mrityunjaymahanews
अन्य

सोमवार – सातच्या बातम्या

सोमवार 

६ जुलै २०२६

पावसाचा कहर : घरे झाडे कोसळली
विजपुरवठा खंडीत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने हजेरी लावत तालुक्यातील जनजीवन विस्कळीत केले . जोरदार वारे व पावसामुळे घरे कोसळणे, झाडे कोसळणे असे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडले आहेत. केवळ दोन दिवसाच्या पावसाने नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून पावसाचा जोर कायम राहिल्यास नद्यांचे पाणी पात्रा बाहेर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काल दिवसभरात शंभर मिलीमीटरचा टप्पा पावसाने ओलांडल्याने अतिवृष्टी नोंद झाली आहे.

सततच्या पावसामुळे चित्री, आंबेओहोळ, सर्फनाला, उचंगी, खानापूर व धनगरवाडी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. चित्री मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा ३५ टक्क्यांवर पोहोचला असून त्यात वेगाने वाढ होत आहे. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत चित्री प्रकल्प परिसरात १४३ मिमी, सर्फनाला परिसरात १९४ मिमी तर आंबेहोळ परिसरात ९० मिमी पावसाची नोंद झाली.
दरम्यान, जोरदार वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण झाले. काही ठिकाणी मोठी झाडे वीजवाहिन्यांवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही तत्काळ दुरुस्ती करून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले.

सध्याची पावसाची स्थिती कायम राहिल्यास साळगाव बंधारा पाण्याखाली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

पावसामुळे भातलागवडीच्या कामांना गती मिळाली असून शेतकरी व शेतमजूर मोठ्या प्रमाणात शेतात कार्यरत आहेत. मात्र काही भागात मोबाईल नेटवर्क खंडित झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीजपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे काही गावांतील पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला असून संततधार पावसामुळे तालुक्यातील दैनंदिन जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे.

वीज पुरवठा खंडित…

वनक्षेत्रासह अनेक ठिकाणी विद्युत तारांवर वृक्ष कोसळल्याने रविवारी दिवसभर वीज पुरवठा वारंवार खंडित होत होता.

नुकसान…

♦ गणू नाना पाटील, हात्तिवडे यांच्या घरावर व बंडू पाटील व पांडुरंग पाटील यांच्या शौचालयावर झाड कोसळले.

♦ अनिल दौलतराव सरदेसाई यांच्या काजू फॅक्टरीवर झाडाची फांदी पडून मोठे नुकसान

♦ मुरुडे येथे अंगणवाडी शाळेचे शेडपत्रे पडून अंदाजे चाळीस हजार रुपयांचे नुकसान

♦ मौजे करपेवाडी दु. येथे जयसिंग यशवंत मांढरे यांच्या जनावरांच्या गोठ्याचे वादळी वाऱ्याने पत्रे व खापरी उडून मोठे नुकसान

♦ साळगाव- पेरणोली रस्त्यावर झाड कोसळले वाहतूक खोळंबली

♦ आजरा -गांधीनगर मार्गावर असणाऱ्या नागझरी येथे आंब्याचे झाड कोसळले.

या गावांना भूस्खलनाचा धोका…

वझरे, खोतवाडी, पेरणोली, हरपवडे या गावांना भूस्खलनाचा धोका असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे तर तालुक्यातील दहा गावे पूरप्रवण क्षेत्रे असल्याचेही स्पष्ट केले आहे.

खाजगी मोटारींचा सार्वजनिक विहिरींना विळखा ; आजऱ्यात अपघाताचा धोका वाढला : विद्युत वायरी थेट पाण्यात 

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहरातील सार्वजनिक विहिरींवर खाजगी पाण्याच्या मोटारी बसविण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक विहिरींमध्ये विद्युत वायरी थेट पाण्यात सोडण्यात आल्याने पावसाळ्यात करंट उतरून मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकाराकडे नगरपंचायतीने तातडीने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

शहरातील अनेक सार्वजनिक विहिरींवर पाच ते दहा खाजगी मोटारी बसविण्यात आल्या आहेत. या मोटारींसाठी टाकण्यात आलेल्या विद्युत वायरींचे जाळे विहिरीभोवती तसेच पाण्यात पसरलेले दिसते. अनेक ठिकाणी वायरी उघड्या अवस्थेत असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरत असल्याने पाण्यात विद्युत प्रवाह उतरण्याची शक्यता वाढली आहे. विहिरींच्या कठड्यांना छिद्रे पाडून पाईपलाईन टाकण्यात आल्याने अनेक ऐतिहासिक विहिरींचीही हानी होत आहे.

मोटारी, वायरी आणि पाईपच्या जाळ्यामुळे महिलांसह सर्वसामान्य नागरिकांना पाणी भरण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. सार्वजनिक विहिरींची स्वच्छता व देखभाल मात्र कोणीच करत नसल्याने त्या अस्वच्छ बनत आहेत.सार्वजनिक विहिरींवर खाजगी मोटारी बसविण्यास नियमाने परवानगी नसतानाही शहरातील बहुतांश विहिरींवर अतिक्रमण झाल्याचा आरोप अनेक स्थानिक रहिवासी करत आहेत. कांही ठिकाणी तर रस्ते खोदून अनधिकृत वीजजोडण्या घेण्यात आल्याने भविष्यात उंदीर व घुशींनी वायरी कुरतडल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

शहरातील सुमारे ८ सार्वजनिक विहिरींवर प्रत्येकी १० ते १५ मोटारी बसविल्याचे चित्र आहे. द.

आंबोलीत पावसाळी पर्यटनाची धूम ; सुट्टीच्या दिवशी हजारोंनी केली गर्दी.., वाहतूक कोंडी

आंबोली : विशेष प्रतिनिधी

पावसामुळे निसर्गाने नवे रूप धारण केलेल्या आंबोलीच्या धबधब्यांचे सौंदर्य पाहण्यासाठी काल रविवारी सुट्टीच्या दिवशी पर्यटकांनी मोठी गर्दी केली. कोकण, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या विविध भागांतून हजारो पर्यटक कुटुंबासह अंबोलीच्या दर्शनासाठी दाखल झाले होते.

सकाळपासूनच धबधब्यांच्या परिसरात पर्यटकांची रेलचेल दिसून आली. हिरवाईने नटले डोंगर, दुथडी भरून वाहणारे धबधबे आणि धुक्याने वेढले निसर्गसौंदर्य याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांनी सेल्फी आणि फोटो काढण्यात रस घेतला.

एकाच वेळी हजारोंच्या संख्येने वाहने आणि पर्यटक आल्यामुळे अंबोली घाट रस्त्यावर तासनतास वाहतूक कोंडी झाली. गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना चांगलीच धावपळ करावी लागली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते.

कांही पर्यटक मद्यधुंद अवस्थेत आढळल्याने किरकोळ वादावादीचे प्रसंगही घडले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

प्रशासनाने पर्यटकांना सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आणि निसर्गाला हानी न पोहोचवण्याचे आवाहन केले आहे. पावसाळ्यात आंबोलीचे सौंदर्य शिगेला पोहोचले असले तरी गर्दी आणि वाहतूक नियोजनासाठी आगाऊ नियोजन करण्याची गरज स्थानिकांनी व्यक्त केली.

कुटुंबासह जायचे की नाही…?

आंबोली येथील मद्यधुंद तरुणाईचा धिंगाणा, हुल्लडबाजी, गाड्या पार्किंग करताना येणाऱ्या अडचणी, वाहतुकीची प्रदीर्घकाळ होणारी कोंडी यामुळे कुटुंबासह या भागात पर्यटनाला जायचे की नाही असा एक प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

श्रुती कांबळे यांचा अभिनयासाठी गौरव


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा महाविद्यालयाची सांस्कृतिक विभागाची विद्यार्थिनी श्रुती विष्णू कांबळे हीचा राज्य नाट्य स्पर्धेतील अभिनयासाठी नुकताच पुणे येथे ज्येष्ठ नाट्य निर्मात्या सुहास जोशी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित राज्य नाट्य स्पर्धेत नवनाट्य कलामंच मंडळ, आजरा या संस्थेच्या वतीने ‘ काळोख देत हुंकार ‘ हे नाटक सादर करण्यात आले होते. या नाटकातील श्रुती कांबळे हिच्या उत्कृष्ठ अभिनयासाठी तिला गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

निधन वार्ता
बाळू सावंत

देऊळवाडी ता. आजरा येथील बाळू दत्तू सावंत ( वय ८२ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे.

येथील स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक सुरेश सावंत यांचे ते वडील होत.

धोंडीबा माडभगत

धनगरमोळा तालुका आजरा येथील धोंडीबा विष्णू माडभगत यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी श्वसनाच्या विकाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,सून, नात,भाऊ,बहिणी, असा मोठा परिवार आहे.

आजचे पंचांग 

दिनांक : ६ जुलै २०२६
वार : सोमवार

माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : आषाढ
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : षष्ठी तिथी (दुपारी ०१.४७ पर्यंत) त्यानंतर सप्तमी तिथी
नक्षत्र : पूर्वाभाद्रपदा नक्षत्र (सायंकाळी ०४.०७ पर्यंत) त्यानंतर उत्तराभाद्रपदा नक्षत्र
योग : सौभाग्य योग (दुपारी ०३.५० पर्यंत) त्यानंतर शोभन योग
करण : वाणीजा करण (दुपारी ०१.४७ पर्यंत) त्यानंतर विस्ती भद्रा करण
चंद्र राशी : कुंभ राशी (सकाळी ०९.५६ पर्यंत) त्यानंतर मीन राशी
सूर्य राशी : मिथुन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०७.४६ ते सकाळी ०९.२५ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१७ ते दुपारी ०१.१०
सूर्योदय : सकाळी ०६.०७
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

संबंधित पोस्ट

चालत्या चारचाकी वर गव्याची उडी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

प्रभागाचा विकास हाच ध्यास…सौ.सरीता गावडे

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

चराटी विरुध्द देसाई… की चराटी विरुध्द ना. मुश्रीफ…?

mrityunjay mahanews
error: Content is protected !!