रविवार दि. १५ मार्च २०२६


नरेश केरकर यांचे निधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
रवळनाथ कॉलनी, आजरा येथील पोलीस जवान नरेश उर्फ विकास सदानंद केरकर (वय ४५ वर्षे) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गडहिंग्लज येथे निधन झाले.
नरेश हे पोलीस दलात/ राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सेवा बजावत होते. रात्री हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न सहका-यांनी केला. उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, भाऊ बहीण असा परिवार आहे. आज रविवारी सकाळी त्यांच्या मृतदेहावर आजरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शाळेत बोगस नोकर भरती
एकास अटक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महागोंड ता. आजरा येथील हायस्कूलमध्ये आर्थिक फायद्याकरीता शासनाची फसवणूक करून खोट्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकर भरती केल्या प्रकरणी संभाजी पुंडलिक पाटील यांनी न्यायालयात दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अमित बाळासाहेब ढोणुक्षे रा. उत्तुर ता. आजरा याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक वार.जी. धोंडे यांनी दिली आहे.
महागोंड येथील शिक्षण संस्थेच्या पदाधिकारी कर्मचारी यांनी संगनमताने आर्थिक फायद्या करता बोगस कागदपत्रांच्या आधारे चुकीच्या पद्धतीने नोकर भरती करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी माजी मुख्याध्यापक संभाजी पाटील यांनी थेट न्यायालयात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने या प्रकरणाचा तपास आजरा पोलिसांकडे सोपवला आहे. यामध्ये महागोंड, गिजवणे, पुष्पनगर/भुदरगड, उत्तूर येथील एकूण आठ संशयित आरोपी असून त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.
या नोकर भरतीच्या आधारे २००९ ते २०२२ या कालावधीत शासनाला खोटे हिशेब दाखवून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याबद्दल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १३ मार्च २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे असेही तपासणी अधिकारी धोंडे यांनी सांगितले.
साळगाव बंधा-याच्या पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करणार
शिरीष देसाई

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
अनेक वर्षे प्रलंबित असलेला साळगाव बंधा-याच्या पुनर्बांधणीसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे सदस्य शिरीष देसाई यांनी केले.
पेरणोली येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नूतन सदस्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते.पं.स. सभापती जयश्री गाडे अध्यक्षस्थानी होत्या. राष्ट्रवादी गटनेते व जि. प. सदस्य सुधीर देसाई, उपसभापती यशोदा पोवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सुधीर देसाई म्हणाले, जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा वाचविण्यासाठी सभागृहात आवाज उठविणार आहे.तसेच वन्यप्राण्यापासून होणाऱ्या नुकसानीची तातडीने भरपाई मिळण्यासाठीही प्रयत्न करणार आहे. युवराज पोवार, अशोक तर्डेकर वंदन जाधव, विष्णू जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
माजी सभापती उदयराज पवार, शेतकरी संघ उपाध्यक्ष दौलती पाटील, सर्जेराव देसाई, संजय गाडे, पांडुरंग दोरूगडे, निवृत्ती फगरे, दिनेश कांबळे, मयुरेश देसाई, संदीप पाटील, दत्तात्रय पारदे, पांडुरंग गुरव, संजय घाटगे आदी उपस्थित होते.

अभिनंदनिय…

कासार कांडगाव, तालुका आजरा येथील कुमारी ज्योती एकनाथ गुरव हिची माजगाव सावंतवाडी येथे ग्राम महसूल अधिकारी पदी निवड झाली आहे.
अखेर रस्त्याला मुहूर्त मिळाला...

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पालकमंत्री नाम.. प्रकाशराव आबीटकर यांच्या आजरा विकास निधीतून चराटी कॉलनी व आपटे कॉलनी येथे रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नगरसेवक श्री. परशुराम बामणे (भाऊजी) यांच्या हस्ते करण्यात आला.
काम दर्जेदार होण्यासाठी आपण या कामावर निश्चितच लक्ष ठेवून आहोत असे नगरसेवक बामणे यांनी सांगितले.
या प्रसंगी श्री. अजीत तोडकर, श्री. महेश शेटगे , श्री. मारुती मोहिते, श्री. अभिजीत संकपाळ , रूपेश परीट, श्री. कुतीनो काजमील, श्री. जोतीबा आजगेकर, श्री. सुरज डोंगरे व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाळ सावंत यांचे निधन…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली ता. आजरा येथील ज्येष्ठ चित्रकार व कथालेखक बाळ नाना सावंत यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
अनेक चित्रे रेखाटण्याबरोबरच ग्रामीण बाजाच्या कथालेखनात त्यांचा विशेष हातखंडा होता. गेले काही दिवस ते आजारी होते. काल शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात विवाहित मुली, मुलांसह सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे संचालक नारायण सावंत यांचे ते बंधू व पेरणोलीचे उपसरपंच संकेत सावंत यांचे वडील होत.

आजचे पंचांग
वार : रविवार
दिनांक : १५ मार्च २०२६
माह (अमावस्यांत) : फाल्गुन
माह (पूर्णिमांत) : चैत्र
ऋतु : वसंत
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : एकादशी तिथी (सकाळी ०९.१६ पर्यंत) त्यानंतर द्वादशी तिथी
नक्षत्र : श्रवण नक्षत्र (१६ मार्च पहाटे ०५.५५ पर्यंत) त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र
योग : परिघ योग (सकाळी १०.२४ पर्यंत) त्यानंतर शिवा योग
करण : बलवा करण (सकाळी ०९.१६ पर्यंत) त्यानंतर कौलव करण
चंद्र राशी : मकर राशी
सूर्य राशी : मीन राशी
अशुभ मुहूर्त:-
राहु काळ : सायंकाळी ०५.१७ ते सायंकाळी ०६.४७ पर्यंत
शुभ मुहूर्त:-
अभिजित : दुपारी १२.२४ ते दुपारी ०१.११
सूर्योदय : सकाळी ०६.४८
सूर्यास्त : सायंकाळी ०६.४७
संवत्सर : विश्वावसु
संवत्सर(उत्तर) : सिद्धार्थी
विक्रम संवत : २०८२ विक्रम संवत
शक संवत : १९४७ शक संवत

मलिग्रे येथे HPV लसीकरण शुभारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
प्राथमिक आरोग्य केंद्र मालिग्रे येथे HPV लसीकरण शुभारंभ जि.प.सदस्य सुधीर देसाई व पं.स.सदस्य समीर पारदे यांचे हस्ते करणेत आला. यावेळी जयराम संकपाळ, किशोर जाधव, डॉ. संगीता परमार वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र मलिग्रे तसेच मलिग्रे प्रा आ केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी सुधीर देसाई यांनी रिक्त पदे, बांधकाम स्थिती , व आतापर्यंत डॉ कुलदीप देसाई, कै.डॉ .सूरज पटणे, डॉ रविंद्र गुरव यांनी केलेल्या कामाचे कौतुक करून आपणही त्याचप्रमाणे काम करावे असा सल्ला दिला. समीर पारदे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र निर्लेखित करणे बाबत पाठपुरावा सुरू असल्यचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री. जे. एस .बोकडे आरोग्य सहाय्यक यांनी केले यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील LHV, वास्कर, मनिषा सावंत ,कनिष्ठ सहाय्यक श्री विलास अरे, श्रीमती माधुरी सावंत, मलिग्रे प्राथमिक उपकेंद्राच्या आशा सेविका श्रीमती जाधव व श्रीमती संगीता निकम व लस घेणारे लाभार्थी उपस्थित होते.
फोटो क्लिक…
परिसर विद्येचा… साम्राज्य कचऱ्याचे
नेत्यांकडून कौतुक…


