
लोकाभिमुख कारभाराची हमी : अभिषेक शिंपी

आजरा- हुकुमशाही आणि मनमानी कारभाराला वैतागली आहे. अशावेळी अभ्यासू व विकासाचा दृष्टिकोन असणारी मंडळी नगरपंचायतीमध्ये कारभारी म्हणून जाणे गरजेचे आहे. राष्ट्रीय काँग्रेस व मित्र पक्षाच्या माध्यमातून तयार झालेल्या आजरा परिवर्तन विकास आघाडीमधून आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत. केलेल्या कामांच्या जोरावर आपण नगरसेवक पदाचे पुन्हा एक वेळ दावेदार आहोत आणि मतदार निश्चितच आपणाला निवडून देतील असा विश्वास प्रभाग १४ मधील आजरा परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार अभिषेक शिंपी यांनी व्यक्त केला.
शिक्षण व अनुभवाच्या जोरावर गेली पाच वर्ष सभागृहात आपण विविध प्रश्नांची निर्गत करण्यासाठी नेहमीच प्रयत्न केला आहे.
जनतेच्या विश्वासाच्या आधारावर लोकाभिमुख, स्वच्छ, पारदर्शी कारभार आणि आजरा शहराचा सर्वांगीण विकास ही भूमिका घेऊन आघाडी या निवडणुकीत उतरली आहे. आजरा शहराची नगरपंचायत झाल्यानंतर इथल्या जनतेने ज्या विश्वासाने नगरपंचायतीची सत्ता सत्ताधारी आघाडीकडे सोपवली होती, त्या जनतेच्या विश्वासाला सत्ताधारी नेतृत्वाने हरताळ फासला आहे. मनमानी कारभार आणी बगलबच्च्यांचे हित हाच या मंडळींचा एकमेव अजेंडा राहिला आहे. म्हणूनच या निवडणुकीत आजरा शहराच्या विकासाचे नवे प्रारूप मांडून आम्ही मतदारांच्याकडे जाणार आहोत. स्वच्छ हवा, समृध्द निसर्ग आणि मुबलक पाणी असतानाही केवळ विकासाभिमुख राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे या शहराचा विकास रखडलेला आहे. ‘सुंदर आजरा… समृध्द आजरा ‘ हा आमचा अजेंडा असून विकासाचे नवे प्रारूप घेऊनच आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत. पिण्याचे स्वच्छ आणि शुध्द पाणी, स्वच्छ सुंदर रस्ते, जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा पार्क, स्त्रियांसाठी स्वच्छतागृहे यासह नवनवे उपक्रम राबवून जनहिताच्या कामावर आमचा भर राहणार आहे. आजरा शहराला मोठा सांस्कृतिक वारसा असून ‘मृत्यंजय’कार शिवाजीराव सावंत, राजा शिरगुप्पे सारखे मोठे साहित्यिक या शहराने घडवले आहेत. त्यांचा सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे काम आम्ही करणार आहोत.
प्रभाग १४ हा आपला घरचा प्रभाग आहे. सर्व मतदारांना मी माझे कुटुंब मानतो. या प्रभागातील सर्व प्रश्नांची निर्गत करणे माझे कर्तव्य समजून मी या निवडणुकीला सामोरा जात असून प्रभागातील जनतेच्या विश्वासावर आपला विजय निश्चित आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
दुहिचे राजकारण करणाऱ्या पासून सावध रहा : आ. सतेज पाटील
आजऱ्यात परिवर्तन विकास आघाडीच्या सभा

केवळ पक्षातच नव्हे तर घराघरात फूट पाडून राजकीय स्वार्थ साधणाऱ्या मंडळींपासून सावध रहा. सर्वसामान्यांच्या विकासासाठी राष्ट्रीय काँग्रेस बांधिल आहे. मतांचे विभाजन करण्यासाठी नगरपंचायत निवडणुकांमध्ये काही चेहरे नेतृत्व पुढे आणले जात आहेत ही खेळी वेळीच मतदारांनी ओळखण्याची गरज आहे. नागरिकांनी जबाबदारीने मतांचे विभाजन टाळून मतदान करावे व राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उबाठा पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन माजी गृहराज्यमंत्री व आमदार सतेज पाटील यांनी केले. आजरा येथे आयोजित विविध कोपरा सभांमध्ये ते बोलत होते.
यावेळी बोलताना आमदार पाटील पुढे म्हणाले, सद्यस्थितीचे राजकारण पाहता महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेने कोणाकडे ? पाहायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शिंदे हे पक्ष फोडण्यात आघाडीवर आहेत तर दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा हे मुलांना जमिनी कुठे मिळतील याचा शोध घेत फिरत आहेत. अशावेळी सर्वसामान्यांच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत.
आजरा नगरपंचायत निवडणुकीमध्ये सक्षम व चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न परिवर्तन विकास आघाडीने केला आहे. काँग्रेसला मत म्हणजे जातीवादी शक्तींना बाजूला ठेवणे असा विश्वास आपण देऊ इच्छितो. दुहीचे राजकारण थांबवायचा असेल तर बारा बलुतेदारांना सोबत घेऊन जाणाऱ्या या उमेदवारांसोबत रहा असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजयराव देवणे ,जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, आजरा साखर कारखान्याचे चेअरमन मुकुंद दादा देसाई, कॉ. संपत देसाई, राहुल बजरंग देसाई, सचिन घोरपडे, अभिषेक शिंपी, आलम नायकवडे, संभाजीराव पाटील, संजयभाऊ सावंत, सुमैय्या खेडेकर,उमेश आपटे, रविंद्र भाटले, नौशाद बुड्डेखान, आशिष सोनेखान, युवराज पोवार, अमित खेडेकर, सौ. भैरवी सावंत, प्रभाकर कोरवी यांच्यासह परिवर्तन आघाडीचे सर्व उमेदवार, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंजूरला अजूनही समजावून सांगा त्याला योग्य संधी देऊ…
मंजूर मुजावर हा नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे. त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा योग्य तो सन्मान केला जाईल अजूनही त्याला थांबवा व ही जबाबदारी आलम नाईकवाडे यांनी घ्यावी असेही त्यांनी सांगितले. मंजूरला थांबवा त्याला मोठे करण्याची जबाबदारी माझी असे मी जाहीरपणे सांगतो असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रभागाच्या विकासासाठी बांधील : कलावती कांबळे (काँग्रेस, प्रभाग सात)

आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रभाग सातमध्ये माजी नगरसेवक किरण कांबळे यांनी कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली आहे. आगामी काळात आणखी विकासकामे पूर्णत्वास नेण्यास बांधील असून प्रभाग सात हा विकासाचे रोल मॉडेल तयार करण्याचा मानस काँग्रेसच्या उमेदवार कलावती कांबळे यांनी व्यक्त केला.
कांबळे म्हणाल्या, गतसभागृहातील एकूण नगरसेवकांपैकी किरण कांबळे यांनी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, जयवंतराव शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या प्रभागात सर्वाधिक विकास निधी आणून विविध विकासकामे पूर्ण केली आहेत व विविध प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यांच्या विकास कामावर प्रभागातील नागरिक पूर्णतः समाधानी असल्यानेच माझी उमेदवारी लोकांच्या आग्रहास्तव झालेली आहे. मुळातच कांबळे कुटुंबीय अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. समाजातील विविध उपक्रमांना नेहमीच हातभार लावत असते. आजरा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला व्यापक स्वरूप येण्यात किरण कांबळे यांचे योगदान राहिले आहे. सर्व जाती-धर्मातील लोकांच्या मध्ये किरण कांबळे नेहमीच मिळून मिसळून वागत असतात. प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. यामुळेच प्रभागातील लोकही माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले आहेत.
जिल्हा नियोजन समिती व शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाचा असणारा निधी प्रभाग सात मध्ये आणून कोट्यावधी रुपयांची विकासकामे केली आहेत. प्रभागातील नागरिकांना कचऱ्याचे वर्गीकरण करता यावे यासाठी कचराकुंड्यांचे वाटप देखील करण्यात आले आहे. कोरोना काळात ज्यावेळी जवळची नातेवाईक पाठ फिरवत होते, त्यावेळी किरण कांबळे प्रभागातील नागरिकांच्या मदतीला नेहमीच धावून जात असत. यामुळेच माजी नगरसेवक किरण कांबळे यांनी प्रभाग सात मधील जनतेच्या मनात एक विश्वास निर्माण केला आहे. त्या विश्वासाच्या जोरावर मी निवडणुकीला सामोरे जात आहे. मला खात्री आहे, की प्रभाग सात मधील जनता मला नगरपंचायतीच्या सभागृहात पाठविणार. किरण कांबळे यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या कारकिर्दीत एक अभ्यासू नगरसेवक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे आजरा नगरपंचायतीचे पहिले सभागृह असताना, शहराच्या शाश्वत विकासाचे धोरण ठरवण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. स्वच्छ व मुबलक पाणी, शहराची स्वच्छता, कचरा उठाव, सांडपाणी नियोजन, गटर्स व रस्ते बांधकाम, दिवाबत्ती याबाबत नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी ते नेहमी आग्रही राहिले आहेत. तसेच नवीन नगरपंचायत असल्याने तत्कालीन पालकमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या माध्यमातून नगरपंचायतीसाठी रुग्णवाहिका, अग्निशामक यंत्रणा मिळवण्यासाठी ते आग्रही राहिले होते. प्रभाग सातचा गत पाच वर्षात विकास कामांच्या माध्यमातून चेहरा मोहरा बदलून वेगळी ओळख किरण कांबळे यांनी निर्माण केली आहे. या कालावधीत प्रभागासाठी आणखी काही करण्याची इच्छा वेळेअभावी पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सभागृहात जाऊन प्रभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा मानस आहे. प्रभागात झालेली विकास कामे याची पोहोचपावती प्रभागातील जनता विजयाचे रूपाने पुन्हा एकदा देईल, असा आशावाद कलावती कांबळे यांनी व्यक्त केला.
आजऱ्याच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी परिवर्तन गरजेचे : संजयभाऊ सावंत,
आजऱ्यात परिवर्तन विकास आघाडीची प्रचार फेरी

आजरा शहरातील रस्ते, गटर्स, सांडपाणी व्यवस्था यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. भटकी कुत्री, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांचा अभाव यासह विविध प्रश्न शहरवाशीयांच्या समोर आ वासून उभे राहीले आहेत. त्यामुळे आजरा शहराच्या विकासासाठी परिवर्तन गरजेचे आहे. त्या करीता आजरा परिवर्तन विकास आघाडीच्या पाठीशी शहरवाशीयांनी ठामपणे उभे रहावे. असे आवाहन नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय सावंत यांनी केले. आजरा शहरात परिवर्तन विकास आघाडीच्यावतीने पदयात्रा व रॅली काढण्यात आली. प्रभाग क्रमांक ११ व प्रभाग क्रमांक १२ मध्ये प्रचार फेरी झाली. यावेळी सावंत बोलत होते. या वेळी उमेदवार आरती दीपक हरणे, समीर गुंजाटी यांच्यासह जयवंतराव शिंपी, संपत देसाई, अभिषेक शिंपी, संभाजी पाटील, आलम नाईकवाडे, अशोक तर्डेकर प्रमुख उपस्थित होते.
नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय सावंत म्हणाले, महायुती पक्षाची परिवर्तन विकास आघाडी ही सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी मैदानात उतरली आहे. शहरात अनेक प्रश्न आहेत. ते सुटलेले नाहीत. पायाभूत सेवासुविधांची कामे अपुरी आहेत. सत्ताधारी शहराचा विकास झाल्याचे सांगत आहेत. नगरपंचायत स्थापन होवून आठ वर्ष झाली पण शहराचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. आज हीच मंडळी जनतेच्या दारात मताचा जोगवा मागत आहेत. आशांना खड्यासारखे बाजूला करावे. संजीवनी सावंत, अमित खेडेकर, युवराज पोवार, प्रभाकर कोरवी, रविंद्र भाटले, रविंद्र तळेवाडीकर, अशोक पोवार, विक्रम पटेकर, के. जी. पटेकर, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सत्ताधाऱ्यांकडून विकासाचा केवळ फार्स
सत्ताधारी मंडळीकडून विकासाचा केवळ फार्स केला जात आहे. शहरात कसला विकास झाला हे त्यांनी दाखवून द्यावे. कुचकामी ठेकेदार निवडल्याने पाणी योजना रेंगाळलेली आहे. शहरातील रस्त्यावरून चालणे किंवा गाडी चालवणे कसरतीचे आहे. सांडपाणी, कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे. सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला कंटाळलेल्या जनतेनं परिवर्तन घडवण्याचे ठरवले आहे. आमच्या आघाडीला सत्ता मिळाल्यास शहराचा चेहरा मोहरा बदलणार असल्याची ग्वाही आघाडीचे प्रमुख व नगरसेवकपदाचे उमेदवार अभिषेक शिंपी यांनी दिली.
बाकीव खेडेकर यांचा संजय सावंत यांना पाठींबा
आजरा नगर पंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असलेल्या बाकीव खेडेकर यांनी राष्ट्रीय कॉंग्रेसचे उमेदवार संजय भाऊ सावंत यांना पाठींबा जाहीर केला आहे.
मतविभाजनाचा फटका पक्षाला बसू नये व त्यामुळे अकार्यक्षम सत्तारूढ आघाडी पुन्हा आजरेकरांच्या वाट्याला येऊ नये म्हणून नेते सतेज पाटील यांच्या सूचनेचा आदर म्हणून पाठिंबा दिला असल्याचे खेडेकर यांनी सांगितले. गेली आठ वर्षे मी कॉंग्रेस पक्षाचे काम अत्यंत निष्ठेने करत असून याची दखल घेऊन या निवडणुकीत पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने मला संधी देण्याची आवश्यकता होती. परंतु स्थानिक राजकारणातून मला डावलण्यात आले. या निर्णयामुळे माझ्या कार्यकर्त्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. या सर्वांच्या दबावामुळे मी थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला होता.
सत्तारूढ पक्षाला फायदा होण्यासाठी काही अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचे लक्षात आल्यानंतर मत विभाजन होऊ शकते याची जाणीव झाली. त्यामुळे याचा फटका कॉंग्रेस पक्षाला बसू शकतो.या बरोबरच गेल्या निवडणुकीत सत्तेवर आलेल्या भाजप प्रणीत पार्टीकडून आजऱ्याच्या जनतेची घोर फसवणूक झालेली आहे. एकंदर सर्वच विकासकामामध्ये सत्तारूढ नेतृत्वाने मोठे ढपले पडण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे त्याचा दर्जा शून्य झालेला आहे. कोट्यावधी रुपयांच्या पाईपलाईन योजनेमधून कोट्यावधी रुपयांचे काढलेले कमिशन, नगरसेवकांना कामे वाटून दिल्यामुळे कुंपणानेच शेत खायला देण्याचे झालेलें प्रकार या सगळ्या बाबींवर विचार केला असता सत्तारूढ आघाडी आजऱ्याच्या सत्तेपासून दूर ठेवणे हि काळाची गरज निर्माण झाली आहे.यामळेच संजयभाऊ सावंत यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

