सामान्यांच्या विश्वासावरच जिल्हा बँक संचालकपदी : सुधिर देसाई
सामान्यांच्या विश्वासावरच जिल्हा बँकेचा संचालक झालो असून बापूंची परंपरा पुढे चालविणार असल्याचे मत आज येथे श्रमिक मुक्ती दलाने आयोजित केलेल्या सत्काराला उत्तर देतांना सुधीर देसाई यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ. नवनाथ शिंदे यांच्या हस्ते सुधीर देसाई यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की प्रचंड मोठ्या धनशक्ती विरोधात आमच्या पक्षाचे नेते, सर्व कार्यकर्ते आणि सामान्य ठराव धारकांच्या विश्वासामुळे मी जिल्हा बँकेचा संचालक झालो. भविष्यात इथल्या सामान्य शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका मी आपला प्रतिनिधी म्हणून बँकेत नेहमी मांडत राहीन.
यावेळी बोलताना कॉम्रेड संपत देसाई म्हणाले की तरुण वयात जिल्ह्याच्या राजकारणात काम करण्याची संधी सुधीरभाऊंना इथल्या जनतेने दिली आहे. बँकेच्या ज्या सेवायोजना चालू आहेत त्या वेळेवर मिळतीलच पण त्याही पलीकडे जाऊन नवे प्रयोग इथल्या परिसराचा विचार करून बँकेला करावा लागेल त्यासाठी तरुण संचालक म्हणून आपण नेहमी आग्रही राहावे.
डॉ नवनाथ शिंदे यांनी शुभेच्छा देऊन सुधीर देसाई यांनी नेहमी सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेऊन कार्य करावे.
यावेळी दशरथ घुरे, काशीनाथ मोरे, नारायण भडांगे, शांताराम पाटील, पांडुरंग गाडे यांनी मनोगते व्यक्त करून सुधीर देसाई यांचे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.
यावेळी मारुती सावंत, विष्णू मांजरेकर, बाबू येडगे, विजय पाटील, नारायण राणे, गंगाराम ढोकरे, एकनाथ गुंजाळ, महादेव चांदेकर, नारायण सुतार, कृष्णा सावंत, मारुती पाटील यांच्यासह श्रमिक मुक्ती दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते. रणजित कालेकर यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रकाश मोरुस्कर यांनी मानले.

आजरा तालुक्यातील ‘या ‘गावामध्ये ग्रामस्थांच्या चुली पेटल्याच नाहीत

आजरा तालूक्यातील उचंगी प्रकल्पग्रस्तांना चितळे ग्रामपंचायतीची गायरान जमिनी देण्यास चितळे ,भावेवाडी ,जेऊर, धनगरवाडा येथील ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. उचंगी धरणग्रस्तांना चितळे ग्रामपंचायतची गायरान जमीन देण्यात येणार आहे याबाबत कोणतीही चर्चा न झाल्याने याबाबत ग्रुप ग्रामंचायत चितळेमधील जेऊर या गावातील गारयरान जमिन साफ करण्याचे काम चालू आहे हे काम बंद करावे या मागणीसाठी ग्रामस्थानी चुल बंद आंदोलन केले. यावेळी ग्रामस्थांच्या चुली पेटल्याच नाही वेळोवेळी जिल्हाधिकारी तहसीलदार व प्रांताधिका-यांना निवेदन दिले आहे पण कोणतीही दखल घेतलेली नाही किंवा याबाबत बैठकही झालेली नाही. नाइलाजास्तव आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करणे पडत आहे असे आंदोलकांनी स्पष्ट केले.

आंदोलनस्थळी स्त्री पुरुष कार्यकर्ते ठिय्या मारून बसले होते. गायरान जमीन ज्या ठिकाणी वाटप चालू आहेत त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी जाऊन या कामासाठी विरोध दर्शविला. परंतु थोड्या वेळानंतर तहसीलदार यांनी मध्यस्थी केल्या नंतर उद्या( बुधवार) प्रांताधिकारी यांच्याशी बैठक घेऊन पुढिल निर्णय ठरेल असे चितळे ग्रामस्थांनी सांगितले. या आश्वासनानंतर चूल बंद आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी मारुती गुरव संजय सांबरेकर, उदयसिंह सरदेसाई, प्रकाश तर्डेकर, प्रकाश गोरे, आनंद भूतुरले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

जेऊर -कासारकांडगाव रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा… मनसेची मागणी

राष्ट्रीय महामार्ग २०९ जेऊर ते कासारकांडगावला मिळणार इ.जि.मा. क्रमांक १४५ हा रस्ता आजरा व चंदगड तालुक्याला जोडणारा जवळचा रस्ता असून सदरमा रस्त्याची डागडूजी करून रस्त्यामध्ये पडलेले खड्डे डांबरीकरण करून रस्ता दुरुस्त करणे बाबतचे निवेदन दि. ०८/०२/२०२१ रोजी देणेत आलेले होते. सदर निवेदनाच्या अनुषंगाने सदर रस्त्याचे काम हे अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनुसार जेऊर-कासार कांडगाव या सत्याचे खड्डे मुरुमाने ८ दिवसात भरून घेण्यात येत आहेत असे लेखी कळविले होते. त्यानुसार कार्यालयाकडून तात्पुरती मलमपट्टी म्हणून मुरूम टाकून खड्डे भरून घेण्यात आले होते, परंतु वाहनांच्या रहदारीमुळे पुन्हा खड्डे पूर्वीपेक्षा मोठे होऊन रस्ता खड्डेमय झालेला आहे.
तथापी सदर खड्डे भरून रस्ता दुरुस्त करण्याचे कोणतेही कामकाज झालेले नाही निवेदन देऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करून सुद्धा प्रशासनाला जाग आलेली नाही यावरून प्रशासन हे मुजोर प्रशासन म्हणून कामकाज करत असल्याचे दिसत आहे. सदर नवीन रस्त्याचा प्रस्ताव पाठवून १ वर्ष उलटले तरीही तो मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. सदर रस्त्याच्या अनुषंगाने आपल्या कार्यालयाकडून करणेत आलेल्या कौतुकास्पद कामामुळे वाहन धारकांना (बाग रस्ता सोडून )लांबच्या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. सदर रस्त्यावर एखादा अपघात होवून मोठा अनर्थ घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का ?असा प्रश्न पडत आहे. यासाठी संबंधित कार्यालयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवेदन देण्यात आले होते परंतु प्रशासनाकडून याबाबत कोणत्या हालचाली झालेल्या दिसत नाहीत. एखादा मोठा अपघात घडला नंतरच प्रशासनाला जाग येणार का असा प्रश्न निर्माण होत आहे तातडीने या रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

आजरा तालुकावासीयांना दिलासा कोरोना रुग्णात प्रचंड घट.
१० जानेवारीपासून झपाट्याने वाढलेल्या आजरा तालुक्यातील कोरोना रुग्णांमध्ये कमालीची घट झाली असून गेल्या दोन दिवसात एकही कोरोना बाधित रुग्ण सापडलेला नाही. तर केवळ पाच रुग्ण सध्या उपचाराखाली आहेत. तालुकावासीयांच्या दृष्टीने ही समाधानाची बाब समजली जाते.



