



निपाणी येथे अपघातात आजरा तालुक्यातील लाकुडवाडीचा तरुण ठार
आजरा :विशेष प्रतिनिधी
इचलकरंजी येथून कार्यक्रम आटोपून लाकुडवाडीच्या दिशेने येणाऱ्या आकाश भैरु (संगाण्णा) आर्दाळकर (वय 26 रा.लाकुडवाडी,ता.आजरा) या तरुणाचा पुणे-बंगलोर महामार्गावर निपाणीनजीक झालेल्या अपघातात मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी मुंबई येथून आलेला आकाश एका कार्यक्रमानिमित्त चारचाकी घेऊन इचलकरंजीला गेला होता. तेथून तो दुपारच्या दरम्यान परतत असताना वाटेत लघुशंकेसाठी थांबला. याच दरम्यान समोरून येणाऱ्या एका चार चाकी वाहनाचे टायर फुटून वाहनाने आकाशला जोरदार धडक दिली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले असताना उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आकाश अविवाहित असून मुंबई येथे खाजगी वाहनचालक म्हणून काम करत होता. त्याच्या मृत्यूमुळे लाकुडवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

