बुधवार दि. २४ सप्टेंबर २०२५


जिल्ह्यातील बड्या नेत्याच़्या चिरंजीवाने घेतली आजऱ्यात जमीन
जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी खटाटोप सुरू असल्याची चर्चा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जिल्हा पातळीवरील एका बड्या नेत्याच्या मुलाने आजरा येथील हिरण्यकेशी नदी काठावरील जमीन खरेदी केली असून आगामी जिल्हा बँक निवडणुकीला आजरा तालुक्यातून सामोरे जाण्याच्या उद्देशाने या जमिनीच्या आधारे एका संस्थेचा ठरावही आपल्या नावावर करण्याचा खटाटोप सुरू असल्याचे खात्रीलायकरित्या समजते.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की…
गोकुळ सह जिल्हा बँकेची निवडणूक जोरदार होण्याची शक्यता सध्या राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. गतवेळी तालुक्यात अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी व मंत्री हसन मुश्रीफ यांचे खंदे समर्थक सुधीर देसाई यांच्यात थेट लढत झाली होती. या लढतीत सुधीर देसाई यांनी धक्कादायकरीत्या अशोकअण्णांचा पराभव केला. देसाई यांच्यासाठी मंत्री मुश्रीफ यांनी पडद्यामागून मोठ्या हालचाली केल्या होत्या. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत. विधानसभेला महायुती धर्म पाळून अशोकअण्णांनी मंत्री मुश्रीफ यांना मदत करून हातचा राखून ठेवला आहे. यामुळे चराटी यांना जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा संधी मिळणार हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही. चराटी यांना गोकुळ मध्ये तर देसाई यांना पुन्हा जिल्हा बॅंके करीता संधी मिळण्याची शक्यता आहे. जिल्हास्तरीय आघाड्या पाहता आजरा तालुक्यातून असे घडले तर देसाई यांना विरोधक म्हणून ‘पृथ्वी’वर ‘राज’ करू पाहणाऱ्या या बड्या नेत्याच्या मुलाने आजऱ्यात नुकतीच जमीन खरेदी केली आहे. केवळ जमीनच खरेदी केलेली नाही तर एका विकास सेवा संस्थेचे सभासदत्वही मिळवले असल्याचे समजते.
याचाच अर्थ मुश्रीफ यांच्या आजरा तालुक्यातील समर्थकांना जिल्हा बँकेपासून रोखण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू झाल्या आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
सध्या या प्रकरणाची चर्चा आजऱ्यात जोरात सुरू आहे.


उत्तुर येथील वीज वितरण कार्यालयासमोर आरदाळकरांची निदर्शने

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोणतीही पूर्वसूचना न देता स्मार्ट मीटर बसवले जात आहेत या गोष्टीला विरोध करण्यासाठी व जुनी मीटर पूर्ववत बसवण्यात यावी या मागणीच्या पार्श्वभूमीवर उत्तुर येथील वीज कंपनीच्या कार्यालयासमोर आरदाळ ग्रामस्थानी जोरदार निदर्शने करत निषेध नोंदवला.
आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला सहाय्यक अभियंता निखिल काळोजी यांना निवेदन देण्यात आले व त्यांच्याशी चर्चा करण्यात आल. यावेळी नवीन मीटरच्या पार्श्वभूमीवर काळोजी यांनी माहिती दिली. यावेळी शिवाजी गुरव यांनी सदर मीटरमध्ये प्रीपेड कार्ड बसवण्याची व्यवस्था आहे का ? असे विचारले असता अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने वातावरण संतप्त झाले.
आंदोलनामध्ये अमोल भांबरे प्रतीक कुडवे बाळू शिवणे, शंकर पावले, शांताराम शिवणे, सचिन पावले, इंदुबाई कांबळे, रेश्मा कांबळे यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.


आजरा क्रीडा संकुलाची इमारत खेळाडूंसाठी खुली करा अन्यथा शिवसेना उद्घाटन करणार…
शिवसेना उबाठाचे निवेदन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोट्यावधी रुपये खर्चून आजरा येथे बांधून पूर्ण झालेले क्रीडा संकुल इमारत वापरात नसल्याने इमारतीच्या समोर व बाजूने झाडे वाढलेली आहेत. इमारत धूळ खात पडलेली आहे.या इमारतीमध्ये बॅडमिंटन, कबड्डी यासारखे अनेक आजरा तालुक्यातील खेळाडूंना खेळता येईल. आजरा तालुक्यात अनेक मुले व मुली राज्यस्तरीय विविध स्पर्धेत यश संपादन करत असताना जिल्हा क्रीडा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे शासनाचा निधी इमारत वापरात नसल्याने वाया गेल्याचे स्पष्ट होत आहे. या क्रीडा संकुलामध्ये आठ दिवसात तात्काळ कर्मचाऱ्यांची नेमणूक करून क्रीडा संकुल खेळाडूंसाठी खुले करावे अन्यथा शिवसेनेकडून उद्घाटन केले जाईल असा इशारा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना शिवसेना उबाठा यांच्या वतीने देण्यात आला आहे.
याबाबतचे लेखी निवेदन देण्यात आले असून निवेदनावर शिवसेना जिल्हाप्रमुख प्राध्यापक शिंत्रे ,तालुका प्रमुख युवराज पोवार, हर्षल पाटील आदींच्या सह्या आहेत.


सदाफुली पतसंस्थेची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा प्रगतीची साक्ष देणारी : चेअरमन प्रकाश खटावकर.

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर येथील सदाफुली ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. सुरुवातीला मॅनेजर संजय चव्हाण यांनी कार्यसूची सादर केली, त्यानंतर चेअरमन प्रकाश खटावकर यांनी वार्षिक अहवाल वाचन करून सभासदांना संस्थेच्या प्रगतीचा आढावा दिला. संस्थेच्या नफ्यातून सभासदांना तब्बल १४% लाभांश जाहीर करण्यात आला. तसेच, वयोमानाने ७० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ सभासदांचा आणि दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सभासदांच्या मुलांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला.संस्थेतील ज्येष्ठ कर्मचारी धोंडिराम बारटक्के यांचा सेवानिवृत्ती प्रसंगी संचालक वसंतराव धुरे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. या प्रसंगी धुरे यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.सभेस मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.


आवंडी वसाहती मध्ये दुर्गामाता दौड

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दुर्गामाता दौडचे आयोजन शिवजन्मोत्सव व भावेश्वरी नवरात्र उत्सव मंडळाने आयोजित केले होते.. यामध्ये आवंडी वसाहतीतील त सर्व लहान – थोर मंडळीनी सहभाग दर्शविला.
विठ्ठल मंदिर पासून सुरू झालेली दुर्गामाता दौड संपूर्ण गावातून फेरी मारल्यानंतर तिची सांगता गावदेवी श्री भावेश्वरी मंदिरात झाली. गावात सर्व रस्त्यावर रांगोळी काढुन व पायावर पाणी घालून गावातील महिलांनी दुर्गामाता दौडचे स्वागत केले.
यामध्ये किरण निकम, वैभव बांदेकर, अभिषेक चौगुले, करण कोले, सुशांत बांदेकर, ऋतिक फगरे, साहिल भादवणकर, विघ्नेश दारुटे, वैष्णवी अस्वले, कार्तिकी मांगले व इतर लहान मुलांनी सहभाग दर्शविला.


श्री सरस्वती हायस्कूल हात्तीवडे च्या विद्यार्थिनींचे शासकीय क्रीडा स्पर्धेत उज्वल यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुका शासकीय क्रीडा मैदानावरती सुरू असलेल्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील शासकीय मैदानी स्पर्धेमध्ये श्री सरस्वती हायस्कूल हातिवडेच्या विद्यार्थिनींनी उज्वल यश संपादन केले.
यशस्वी विद्यार्थिनी मधील कुमारी कीर्ती पाटील- हिने ३००० मीटर धावणे क्रीडा प्रकारात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. कुमारी श्रेया घेवडे- हिने १५०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला.कुमारी अनुष्का आजगेकर हिने थाळीफेक क्रीडा प्रकारात तालुक्यात तृतीय क्रमांक मिळविला. कुमारी कीर्ती पाटील व कुमारी श्रेया घेवडे यांची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशस्वी विद्यार्थिनींना सरस्वती हायस्कूलचे क्रीडा शिक्षक श्री संजय पाटील यांचे मार्गदर्शन तर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री विश्वास चव्हाण व शाळेचे मुख्याध्यापक उदय चंद्रकांत अमनगी यांचे प्रोत्साहन मिळाले.

दुर्गा माता दर्शन
छ.शिवाजी नगर नवरात्र उत्सव मंडळ

अध्यक्ष : दीपक बल्लाळ
उपाध्यक्ष : योगेश जाधव
सचिव : तानाजी सुतार
खजिनदार : राजेंद्र चंदनवाले/ विजय उर्फ बाळू सावंत
लायन्स किंग नवरात्र उत्सव मंडळ

अध्यक्ष : ओमकार माध्याळकर
उपाध्यक्ष : स्वप्नील रांगणेकर
खजिनदार : केदार महाजन
मुर्ती देणगीदार : वैभव लाड
आज शहरात…
शिवसेना उबाठा पक्षाने दिलेल्या तिरडी मोर्चाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आजरा आगारा मार्फत सकाळी ११ वाजता विशेष बैठक बोलवण्यात आली आहे.


