mrityunjaymahanews
अन्य

रामतीर्थ यात्रेबाबत आजरेकरांमध्ये उत्सुकता


रामतीर्थ यात्रेबाबत आजरेकरांमध्ये उत्सुकता

आजरा तालुक्यासह जिल्हावासियांचे आकर्षण असणाऱ्या रामतीर्थ यात्रेबाबत आजरेकरांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर रामतीर्थयात्रेबाबत संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे.सध्या शासनाने बऱ्यापैकी निर्बंध शिथिल केले आहेत.ठीक-ठिकाणी राजकीय कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. गोव्यासह कांही राज्यांच्या विधानसभा निवडणुका दणक्यात पार पडल्या. विवाह सोहळे देखील मोठ्या गर्दीत पार पडत आहेत. अशा वेळी यात्रेमध्ये कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण न आणता सदर यात्रेस परवानगी मिळेल अशी अपेक्षा व्यापारीवर्ग बाळगून आहे. पंधरा दिवसावर(१ व २मार्च) यात्रा येऊन ठेपली असल्याने येथे दुकाने थाटणाऱ्या छोट्या-मोठ्या व्यवसायिकामध्ये बाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. यात्रेच्या परवानगी बाबतचा निर्णय लागलीच होणे अपेक्षित आहे. यात्रा होणार असे गृहीत धरून व्यापारी वर्गाने मिठाई सह इतर काही नाशवंत माल तयार केल्यास मोठ्या नुकसानीचा फटका बसण्याची शक्यताही व्यापारी वर्गातून बोलली जाते. सध्या यात्रेचा चेंडू आजरा नगरपंचायत व महसूल विभागाच्या कोर्टात आहे.याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी आजरा वासीयांकडून केली जात आहे.

 

…….

अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न.

जत्रा-यात्रासह आठवडा बाजारावर अनेक कुटुंबे अवलंबून आहेत. अशा कुटुंबांची आर्थिक गणिते गेली दोन वर्षे पूर्णपणे विस्कटली आहेत. प्रशासनाने किमान अशा कुटुंबांचा विचार करून जत्रा यात्रा सुरू कराव्यात अशी मागणीही होत आहे

कै. रमेश टोपले स्मृती राज्यस्तरीय नाटयमहोत्सवाचे  २१ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान आयोजन

आजरा येथील जेष्ठ नाट्य दिग्दर्शक कै. रमेश टोपले यांचे स्मृतीप्रित्यर्थ नवनाट्य मंडळ, आजरा यांचे वतीने जानेवारी २०२२ मध्ये ७ वा राज्यस्तरीय नाट्यमहोत्सव आजरा महाविद्यालय आजरा च्या रंगमंचावर आयोजित करणेत आला होता. या महोत्सवाचे आयोजनासंदर्भात सर्व तयारी पूर्ण झाली होती परंतुुु कोरोना पार्श्वभूमीवर  आयोजित केलेला नाटयमहोत्सव स्थगित करणेत आला होता.

नुकतेच मा. जिल्हाधिकारीसो यांचेकडून कोरोना फैलावू नये यासाठी लावणेत आलेल्या निर्बंधांमध्ये शिथिलता देणेत आली आहे तसेच आजरा व परीसरातील नाटयरसिकांचे आग्रहानुसार सोमवार दि.२१ फेब्रुवारी ते रविवार दि.२७ फेब्रुवारी २०२२ अखेर नाटयमहोत्सवाचे आयोजन करणेत येत आहे. राज्य शासनाच्या व जिल्हा प्रशासनाचे कोव्हीड प्रतिबंधक मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच या वर्षी हा राज्यस्तरीय नाट्य महोत्सव संपन्न होत आहे. या महोत्सवाचे नियोजन करीत असताना अगोदर सहभागी झालेल्या काही नाटयसंस्थांना कोव्हीड मूळे सादरीकरण करणेसाठी अडथळे आले व त्यामूळे त्या संघाना महोत्सवात सहभागी होता आले नाही. तरी देखील नवनाटय मंडळ च्या कमिटीने अत्यंत कमी कालावधीत नामवंत नाट्य संस्थांशी संपर्क साधून दर्जेदार नाटकांची निवड केली आहे व हा महोत्सव साजरा होत आहे. या महोत्सवामध्ये दि. २१ फेब्रुवारी ते रविवार दि.२७ फेब्रुवारी या कालावधीत १) नेटवर्क 24X7, २) संगित तुका म्हणे आता ३) सुलतान रजिया ४) स्टार ५) गगन दमामा बाज्यों, ६) बाकी शून्य व ७ ) मनस्विनी अशी दर्जेदार नाटके सादर होत आहेत. या महोत्सवाकरता विविध संस्था व नाट्यरसिक प्रायोजक व सहप्रायोजक ची जबाबदारी उचलून मोठे आर्थिक सहकार्य करत आहेत व त्यांच्याच पाठबळावर आजरा सारख्या ग्रामिण भागामध्ये हा राज्यस्तरीय नाटयमहोत्सव संपन्न होत आहे. या महोत्सवाच्या आयोजनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. नाटयरसिकांना या दर्जेदार नाटकांच्या मेजवानीचा आस्वाद घेणेकरीता तिकीट विक्री सुरू करणेत आली आहे. तिकीटांसाठी नवनाटय मंडळचे जेष्ठ रंगकर्मी शंकर उर्फ भैय्या टोपले सर यांचेशी त्वरीत संपर्क करावा तसेच या महोत्सवामध्ये बैठकव्यवस्था ही अग्रक्रमाने प्रवेश याप्रमाणे करणेत आली आहे असे नवनाटय मंडळाचे अध्यक्ष अशोकआण्णा चराटी उपाध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे, नाटयमहोत्सव अध्यक्ष चंद्रशेखर फडणीस यांनी नवनाटय मंडळाचे वतीने सांगितले.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्यावतीने पंचायत समिती समोर निदर्शने

आजरा येथील आशा स्वंसेविका व गटप्रवर्तकांचे चार महिण्याचे थकीत वेतन मिळालेच पाहिजे. या मागणीसाठी दि. १४ रोजी आजरा. पंचायत समिती समोर आशा स्वंसेविका व गटप्रवर्तक यांनी निदर्शने करत गट. विकास अधिकारी बी. डी. वाघ यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. व महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर ता. अध्यक्ष मंदाकिनी कोडक, तसेच दीपा बुरूड, रुपाली गुरव, सुनिता पाटील, कॉम्रेड प्रकाश कुंभार सह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. यावेळी आपल्या मागण्या आठ दिवसात महाराष्ट्र शासनाने पुर्ण नाही केलेस मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार असल्याचे यावेळी बोलताना कॉम्रेड प्रकाश कुंभार यांनी सांगितले.

झुंडशाहीने भारतीय संविधानाचा भंग करणाऱ्या सर्व संबंधितावर कायदेशीर कारवाईची मागणी

भारतीय संविधानातील कलम २५ व कलम २९ नुसार जगण्याचा हक्क नाकारणाऱ्या धर्मांध शक्ती
विरोधात भारतीय संविधानानुसार कारवाई झाली पाहिजे, हिजाब घातलेल्या मुलीवर दहशत निर्माण होईल अशा पध्दतीने घोळक्याने गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करुन पुढिल काही दिवस त्यांचे प्रवेश निलंबीत करून पालकांना या बाबत अवगत करावे.
इत्यादी मागण्यांचा समावेश आहे.

यावेळी संग्राम सावंत, अँड. सुदीप कांबळे, समीर खेडेकर, मजीद मुल्ला, संतोष मासोळे, नाजमीन खेडेकर अतुल खरात, तनवीर मुल्ला, ईलान भडगावकर, जुबेर नेसरीकर, तौफिक मुजावर, सुहेब आजरेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार श्री. विनय कोरे यांची आजरा अर्बन बँकेला सदीच्छा भेट

वारणा उद्योग समूहाचे प्रमुख, माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री. विनय कोरे यांची महाराष्ट्रातील अग्रगण्य बँक दि आजरा अर्बन को-ऑप बँक लि., आजरा च्या मुख्य कार्यालय आजरा येथे सदीच्छा भेट दिली. बँकेमध्ये मा. श्री. विनय कोरे यांचा सत्कार आजरा बँकेचे चेअरमन मा.डॉ.अनिल देशपांडे यांनी केला. सदरचे प्रसंगी आजरा बँकेची व अण्णा भाऊ संस्था समूहातील सर्व संस्थांची माहिती अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख श्री. अशोकअण्णा चराटी यांनी दिली. आजऱ्यासारख्या ग्रामीण भागात सर्व संस्था उत्कृष्ठ पद्धतीने चालविल्याबद्दल श्री. अशोकअण्णा चराटी व सर्व संचालकांचे अभिनंदन श्री. विनय कोरे यांनी केले.

यावेळी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मा. ज्योत्स्ना चराटी , जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री. जयवंतराव शिपी , बँकेचे संचालक श्री. सुरेश डांग, श्री प्रकाश वाटवे, डॉ. दीपक सातोसकर, श्री. बसवराज महाळक, श्री आनंदा फडके, श्री. संजय चव्हाण तसेच श्री. विनय सबनिस, श्री. अनिकेत चराटी, श्री. अभिषेक शिंपी, श्री. बसवराज गुंजाटी, श्री. महेश कुरुणकर व लिंगायत समाजातील कार्यकर्ते तसेच आजऱ्यातील मान्यवर नागरिक उपस्थित होते.

भादवण येथे माहेरवाशीनीचे पडलेले मंगळसुत्र  यांच्या विनीत पाटील या शालेय विद्यार्थ्यांकडून प्रामाणिकपणे परत

भादवण येथे श्री. महालक्ष्मी यात्रेनिमित्य मुंबई वरून आलेली माहेरवाशिन सौ. ज्योती केसरकर या सकाळी चालण्यासाठी भादवण ते भादवण फाटा या ठिकाणी गेल्या असता गळ्यातील दिड तोळ्याचे मंगळसुत्र तुटून पडले होते. सदर घटनेबाबत दोन दिवसांनी गावचे सरपंच संजय पाटील यांच्याशी त्यांनी संपर्क करून विनंती केली कि, ग्रामपंचायत भादवणच्या संस्कारवाहिनी  वरून मंगळसुत्र हरवले बाबत सादविण्यास सांगितले तसेच गावातील सर्व वॉटसअपग्रुपवर माहीती देऊन दंवडी देणे बाबत विनंती केली.तसे सरपंच संजय पाटील यांनी लागलीच सदर बाबतची माहिती वॉटसप ग्रुपवर दिली व  दवंडी देण्यास सांगुन ग्रामपंचायत संस्कारवाहिनी वरून माहिती दिली. सदरची माहीती मिळताच पाटिलवाडी येथील जेष्ठ नागरीक श्री महादेव गोविंद पाटील यांनी सरपंच संजय पाटील यांना सांगीतले की सदरची वस्तू  नातू कुमार विनित सुनिल पाटील याला शाळेत जातेवेळी मिळाली आहे.त्याने माझेकडे दिली आहे त्यानंतर सरपंच संजय पाटील यांनी सदर वस्तुची पाहणी करून सौ केसरकर व त्यांचे वडिल श्री. चंद्रकांत आजगेकर यांना बोलवून घेतले पडताळणी केली असता त्यांचेच मंगळसुत्र होते याची खात्री झाले नंतर शिवसेना शाखा कार्यालयात सदर मंगळसुत्र त्यांचेकडे सपुर्द करणेत आले काहि महिण्यापुर्वी करबंळी ता गडहिंग्लज येथील आजी सैनिक पन्हाळकर याचे सोन्याचं ब्रेसलेट भादवण येथे पडले होते ते विश्वास सदाशिव पाटील यांनी प्रामाणिकपणे परत केले त्यामुळे केरबा पाटील, महादेव पाटील, सदाशिव पाटील,दादु पाटील यांच्या घराण्यातील प्रामाणिकपणा बद्दल भादवण गावात सर्वत्र चर्चा आहे

युगंधरा सावंत जीडीसी अँड ए परीक्षेत जिल्ह्यात प्रथम

 

युगंधरा ज्योतीप्रसाद सावंत-येडूरकर यांनी सहकार विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या जीडीसी अँड ए या परीक्षेत प्रथम श्रेणी सह जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. ‘मृत्युंजय महा न्यूज ‘चे मुख्य संपादक ज्योतीप्रसाद सावंत यांच्या त्या जेष्ठ कन्या असून तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

……..

गुरव बंधुकडुन साळगाव शाळेस पुस्तक भेट

कृषी अधिकारी श्री सुरेश गुरव व पुणे स्थाईक असणारे मुरलीधर व रामचंद्र गुरव यांनी वडिल कै तुकाराम व आई कै. हिराबाई यांचे स्मरणार्थ साळगाव शाळेस पंधरा हजार रु.ची पुस्तके भेट दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ मंजिरी यमगेकर ह्या होत्या. सुरवातीला गुरव बंंधुचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर संजय मोहिते यांनी शालेय समृध्द ग्रंथालय योजनेअंतर्गत शाळेस विविध संस्था व देणगीदारांनी दिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन व पुस्तकांची माहिती दिली. गुरव बंधुनी दिलेल्या पुस्तकांचे फिरते वाचनालय उपक्रम राबवावा व गावातील युवकांना त्याचा लाभ व्हावा अशी अपेक्षा गुरव बंधुनी व्यक्त केली सौ यमगेकर यांनी शाळेने राबवलेल्या वाढदिवस पुस्तक भेट , अवांतर वाचन , समुह वाचन , वाचन प्रेरणा दिना निमित्य राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली व गुरव बंधुनी वाचन चळवळीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल शाळेच्या वतीने आभार मानले .  यावेळी निवृती मिटके सत्यवान सोन्ने व विद्यार्थी उपस्थित होते. संजय मोहिते यांनी आभार मानले.

जिल्हा स्तरीय मुल्यांकनासाठी मलिग्रे प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी

प्राथमिक आरोग्य केंद्राने स्वच्छ न सर्वांग सुंदर दवाखाना ( नाविन्यपूर्ण योजना सन २०२१.२०२२) यामध्ये २०२०.२०२१ चे कामावर आधारीत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकवला असुन या केंद्राची जिल्हास्तरीय स्पर्धासाठी निवड झाली. या पार्श्वभुमीवर मुल्यांकन कमिटीच्या सदस्यांनी या केंद्राला नुकतीच भेट देउन योजनेच्या निकषानुसार विविध बाबींची पाहणी केली.

यावेळी जिल्हा आरोग्य सभापती वंदना जाधव, जि. प सदस्या मा. सुनिता रेडेकर , जिल्हा आरोग्य अधिकारी वाय. आर. साळे, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. फारुख देसाई, जिल्हा आयुष अधिकारी सुषांत रेवढेकर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वाय एस सोनवणे, प्रासिध्दी अधिकारी एकनाथ जोशी, विस्तार अधिकारी सुनिल जाधव, व आरोग्य कर्मचारी स्टाफ उपस्थित होते.

 

 

संबंधित पोस्ट

चंद्रकांत सांबरेकर यांचे अपघाती निधन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

एक वेळ घरी बसेन पण भाजपात जाणार नाही…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

डॉ. सोमशेट्टी यांचे निधन

mrityunjay mahanews
error: Content is protected !!