


आजरा कारखान्याचा कारभार पारदर्शक करणार:गोविंद पाटील
सुळेरान येथे श्री. रवळनाथ शेतकरी आघाडीची सभा

आजरा:प्रतिनिधी
आजरा कारखाना उत्तमप्रकारे कसा सुरु राहील यासाठी राष्ट्रवादीची नेतेमंडळी प्रयत्नवत आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार राजेश पाटील यांच्या सहकार्याने कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी आमची आघाडी मैदानात आहे. सभासदांनी संधी दिल्यास कारखान्याचा कारभार पारदर्शक व काटेकोर केला जाईल. असे प्रतिपादन उमेदवार गोविंद पाटील यांनी केले.
सुळेरान, धनगरमोळा (ता. आजरा) येथे श्री. रवळनाथ शेतकरी विकास आघाडीची सभा झाली. या वेळी गोविंद पाटील यांनी आघाडीची भूमिका मांडली. या वेळी उमेदवार उदयराज पवार, रणजित देसाई उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, आजरा कारखाना बिनविरोधासाठी राष्ट्रवादीचेही प्रयत्न होते. पण गटातटाचे राजकारण करत काही मंडळीनी जागा वाटपात घोळ घातला. आपल्या वाट्याला जागा कशा जास्त येईल हे पाहीले. पडद्याआडचे राजकारण सर्वांनाच समजल आहे. त्यामुळे राष्ट्रवादी बाहेर पडली. राष्ट्रवादीने रिंगणातून बाहेर राहण्याचा पर्याय ठेवला होता. पण त्याबाबतही आमच्यावर आरोप होत असतील तर निवडणुकीशिवाय पर्याय नव्हता. राजकीय ताकद दाखवण्याबरोबर कारखान्याचा कारभार पारदर्शक व काटेकोर करण्यासाठी निवडणूक रिंगणात आहोत. उदयराज पवार म्हणाले, कारखाना आर्थिक अरिष्टात आहे. हे सर्वांना माहीती आहे पण या कारखान्याचा कारभार गल सहा सात वर्षात कसा झाला याची माहीती सभासदांना आहे. कारखाना वाचवायचा असेल तर राष्ट्रवादीच्या श्री. रवळनाथ विकास आघाडीला विजयी करावे. या वेळी देवदास बोलके व शेतकरी सभासद उपस्थित होते.
आजरा- श्रृंगारवाडी गटात आघाडीचे उमेदवार मुकुंदराव देसाई, सुभाष देसाई व शिवाजी नांदवडेकर यांनी प्रचार फेरी काढली उत्तूर मडिलगे गटात आघाडीचे उमेदवार वसंतराव धुरे, मारुती घोरपडे, दीपक देसाई व काशिनाथ तेली यांनी प्रचार फेरी काढली व आघाडीला विजयी करण्याचे आवाहन केले.

कारखाना सक्षमपणे चालवण्यासाठी सत्ता द्या : दशरथ अमृते

आजरा:प्रतिनिधी
केंद्र व राज्यात भाजप सरकार आहे. आमचे नेते व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक चराटी यांचा संपर्क दांडगा आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याशी आजरा कारखान्याबाबत चराटींनी चर्चा केली आहे. त्यामुळे कारखान्याला विशेष निधी मिळवून कारखाना सक्षमपणे चालवणार आहोत. शेतकरी, सभासद व कामगारांच्या हितासाठी चाळोबादेव शेतकरी विकास आघाडीला निवडून द्यावे. असे आवाहन दशरथ अमृते यांनी केले. सुलगाव, चांदेवाडीसह अन्य गावात चाळोबादेव शेतकरी विकास आघाडीने प्रचार फेरी काढली. सुलगाव येथे झालेल्या कोपरा सभेत आघाडीची भूमिका मांडली.
श्री. अमृते म्हणाले, आजरा कारखाना आर्थिक अरिष्टात आहे. त्यामुळे या कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची सर्वाची भूमिका होती. याबाबतचा प्रस्ताव जिल्ह्याच्या नेतेमंडळीसमोर ठेवला होता. पण काही मंडळींनी जागा वाटपात तडजोड मान्य केली नाही. त्यांना अधिक जागा देण्याची आमच्या नेत्यांची भूमिका होती. पण दुर्देवाने निवडणूक लादली. कारखान्याला अकारण सुमारे ८० लाखांच्या खर्चात घातले आहे. यामुळे काय साध्य होणार आहे. सभासद, शेतकरी व कामगारांच्या हिताचा कारभार करण्यासाठी श्री चाळोबा देव विकास आघाडी निवडणूक रिंगणात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळीनंदकुमार देसाई, शिवाजी डोंगरे, नारायण देसाई यांच्यासह पदाधिकारी व आघाडीचे उमेदवार उपस्थित होते.

कारखान्याला उर्जित अवस्था आणून देण्यासाठी प्रयत्नशील : श्रीमती अंजनाताई रेडेकर
सरंबळवाडी येथे चाळोबादेव शेतकरी आघाडीची प्रचार सभा

आजरा:प्रतिनिधी
आजरा कारखाना आर्थिक अरिष्टात आहे. कारखान्याला उर्जीतावस्था आणून देण्यासाठी निवडणूक रिंगणात आहे. कारखाना कर्जमुक्त करून एक आदर्शवत पद्धतीने कारखाना चालवू, असे प्रतिपादन गोकुळच्या संचालिका व आजरा कारखान्याच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर यांनी केले.
सरंबळवाडी वाडी येथे सभासदांशी संवाद साधताना श्रीमती रेडेकर म्हणाल्या, कारखाना कामगार व शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीला सामोरे जात आहोत. कारखान्याचा कारभार सक्षमपणे करून कारखाना कर्जमुक्त कसा करता येईल याकरिता आपल्या आघाडीतील प्रमुख मंडळी प्रयत्नशील आहेत. सभासदांनी आघाडीच्या पाठीशी राहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी उमेदवार सुधीर पाटील, आनंदा बुगडे, सौ सुनीता रेडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

रविवारी आज-यात संत निरंकारी विशाल सत्संग सोहळा

आजरा:प्रतिनिधी
रविवार दिनांक १० डिसेंबर २०२३ रोजी आजऱ्यामध्ये संत निरंकारी विशाल सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आजरा शाखेचे मुखी भिकाजी पाटील यांनी दिली.
आजरा हायस्कूलच्या पटांगणावर दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून सायंकाळी सात ते दहा या कालावधीत म. जालंदर जाधव, प्रचारक सांगली यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर सत्संग सोहळा पार पडणार आहे. यावेळी श्री अमरलाल निरंकारी, झोनल इन्चार्ज, कोल्हापूर झोन, शहाजी पाटील क्षेत्रीय संचालक, कोल्हापूर क्षेत्र हे देखील उपस्थित राहणार आहेत. सत्संग समाप्तीनंतर ब्रह्मज्ञान प्रदान कार्यक्रम होणार असून सर्वांसाठी प्रसादाची जेवणाची व्यवस्था केलेली
रविवारी सकाळी नऊ वाजता सेवा दल शिबिर, सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रदर्शनी, वैद्यकीय शिबिर, दुपारी तीन वाजता दिंडी व सायंकाळी सात वाजता सत्संग सोहळा असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.


डॉक्टर अशोक फर्नांडिस : माणसातला देव
आज-यात शोकसभा

आजरा:प्रतिनिधी
डॉ. अशोक फर्नांडीस यांच्या जाण्याने केवळ एका कुटुंबाचे नव्हे तर संपूर्ण समाजाचे नुकसान झाले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत घडलेला एक सेवाभावी वृत्तीचा डॉक्टर समाजाने गमावला आहे. ज्यांची माणसातला देव म्हणून ओळख होती त्या डॉ. फर्नांडिस यांच्या कार्याचा वसा पुढे चालवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे असे प्रतिपादन आजरा येथे आयोजित शोकसभेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केले.
श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजराच्या सभागृहात डॉ. फर्नांडिस यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. डॉक्टरांनी केलेल्या सामाजिक वैद्यकीय क्षेत्रातील कार्याच्या आठवणींना उजाळा यावेळी देण्यात आला.
यावेळी जेष्ठ नेते जयवंतराव शिंपी, विनायक अमनगी, प्रभाकर कोरवी, सुधीर कुंभार, तुळसाप्पा पोवार, तातूअण्णा बटकडली, बी.एम.दरी, गुरु गोवेकर राजू होलम, सुभाष विभूते, प्रा. बजरंग पुंडपळ, मारुती मोरे, डॉ. प्रवीण निंबाळकर, डॉ. धनाजी राणे, सौ.वैशाली वडवळेकर, कॉ. संजय तर्डेकर, काँ. शिवाजी गुरव आदींनी डॉ. फर्नांडिस यांच्या बद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या
यावेळी सौ.गीता पोतदार, बंडोपंत चव्हाण, मायकल फर्नांडिस, बशीर खेडेकर, डॉ. कुलदीप देसाई यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर, डॉ. स्मिता फर्नांडिस व कुटुंबीय उपस्थित होते.


निवड

देऊळवाडी- सातेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संजूभाई सावंत यांची निवड झाली. या निमित्त त्यांचा सरपंच सौ.पोवार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.


निधन वार्ता
विठोबा मगदूम

दुंडगे ( ता.गडहिंग्लज) येथील प्रगतशील शेतकरी विठोबा रामा मगदूम (वय ७९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,सूना, नातवंडे असा परिवार आहे.’लोकमत’चे पत्रकार राम मगदूम यांचे ते वडील होत.अंत्यविधी गुरुवारी सकाळी १० वाजता दुंडगे येथे आहे.




