गुरुवार दि. २५ सप्टेंबर २०२५


आजरा नगरपंचायत प्रभाग रचनेबाबत कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये सुनावणी
सोमवारी निकालाची शक्यता

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायतीच्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये काल बुधवारी सुनावणी झाली.याचीकाकर्त्यांची बाजू न्यायालयाने ऐकून घेतली असून सोमवार दिनांक २९ सप्टेंबर ही पुढील तारीख देण्यात आली आहे. यामुळे सोमवारी याबाबत निकालाची अपेक्षा वर्तवली जात आहे. नगरपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर आजरा नगरपंचायतीची प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यात आली.
ही रचना चुकीची असल्याची तक्रार काही नागरिकांनी मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांच्याकडे केली होती. तर यापैकी रशीद पठाण, विक्रम देसाई, संजयभाऊ सावंत, परेश पोतदार व रवींद्र भाटले यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती.या याचीकेची सुनावणी काल बुधवारी पार पडली. याचीकाकर्त्यांच्या वतीने ॲड. प्रथमेश बलगुडे यांनी मत मांडले. न्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून घेतली असून सोमवार दिनांक २९ ही पुढील तारीख दिली आहे.

माजी पं.स. सभापती मसणू सुतार यांचे निधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
किणे (ता. आजरा) तालुक्याचे जेष्ठ नेते व माजी सभापती मसणु रावजी सुतार (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने आज दुपारी बेळगाव येथे उपचार सुरु असताना निधन झाले. माजी आमदार तुकाराम कोलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या राजकीय व सामाजिक कारकिर्दीला सुरवात झाली. त्यांनी सन १९७२ ते सन १९९५ पर्यंत किणेच्या सरपंचपदाची धुरा सांभाळली. हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखान्याच्या संचालकपदी त्यांनी दहा वर्ष काम केले आहे. उचंगी प्रकल्प उभारणीसाठी त्यांचे योगदान महत्वपूर्ण राहीले आहे.
आजरा नेसरीमार्गे बेळगाव रस्ता पुर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. कोळींद्रे पंचायत समिती मतदार संघातून सन २००२ मध्ये त्यांनी विजयी मिळवला. सन २००५ मध्ये ते पंचायत समितीचे सभापती झाले. गावातील श्री. लक्ष्मी विकास सेवा संस्था, लक्ष्मी दुध संस्था स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. श्री.लक्ष्मी सेवा संस्थाचे ते संस्थापक अध्यक्ष तर किणे ग्रामपंचायतीचे ते ग्रामपंचायत सदस्य आहेत. माजी आमदार नरसिंगराव पाटील यांचे ते खंदे समर्थक्र म्हणून ओळखले जात विधानसभेचे माजी सभापती बाबासाहेब कुपेकर, दौलतचे माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील यांच्याबरोबर त्यांनी काम केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर कांही काळ राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष होते. देशाचे माजी कृषी मंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, विवाहीत मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. भाजप पंचायतराज जिल्हा उपाध्यक्ष जयवंतराव सुतार यांचे ते वडील होत.
सायंकाळी त्यांच्यावर किणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार शिवाजीराव पाटील, माजी जि प अध्यक्ष उमेश आपटे, गोपाळराव पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, आजरा कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई, उपाध्यक्ष सुभाष देसाई, अल्बर्ट डिसोजा,राजू होलम, अनिकेत चराटी, सी.आर.देसाई, दिगंबर देसाई, अरुण देसाई, बाळ केसरकर, निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, शिवाजी नांदवडेकर, संभाजी बापट, सुरेश गिलबिले,प्रकाश पाटील, सुरेश बुगडे, मधुकर यलगार यांच्यासह तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

आरदाळ येथून एक जण बेपत्ता

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आरदाळ ता.आजरा येथून प्रदीप दिनकर जाधव ( वय ४० वर्षे ) हे बेपत्ता झाल्याची वर्दी दिनकर परशराम जाधव यांनी पोलिसात दिली आहे.
कोणालाही न सांगता प्रदीप हे घरातून निघून गेले असून ते बरेच दिवस झाले परतले नसल्याचे या वर्दीत म्हटले आहे. पुढील तपास आजरा पोलीस करत आहेत.

एसटीच्या विस्कळीत सेवेवरून अधिकारी धारेवर
शिवसेना उबाठा, आक्रमक प्रवाशी, विद्यार्थ्याच्या गैरसोयीचा आरोप, कार्यवाहीची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील एसटीची सेवा विस्कळीत झाली असून प्रवाशी, विद्यार्थी, रुग्णांची गैरसोय होत आहे. अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्रा. सुनिल शिंत्रे, उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, तालुका प्रमुख युवराज पोवार यांनी केला. त्यांनी आजरा आगार प्रमुख प्रविण पाटील यांना धारेवर धरले. वेळापत्रकानुसार एसटीची सेवा पुर्ववत करून कोरोनानंतर बंद झालेल्या एसटीच्या फेऱ्या पुन्हा सुरु करण्याची मागणी करण्यात आली.
एसटीची तालुक्यातील सेवा विस्कळीत झाल्याबाबत तिरडी मोर्चा काढण्याचा इशारा आजरा तालुका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आज आजरा आगारात बैठक झाली.
प्रा. शिंत्रे, श्री. पाटील यांच्यासह शिवसैनिकांनी तालुक्यात एसटी सेवेचे कोलमडलेले वेळापत्रक, कर्मचाऱ्यांची मनमानी याचबरोबर आगार प्रमुखांचे एसटी बसस्थानक परिसरात होणारे दुर्लक्ष याकडे लक्ष वेधले. प्रा. शिंत्रे म्हणाले, आगार प्रमुखांनी बसस्थानकावर जावून विद्यार्थी व प्रवाशाची गैरसोय कशी होते हे प्रत्यक्ष पहावे. चांगले काम केल्यास सत्कार करून पण गैरसोय खपवून घेणार नाही. श्री. पाटील म्हणाले, पुरेशा गाड्या उपलब्ध असतांनाही तालुक्यातील प्रवाशांची होणारी गैरसोय दुर्देवी आहे. चांगले चाललेले एसटीचे आगार बंद पाडणार का ? श्री. पोवार यांनी एसटीचे वेळापत्रक सुरळीत करण्याची मागणी केली. विद्यार्थी व पालकांनी एसटी आगाराकडून होत असलेली गैरसोय व अडचणी मांडल्या. आगार प्रमुख श्री. पाटील यांनी पंधरा दिवसात एसटीचे वेळापत्रक सुरळीत करण्याची ग्वाही दिली.
शिवाजी आढाव, दिनेश कांबळे, नारायण कांबळे, महेश पाटील, ओमकार गिरी, भिकाजी विभुते, शिवाजी इंगळे, प्रसाद जोशी, संदीप खवरे, राजाराम येसादे यांच्यासह शिवसैनिक व एसटी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आजरा साखर कारखान्यांवर कृषी उपयुक्त साहित्य प्रदर्शन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आज गुरूवार दि. २५/९/२०२५ रोजी दुपारी १-०० वाजता कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर आयोजित केली आहे. या सभेस उपस्थित रहाणाऱ्या सभासदांना वेगवेगळी कृषी औजारे, औषध फवारणी करिता ड्रोन व त्याची प्रात्यक्षिके, ट्रॅक्टर, सेंद्रिय व रासायनिक खते, शेतीशी संबंधित इतर उत्पादने यांचे स्टाॅल लावलेले आहेत. त्याचा जास्तीत जास्त तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भेट देऊन माहिती घेऊन लाभ घ्यावा असे आवाहन कारखान्याचे चेअरमन श्री मुकुंद उर्फ उदयसिंह बळीराम देसाई यांनी केले आहे.

बिरेश्वर पतसंस्थेकडून आर्थिक मदत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जोल्ले उद्योग समूहाची श्री बिरेश्वर को-ऑप क्रेडिट सोसायटी शाखा- आजराच्या अमूल्या कर्जदार परवीन युनूस मुल्ला यांचे आकस्मित निधन झाले. त्यांचे वारसदार (मुलगा ) दादासाब युनूस मुल्ला यांना संस्थेकडून सभासद कल्याण निधीतून रु. 30000/- इतकी मदत रक्कम वितरीत करण्यात आली.
यावेळी शाखेचे शाखा चेअरमन ज्योतीप्रसाद सावंत व संचालक श्री महेश कुरुणकर, अनिकेत शिंत्रे, सुशांत निकम, सुरेश मिटके, सुनील डोणकर तसेच शाखा हितचिंतक व कर्मचारी उपस्थित होते.
निधी मंजूर केल्या बद्धल संस्थापक माजी खासदार श्री. अण्णासाहेब जोल्लेजी, सहसंस्थापिका आमदार सौ.शशिकला अण्णासाहेब जोल्लेजी, मुख्य शाखेचे संचालक मंडळ व मुख्य शाखेचे अधिकारीवर्ग यांचे आभार मानण्यात आले.

राष्ट्राच्या जडणघडणीत राष्ट्रीय सेवा योजनेचे योगदान खूप मोलाचे…
प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा महाविद्यालय आजरा येथे राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह अंतर्गत एनएसएस स्थापना दिन साजरा करण्यात आला. दिनांक २२ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
सोमवार दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी ‘भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षणातील योगदान’ या विषयावर प्रा. विनायक चव्हाण यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व मंगळवार दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी ‘भारतरत्न सरदार वल्लभाई पटेल – एक कणखर नेतृत्व’ या विषयावर प्रा. रमेश चव्हाण यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
आज या सप्ताहाचा तिसरा दिवस साजरा करत असताना एनएसएस स्वयंसेवकांमार्फत महाविद्यालय परिसराची स्वच्छता करण्यात आली व ‘एनएसएस चे मानवी जीवनातील महत्त्व व राष्ट्राच्या विकासातील योगदान ‘ या आणि ‘नशामुक्त जीवन’ विषयांवर प्रा.मल्लिकार्जुन शिंत्रे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी ज्युनिअर व सीनियर विभागातील स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए.एन.सादळे हे होते. तसेच कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील प्रा. विनायक चव्हाण प्रा. रमेश चव्हाण प्रा. आनंद बल्लाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. मलिकार्जुन शिंत्रे पुढे म्हणाले की,’राष्ट्राच्या जडणघडणीत युवकांचे योगदान मोलाचे असून. या युवकांच्या जडणघडणीत महाविद्यालयातील विविध उपक्रम महत्त्वाचे योगदान देतात. एन एस एस सारख्या राष्ट्रीय उपक्रमातून युवकांचे व्यक्तिमत्व सर्वांगीण गुणसंपन्न होते. विद्यार्थ्यांनी क्रमित अभ्यासक्रमाबरोबरच एन एस एस मध्ये सहभागी होऊन समाजसेवेची संधी उपलब्ध करून घ्यावी व समाजाच्या विकासाबरोबरच राष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान द्यावे.’ आताच्या युवक वर्गाने व्यसनापासून दूर राहणे तसेच व्यसनामध्ये अडकलेल्या व्यक्तींचे प्रबोधन करणे गरजेचे आहे व एक व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यामागे आपला महत्त्वाचा हातभार लावला पाहिजे.’
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ.आर बी पवार यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार डॉ. अविनाश वर्धन यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनएसएस विभागाचे प्रकल्प अधिकारी प्रा .रत्नदीप पवार यांनी केले

अण्णाभाऊ स्मृती पंधरवड्या निमित्त जनता शिक्षण संस्थेत वक्तृत्व स्पर्धा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
अण्णाभाऊ स्मृती पंधरवड्या वड्या निमित्त जनता शिक्षण संस्था संचलित आजरा हायस्कूलमध्ये शाखांतर्गत वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक ए. एल. तोडकर यांनी केले. या स्पर्धेत विजयी स्पर्धक पुढील प्रमाणे …
वेदिका विजय पोतदार आजरा हायस्कूल आजरा प्रथम क्रमांक, समृद्धी उत्तम मांजरे हायस्कूल द्वितीय क्रमांक,रिया संजय पाटील, बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूल गवसे तृतीय क्रमांक, प्राजक्ता नामदेव चौगुले एरंडोळ हायस्कूल एरंडोफ व ऋतुजा अरविंद सातुसे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वैजयंता अडकुरकर यांनी केले. आभार पर्यवेक्षक ए.आर. व्हसकोटी यांनी मांडले. स्पर्धा प्रसंगी डॉ. अनिल देशपांडे,डॉ. अंजनी देशपांडे, के. व्ही.येसणे सौ.सुरेखा भालेराव नुरजहॉं सोलापूरे, उपमुख्याध्यापिका सौ.एच.एस. कामत उपस्थित होत्या.

निधन वार्ता
रानबा दारुटे

आवंडी या.आजरा येथील ज्येष्ठ नागरिक रानबा दारुटे (वय ८५ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

भादवण विकास सेवा संस्थेला ४ लाख १२ हजाराचा नफा :
चेअरमन संभाजी कांबळे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भादवण येथील भादवण विकास सेवा संस्थेला २०२४-२५ या आर्थिक वर्षात ४ लाख १२ हजाराचा नफा झाला असून सभासदांना ५ % लाभांश देणार असल्याचे वार्षिक सभेत जाहीर करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन संभाजी कांबळे होते.
केदारनाथ मंदिर येथे सभा संप्पन्न झाली. स्वागत व प्रास्ताविक पी. के. केसरकर यांनी केले, श्रद्धांजलीचा ठराव मारुती देसाई यांनी मांडला,संस्था सचिव सुभाष पाटील यांनी अहवाल वाचन केले, यावेळी सर्व विषयांना
एकमताने मंजूरी देण्यात आली. यावेळी उपस्थित सभासदांनी दिलेल्या प्रश्नांना सचिव सुभाष पाटील यांनी उत्तरे दिली, या हंगामात पीक कर्ज व म. मुदत कर्ज वाटप २ कोटी 2२० लाख इतके वाटप झाले असून स्वभांडवलातून ४० लाख इतके वाटप झाले आहे. संस्थेला चालू वर्षी अ वर्ग मिळाला आहे आपत्तीग्रस्त सभासदांना आर्थिक मदत केली आहे. सभासद कर्जाची ९९ % वसुली झाली आहे. यावेळी आजरा कारखाना संचालक राजेश जोशीलकर, अंतू पाटील, विष्णू मुळीक, पी. जी. मुळीक यांनी चर्चेत भाग घेतला, सभेला व्हा. चेअरमन दत्तात्रय पाटील, दशरथ डोंगरे, रत्नापा कुंभार, गजानन गाडे, रुक्मिणी पाटील, रत्नाबाई केसरकर, एम. टी. मुळीक, दत्तात्रय पाटील यांच्यासह आनंदा जोशीलकर, रणजित गाडे, तुकाराम पाटील, दिनकर गोडसे सुधीर जाधव,अर्जुन दोरूगडे,धोंडीबा जांभळे यांच्यासह सभासद उपस्थित होते, आभार संचालक अशोक गुरव यांनी मानले.

धर्मवीर नवरात्र उत्सव मंडळ, गांधीनगर आजरा

संस्थापक- श्री आनंदा मनोळकर
संस्थापक अध्यक्ष- श्री महेश खेडेकर
अध्यक्ष – श्री संदीप गिरी
उपाध्यक्ष – श्री दयानंद कालेकर
खजिनदार- श्री जितेंद्र कांबळे
सचिव – श्री सुरज पाटील
सहसचिव – श्री विक्रम गायकवाड, श्री आकाश शिंदे, श्री विठ्ठल बुरुड, श्री आकाश पोवार, श्री धीरज ससाणे, श्री श्रावण कांबळे, श्री लुकेश कांबळे.
आज आजऱ्यात
♦ वसंतराव देसाई आजरा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा दुपारी एक वाजता कारखाना कार्यस्थळी
♦ लायन्स किंग्स नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
वेळ दुपारी १२ ते ३


