मंगळवार दि. २३ सप्टेंबर २०२५


पावसाची साथ
नवरात्र उत्सवास जल्लोषात सुरुवात…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरासह तालुक्यामध्ये पावसाने उघडीप दिल्याने दुर्गामातेचे स्वागत जल्लोषात करण्यात आले.
घरोघरी घटस्थापना उत्साहात करण्यात आली. तर सार्वजनिक दुर्गामाता मंडळानी दुर्गा मातेच्या आगमनाच्या मिरवणुका दणक्यात काढल्या. आजरा शहरामध्ये डॉल्बी, सजीव देखावे, लेझीम, पारंपारिक वाद्ये यांची रेलचेल करण्यात आली होती.

मिरवणुकांदरम्यान जोरदार आतषबाजीही करण्यात आली.
क्रांतिकारी नवरात्रोत्सव मंडळ,छ. शिवाजीनगर नवरात्र उत्सव मंडळ, लायन्स किंग नवरात्रोत्सव मंडळ, भगवा रक्षक मंडळ व धर्मवीर नवरात्र उत्सव मंडळ, गांधीनगर या मंडळांनी मिरवणुकांचे नेटके आयोजन केले होते.
आगमन मिरवणुका पाहण्यासाठी शहरवासी यांनी मोठी गर्दी केली होती.
रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या.


उत्तूरमध्ये दुर्गा मातेचे जल्लोषात स्वागत

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा.
(मंदार हळवणकर)
नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्तूरसह संपूर्ण उत्तूर परिसरात श्री. दुर्गामाता मूर्तीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात, जयघोष व घोषणाबाजी करत भाविकांनी मोठ्या उत्साहात मिरवणुका काढल्या. गावातील तरुण, महिला व बालकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
मूर्ती स्थापनेसाठी मंदिर व मंडप आकर्षक फुलांच्या व रोषणाईच्या सजावटीने सजविण्यात आले असून वातावरण भक्तीमय झाले आहे. पुढील नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम,आरती, महिलांसाठी हळदीकुंकू, रस्सीखेच, कराओके गायन स्पर्धा, भजन व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नवरात्रोत्सवाच्या स्वागताने गावामध्ये आनंद, उत्साह व धार्मिकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


जनता सहकारी गृहतारण संस्थेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजऱ्यातील जनता सहकारी गृहतारण संस्थेला गेल्या आर्थिक वर्षात ५५ लाख ५८हजार ५९४ इतका निव्वळ नफा झाला असून सभासदांना ११ टक्के लांभाश देण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष श्री. मारूती मोरे यांनी संस्थेच्या २४ व्या वार्षिक सर्वसाधरण सभेत जाहिर केले. संस्था रौप्यमहोत्सवात पदार्पण करत असून संस्थेने कमी कालावधी मध्ये १०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केला. यंदा संस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने संस्थेकडून सर्व सभासदांना प्रत्येकी रूपये पाचशेचे बोनस शेअर्स देणेचा निर्णय घेतला आहे.
संस्थेने सर्व संस्था प्रवर्तकांचे, तसेच ७५ वर्ष पूर्ण झालेले सभासद, तसेच बढती मिळालेल्या व जि. प. सर्वपल्ली राधाकृष्णन पुरस्कार प्राप्त व राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शाल व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. तसेच ४ थी, ५ वी शिष्यवृत्ती, १० वी व १२ वी, पदवीधर, वेगवेगळया क्षेत्रातील नाविण्यपूर्ण प्राविण्य मिळविलेल्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक संस्था अध्यक्ष श्री. मारूती मोरे यांनी करुन संस्थेच्या आजपर्यंतच्य सांपत्तिक स्थितीचा आढावा सभासदासमोर सादर केला. श्रध्दांजली ठरावाचे वाचन संचालिका प्रो. (डॉ.) संजीवनी पाटील यांनी केले. संस्थेच्या प्रवर्तकांचे सत्कार चेअरमन मारूती मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
विषय पत्रिका, मागील सभेचे इतिवृत्ताचे वाचन, ताळेबंद व नफा-तोटा पत्रक, शासकीय लेखापरीक्षण व संचालक मंडळ कर्ज यादीचे वाचन संस्थेचे मॅनेजर मधुकर खवरे यांनी केले. सभेमधील चर्चेमध्ये श्री. बंडोपंत चव्हाण, श्री. इनास फर्नांडीस, श्री. महादेव मोरूस्कर, श्री. विष्णू जाधव, श्री. सावंत, श्री. विजय बांदेकर व श्री. कृष्णा येसणे यांनी सहभाग घेतला. त्यानंतर संस्थेने १०० कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण केलेबददल संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर करणेत आला.
संस्थेकडे आजअखेर १०७ कोटी ९० लाख हजारांच्या ठेवी असून ६६ कोटी ३५ लाख इतके कर्ज वाटप केले आहे. संस्थेला आयएसओ मानांकन ९००९ : २०१५ प्राप्त झालेले आहे. आपली संस्था स्व-भांडवलावर सुरु असून कोणत्याही बँकेकडून कर्ज न घेता व्यवहार सुरु आहे हि अभिमानाची गोष्ट आहे. सभासदांनी या पुढील काळातही सहाकार्य करावे असे आवाहन उपाध्यक्ष प्रो. (डॉ.) अशोक वाचूळकर यांनी केले.
सभेचे सूत्रसंचालन प्रो. (डॉ.) अशोक बाचूळकर यांनी केले व आभार प्रा. आनंद चव्हाण यांनी मानले. यावेळी आजरा शाखेचे संचालक प्राचार्य, डॉ. अशोक सादळे, श्री. दिनकर पोटे, प्रा. आनंद चव्हाण, श्री. कृष्णा डेळेकर, श्री. युवराज शेटके, प्रा. (डॉ.) तानाजी कावळे, प्रा. सौ. नेहा पेडणेकर, प्रो. (डॉ.) सौ. संजीवनी पाटील, प्रा. सौ. क्रांती शिवणे उपस्थित होते. संस्थेचे मॅनेजर मधुकर खबरे व प्रशासकीय अधिकारी मारुती कुंभार व प्रकाश पोवार, डॉ. गोपाळ गावडे, प्रा. आनंद चव्हाण प्रा. प्रकाश शिंदे, डॉ. संजय कुमार गायकवाड, डॉक्टर अशोक दोरुगडे यांच्यासह सर्व शाखांचे चेअरमन, व्हा. चेअरमन संचालक, सभासद व कर्मचारी उपस्थित होते.


किणे येथे बांधकाम कामगारांना भांडी वाटप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
किणे ता. आजरा येथे बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप करणेत आला. याप्रसंगी सरपंच सुनंदा सुतार, माजी सरपंच सुरेश गिलबिले, संदीप केसरकर,माजी उपसरपंच कोंडीबा आडे, सदस्य के. पी. कांबळे, गणपत गुडूळकर, तुकाराम बामणे गुरुजी, आनंदा गुडूळकर,आकाश सुतार, सुशाबाई तुपट,गणेश यादव, विष्णू गिलबिले, मंगेश दळवी, सागर गुडूळकर,अप्पा गुडूळकर, येल्लापा कांबळे, बाबू केसरकर,सौरभ बामणे, नितेश दळवी,सागर राऊ गुडूळकर,रेखा बामणे, रेखा सुतार, करुणा देसाई,सखुबाई सुतार, आदी उपस्थित होते.


नवरात्री उत्सवानिमित्त साळगाव येथे भगवा रक्षक तरुण मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
साळगाव (ता. आजरा) येथील भगवा रक्षक कला क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळ यांच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त सोमवार दि. २२ सप्टेंबर ते गुरुवार दि. २ ऑक्टोबर पर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाच्या वतीने गेली वीस वर्षे ग्रामदैवत केदारलिंग मंदिराच्या प्रांगणात दुर्गामातेचा उत्सव साजरा केला जातो. उत्सवाचे यंदाचे २१ वे वर्ष आहे.
यावर्षी मंडळाच्या वतीने पुढील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, (दि. २३) रात्री ९ वाजता : केदारलिंग भजनी मंडळ साळगाव यांचे भजन, बुधवार (दि. २४) रात्री ९ वाजता : ह. भ. प. राहुल महाराज कदम (इचलकरंजी) यांचे कीर्तन
कीर्तनसाथ : विठ्ठल रखुमाई सांप्रदाय मंडळ व ग्रामस्थ साळगाव, गुरुवार (दि. २५) सप्टेंबर रात्री ९ वाजता : फनी गेम्स (शालेय विद्यार्थ्यांसाठी), शुक्रवार (दि. २६) दुपारी १२ वाजता : हळदीकुंकू (महिलांसाठी), रात्री ९ वाजता : फनी गेम्स (महिला व युवतींसाठी), शनिवार (दि. २७) रात्री ९ वाजता : झी मराठी, कलर्स मराठी वाहिनीवरील विविध मालिकामध्ये तसेच शिवपुत्र संभाजी महानाट्यमध्ये येसाजी कंकची भूमिका केलेले संतोष चव्हाण यांचा स्टेज हिप्नॉटिझमचा धमाल कॉमेडी व करमणुकीचा कार्यक्रम. रविवार (दि. २८) रात्री ८ वाजता : महाप्रसाद, सोमवार (दि. २९) रात्री ८ वाजता : रास दांडिया गरबा, मंगळवार (दि. ३०) सायंकाळी ७.३० वाजता : महाआरती (महिलांसाठी लकी ड्रॉ), रात्री ८ वाजता : रास दांडिया गरबा, बुधवार (दि. २ ऑक्टोबर), रात्री ८ वाजता : रास दांडिया गरबा, गुरुवार (दि. २) सकाळी ६.३० वाजता : दुर्गामाता महादौड (सुरुवात : हनुमान-विठ्ठल रुखमाई मंदिर साळगाव), सायंकाळी ६ वाजता विसर्जन मिरवणूक विशेष आकर्षण : हलगी आणि भागात प्रथमच काहीतरी नवीन. दररोज ग्रामदैवत श्री केदारलिंग मंदिर व श्री दुर्गामाता उत्सव येथे दररोज सकाळी ७.३० वाजता व सायंकाळी ७.३० वाजता आरती होईल. या सर्व कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष अंकुश पाटील, धनंजय पाटील, संदीप वेंगुळकर, सुभाष पाटील, संदीप केसरकर यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.


उत्तूर प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानाचा शुभारंभ

उत्तूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच किरण आमणगी होते.
सुरुवातीला ज्येष्ठ महिलांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.प्रास्ताविकात डॉ. शर्मा यांनी अभियानाची सविस्तर माहिती दिली. यावेळी सरपंच किरण आमणगी, माजी जि.प. अध्यक्ष उमेश आपटे, माजी उपसभापती शिरीष देसाई यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमासाठी उपसरपंच समीक्षा देसाई, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गुरव, विस्तार अधिकारी काटकर, भांडकोळी मॅडम, आरोग्य सहाय्यक डी.के. पाटील, ग्रामपंचायत सदस्य महेश करंबळी, राजू खोराटे तसेच कर्मचारी, आशा सेविका, गटप्रवर्तक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आभार प्रदर्शन आरोग्य सहाय्यक अनिल कुरणे यांनी मानले.यानंतर झालेल्या आरोग्य शिबिरात २२९ महिलांची तपासणी करण्यात आली. तपासणीसाठी स्त्रीरोग तज्ञ डॉ. देशमाने, दंतचिकित्सक डॉ. शुभम खवरे, नेत्रतपासणी सहाय्यक पोवार, डॉ. गॉडद व त्यांची टीम तसेच संत गजानन महाराज हॉस्पिटल, महागाव यांची टीम उपस्थित होती.



