
निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवले ; ‘शिवसेना’ नाव सुद्धा वापरता येणार नाही

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठविण्यात आल्याचा निर्णय दिला आहे. तसेच शिवसेनेच्या दोन्ही गटांना या चिन्हा वापर करता येणार नाही असे म्हटले आहे. शिवाय दोन्ही गटांना शिवसेना हे नाव देखील वापरता येणार नाही असा निर्णय दिला आहे.
काल, शुक्रवारपर्यंत आयोगाने दोन्ही पक्षांना त्यांच्याकडून करण्यात आलेल्या दाव्यासंबंधी कागदपत्रे आणि उत्तर सादर करण्याचे आदेश दिले होते. या अनुषंगाने शिंदे गटाकडून शिवसैनिकांचे शपथपत्र आयोगाकडे सादर केले. तर, ठाकरे गटाकडून आयोगात कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली. या मागणीनंतर आयोगाने शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत कागदपत्रे सादर करण्यासाठीची अंतिम मुदत दिली होती. त्यावर शनिवारी पक्षाचे ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह ठाकरे गटाचे की शिंदे गटाचे? यासंबंधी निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे.
शनिवारपर्यंत ठाकरे गटाकडून कुठले उत्तर मिळाले नाही तर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आयोगाकडून ठणकावण्यात आले होते. शिवसेनेच्या बहुसंख्य लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी तसेच अध्यक्षपदी निवड केली आहे. शिवसेनेच्या ५५ पैकी ४० आमदार आमच्याकडे आहेत तसेच १८ पैकी १२ खासदारांचा आम्हाला पाठिंबा आहे. प्रतिनिधी सभा आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे ‘मुख्य नेता’ तसेच अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे १४४ पदाधिकारी आणि ११ राज्यांच्या प्रमुखांनी शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. शिवसेनेचे बहुसंख्य लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांचा शिंदे यांना पाठिंबा आहे, असे शिंदे गटाकडून आयोगाकडे सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्रात गेल्या काळात अनपेक्षितरीत्या घडलेल्या सत्तांतरानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. पक्षातील फुटीनंतर पहिल्यांदाच होऊ घातलेल्या अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपूर्वी पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह ठाकरे गटाकडे राहणार की शिंदे गटाला मिळणार याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. निवडणूक आयोगाने आता ठाकरे गटाला उद्या (दि. ८) दुपारी २ पर्यंत ठाकरे गटाला मुदत दिली होती.
तर दुसरीकडे शिंदे गटाने धनुष्यबाण चिन्हावर अधिकृत दावा केला आहे. तत्पूर्वी, दोनवेळा मुदतवाढ मागणाऱ्या ठाकरे गटाने काल (दि.७) पहिल्यांदाच आपले प्राथमिक लेखी निवेदन आयोगात सादर केले होते. शिंदे गटाची कागदपत्रं आम्हाला अद्याप मिळालेली नाहीत अशी तक्रार करत ठाकरे गटाने काल निवडणूक आयोगात आपली बाजू मांडली होती. बाजू मांडण्यासाठी ठाकरे गटाला आज शेवटची मुदत होती. पक्षावर अजूनही आमचं वर्चस्व आहे हे सांगतानाच सविस्तर कागदपत्रं सादर करण्यासाठी आपल्याला किमान १५ ते २० दिवसांचा वेळ मिळावा ही मागणी ठाकरे गटाने केली होती. मात्र त्यांना आजपर्यंतची मुदत देण्यात आली होती.
निवडणूक आयोगाकडे केलेल्या अर्जात, शिंदे गटाने म्हटले आहे की उद्धव ठाकरे गटाने चिन्ह गमावले आहे. ३ नोव्हेंबरच्या अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने चिन्हाच्या मुद्द्यांवर त्वरित निर्णय द्यावा अशी विनंती त्यांनी केली होती. शिवसेनेचे नेते, उपनेते, राज्य संपर्कप्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख, राज्यप्रमुख, सचिव, जिल्हाप्रमुख, राज्य विधीमंडळ आणि संसदेत पक्षाचे निवडून आलेले सदस्य तसेच महापौर आणि जिल्हा परिषदांचे अध्यक्ष यांचाही त्यांना पाठिंबा असल्याचा दावा शिंदे गटाने केला होता.
निवडणूक चिन्हासंबंधीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे सोपवला होता. शिंदे यांच्या बंडानंतर मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघात होणारी पहिली पोटनिवडणूक आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांचे मे महिन्यात निधन झाले होते. त्यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली. नियमानुसार सहा महिन्यात ही निवडणूक होणे गरजेचे आहे. निवडणूक तोंडावर आली असेल तर आयोग वादात असलेले चिन्ह गोठवून दोन्ही बाजूंना नवीन चिन्ह देत असते.
अंतिम निर्णय अद्याप बाकी : उज्वल निकम
निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्ह गोठवलेले आहे हा निर्णय तात्पुरत्या स्वरूपाचा असल्याने दोन्ही गटांना न्यायालयात दाद मागता येईल अशी प्रतिक्रिया निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर बोलताना ज्येष्ठ विधितज्ञ निकम यांनी दिली आहे.





