


पालकमंत्री मुश्रीफ यांच्यासह आमदार सतेज पाटील आज तालुक्यात

आजरा : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाल्याने महायुतीसह महाविकास आघाडी दक्ष झाली असून या पार्श्वभूमीवर विविध विकास कामाचा शुभारंभ व उद्घाटनाच्या निमित्याने पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ हे तर संविधान बचाव रॅली च्या निमित्याने माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील हे आजरा तालुक्यात येत असून लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना चार्ज करणे हा एकमेव उद्देश या कार्यक्रमांचा असल्याचे स्पष्ट होत आहे. कांही दिवसापूर्वी विविध निवडणुकांना एकत्रित सामोरे गेलेल्या कार्यकर्त्यांची मात्र यामुळे चांगलीच गोची होत आहे विशेषत: या कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची दोन सरळ गटात विभागणी झाल्याचे पहावयास मिळत आहे.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमेश आपटे यांनी तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाला तालुक्यात मरगळ आली आहे हे नाकारता येत नाही. याचा परिणाम म्हणून कार्यकर्ते सोयीच्या भूमिका घेऊ लागले आहेत. याचा फटका आगामी नगरपंचायतीसह जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये बसू शकतो याची जाणीव झाल्याने डॅमेज कंट्रोल करण्याची जबाबदारी आमदार पाटील यांच्यावर आली आहे. लोकसभेसाठी महाविकास आघाडीतून काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याने कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची अवस्थाही फारशी वेगळी नाही. या गटाची जबाबदारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आहे. कांही दिवसापूर्वी तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली परंतु अद्याप काही मंडळी शरद पवार यांचे नेतृत्व मानून काम करत असल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये हे दोन्ही गट वेगवेगळ्या दिशेला असणार आहेत. वरकरणी दोन्ही राष्ट्रवादी एकच असे दिसत असले तरी लोकसभा निवडणुकीत मात्र सवतासुभा मांडल्याशिवाय पर्याय राहणार नाही.
या सर्व बाबी विचारात घेतल्यास जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या दोन मातब्बर मंडळींच्या दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांना कोण कोण हजेरी लावणार? (विशेषतः राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ) यावरून लोकसभेतील आजरा तालुक्याचे राजकीय चित्र स्पष्ट होणार हे निश्चित.
भाजपाचा उद्या मेळावा
लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे उतरण्याची शक्यता निर्माण झाल्याने भाजपानेही सावध भूमिका घेत तातडीने आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा उद्या मंगळवारी दुपारी अडीच वाजता येथील अण्णाभाऊ सभागृहात आयोजित केला आहे. या मेळाव्यास खासदार धनंजय महाडिक माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, समरजीतसिंह घाटगे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, शिवाजीराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अशोकअण्णा चराटी, तालुकाध्यक्ष अनिरुद्ध केसरकर यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

आजरा कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता
तालुक्यात अद्यापही ऊस शिल्लक

प्रतिनिधी : आजरा
वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याच्या यावर्षीच्या २०२३-२४ च्या गळीत हंगामाची सांगता झाली यावर्षीच्या गळीत हंगामामध्ये कारखान्याने १११ दिवसात २ लाख ६४ हजार ४१३ मे. टन ऊसाचे गाळप केले असून ३ लाख २८ हजार ४५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून सरासरी १२.४२ इतका उतारा मिळाला असल्याचे चेअरमन वसंतराव धुरे यांनी दिली. कारखान्याचे संचालक दिपक देसाई व त्यांच्या पत्नी सुमित्रा देसाई यांच्या हस्ते पूजा पार पडली.
हंगाम २०२३-२४ मध्ये कारखान्याने किमान ३ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले होते, परंतू बीड व स्थानिक तोडणी वाहतुक यंत्रणेने फसवणुक केल्यामुळे व संकेश्वर-बांदा महामार्गाच्या कामामुळे हजर झालेल्या व नव्याने जुळणी करून कामावर आणलेली यंत्रणाही कामावर टिकली नसलेने कारखान्याने गाळपाचे ठेवलेले उद्दिष्ट पूर्ण झाले नाही, कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँकेचे अध्यक्ष मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेच्या सहकार्याने कारखान्याकडे हंगाम अखेर गाळपास आलेल्या संपूर्ण ऊसाची बिले विनाकपात एक रकमी तसेच तोडणी वाहतुकीची बिले देखील नियमीतपणे अदा केली जात आहेत.
कारखाना कामगारांनी कारखाना पूर्ण क्षमतेने चालावा यासाठी चांगल्या प्रकारे काम केले तसेच कोल्हापूर जिल्हा बँकेने कारखान्यास निधी उपलब्ध करून दिला. सदर निधीचा काटकसरीने व योग्य वापर करीत कारखाना व्यवस्थापनाने कारखाना सुरु ठेवला. आजरा साखर कारखाना कर्जातुन बाहेर काढण्यासाठी केवळ साखर उत्पादनावर अवलंबून न राहता प्रस्तावित को-जन व डिस्टलरी प्रकल्पाची उभारणी करण्याचा संचालक मंडळाचा मानस असुन त्यादृष्टीने कार्यवाही सुरू असल्याचे चेअरमन धुरे यांनी सांगितले,
यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन मधुकर देसाई, जिल्हा बँकेचे संचालक तथा बैंक प्रतिनिधी सुधीर देसाई यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.
शिल्लक उसाचा प्रश्न कायम?
नेहमीप्रमाणे यावेळीही तोडणी-ओढणी यंत्रणेने दगा दिल्याने कारखान्याच्या गाळपावर मर्यादा आल्या. तालुक्यातील काही ऊस उत्पादकांचा ऊस अद्याप तुटलेला नाही. कारखाना बंद झाल्याने आता इतर कारखान्यांचे उंबरे झिजवण्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय राहिला नाही.


चित्रानगर येथे सावित्रीबाई फुले स्मृती दिन साजरा

आजरा : प्रतिनिधी
चित्रानगर ता. आजरा येथे आनंदी महिला संविधान गटाच्यावतीने सावित्रीबाई फुले स्मृती दिन साजरा करण्यात आला.यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .
यावेळी सामाजीक कार्यकर्त्या मनिषा गुरव म्हणाल्या फुले यांच्यामूळे सर्व समाजातील महिलांना शिक्षणाची दारे खुली झाली आहेत.महिलांना संविधानामूळे हक्क व अधिकार मिळाले. पुरूषासोबत काम करण्याची संधी मिळाली.कृष्णा सावंत यांनी संविधानाबाबत मार्गदर्शन केले.महिलांनी संगीत खुर्ची व गौरी गितांचा उपक्रम राबविला.यावेळी सावंत यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
याप्रसंगी तानाजी मिसाळ,पुजा मिसाळ,नंदा मिसाळ,कोमल मिसाळ,कल्पना लाड,सुवर्णा लाड,रेखा मिसाळ,प्रेमा शिवणगेकर,उज्वला लाड आदी उपस्थित होते.


गजरगाव येथे उद्या बैलगाडा पळवण्याचा स्पर्धा

आजरा: प्रतिनिधी
महाशिवरात्रीनिमित्त उद्या मंगळवार दिनांक १२ रोजी सकाळी आठ वाजता मराठा तरुण मंडळ, गजरगाव यांच्या वतीने विना लाठीकाठी एक मिनिटात बैलगाडा पळवण्याचा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेतील प्रथम १६ क्रमांकाच्या विजेत्यांना रोख २१००१/- पासून ते २००१/- पर्यंत रकमेसह इतर बक्षिसे देण्यात येणार असल्याचे संयोजकांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.



