mrityunjaymahanews
कोल्हापूरठळक बातम्या

‘त्या’ बातमीने आजरा तालुकावासीयांची झोप उडाली…….

‘त्या’ बातमीने आजरा तालुकावासियांची झोप उडाली

आजरा तालुक्यामध्ये ‘आदिमानव’ नावाचा प्राणी आला असून या प्राण्याने ऊसतोड कामगारांवर हल्ला केला आहे. यामध्ये एका मुलासह महिलेचा मृत्यू झाल्याची बातमी मंगळवारी दुपारपासून व्हायरल होत होती. ही बातमी फोटोसह इतकी व्हायरल झाली की अक्षरश: आजरा तालुका वासीयांचे धाबे दणाणले. लांडगासदृश्य रक्ताने माखलेले तोंड असणारा प्राणी, त्यासोबत उसाच्या फडामध्ये मृतावस्थेत असणारे बालक व शिर नसलेल्या महिलेचा शेतातील मृतदेहाचे फोटो या बातमीसोबत व्हायरल होत होते. सोबत  व्हिडिओ क्लिपही शेअर केल्या जात होत्या. ही बातमी ठिकठिकाणी व्हायरल झाल्यामुळे ज्यांच्या पर्यंत पोहचली त्यांनी आपल्या आजरा येथील नातेवाईकांसह प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना संपर्क साधून खातरजमा करण्याचा प्रयत्न केला. या बातमीमुळे तालुक्यामध्ये डोंगरकपारीत राहणाऱ्या तालुका वासीयांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्यक्षात मात्र असा कोणताही प्रकार नसल्याचे निदर्शनास आले. या बातमीमुळे आजरा तालुकावासीय मात्र काही कालावधीकरिता निश्चितच हादरून गेले होते.

रोझरी इंग्लिश स्कूलला सर्वतोपरी सहकार्य : ग्राम विकासमंत्री मुश्रीफ

वाटंगीसारख्या खेड्यात सुमारे पन्नास वर्षांपूर्वी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू झाली ही गोष्ट आश्चर्यकारक आहे. या शाळेने ज्ञानाची गंगा समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवली आहे. इंग्रजी शाळा या श्रीमंतांचे शाळा अशी असणारी ओळख या वाटेने शाळेने पुसून काढली आहे. गोरगरिबांची ग्रामीण भागातील मुले या शाळेतून मोठी झाली हे कौतुकास्पद आहे. या शाळेला अनुदानासह अन्य सोयी सुविधा मिळण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

वाटंगी (ता. आजरा) येथे रोझरी इंग्लिश स्कूलच्या सुवर्णमहोत्सवाला प्रारंभ झाला. यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते झाले. या वेळी ते बोलत होते.

आमदार राजेश पाटील, गोव्याच्या सि. वरना प्रमुख उपस्थित होते. सिंधुदुर्ग प्रातांचे ख्रिस्ती धर्मप्रांत डायसिसचे रेव्हरंड बिशप आल्विन बरेटो हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

फादर फेलिक्स लोबो यांनी स्वागत केले. माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ. आर. पी. डिसोझा यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी शाळेच्या वाटचालीचा आढावा घेतला. मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते संस्थापक सदस्यांचा व मान्यवरांचा सत्कार झाला. पाऊलखुणा शाळेच्या या पुस्तिकेचे प्रकाशन झाले. मंत्री मुश्रीफ म्हणाले, “शाळेच्या भौतिक सुविधेसाठी खासदार निधीतून पंचवीस लाख रुपये देण्यासाठी प्रयत्नशील आहे.’ त्यांनी वाटंगीच्या विकासासाठी पंचवीस लाखांचा विकासनिधीसह शाळेला मुश्रीफ फाउंडेशनच्या माध्यमातून एक लाखांची मदत जाहीर केली. यावेळी वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

आमदार पाटील, माजी सभापती अल्बर्ट डिसोझा, रेव्हरंड विशप यांचे भाषण झाले. या वेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, विष्णुपंत केसरकर, सरपंच शिवाजी नांदवडेकर, एम. के. देसाई, बाजार समितीचे अध्यक्ष अभय देसाई, रणजित देसाई, राजू होलम, रणजित देसाई, अनिकेत कवळेकर, विजय देसाई, संभाजी पाटील (हात्तिवडे)शिरीन डिसिल्व्हा, माजी विद्यार्थी, पालक उपस्थित होते. मुख्याध्यापिका सिस्टर अलका रोझारीओ यांनी आभार मानले.

जिल्हा बँकेचे नूतन संचालक देसाई यांचा कर्मचारी वर्गातर्फे सत्कार 


शेतकऱ्यांना सुलभ आणि कमी व्याजाचा कर्ज पुरवठ्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांनी केले. आजरा येथे बँकेच्या कर्मचाऱ्यांच्यावतीने आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. सभापती उदय पवार अद्यक्षस्थानी होते . विभागीय अधिकारी सुनील दिवटे यांच्या हस्ते श्री देसाई यांचा शाल,श्रीफळ व श्रींची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
बँक निरिक्षक बबन पाटील यांनी स्वागत केले. श्री देसाई म्हणाले ,” कै.राजारामबापू देसाई यांनी समाजकारणाचा वसा घालून दिला आहे . तो वसा घेऊन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रिफ यांच्या नेतृत्वाखाली व तालुक्यातील सर्व नेतेमंडळींच्या सहकार्याने विकास संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार आहे . माझा झालेला विजय हा सर्व पक्षीय नेतेमंडळींच्या प्रयत्नातून आणि स्वाभिमानी मतदारांच्या कष्टातून साध्य झाला आहे .
विभागीय अधिकारी दिवटे यांनी तालुक्यातील सर्व शाखांच्या कामकाजाबाबत आढावा यावेळी घेतला. कार्यक्रमाला राजू होलम, वृषाल हुक्केरी,आय ओ,निरिक्षक,शाखाधिकारी व तालुक्यातील सर्व शाखांचे कर्मचारी उपस्थित होते. आभार रामदास आजगेकर यांनी मानले

आकसाने कारवाई नाही …

बँकेतील कर्मचाऱ्यांचे राजकीय हितसंबंध पाहता आपण आकसापोटी कुणालाही जाणीवपूर्वक त्रास देणार नाही . मात्र आपल्याला मदत केली म्हणून विरोधकांनी त्यांच्या संस्थेतील कर्मचाऱ्यांना त्रास दिल्यास गप्प न बसण्याचा इशाराही श्री. देसाई यांनी  दिला.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

BREAKING NEWS…

mrityunjay mahanews

गटविकास अधिकाऱ्यांना काळे फासल्याप्रकरणी विलास जोशिलकर याला तीन महिन्यांची कैद

mrityunjay mahanews

कुडाळनजीक दुचाकी अपघातात कानोली येथील तरुण ठार… एक जखमी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

error: Content is protected !!