
कावळे नव्हे मावळे जात आहेत…
जिल्ह्यात महायुतीच्या अडचणी वाढल्या
आजरा … ज्योतिप्रसाद सावंत
राजकीय घडामोडी घडत असताना जेंव्हा एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये मंडळी प्रवेश करीत असतात तेंव्हा ज्या पक्षातून ती मंडळी दुसऱ्या पक्षात जातात त्या मुळ पक्षातील इतर कार्यकर्त्यांकडून गेले ते कावळे... आणि राहिले ते मावळे… अशी उपरोधात्मक टीका केली जाते, परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीतील घटक पक्षांच्या प्रमुख मंडळींच्यापैकी जे पक्ष सोडून जात आहेत ते मावळेच आहेत. त्यांच्या जाण्याने पक्षांचे काही नुकसान होणार नाही अशा गैरसमजामध्ये वरिष्ठांनी राहू नये अशीच परिस्थिती सध्या दिसत आहे. त्यामुळे गेले ते कावळे नव्हे तर मावळेच जात आहेत याचे भान पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
गेल्या पाच- दहा वर्षापासून समरजीतसिंह घाटगे या कागलमधील राजर्षी शाहू संस्था समूह परिवाराच्या लढवय्या व भाजपाच्या माजी जिल्हाध्यक्ष शिलेदाराने भाजपाची जिल्ह्यातील मोट बांधण्यात मोठी भूमिका वटवली होती. हीच अवस्था राहुलदादा देसाई यांचीही झाली. भुदरगड – राधानगरी विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे तगडे उमेदवार म्हणून राहुल देसाई हे उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. पण वरिष्ठांच्या पक्षीय तडजोडीत भाजपाकडून उमेदवारीच्या शक्यता दुरावल्याने भाजपाच्या या दोन तरुण कार्यकर्त्यांनी/नेत्यांनी घेतलेली भूमिका निश्चितच धक्कादायक आहे.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या वरच्या फळीतील नेते म्हणून माजी आमदार के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांना ओळखले जाते. के. पी. पाटील व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. परंतु महायुतीतून विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची कोणतीच शक्यता नसल्याने या दोघांनीही राष्ट्रवादी अजित पवार गटापासून दूर राहण्याचे पसंत केले आहे. दोघेही राष्ट्रवादीचे माजी जिल्हाप्रमुख आहेत हे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
भाजपाचे दोन माजी जिल्हाप्रमुख आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन माजी जिल्हाप्रमुख असे चार खंदे नेते महायुतीतून बाजूला झाले आहेत.एकीकडे राज्यस्तरीय नेतेमंडळी पुन्हा सत्तेत येण्याची स्वप्ने पाहत असताना कोल्हापूर सारख्या जिल्ह्यामध्ये महायुतीची विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठी पडझड होण्याची शक्यता दिसू लागली आहे. याचे पडसाद बाजूच्या सांगली व सातारा जिल्ह्यामध्ये उमटण्याची शक्यताही आता वर्तवली जात आहे. जिल्ह्यातील महायुतीमध्ये डॅमेज कंट्रोल करण्यासह गळती थांबवण्याचे मोठे आव्हान आता राज्यस्तरीय नेत्यांच्यावर येऊन पडले आहे.
स्थानिक नेत्यांचे बंड भोवणार...
लोकसभेमध्ये महायुतीला कोल्हापूर मतदारसंघात फटका बसला असतानाही जिल्ह्यातील स्थानिक नेतेमंडळींना विश्वासात न घेता वरिष्ठ पातळीवर विधानसभा निवडणुका संदर्भातील महायुतीच्या नेत्यांकडून निर्णय घेणे व ते स्थानिक नेत्यांवर लादणे याची फार मोठी किंमत विधानसभा निवडणुकीत मोजावी लागणार असे दिसत आहे. विशेषतः भाजपाकडे चंदगड विधानसभा मतदारसंघातून शिवाजीराव पाटील, कागलमधून समरजीतसिंह घाटगे भुदरगड – राधानगरी मधून राहुलदादा देसाई, इचलकरंजी मधून माजी आमदार सुरेश हळवणकर गेली दहा वर्षे आपापल्या मतदारसंघातील भाजपा बळकटीस बळ देणारे नेते यावेळी उमेदवारीच्या स्पर्धेतून आपोआपच बाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे समरजीतसिंह घाटगे यांच्यासह राहुलदादांनी आपली भूमिका बदलून कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीतील उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्णय घेतला आहे. समरजितसिंह घाटगे यांची उमेदवारी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातून निश्चित मानली जाते तर राहुल देसाई यांना उमेदवारीची आशा आहे .
भुदरगड -राधानगरी मतदारसंघातील के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांनीही विधानसभा उमेदवारीसाठी आपली भूमिका बदलली आहे. महायुतीतून आमदार प्रकाश आबिटकर यांची शिंदे गटातून उमेदवारी निश्चित आहे तर मग महाविकास आघाडीतून राहुल देसाई, ए. वाय. पाटील की के.पी.पाटील ? या प्रश्नाचे उत्तर काही दिवसातच मिळेल.
‘त्यांची’ भूमिका महाविकास आघाडीच्या पथ्यावर…
भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, राहुलदादा देसाई यांच्यासह राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे के. पी. पाटील व ए.वाय. पाटील यांनी घेतलेली भूमिका महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता दिसू लागली असून लोकसभा निवडणुकीप्रमाणे जिल्ह्यातील अनेक विधानसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल येणार हे स्पष्ट होऊ लागले आहे.

भूमि अभिलेखच करायचं काय ?
तालुकावासियांचे धरणे आंदोलन सुरू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील भूमिअभिलेख कार्यालयात गलथान व भोंगळ कारभार सुरु आहे.तालुक्यातील जमिनीच्या मोजणीबाबत अनेक तक्रारी येत आहेत. असा आरोप सामाजिक कार्याकर्ते कॉ. शिवाजी गुरव यांनी केला आहे. अशा प्रकरणात दोषी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची वरिष्ठ स्तरावरून चा कशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत किटवडे ग्रामस्थांनी आजरा तहसीलसमोर बेमुदत आंदोलन सुरु केले आहे.
किटवडे (ता. आजरा) येथील एका जमिनीची दोन वेळा मोजणी झाली. याचे नकाशे तयार झाले. एकाच कार्यालयाने केलेली मोजणी कोणती बरोबर याबाबत संभ्रम निर्माण झाला असून याचा खुलासा संबंधीत जमिनधारकांनी मागीतला आहे. याबाबत कार्यालयाकडे तक्रार केली आहे. पुन्हा योग्य ती मोजणी व्हावी व दोषीवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. गत दोन वर्षापासून आर्थिक व मानसीक त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत असून याबाबत त्यांचा लढा सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून आज संबंधीत शेतकऱ्यांनी तहसीलसमोर बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली आहे. सामाजिक कार्यकर्ते गुरव यांनी आंदोलनस्थळी मनोगत व्यक्त केले.
यावेळी त्यांनी भूमि अभिलेखच्या कारभाराचा पाढा वाचला.
दरम्यान आजऱ्याच्या उपअधिक्षक भूमिअभिलेख विद्या तांगडे आंदोलनस्थळी जावून आंदोलकांशी चर्चा केली. परंतु आंदोलक निर्णयावर ठाम आहेत. जयवंत पाटील, शंकर पाटील, सुधाकर पाटील, भिकाजी सावंत, गावडू पाटील, यशवंत पाटील, अंकुश सावंत यासह ग्रामस्थांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे.

कार्यकर्ते उठवत आहेत रान…
टोलबाबत होत आहे जनजागृती

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
२८ ऑगस्ट रोजी टोलमुक्ती संघर्ष समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या संकेश्वर – बांदा मार्गावरील मसोली येथील टोल नाक्यावरील सरास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर टोलमुक्ती संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी रान उठवण्यास सुरुवात केली आहे. गावा- गावांमध्ये जाऊन कार्यकर्ते टोल बाबत जनजागृती करू लागले आहेत.
टोल मुक्ती संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांच्या तुकड्या तयार करण्यात आलेल्या असून ग्रामीण भागामध्ये टोलला विरोध करण्याबाबतची जनजागृती केली जात आहे. टोलला विरोध का ? याबाबतची माहिती दिली जात आहे.
हे आंदोलन भव्य व यशस्वी करण्याच्या उद्देशाने मुक्ती संघर्ष समितीची यंत्रणा सज्ज झाली आहे.

आरोग्य केंद्रामध्ये रिक्त पदे त्वरित भरा…
पेरणोली ग्रामस्थांची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली (ता. आजरा) येथे आरोग्य उपकेंद्र व आयुर्वेदिक दवाखाना आहे. आयुर्वेदिक दवाखान्यामध्ये वैद्याकिय अधिकारी (गट ब) व शिपाई हे पद आठ वर्षापासून रिक्त आहे. आरोग्य उपकेंद्रामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. ही पदे तात्काळ भरावीत अशी मागणी पेरणोली ग्रामपंचायत, परिसरातील ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकीयन यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांना दिले आहे.
सरपंच सौ. प्रियांका जाधव, ग्रामपंचायत सदस्य संकेत सावंत यांनी श्री. कार्तिकियन यांची भेट घेतली व गाऱ्हाणे मांडले, पेरणोली उपकेंद्र व आयुर्वेदिक दवाखान्यातंर्गत सहा गावे येतात. यापुर्वी ग्रामिण व दुर्गम भागासाठी काही कर्मचाऱ्यांकडून गुणवत्ता पूर्ण व सेवाभावीवृत्तीने सेवा पुरवण्यात आल्या. पेरणोली पंचक्रोशीतील ग्रामस्थ आजही याची चर्चा करतांना दिसतात. गेले सात ते आठ वर्षांपासून येथे जिल्ह्याहून कागदोपत्री पदाची भरती झाल्याचे दाखवले जात होते. प्रत्यक्षात वैद्यकिय अधिकारी दुसरीकडे प्रतिनियुक्तीने सोयीच्या ठिकाणी काम करत होते. काही राजकीय व सामाजिक मंडळीनी या संबंधी पाठपुरावा करून देखील याबाबत वरिष्ठ स्तराहून कार्यवाही झालेली नाही. गेली दशकभरापासून या परिसरातील जनतेला खाजगी वैद्यकिय सेवेवर अवलंबून रहावे लागत आहे. कांहीजण ग्रामीण रुग्णालय, आजरा येथे उपचारासाठी जातांना दिसतात. त्यामुळे येथे आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. तसेच गरोदर माता तपासणी, लहान मुलांचे लसीकरण, साथ रोग यासाठी आरोग्य सेवक, आरोग्य सेविकांची गरज आहे. हे देखील पदे गत पाच वर्षापासून रिक्त आहेत. या वेळी ग्रामपंचायत सदस्या अश्विनी कांबळे, ग्रामसेवक संदिप चौगले उपस्थित होते.

बस बिघडली…
विद्यार्थ्यांच्या मदतीला धावले मनसे पदाधिकारी!

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बहुतांशी बस थांब्यावर थांबवल्या जात नाहीत, ज्या गाडीतून प्रवास करावा ती गाडी सुस्थितीत शेवटच्या थांब्यापर्यंत पोहोचेल याची हमी नाही.याचा फटका धनगरमोळा परिसरातील विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी तातडीने खाजगी वाहतूक करणाऱ्या गाड्या उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था केली. सदर व्यवस्था झाली नसती तर शाळकरी विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले असते.घनगरमोळा शाखा अध्यक्ष व तालुका उपाध्यक्ष प्रेमानंद खरुडे यांच्या सहकार्याने खाजगी वाहनाने त्वरित त्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी रवाना केले
बस थांब्यावर बस थांबत नसल्याने आंदोलनाचा पवित्रा घेत आक्रमक झालेल्या मनसे पदाधिका-यांनी आंदोलनाची हाक दिली. आगार व्यवस्थापकांनी लेखी आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्यास सांगितले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस सुधिर सुपल, तालुका अध्यक्ष आनंदा घंटे उपस्थित होते.

धक्कादायक !

– पुणे –
बदलापूरमधील २ अल्पवयीन मुलींवर करण्यात आलेल्या अत्याचाराची घटना ताजी असताना आता पुण्यातील एका नामांकित शाळेत एका मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. या मुलीवर शाळेतील विद्यार्थ्यानेच अत्याचार केल्याचे समोर आले आहे.पुण्यातील भवानी पेठ परिसरात असलेल्या एका नामांकित शाळेत हा प्रकार घडला आहे.
काय घडले नेमके?
५ ऑगस्टच्या दिवशीच हा प्रकार घडला. पीडित मुलगी ही सातवीच्या वर्गात शिकणारी असून हा आरोपी तरुण देखील त्याच शाळेतील विद्यार्थी आहे. देवराज पदम आग्री असे आरोपी तरुणाचे नाव असून तो १९ वर्षांचा आहे. या तरुणाने पीडित तरुणीवर शाळेतील स्वच्छतागृहात लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात देवराज आग्री विरोधात गुन्हा दाखल असून त्याला अटकही करण्यात आली आहे.
पीडित मुलीच्या ३० वर्षीय आईने या प्रकरणी तक्रार दिली आहे. तसेच शाळेतील स्वच्छतागृहाजवळ हा प्रकार घडल्याच उघड झालं आहे. या तरुणावर समर्थ पोलीस ठाण्यात याप्रकरणी आरोपी विरोधात पोक्सो नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर
या दोन प्रकरणानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शाळांमधूनच असे प्रकार घडत आहेत, त्यामुळे मुलं शाळेत तरी सुरक्षित आहेत का ? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. राज्य सरकार यावर काय भूमिका घेतात? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
(news source:online news)




