
आडवी बाटली उभी करणारच…
बिअर बार परवान्यासाठी खटपटी सुरू

संकेश्वर- बांदा या नवीन राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झाल्यापासून अनेकांच्या डोक्यामध्ये रस्त्यालगत असणाऱ्या जागांवर बियर बार व परमिट रूम सुरू करण्याची कल्पना घोंगावू लागली आहे. परिणामी बाटली आडवी करून पंधरा वर्षे झालेल्या एका ग्रामपंचायतीकडे चक्क ना हरकत प्रमाणपत्रासाठी संबंधित मंडळी खेटे मारू लागली आहेत. आता मोठ्या कष्टाने आडवी झालेली बाटली जर उभीच करणार असा निर्धार या मंडळींनी केला असेल तर त्याला काय म्हणावे…?
त्याचे असे झाले…
पंधरा वर्षापूर्वी बाटली आडवी करण्याची चळवळ चांगलीच बहरात आली होती. याचा परिणाम म्हणून आजरा तालुक्यातील भादवणपासून सुलगावपर्यंत अनेक गावात दारूबंदी झाली.या मुद्द्यावर अनेक पारितोषिकेही ग्रामपंचायतींनी मिळवली.या निर्णयाने परमिट रूम काढू इच्छिणाऱ्याची चांगलीच अडचण झाली आहे.
पंधरा किलोमीटर अंतरावर एकही बियर बार नसल्याने बियर बार सुरू करण्याचे अनेकांचे स्वप्न आहे.महामार्गाचे काम सुरू झाल्यापासून तर या स्वप्नाला मूर्त स्वरूप देण्यासाठी अनेकजण धडपडत आहेत.
यामध्ये राजकीय मंडळी शासकीय अधिकारी, भागातील आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य,पुढारी आदींचा समावेश असल्याचे पुढे येत आहे. अर्थातच बाटली आडवी झाल्यामुळे तळीरामांची होणारी गैरसोय परमिट रूम/ बियर बार अभावी गावांच्या थांबलेला विकास (?) ग्रामपंचायत घटलेले उत्पन्न हे सर्वच मुद्दे आता पुन्हा एकदा अधोरेखित होऊ लागले आहेत. याकरता आता परमिट रूम, बियर बार शिवाय दुसरा पर्यायच नाही असे देखील सांगितले जाऊ लागले आहे.
एकंदर मोठ्या हौसेने आडवी केलेली बाटली आता पुन्हा उभी राहण्यासाठी धडपडू लागली आहे हे नक्की.

बिबट्याच्या हल्ल्यात धनगरवाड्यावरील गाय व वासराचा मृत्यू.
हरपवडे पेरणोली धनगरवाड्यावरील विशाल धोंडिबा गावडे हे आपल्या जनावरांना चरण्यासाठी घेऊन गेले असता बिबट्याने गायीवर हल्ला केला. या हल्ल्यात गाय जागीच ठार झाली. त्यानंतर परत त्याचं बिबट्याने वासरावर हल्ला करून ठार मारले. याबाबत वनविभागाला कळविले असता त्यांनी नुकसानभरपाई देता येणार नाही असे सांगितल्याने या गरीब कुटुंबाचे खुपच नुकसान होणार आहे असा आरोप श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने करण्यात आला आहे. याबाबत वनविभागाने तातडीने पंचनामे करून गाय व वासराची किंमत विशाल गावडे यांच्या कुटुंबाना ताबडतोब द्यावी अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने करण्यात आली आहे.

व्यंकटराव महाविद्यालय सुरु करण्यास शासनाची अंतिम मान्यता

येत्या काळात पदव्युत्तर शिक्षण, व्यवसायिक शिक्षण तसेच तांत्रिक, वैद्येकिय, कृषी व कायदे शिक्षण सुरु करण्याबरोबर ग्रामिण मुलांना स्पर्धा परिक्षा तसेच विविध प्रवेश परिक्षांचे मार्गदर्शन केंद्र सुरु करण्याचा मानस असून व्यंकटराव महाविद्यालय सुरु करण्यास शासनाची अंतिम मान्यता मिळाली असल्याची माहिती आजरा महाल मंडळाचे संचालक अभिषेक शिंपी यांनी दिली.
व्यंकटराव प्राथमिक विद्या मंदिर, व्यंकटराव हायस्कूल,आजरा, भादवण, सिरसंगी व देवर्डे ,व्यंकटराव ज्युनियर कॅालेज पाठोपाठ आता व्यंकटराव महाविद्यालय सुरु होत आहे.
संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या पाठपुराव्यामुळे कला,वाणिज्य व विज्ञान विभागातील पदवी शिक्षण घेण्याची सोय महाविद्यालयात होणार आहे.
या सर्व प्रगती मध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केलेल्या सर्व लोकांचे आभारही शिंपी यांनी मानले.

निधन वार्ता
राजाराम पाटील

सरोळी ( ता. आजरा ) येथील प्रतिष्ठित नागरिक व सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजाराम दत्तात्रय तथा आर. डी. पाटील गुरुजी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले चुना नातवंडे असा परिवार आहे. आजरा साखर कारखान्याचे कर्मचारी अनिलकुमार पाटील, यांच्यासह प्रकाश पाटील व किरणकुमार पाटील यांचे ते वडील होत.


