शनिवार दि. १४ मार्च २०२६

मार्चमध्येही कोसळतोय रामतीर्थ धबधबा…
पर्यटक सुखावले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
यापूर्वी साधारणपणे जानेवारी महिन्याच्या अखेरीपासून सुप्रसिद्ध रामतीर्थ धबधब्याचा प्रवाह कमी होऊन पावसाळ्यापर्यंत तो एखाद्या छोट्याशा झ-याप्रमाणे वाहताना दिसत असे. यावर्षी मात्र सर्फनाला प्रकल्पातून वेळोवेळी पाण्याची आवर्तने सुरू झाल्याने हिरण्यकेशी नदीच्या पाण्याचा प्रवाह वाहता असल्याने धबधबाही चांगल्या क्षमतेने कोसळत आहे. मार्च एप्रिल महिन्यामध्ये पाण्या अभावी भकास दिसणारा रामतीर्थ धबधबा यावर्षी मात्र मोठ्या डौलाने बऱ्यापैकी क्षमतेने कोसळत आहे.
कडाक्याच्या उन्हातही धबधब्याचे सौंदर्य पाहण्याकरता मार्च महिन्यात पर्यटक भेट देऊ लागले आहे हे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. कोसळणाऱ्या धबधब्याचे सौंदर्य पाहून पर्यटन निश्चितच सुखावू लागले आहेत.

‘ईद’वर गॅसचे संकट…
सिलेंडरसाठी धावाधाव

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मुस्लिम बांधवांचा महत्त्वाचा समजला जाणारा रमजान ईद सण अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपला असताना बाजारपेठेत गॅसची टंचाई जाणवू लागली आहे. केवळ गॅसच नाही तर इतर संसारोपयोगी वस्तूंचे दर झपाट्याने वाढू लागल्याने यावर्षी ईदवर गॅसचे संकट प्रकर्षाने जाणवू लागले आहे.
सध्या मुस्लिम बांधवांची रमजान ईदची जोरात तयारी सुरू आहे. कपड्यांसह इतर जीवनावश्यक वस्तू व सणाला लागणाऱ्या विशेष वस्तूंची खरेदी करण्यामध्ये मुस्लिम बांधव गुंतलेले असतानाच युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस टंचाईचे संकट येऊन ठेपले आहे. एकीकडे रोजे असताना दुसरीकडे भर उन्हात गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे.
केवळ मुस्लिमच नाही तर ग्रामीण भागातील नागरिकही रोजंदारी सोडून गॅस सिलेंडर पदरात पाडून घेण्यासाठी दिवस- दिवसभर प्रयत्नशील असल्याचे दिसत आहेत.
एकंदर गॅस टंचाईची झळ ईदच्या धावपळीत असणाऱ्या मुस्लिम बांधवांना बसत आहे पण त्याचबरोबर ग्रामीण भागातील मंडळी ही आता सिलेंडर साठी धावपळ करताना दिसत आहेत.
ओटीपी द्यायचा कुठला…?
ऑनलाइन सिलेंडर बुकिंग वारंवार प्रयत्न करूनही होत नसताना वितरकांकडून ओटीपी ची मागणी केली जाते. मुळात गॅस बुकिंगच होत नाही तर ओटीपी देणार कुठून ? महत्वाचा आहे.
कडगाव–उत्तूर रिंगरोडचे काम पुन्हा ठप्प.. ठेकेदारांची मनमानी

उत्तूर/मंदार हळवणकर
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या (MSIDC) अंतर्गत सुरू असलेल्या कडगाव–उत्तूर रिंगरोडच्या कामाबाबत प्रशासनाचे प्रचंड दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. वाहन चालकातून यामुळे संताप व्यक्त होत आहे.
डिसेंबर २०२४ मध्ये या कामास सुरुवात झाली असली तरी वर्षभर उलटूनही अवघ्या तीन किलोमीटर अंतराचे काम व्यवस्थित पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे या अर्धवट कामामुळे परिसरात अपघाताची भीती वाढत आहे.
नेसरी ते पांगिरे हा रस्ता तीन वर्षांच्या आत पूर्ण करण्याचे नियोजन असताना प्रत्यक्षात कामाची गती अत्यंत मंद गतीने सुरू आहे. रस्त्याचे इंजिनिअर व ठेकेदार यांच्याकडून नागरिकांना समाधानकारक माहिती मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. फोन करून विचारणा केल्यास प्रतिसाद टाळला जात असल्याचेही नागरिकांकडून सांगितले जात आहे.
प्रत्येक वेळी ‘पेव्हर मशीन आलेले नाही’ अशी कारणे देऊन काम लांबणीवर टाकले जात असल्याचा आरोपही होत आहे.
काम सुरू असलेल्या ठिकाणी अनेक ठिकाणी डांब काढलेले आहेत मात्र ते हटवण्यास दिरंगाई होत आहे. काही ठिकाणी मोरीची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. कापलेल्या झाडांचे बुंधे तसेच ठेवलेले असल्याने वाहनचालकांसाठी धोका निर्माण झाला आहे.
काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यावर आवश्यक त्या प्रमाणात पाणी मारले जात नसल्याचीही तक्रार आहे. कामाच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच रस्त्यावरील पहिला थर (DLC थर) पूर्णपणे उखडलेला आहे.यामुळे काम नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण होईल की नाही, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, रस्त्याची उंची अनेक ठिकाणी वाढवण्यात आली असली तरी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी आवश्यक रॅम्पची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एकूणच अर्धवट काम, संथ गती आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव यामुळे हा रस्ता सध्या वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असून प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन काम वेगाने व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत.
नागरिकांचे आरोप..
१.ठेकेदार-इंजिनिअरांकडून माहिती देण्यास टाळाटाळ
२.काँक्रिट रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह.
३.शेतकऱ्यांसाठी रॅम्पची सुविधा नाही
४.प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष.

विष्णूमामा गेले…

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बेलेवाडी हुll. येथील हलगी सम्राट विष्णू रामा तांबेकर (वय ९९ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने काल शुक्रवारी निधन झाले. उत्तुर पंचक्रोशीत लग्न ,आंबील घुगऱ्या, बारसे, मिरवणुका यासह विविध कार्यक्रमांमध्ये त्यांच्या हलगीची अदाकारी उपस्थितांना पहावयास मिळायची. विष्णूमामा या नावाने ते परिचित होते. ग्रामपंचायत कर्मचारी कृष्णा तांबेकर यांचे ते वडील होत.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, सूना, नातवंडे असा परिवार असून रक्षाविसर्जन सोमवार दिनांक १६ रोजी आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त एकात्मिक बाल विकास मार्फत नूतन नगरसेविकांचा सत्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जागतिक महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प बीट आजरा- चंदगड मार्फत नगरपंचायतीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविकपर भाषणात सौ. हेमाली पाटील यांनी महिला दिन का साजरा केला जातो, महिलांचे अधिकार, कर्तव्य याबाबत माहिती दिली.
यावेळी नगरसेवक निसार लाडजी, निशांत चांद, डॉ.सौ. स्मिता कुंभार , पुनम लिचम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी उपनगराध्यक्षा सौ.पूजा डोंगरे, माजी नगराध्यक्षा सौ. ज्योत्स्ना चराटी, नगरसेविका सौ. अन्वी केसरकर, सौ.अश्विनी चव्हाण, सौ. रेश्मा बुड्डेखान या नगरसेविकांसह सौ. वैशाली सावंत – चौगुले, श्रीमती सुचिता वर्धन यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्तिकी चिकुर्डे यांनी केले तर नसिम जमादार यांनी आभार मानले.

उत्तूर येथे एचपीव्ही लसीकरण मोहिमेला प्रारंभ

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मुलींना गर्भाशयमुख कर्करोगापासून संरक्षण मिळावे यासाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहिमेला उत्तूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई होते. सरपंच किरण आमणगी, पंचायत समिती सदस्य विकास चोथे व केंद्रप्रमुख मनोहर नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना शिरीष देसाई यांनी मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने एचपीव्ही लस अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. सोशल मीडियावर लसीबाबत विविध अफवा पसरवल्या जात असल्या तरी पालकांनी त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या मुलींना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध प्रश्नांबाबत संबंधित स्तरावर पाठपुरावा करून ते सोडविण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आरोग्य सहाय्यक अनिल कुरणे यांनी प्रस्तावना करून उपस्थितांचे स्वागत केले. सरपंच किरण आमणगी व पंचायत समिती सदस्य विकास चोथे यांनी उत्तूर आरोग्य केंद्रात पंचक्रोशीतील रुग्ण मोठ्या प्रमाणात येत असल्याने त्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.
वैद्यकीय अधिकारी डॉ. सौरभ कसबे यांनी एचपीव्ही लसीचे महत्त्व व त्याचे आरोग्यदायी फायदे याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार आरोग्य सहाय्यिका कल्पना बंडगर यांनी मानले.
या वेळी तानाजी डोंगरे, सुनिल रावण, मोहन यादव, आरोग्य केंद्राचे कर्मचारी, आशा सेविका, लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

गवसे येथे आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग अंतर्गत तहसीलदार कार्यालय, आजरा यांचे मार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान आज दिनांक १४ मार्च रोजी रवळनाथ मंदिर या ठिकाणी सकाळी १० वाजता होणार आहे.
सदर शिबिरामध्ये खाली नमूद सर्व प्रकारच्या सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळणार आहेत. या शिबिराचा लाभ तालुका वाशियांनी घ्यावा असे आवाहन महसूल विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
शिबिरा अंतर्गत राबविले जाणारे उपक्रम…
१. आधार दुरुस्ती
२. ॲग्रीस्टॅक रजिस्ट्रेशन
३. पी एम किसान रजिस्ट्रेशन
४. रेशन कार्ड दुरुस्ती
५. नवीन रेशन कार्ड तयार करणे.
६. सातबारा व आठ अ वितरण
७. शालेय दाखले वितरण
८. कृषी विभागाकडील विविध योजनांची माहिती.
९. पंचायत समिती विभागाकडील विविध योजनांची माहिती.
१०. वनविभागाकडे प्रलंबित कामे.
११. सामाजिक वनीकरण विभागाकडील विविध वृक्ष लागवड बाबत माहिती.
१२. इतर सर्वच शासकीय विभागाकडील कामे.
अशा सर्व शासकीय योजनांची माहिती व लाभ एकाच ठिकाणी मिळणारआहे .

आजचे पंचांग
दिनांक : १४ मार्च २०१६
वार : शनिवार
माह (अमावस्यांत) : फाल्गुन
माह (पूर्णिमांत) : चैत्र
ऋतु : वसंत
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : दशमी तिथी (सकाळी ०८.१० पर्यंत) त्यानंतर एकादशी तिथी
नक्षत्र : उत्तराषाढा नक्षत्र (१५ मार्च पहाटे ०४.४८ पर्यंत) त्यानंतर श्रवण नक्षत्र
योग : वरीयान योग (सकाळी १०.४१ पर्यंत) त्यानंतर परिघ योग
करण : विस्ती भद्रा करण (सकाळी ०८.१० पर्यंत) त्यानंतर भाव करण
चंद्र राशी : धनु राशी (सकाळी ०९.३२ पर्यंत) त्यानंतर मकर राशी
सूर्य राशी : कुंभ राशी (१५ मार्च पहाटे ०१.०१ पर्यंत) त्यानंतर मीन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०९.४९ ते सकाळी ११.१८ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.२३:ते दुपारी ०१.११
सूर्योदय : सकाळी ०६.४९
सूर्यास्त : सायंकाळी ०६.४६
संवत्सर : विश्वावसु
संवत्सर(उत्तर) : सिद्धार्थी
विक्रम संवत: २०८२ विक्रम संवत
शक संवत: १९४७ शक संवत

फोटो क्लिक…
गॅस सिलेंडर टंचाई बरोबरच दरही वाढले… ग्रामीण भागात गोबर गॅसला नव्याने ‘अच्छे दिन’ आले…

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नूतन उपाध्यक्ष अनिल फडके यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री नाम. हसन मुश्रीफ यांची सदिच्छा भेट घेतली..


