराव डोंगरे,सौ. धनश्री देसाई सौ.गिता पोतदार उपस्थित होते.
सौ.सुनंदा मोरे यांनी आभार मानले.


जाती व धर्मापलिकडे जाण्यासाठी संविधानाच्या अंमलबजावणीची गरज आहे : प्रा.सुरेश बुगडे

आजरा : प्रतिनिधी
जाती व धर्मापलिकडे जाण्यासाठी संविधानाच्या अंमलबजावणीची गरज आहे.आपले मूलभूत अधिकार व हक्क जाणून घेण्यासाठी संविधानाचा जागर अशा जयंती मधून झाला पाहिजे हेच खरे राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन होईल.आपल्या न्याय हक्कासाठी लोकशाही टिकण्यासाठी आपण प्रत्येकाने गांभीर्याने या काळात चालले पाहिजे. प्रशासन व्यवस्थेवर आपण आपला वचक संविधानाच्या माध्यमातून बसविला पाहिजे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून, वेगवेगळे कायदे विषयक मार्गदर्शन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रा. सुरेश बुगडे यांनी केले.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संविधान गट कोळिंद्रे व संविधान सन्मान परिषद यांच्या वतीने ‘ राष्ट्रमाता जिजाऊ जयंती ‘ साजरी करण्यात आली यावेळी प्रा. बुगडे बोलत होते.
सुरुवातीला राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
संग्राम सावंत म्हणाले, जिजाऊंच्या खऱ्या विचारांचा जागर होणे ही फार काळाची मोठी गरज आहे. यासाठी सर्वांनी जिजाऊंपासून ते संविधानापर्यंतचा जो इतिहास आहे. हा इतिहास सगळ्यांनी समजून घेण्यासाठी जयंतीचे असे कार्यक्रम घेणे गरजेचे आहे. अभिमान,स्वाभिमान आणि रयतेचे स्वराज्य या गोष्टी जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या मनात कोरलेल्या होत्या.
यावेळी सविता कांबळे व पूजा कांबळे यांनी आपले विचार मांडले.
कोळिंद्रे गावामध्ये “रांड पुनवं” हा महिलांच्या शोषण परंपरा जपणारा कार्यक्रम दरवर्षी घेतला जात होता. ती प्रथा परंपरेने चाललेली शोषणाची ही परंपरा कायमस्वरूपी बंद करून एक नवे पाऊल टाकण्याचा प्रयत्न व धाडस केलेल्या महिलांचा सत्कार यावेळी प्रमुख वक्ते प्रा.सुरेश बुगडे व प्रा.वसंत कांबळे सरांच्या व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी कोळिंद्रे ग्रामपंचायत सदस्या मेघा जाधव ,नंदा जाधव , ग्रामपंचायत सदस्य मनोहर पाटील,भिकाजी गोंधळी,विजय कांबळे वसामाजिक कार्यकर्ते नरसु शिंदे,रविंद्र भोसले, संजय कांबळे,हेमंत आयवाळे,रवी कांबळे, आनंदा सुतार,अक्षय कांबळे आणि संविधान गटातील महिला मुली-मुले व पुरुष मंडळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मारूती कांबळे यांनी केले.आभार सुरेखा कांबळे यांनी मानले.


थोडक्यात…

अश्वमेध फाउंडेशन मार्फत देण्यात आलेल्या आजरा तालुका शिष्यवृत्ती परीक्षा पेपर वाटप प्रसंगी शिक्षक समितीचे विभागीय संपर्कप्रमुख सुनील शिंदे , शिक्षक बँकेचे संचालक शिवाजी बोलके , शिक्षक समितीचे बळवंत शिंत्रे , शिक्षक समितीचे तालुका सरचिटणीस सुभाष नाईक , तालुका कार्याध्यक्ष खवरे , लक्ष्मण सुतार , सुभाष आजगेकर , व शिक्षक समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


कौतुकास्पद…

स्वामी विवेकानंद विद्या मंदिर आजरा मधील माझी शाळा सुंदर शाळा या अभियान अंतर्गत होणाऱ्या स्वतःच्या शाळेसाठी शाळा दुरुस्ती, स्वच्छ्ता गृह दुरुस्ती व खेळासाठी ग्राउंड स्वच्छ्ते साठी इ.तिसरीतील वर्गातील विद्यार्थिनी कु शरण्या सुधीर कुंभार, कुंभार गल्ली, आजरा हिने आपली पिगी बँक शाळेसाठी मदत निधी म्हणून मुख्याध्यापकांच्याकडे सुपूर्द केली.


कै.रमेश टोपले नाट्यमहोत्सव
आजचा नाट्य प्रयोग…
सूर राहू दे (लेखक शं.ना. नवरे)
सायंकाळी सात वाजता… आजरा महाविद्यालयाच्या रंगमंचावर
यात्रा-जत्रा...
पेरणोली येथील श्री. कुरकुंदेश्वर देवस्थान येथे महाप्रसाद

छायावृत्त….

सुतार गल्ली आजरा येथे विजेच्या झटक्याने वानर मृत्यूमुखी पडले.

आजरा-आंबोली मार्गावर सुरू असलेल्या महामार्गाच्या कामाचे ठिकाणी धुळ उडू नये म्हणून पाणी मारले जात आहे. परंतु याचा दुचाकीधारकांना चांगलाच त्रास होत आहे.



