गुरुवार दि.६ नोव्हेंबर २०२५

बेपत्ता ऊसतोड कामगाराचा मृतदेह सापडला

आजरा ; मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
छत्तीसगड येथील गेल्या आठवडाभरापासून हाजगोळी येथून बेपत्ता असणाऱ्या पुरुषोत्तम सुखऊ गोड ( वय ३५ वर्षे ) या ऊसतोड कामगाराचा मृतदेह भिकाजी होडगे यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या व अर्धवट सडलेल्या स्थितीत आढळून आला.
३० ऑक्टोबर रोजी अचानकपणे बेपत्ता झालेल्या पुरुषोत्तम याचा शोध गेले आठ दिवस सुरू होता. दरम्यान बुधवारी त्याचा मृतदेह आढळून आला याबाबतची वर्दी सुनील मारुती जाधव राहणार हाजगोळी यांनी पोलिसात दिली आहे.
पुढील तपास हवालदार राहुल पन्हाळकर करीत आहेत.


रात्री खुदाई… गाड्या खड्ड्यात… कामगार पळाले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा – साळगाव मार्गावर तू काही मंदिरासमोरील रस्त्याची अचानकपणे रात्री जेसीबीच्या सहाय्याने खुदाई करण्यात आली. सर्वत्र अंधार असल्याने व सदर खुदाई बरोबरच रस्त्यावर पाईप आणून टाकल्याने दुचाकी स्वारांचा अपघात झाला. एकाच वेळी दोन-तीन दुचाकी खड्ड्यात गेल्याने संतप्त नागरिकांनी खुदाई करणाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. अंधार असताना ही खुदाई का केली? अपघात होऊ नये म्हणून कोणती खबरदारी घेतली? कोणाच्या आदेशाने सदर खुदाई केली? असा संतप्त सवालांचा भडीमार केला.
उपस्थित नागरिकांचा एकत्रित पवित्रा पाहून कामगारांसह जेसीबी चालकाने तेथून पलायन केले. रात्रभर या प्रकाराची चर्चा विद्या नगर परिसरात सुरू होती.

रविंद्र आपटे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गोकुळ दूध संघाचे व जनता दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्थेचे चेअरमन स्व. रविंद्र आपटे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
जनता डेअरी येथे झालेल्या या कार्यक्रमात सचिन उत्तूरकर यांनी स्वागत केले. उपस्थित मान्यवरांनी रविंद्र आपटे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाला चेअरमन एम.डी. सावंत,स्व. आपटे यांच्या पत्नी पद्मजा आपटे,सर्व संचालक, माजी चेअरमन वसंतराव धुरे, माजी उपसभापती शिरीष देसाई, सरपंच किरण आमणगी, माजी जि.प. अध्यक्ष उमेश आपटे, संचालक मारुतराव घोरपडे, विठ्ठल उत्तूरकर, गणपतराव यमगेकर, पुंडलिक पाटील, सुजित लोखंडे, भैरू सावंत, संजय सावंत, विजय हळवणकर, रमेश ढोणुक्षे,संजय पोतदार, मंजूरभाई बागवान,विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार सेक्रेटरी भैरू तानवडे यांनी मानले.

मराठी रंगभूमी ही महाराष्ट्रातील लोकांच्या जीवनाचा आरसा आहे – आय. के. पाटील

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मराठी रंगभूमीचे वेगळेपण तिच्या सांस्कृतिक वारसा, संवादशैली, सामाजिक भान, विषय-विविधता आणि आधुनिकतेमध्ये आहे. या रंगभूमीने ऐतिहासिक, पौराणिक आणि विनोदी नाटकांच्या जोडीला सामाजिक समस्यांवर आधारित नाटकांनाही प्राधान्य दिले आहे, ज्यामुळे ती महाराष्ट्रातील लोकांच्या जीवनाचा आरसा बनली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी श्री. आय. के. पाटील यांनी येथे केले.
आजरा महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग आणि नवनाट्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आजरा महाविद्यालयात मराठी रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. आय. के. पाटील उपस्थित होते तर यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सादळे होते.
श्री.पाटील पुढे म्हणाले की, विष्णुदास भावे यांनी दि. ५ नोव्हेंबर १८५३ मध्ये ‘सीता स्वयंवर’ या नाटकाद्वारे मराठी रंगभूमीची सुरुवात केली. हा वारसा घेऊन ही रंगभूमी विकसित झाली. सुरुवातीला ऐतिहासिक आणि पौराणिक नाटकांवर या रंगभूमीचा भर होता, तर नंतर सामाजिक, विनोदी आणि गंभीर विषयांवरील नाटकांनी मराठी रंगभूमीला समृद्ध केले. आजही मराठी रंगभूमीची परंपरा ही भारतातील सर्वात जुनी आणि समृद्ध नाट्य परंपरा मनाली जाते.
यावेळी श्रुती कांबळे, संचिता तरडेकर, निदा इंचनाळकर, विक्रांत सावंत, विवेक कोंडुस्कर, अथर्व मोहिते यांचीदेखील भाषणे झाली.
यावेळी कार्यालय अधीक्षक श्री. योगेश पाटील, श्री. रुपेश डांग, श्री. अनिकेत कांबळे, विद्यार्थी विकास विभागाचे प्रमुख डॉ. आनंद बल्लाळ, अरमान दड्डीकर, समृद्धी तांबेकर, संदीप देशमुख आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक परशुराम राणे याने केले. सूत्रसंचालन सुप्रिया घुरे हिने तर मिथुन कांबळे याने उपस्थितांचे आभार मानले.

“वंदे मातरम”च्या स्वरांनी आजरा दणाणणार…
आज आजऱ्यात कार्यक्रमाचे आयोजन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं प्रतीक आणि देशभक्तीचा जयघोष असलेल्या “वंदे मातरम” या गीताला यंदा १५० वर्षे पूर्ण होत आहेत.
या ऐतिहासिक निमित्ताने आजरा शहरात “वंदे मातरम — राष्ट्राचा श्वास, स्वातंत्र्याचा जयघोष!” या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
हा कार्यक्रम गुरुवार, दि. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वा. शिवतीर्थ मैदान, आजरा येथे होणार असून, या प्रसंगी सामूहिक “वंदे मातरम” गीताचे सादरीकरण करण्यात येणार आहे. १५० वर्षांच्या प्रवासाचं दर्शन घडवणारं विशेष दृश्य-श्राव्य सादरीकरण होईल.
कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभक्ती, संस्कृती आणि अभिमान यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळणार असून, सर्व नागरिकांना यात सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे.

मयूर पोवार यांचे यश

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर ता. आजरा येथील श्री.मयुर संजय पोवार यांची नुकत्याच झालेल्या महारष्ट्र लोकसेवा आयोगाच्या(MPSC) राज्यसेवा परीक्षा २०२५ मधून राजपत्रित अधिकारी म्हणून निवड झाली. एस.सी. प्रवर्गातून त्यांनी राज्यातून २३ वा क्रमांक मिळवला.
त्यांनी शासकीय कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथून कृषी विभागातील पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आहे. उत्तूर येथील नामांकित वकील ॲड. संजय रामचंद्र पोवार यांचे ते सुपुत्र आहेत.
आज शहरात…
आज सकाळी ११ वाजता छत्रपती संभाजी चौक, आजरा येथे शेतकरी वनहक्क संघर्ष समितीच्या वतीने हत्ती, गवे, रानडुक्कर, माकडे इत्यादी वन्य प्राण्याचा उपद्रव शेतकऱ्यांना होत असून या विरोधात सर्वपक्षीय ठिय्या आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.


