mrityunjaymahanews
अन्यठळक बातम्यामहाराष्ट्र

उत्तूर येथे तरुणाची आत्महत्या ? प्रेत विहिरीत सापडले…….जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज व्हा : माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

 

उत्तूर येथे तरुणाची आत्महत्या ?
प्रेत विहिरीत सापडले…


उत्तुर (ता. आजरा) येथील सचिन दिनकर इळके या तीस वर्षीय तरुणाचे प्रेत येथील लक्ष्मी मंदिराजवळील विहिरीच्या पाण्यामध्ये तरंगताना आढळले. सचिन हा गेले दोन दिवस बेपत्ता होता. दरम्यान मंगळवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास त्याचा शोध घेत असताना सदर प्रेत आढळून आहे. तो आजारी असल्याने वेडसरसारखी बडबड करत होता व घरातून निघून जात होता. वेडसरपणामध्येच त्याने आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त होत आहे. याबाबतची फिर्याद महेंद्र दिनकर उत्तुरकर यांनी आजरा पोलिसात दिली आहे. पुढील करून पोलिस करीत आहेत.

 

 

जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज व्हा : माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ


पावणेतीन वर्षांमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आपला प्रामाणिक प्रयत्न राहिला आहे. सत्तेत असल्यामुळेच आंबेओहळ व उचंगी प्रकल्प मार्गी लागले आहेत. मंत्रिपद कालावधीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेणे शक्य झाले. सत्ता येणे व जाणे हे चालूच राहणार आहे. सत्ता गेली म्हणून कार्यकर्त्यांनी खचून न जाता हिंमतीने कामाला लागावे. सत्तेपासून दूर गेल्यामुळे जर सामान्य माणसांची अडवणूक झाली तर प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारीही आपली आहे. येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती मार्केट कमिटीसह विविध स्थानिक सहकारातील निवडणुकांमध्ये र
राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे असे आवाहन माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. आजरा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या विविध सेवा संस्थांच्या निवडणुकीतील विजयी उमेदवारांचा सत्कार समारंभ व कार्यकर्त्यांचा मेळावा असा संयुक्त कार्यक्रम माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी ते बोलत होते.

स्वागतपर भाषणात बोलताना जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुधीर देसाई म्हणाले, जिल्हा बँकेची वसुली सेवा संस्थांच्या पदाधिकारी यांच्या सहकार्यामुळे समाधानकारक झाली आहे. सध्या तालुक्यातील दोन बडे नेते एकत्र येऊन तालुकाभर फिरताहेत. जिल्हा परिषद, नगरपंचायत, आजरा साखर कारखाना या निवडणुकांमध्ये एकमेकांविरोधात लढलेले हे दोन नेते तालुकावासीयांच्या दृष्टीने दिशाभूल करणारी विधाने करीत आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना माजी मंत्री,आमदार मुश्रीफ पुढे म्हणाले, आजरा साखर कारखाना सुरु करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य आपण केले आहे परंतु या यापुढे कारखाना व्यवस्थित चालण्यासाठी कारखान्यांमध्ये विस्तारीकरणाची गरज तर आहेच परंतु त्याच बरोबर डिस्टीलरी, सहवीज प्रकल्प याचीही गरज असल्याने यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. विकास सेवा संस्था चालवताना अनेक मर्यादा येत आहेत यासाठी या संस्थांना मदत करण्यासाठी आपला प्रामाणिक प्रयत्न राहील.सत्ता गेली म्हणून कार्यकर्त्यांनी घाबरु नये अथवा नाऊमेदही होऊ नये भविष्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना आमदार राजेश पाटील म्हणाले, राष्ट्रवादीतून कोण गेले याचा विचार करत बसू नका अशा राष्ट्रवादीतून पळून गेलेल्या पळपुट्या लोकांची वेळीच दखल घेऊन पुन्हा अशा दगाफटका करणाऱ्यांची गय करू नका.माजी मंत्री मुश्रीफ यांनी चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्याला आर्थिक शिस्त बसविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून या तीनही तालुक्यांना मदत केली आहे अद्यापही ग्रामीण भागातील जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे, यासाठी विशेष प्रयत्न करावेत असेही त्यांनी सांगितले. आंबेहोळ व उचंगी प्रकल्प माजी मंत्री मुश्रीफ यांच्यामुळेच मार्गी लागले आहेत. पुनर्वसनाचे सर्व प्रश्न याच पद्धतीने मार्गी लावण्यासाठी आपण बांधील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

माजी आमदार के, पी, पाटील यांनी यावेळी जोरदार फटकेबाजी केली. ते म्हणाले गद्दारीच  राजकारण यापूर्वी महाराष्ट्रात घडले नाही. पक्षाच्या जीवावर मोठे होणा-यांनी नेतृत्वालाच गद्दार ठरण्याचे पाप केले आहे. पैसे घेऊन लाचार व गद्दार झालेल्या अशा मंडळीना मतदार धडा शिकवल्याशिवाय रहाणार नाहीत.राष्ट्रवादीने मोठी चांगली व चांगली-चांगली पदे दिलेली मंडळीच राष्ट्रवादीच्या विरोधात बोलू लागली आहेत.आगामी निवडणुकांमध्ये अशा मंडळींनाही धडा शिकवण्याशिवाय पर्याय नाही.राज्यातील सत्तांतरानंतर जिल्हा बँकेमध्ये काय होणार ? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. परंतु ‘हसन मुश्रीफ’नावाचा जादूगार बँकेत आहे तोपर्यंत जिल्हा बँकेला कोणी धक्का देऊ शकत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले राज्यात काय चालले आहे यापेक्षा कार्यकर्त्यांनी जिल्ह्याकडे लक्ष द्यावे. जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची मोट चांगली बांधली गेलेली आहे. आगामी जिल्हा परिषद ,पंचायत समिती, मार्केट कमिटीसह सहकारातील निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा शंभर टक्के फडकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

माजी पंचायत समिती सभापती विष्णुपंत केसरकर म्हणाले, जिल्हा बँकेत निवडणुकीमध्ये बिनविरोधची  वल्गना करणाऱ्यांनी आजरा साखर कारखान्याचे तीन-तेरा करण्याचे काम केले. तालुक्यातील सेवा संस्थांच्या ठराव धारकांनी भरीव सहकार्य केल्याने कमी वयामध्ये जिल्हा बँकेत संचालकपदी जाण्याची संधी सुधिर देसाई यांना मिळाली आहे. तालुक्याच्या विकासासाठी याचा  निश्चितच फायदा होईल.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मुकुंदराव  देसाई म्हणाले,  तालुक्यामध्ये एक अभद्र युती जन्माला आली असून आपला वारू कोणी रोखू शकणार नाही अशा अविर्भावात वागू लागली आहे. तालुक्यावर असणारे राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व जिल्हा बँकेच्या निवडणूक माध्यमातून सिद्ध झाले आहे. आजरा कारखान्याची परिस्थिती पाहिल्यास दोन वर्षे कारखाना बंद करण्याची नामुष्की तत्कालीन सत्ताधाऱ्यांना आली. केवळ मुश्रीफ यांच्या सहकार्यामुळे साखर कारखाना सुरू होण्यास मदत झाली आहे हे विसरून चालणार नाही.

यावेळी माजी पंचायत समिती सभापती अल्बर्ट डीसोझा, वसंतराव धुरे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रम प्रसंगी पंचायत समिती सभापती उदय पवार, तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष एम.के. देसाई, काशिनाथ तेली, मारुती घोरपडे, दिपकराव देसाई , अंकुश पाटील, राजू होलम, सौ.रचना होलम,नगरसेवक आलम नाईकवाडे,रणजित देसाई,महादेवराव पाटील-धामणेकर,देवदास बोलके,महादेव पोवार,जनार्दन बामणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

आमदार प्रकाश आबिटकर, अशोक चराटी व जयवंतराव शिंपी यांच्यावर जोरदार टीका

आजच्या या मेळाव्यामध्ये आमदार प्रकाश आबिटकर यांचे नाव न घेता माजी आमदार के. पी. पाटील यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली तर उर्वरित सर्वच वक्त्यांनी अशोकअण्णा चराटी व जयवंतराव शिंपी यांना टीकेचे  लक्ष्य बनवले.

……………..

 

 

 

संबंधित पोस्ट

मुंगूसवाडी येथे मारामारी…सहा जणांविरोधात गुन्हा नोंद

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

तीन लाख ५५ हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

तालुका खरेदी  विक्री संघावर सत्ताधाऱ्यांचा झेंडा

mrityunjay mahanews
error: Content is protected !!