mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरगुन्हाठळक बातम्यामहाराष्ट्रराजकीयसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

मगळवार  दि.७ आक्टोंबर २०२५

नगराध्यक्ष पदाचे मार्ग ‘खुले ‘…
इच्छुकांची मांदियाळी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाल्याने नगराध्यक्ष पदाचे अनेकांचे मार्ग खुले झाले आहेत. इच्छुकांची मांदियाळी असल्याने नगराध्यक्ष पदाची निवडणूक मोठ्या चुरशीने होणार हे स्पष्ट झाले आहे.

सद्यस्थितीत नगराध्यक्ष पदासाठी विविध पक्ष व आघाड्यामधून अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी, अबूताहेर तकिलदार, आलम नाईकवाडे, संभाजी पाटील, अभिषेक शिंपी, रशीद पठाण, संजयभाऊ सावंत यांची नावे पुढे येत आहेत.

अद्यापही आघाड्यांचे चित्र स्पष्ट न झाल्याने हे चित्र स्पष्ट झाल्यानंतर यापैकी कोण कोण नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत राहणार हे स्पष्ट होईल. उद्या बुधवारी प्रभाग निहाय सदस्य पदाचे आरक्षण व मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आघाड्यांचे चित्र आठवडाभरात स्पष्ट होईल असे दिसते. अद्याप आजरा नगरपंचायतीशी संबंधित स्थानिक कार्यकर्ते मंडळींच्या वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकाही स्पष्ट व्हायच्या आहेत. या भूमीकाही महत्त्वाच्या ठरणार आहेत. प्राधान्याने यामध्ये मंत्री प्रकाश आबीटकर, मंत्री हसन मुश्रीफ  व आमदार शिवाजीराव पाटील यांच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत.

आता भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी निघणार महामोर्चा…

आजरा (प्रतिनिधी) :

आजरा शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या त्रासाबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती तसेच सर्व पक्षीय नागरिकांच्या वतीने शुक्रवारी महामोर्चा काढण्यात येणार असून तसे निवेदन संबंधित विभागांना देण्यात आले आहे.

शुक्रवार, दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर हे निवेदन ६ ऑक्टोबर २०२५ रोजी नगरपंचायत आजरा येथील मुख्याधिकारी यांना देण्यात आले.

सदर निवेदनात भटक्या कुत्र्यांमुळे शहरातील नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. शाळांमधील लहान मुले, महिला, वृद्ध नागरिक तसेच वाहनधारकांना भटक्या कुत्र्यांमुळे धोका निर्माण होत असून अनेक अपघात आणि चावण्याच्या घटना घडल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या निवेदनाच्या प्रती  तहसीलदार, आजरा व पोलीस निरीक्षक, आजरा यांनाही देण्यात आल्या आहेत.

दरम्यान शिवसेना उ.बा.ठा. गटानेही कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

एसटी आगाराचे वेळापत्रक कोलमडले…
प्रवासी व व्यापारी संघटना आक्रमक : टाळे ठोको चा इशारा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा एसटी आगाराचा कारभार अतिशय गलथान पद्धतीने सुरू असून याचा फटका आजरा तालुक्यातील प्रवासी व्यापारी व शहरात बाजारहाटीसाठी येणाऱ्या ग्राहक वर्गाला बसत आहे. यामुळे आजरा शहरातील व्यापारी दृष्ट्या होणारी आर्थिक उलाढाल कमी झाली आहे.या कारभारात सुधारणा कधी होणार ? असा सवाल उपस्थित करत आजरा व्यापारी असोसिएशनसह प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आगारप्रमुखांना चांगलेच धारेवर धरले.

अनेक गावच्या मुक्कामाच्या फेऱ्या थांबवण्यात आल्या आहेत यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्त येणाऱ्या तालुका वासियांची मोठी गैरसोय होत आहे. मुंबई, पुणे मार्गावर गरज नसताना अनावश्यक फेऱ्या सोडून ग्रामीण भागातील प्रवासी वर्गाचे मोठे हाल केले जात आहेत. या कारभारात तातडीने सुधारणा व्हावी व आगाराचे सन २०१८- १९ मध्ये सुरू असणारे एसटीचे वेळापत्रक पुन्हा एक वेळ अमलात आणून त्या पद्धतीने बस फेऱ्या सुरू कराव्यात अन्यथा उद्या बुधवारी ८ ऑक्टोबर रोजी आजरा बस स्थानक व आजरा एसटी आगार येथे टाळे ठोक आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सचिन इंदुलकर, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिवाकर नलवडे, यशवंत इंजल, विकास सुतार, नाथ देसाई, मंगेश पोतनीस, ज्योतिप्रसाद सावंत, गुंडू परीट, मनोज गुंजाटी, मल्लिकार्जुन तेरणी, विराज बिल्ले आदींनी भाग घेतला.

यावेळी आगार प्रमुख प्रवीण पाटील, प्रसाद जोशी, राजाराम येसादे यांनी एसटी महामंडळाची बाजू मांडली.

शक्य तितक्या लवकर प्रवासी संघटनेच्या मागणीनुसार एसटीचे वेळापत्रक केले जाईल असे आश्वासन देण्यात आले.

हॉटेल वनश्रीचे उद्घाटन

गडहिंग्लज येथील वनश्री या फॅमिली रेस्टॉरंटचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी सुरेश होडगे, संदीप दावणे, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकांनी पाल्याच्या विकासाची विधायक व भव्य स्वप्ने ठेवावी डॉ. बी. एम. हिर्डेकर

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

श्री शिवपुत्र शंकर करंबळी एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट आणि पार्वती–शंकर शैक्षणिक संस्थेच्या विद्यामंदिर व विद्यालयात पालक मेळावा उत्साहात पार पडला.

संस्थेचे अध्यक्ष श्री.बसवराजआण्णा करंबळी, सेक्रेटरी श्री. सुरेश मुरगुडे, संचालक डॉ. व्ही. एम. पाकले, प्राचार्य डॉ. दिनकर घेवडे व श्री. विनायक करंबळी यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वनाथआण्णा करंबळी, प्रमुख पाहुणे म्हणून संजय घोडावत विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. बी. एम. हिर्डेकर उपस्थित होते.

श्री.संदेश रायकर, श्री सचिन कलस, श्री अनिल मोहिते, सौ. हिर्डेकर, श्री.जयंत कुलकर्णी व श्री. रवींद्र खंदकर आदी मान्यवरही उपस्थित होते. डॉ. हिर्डेकर यांनी पालकांना मार्गदर्शन करताना  प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी भव्य आणि विधायक स्वप्ने ठेवावीत. पालक–शिक्षक सुसंवादातूनच शिक्षणातील खरी प्रगती घडते. पार्वती–शंकर ही केवळ शाळा नाही, तर संस्कार केंद्र आहे असे स्पष्ट केले.

प्राचार्य डॉ. दिनकर घेवडे यांनी प्रास्ताविकात पालक–पाल्य सुसंवादाचे महत्त्व अधोरेखित केले आणि संस्थेने राबविलेल्या सर्व उपक्रमांना पालकांनी साथ द्यावी, असे सांगितले.या कार्यक्रमात आदर्श पालक पुरस्कार माध्यमिक विभागासाठी सौ. व श्री विकास पाटील (मांगनूर) व प्राथमिक विभागासाठी सौ. व श्री प्रणवकुमार येजरे (उत्तूर) यांना प्रदान करण्यात आला.तसेच आदर्श विद्यार्थी पुरस्कार माध्यमिक विभागात अथर्व भाटले (इ.१० वी) व प्राथमिक विभागात कु. श्रीया बोटे (इ.७ वी) यांना देण्यात आला.दहावीतील ९०% पेक्षा जास्त गुण मिळविणारे, शिष्यवृत्तीधारक व विशेष गुणवत्ता प्राप्त ४१ विद्यार्थी आणि ६ शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.या मेळाव्यास ४४३ पालकांची उत्साहपूर्ण उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.पी. एन. केसरकर यांनी केले.

कृष्णा व्हॅली स्कूलचे जिल्हास्तरीय स्पर्धेत यश


उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

वडणगे येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत उत्तुर येथील नव कृष्णा व्हॅली स्कूल व ज्युनिअर कॉलेज उत्तुर च्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश मिळविले. १७ वर्षाखालील गटात वीरेन विजय बुजरे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक प्राप्त करत विभागीय स्तरावर धडक मारली. तसेच मुलींच्या १४ वर्षाखालील गटात ज्ञानेश्वरी रामकृष्ण मगदूम हिने प्रथम क्रमांक पटकावत झोनल विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरली. याशिवाय ईशान प्रदीप विश्वास ( १७ वर्षाखालील) यांने द्वितीय, जान्हवी आशिष मिसाळ (१४ वर्षाखालील गटात) हिने द्वितीय क्रमांक पटकावले, यश्वी रावसाहेब भागवत हिने (१४ वर्षाखालील गटात) चतुर्थ क्रमांक पटकावला. सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य रामकृष्ण मगदूम, क्रीडा शिक्षक विशाल वडवळे, कराटे कोच सुखदेव चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.

८ ऑक्टोबर रोजी शेतकरी-शेतमजूर कष्टकरी कामगार-वंचित महिलांची विभागीय महिला परिषद गडहिंग्लज होणार


गडहिंग्लज : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने न्याय, हक्क, अधिकार आणि स्वातंत्र्यासाठी शेतकरी-शेतमजूर कष्टकरी कामगार-वंचित महिलांची विभागीय महिला परिषद गडहिंग्लज येथे सांगली-सातारा-कोल्हापुर-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला सहभागी होणार आहेत.

बुधवार दि.८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ११.०० ते ४.०० पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन संकेश्वर रोड, निलकमल हॉटेल जवळ, गडहिंग्लज, जि. कोल्हापूर येथे ही परिषद होणार आहे.

या परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत डॉ.माया पंडित करणार आहेत.तर परिषदेच्या अध्यक्ष कॉ. उज्वला दळवी (सामाजिक कार्यकर्त्यां) या करणार आहेत.

तसेच कॉ. मरियम ढवळे(राष्ट्रीय सरचिटणीस जनवादी महिला संघटना, दिल्ली);डॉ.अजित नवले (राज्य सचिव अखिल भारतीय किसान सभा);कॉ. उमेश देशमुख (राज्याध्यक्ष-अखिल भारतीय किसान सभा) हे प्रमुख पाहुणे उपस्थितीत राहणार आहेत.

 

संबंधित पोस्ट

आजरा तालुक्यातील आजच्या ठळक घडामोडी

mrityunjay mahanews

निपाणी येथील अपघातात लाकुडवाडीचा तरुण ठार

mrityunjay mahanews

आडवी बाटली उभी होणार…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!