गुरूवार
९ जुलै २०२६

आजऱ्यात पावसाने घेतली विश्रांती ; शेती कामांना वेग, घरांची पडझड मात्र सुरू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने आजऱ्यात आज थोडी उघडीप दिली आहे. काल बुधवारी तालुकावासियांना सूर्यदर्शन झाले. पावसाचा जोर कमी झाल्याने हळूहळू जनजीवन पूर्ववत होऊ लागले आहे.
पावसामुळे शेतातील कामांना वेग आला आहे. शेतकरी ऊस भांगलण, भात लावणी आणि इतर पेरणीच्या कामांमध्ये व्यस्त झाले आहेत. मात्र चार-पाच दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील काही भागात घरांची पडझड सुरूच आहे. अनेक कुटुंबांचे नुकसान झाले असून प्रशासनाकडून पाहणी सुरू आहे. पाणी प्रकल्प क्षेत्रामध्ये अद्यापही पाऊस सुरू असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
पावसाने दिलासा दिल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला असला तरी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आजरा पाणीपुरवठ्यात अपव्यय; नगरसेवक अभिषेक शिंपी यांची ऑटोमेशन तात्काळ सुरू करण्याची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेत पाणी आणि वीजेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याचे सांगत नगरसेवक अभिषेक जयवंतराव शिंपी यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. अनेक ठिकाणी टाक्या भरल्यानंतरही ओव्हरफ्लो होत असल्याने पाण्याबरोबरच पंप सुरू राहिल्याने वीजही वाया जात असल्याचा आरोप त्यांनी केला. एकीकडे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही आणि दुसरीकडे निष्काळजीपणामुळे मौल्यवान संसाधने वाया जात असल्याचे त्यांनी म्हटले.गांधीनगर पंपहाऊस येथील टाकीच्या परिसरात ओव्हरफ्लोमुळे मोठी धूप झाली असून टाकीच्या सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण झाला आहे. योजनेचे एक तृतीयांशपेक्षा अधिक बिल अदा करूनही प्रस्तावित ऑटोमेशन प्रणाली अद्याप सुरू न झाल्याने टाक्या वेळेवर बंद न होणे आणि अनावश्यक वीज वापर यांसारख्या समस्या वाढल्या आहेत.
याबत शिंपी यांनी ऑटोमेशन प्रणाली तात्काळ कार्यान्वित करावी, योजना हस्तांतरित होईपर्यंत ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे झालेले अतिरिक्त वीजबिल त्यांच्याकडून वसूल करावे, गांधीनगर टाकीची तातडीने पाहणी करून संरक्षणात्मक उपाय करावेत आणि या प्रकरणी ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी अशी मागणी केली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अश्विन डोंगरे उपस्थित होते.

आजरा साखर कारखाना कामगार काॅलनीत झाड पडून ५ लाखांचे नुकसान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना गवसे येथील कामगार काॅलनीतील बी टाईप बंगल्यावर वादळीवाऱ्यासह पावसाने उंबराचे झाड उन्मळून पडले. तसेच या झाडामुळे ७ विद्युत खांबही मोडून पडले व विज प्रवाह खंडीत झाला आहे. तसेच कारखाना परिसरात जोपासलेली अनेक झाडे धोकादायक दिसू लागलेने खबरदारीचा उपाय म्हणून कारखाना प्रशासनाने तात्काळ निर्णय घेवून उपाययोजना केल्या आहेत. त्याचप्रमाणे वादळी वाऱ्यामुळे फॅक्टरी बिल्डिंग वरील काही ठिकाणचे पत्रेही उडाले आहेत.
कारखाना परिसरात झालेल्या या आपत्तीची कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई व व्हाईस चेअरमन अनिल फडके यांनी पाहणी केली. या आपत्तीमुळे कारखान्याचे किमान पांच लाख रूपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली. या प्रसंगी कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी यांनी चांगले सहकार्य केले असलेचे कार्यकारी संचालक यांनी सांगितले.

आजरा-पोळगाव रस्त्याच्या दुरावस्थेवर नगरसेवक आक्रमक, तात्काळ दुरुस्तीची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गांधीनगरमार्गे आजरा ते पोळगाव जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाल्याने आजरा नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक आक्रमक झाले आहेत. पाणीपुरवठा योजनेचे काम झाल्यानंतर रस्ता पूर्ववत न केल्याने मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे एस.टी., रुग्णवाहिका आणि शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन रस्त्याची तातडीने पाहणी करून खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. भविष्यात होणाऱ्या अपघाताला प्रशासन जबाबदार राहील असेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर उपनगराध्यक्षा सौ. पूजा डोंगरे, सौ
आसावरी खेडेकर ,परशुराम बामणे, डॉ. स्मिता कुंभार, निसार लाडजी, सौ. बुड्ढेखान, सौ. निशांत चांद आदींच्या सह्या आहेत.

संजय गांधी निराधार योजना समिती च्या अध्यक्षपदी सुनील दिवटे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुका संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी सुनील पांडुरंग दिवटे (वडकशिवाले ) यांची नियुक्ती करण्यात आली. त्या बाबतचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी काढला आहे.अध्यक्षासह सदस्य म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या किशोर शंकर जाधव (मलिग्रे ) व मधुकर पांडुरंग राणे (किटवडे ) यांची नव्याने नियुक्ती झाली आहे.श्री दिवटे हे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत.
समिती नसल्याने निराधारांची अनेक प्रकरणे प्रलंबित होती. आता समिती गठीत झाल्यामुळे ही प्रकरणे मार्गी लागण्यासाठी मदत होणार आहे.समितीत ११ सदस्यांचा समावेश आहे.अध्यक्षासह सहा सदस्य नियुक्त झाले असून नवीन समितीत या पूर्वी भाजपाच्या तीन सदस्यांची नियुक्ती झाली असून आत्ता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तीन सदस्यांची नियुक्ती झाली आहे. गटविकास अधिकारी हे शासन प्रतिनिधी तर तहसीलदार हे सचिव म्हणून आहेत.

पावसावर मात करत किटवडे येथे ‘ग्राम आरोग्य स्वच्छता आणि पोषण दिन’ उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
प्रचंड पाऊस, सर्वत्र पाणीच पाणी, रस्ते बंद अशा परिस्थितीमध्ये आरोग्य उपकेंद्र गवसे अंतर्गत किटवडे येथे पायी चालत जाऊन आरोग्य कर्मचाऱ्यांनी ग्राम आरोग्य स्वच्छता आणि पोषणदिन उत्साहात साजरा केला.
यावेळी माता व बाल संगोपन, लसीकरण आणि पोषण आहार, पावसाळ्यातील साथीचे आजार व प्रतिबंध, शुद्ध पिण्याचे पाणी व स्वच्छता, जागेवर प्राथमिक तपासणी व सल्ला याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी श्रीमती माया सावंत, श्रीदर्शन भालेराव, आशाताई वैशाली शेटगे, पालक व गावातील लाभार्थी नागरिक उपस्थित होते.

निधन वार्ता
आंबुबाई रेडेकर

सुळे ता. आजरा येथील अंबुबाई मसनू रेडेकर वय वर्ष ७३ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले , दोन विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
फोटो क्लिक…

भरधाव जाणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या म्हणजे शाळकरी विद्यार्थ्यांची डोकेदुखी ठरत आहेत. काही वेळा तर दरवाजे उघडे ठेवून हुल्लडबाजी करत जात असताना दिसतात.एखादा अपघात झाल्यास जबाबदार कोण.?

मुरूम टाकले पण तो पसरणार कोण…? कर्मचाऱ्यांची कमतरता हे कारण किती दिवस सांगितले जाणार?
स्थळ : नागझरी रस्ता

आजचे पंचांग
दिनांक : ९ जुलै २०२६
वार : गुरुवार
माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : आषाढ
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : नवमी तिथी (सकाळी १०.३७ पर्यंत) त्यानंतर दशमी तिथी
नक्षत्र : अश्विनी नक्षत्र (दुपारी ०२.५५ पर्यंत) त्यानंतर भरणी नक्षत्र
योग : सुकर्मा योग (सकाळी १०.११ पर्यंत) त्यानंतर धृति योग
करण : गराजा करण (सकाळी १०.३७ पर्यंत) त्यानंतर वाणीजा करण
चंद्र राशी : मेष राशी
सूर्य राशी : मिथुन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०२.२३ ते सायंकाळी ०४.०१ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१७ ते दुपारी ०१.१०
सूर्योदय : सकाळी ०६.०८
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत



