बुधवार दि. १७ सप्टेंबर २०२५


संघटित रित्या ग्रामीण भागाचा विकास शक्य : प्रा. अर्जुन आबिटकर
आजरा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेना अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संघटितरित्या ग्रामीण भागाचा विकास शक्य आहे. या प्रक्रियेमध्ये स्थानिक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर यांनी केले आजरा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आयोजित तालुकास्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते.
गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे यांनी महाराष्ट्रात ग्राम विकासाचे काम चांगल्या पद्धतीने चालू आहे गावातील शेवटचा माणूस जोपर्यंत या प्रक्रियेत येत नाही तोपर्यंत गावांचा विकास होणे अशक्य आहे शासनाच्या अनेक योजना घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी अधिकारी वर्गाची असून कोणत्याही परिस्थितीत आपण पुरस्कार मिळवणार अशी जिद्द मनात बाळगून प्रयत्न केल्यास यश निश्चित आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य शरीर देसाई यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रम प्रसंगी माजी जि. प. सदस्या सौ. सुनीता रेडेकर, सौ.रचना होलम, सौ.वर्षा कांबळे, राजेंद्रसिंह सावंत, सुधीर कुंभार, राजू होलम,जी.एम. पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश शेटे, विस्तार अधिकारी बी. टी. कुंभार विस्तार अधिकारी आबासाहेब मासाळ यांच्यासह विविध गावचे सरपंच उपस्थित होते.
मान्यवरांची अनुपस्थिती व नियोजनाचा अभाव
घाईगडबडीने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत तालुक्याशी संबंधित तीनही मंत्री- आमदार यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य व इतर बड्या मंडळींची उपस्थितांमध्ये नावे घालून प्रसिद्ध करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र बहुतांशी मंडळींनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. अनेकांना या कार्यक्रमाची माहितीच नव्हती त्यामुळे कार्यक्रमातील ढिसाळपणा अधोरेखित झाला.

सिद्धी देसाईचे यश कौतुकास्पदच…
कर निरीक्षक पदाला घातली गवसणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
एम.पी.एस.सी.मधून सुलगाव येथील कु. सिद्धी अनिल देसाई हिची राज्य कर निरिक्षक (STI- Class-2) पदी निवड झाली.
कु. सिद्धी ही व्यंकटराव हायस्कूल आजराची आदर्श विद्यार्थीनी असून तिचे प्राथमिक शिक्षण सुलगाव शाळेत झाले. पुढे तीने साधना ज्युनिअर कॉलेज, गडहिंग्लज येथे १२ वी पर्यंतचे शिक्षण घेवून, शासकीय महाविद्यालय कराड मधून बी. फार्मसी डिग्री संपादन केली. त्यानंतर तीने आपल्या गावीच एम्. पी. एस. सी. चा अभ्यास सुरू करून २०२४ या परिक्षेत पहील्याच प्रयत्नात राज्य कर निरिक्षक वर्ग – २ हे पद संपादन केले.
आजरा साखर कारखान्याचे अधीक्षक अनिल देसाई यांची ती कन्या आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

रामतीर्थ वन विभागाच्या पर्यटन करावर अन्याय निवारण समितीचा आक्षेप…
तालुकावासीयांसह दुचाकी स्वारांकडून कर न आकारण्याची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
रामतीर्थ पर्यटन स्थळी जाणाऱ्या रस्त्यावर वन विभागाच्या हद्दीमध्ये पर्यटन कर वसुली नाका तयार करण्यात आला आहे. या नाक्यावर स्थानिक नागरिकांसह दुचाकी स्वरांकडूनही कर आकारणी होत असल्याच्या तक्रारी वाढत असून वनविभागाने स्थानिक नागरिकांसह दुचाकीस्वारांना करातून मुक्ती द्यावी अशी मागणी आज अन्याय निवारण समिती व वनविभागाच्या अधिकाऱ्यांची सोबत झालेल्या चर्चेत करण्यात आली.
मुळातच रामतीर्थ परिसरातील स्वच्छतागृहे अत्यंत अस्वच्छ आहेत या परिसरामध्ये पिण्याचे पाणीही उपलब्ध होत नाही अशावेळी कर आकारणी मागचा उद्देश काय ? असा सवाल समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे यांनी केला. कर आकारणी पावत्यांमध्येही गोंधळ आहे. पावत्यावरच्या शिक्के व सह्या नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी परिक्षेत्र वन अधिकारी सावंत,गौरव देशपांडे,पांडुरंग सावरतकर, ज्योतिप्रसाद सावंत, यशवंत चव्हाण, दिनकर जाधव, जोतिबा आजगेकर, जावेद पठाण, मिनीन डिसोझा आदींनी चर्चेत भाग घेतला.
हा आहे उपाय…
♦ वाहनांचे चार चाकी, अवजड, प्रवासी असे वर्गीकरण करून प्रति माणसी कर आकारण्यापेक्षा या परिसरात प्रवेश करणाऱ्यांना वाहनांवर कर आकारणी करावी.
♦ रामतीर्थ महादेव मंदिर परिसरासह मुख्य राम मंदिर परिसरामध्ये पिण्याचे पाणी व स्वच्छ स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्यावीत.

पंडित दीनदयाळ विद्यालयात अभियंता दिन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पंडित दीनदयाळ विद्यालयामध्ये अभियंता दिन उत्साहात करण्यात आला.
विद्यालयाची माजी विद्यार्थिनी नेहाराणी उत्तम कुंभार हिला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. संजीव देसाई यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन अभियंता दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
त्याचबरोबर आज जागतिक लोकशाही दिन साजरा करण्यात आला .जागतिक दिनाचे महत्व व अभियंता दिन याबद्दल श्री.संजीव देसाई यांनी माहिती सांगितली.
आभार श्री. भरत बुरुड यांनी मानले.

मलिग्रे ग्रामदैवत श्री भावेश्वरी मंदिर बांधकाम वेगावले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मलिग्रे या.आजरा येथील ग्रामदैवत श्री भावेश्वरी मंदिर जिर्णोद्वाराचे काम लोक सहभाग व देगणीतून सुरु असून मंदिराचे स्लँबच्या कामाकरीता गावात पाळक करून महिलांनी मंदीर स्लँबसाठी दुर्डीची मिरवणूक काढली.
यावेळी विधवत पूजा करून मंदीर स्लँब शुभारंभ करणे आला. याप्रसंगी उत्तम पारदे, बसवंत जाधव, शिवाजी गुरव, पांडूरंग नेसरीकर, माजी सरपंच समीर पारदे, गजानन देशपांडे, देवस्थान समिती व मंदिर जिर्णोव्दार समिती सदस्य ग्रामस्थ व महिला भाविकानी सहभागी नोंदवला.

मधमाशांच्या हल्ल्यात एक जखमी
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा साखर कारखान्याचे कर्मचारी विलास जोतिबा करमळकर (वय ५० वर्षे रा. हेब्बाळ जलद्याळ ) हे आजरा साखर कारखान्यावर कामाला येत असताना शृंगारवाडी फाटा ते चित्रा नगर दरम्यानच्या मार्गावर मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
पाऊस पाणी
आजरा शहरासह परिसरात पावसाने उघडीप दिल्याने तालुकावासीय सुखावले आहेत. मात्र विचित्र वातावरणामुळे दवाखाने रुग्णांनी भरून गेले आहेत.


