
दुचाकीस्वारास मारहाण करून लुटण्याचा प्रयत्न

आजरा:प्रतिनिधी
आठ दिवसांपूर्वी शृंगारवाडी ते उचंगी दरम्यान दुचाकीस्वाराला लुटण्याच्या प्रकाराचीघटना ताजी असतानाच पुन्हा एक वेळ मडीलगे येथील राकेश पांडुरंग पोवार या दुचाकीस्वारास आजरा- गडहिंग्लज मार्गावरील म्हसोबा देवस्थान समोर अंधाराचा फायदा घेत लुटण्याचा प्रयत्न झाला यामध्ये त्याला मारहाणही करण्यात आली.
आजरा तालुक्यातील श्रुंगारवाडी ते उचंगी रस्त्यावर राजेंद्र अनिल सावंत या व्यक्तीला लुटण्याचा प्रयत्न झाला होता. याच प्रकाराची पुनरावृत्ती शनिवारी रात्री झाली. अडकुर येथे कामाला असलेले पवार हे रात्री उशिरा मधील गीते परतत असताना त्यांची दुचाकी सुलगाव फाट्याच्या पुढील बाजूस म्हसोबा देवस्थानच्या समोर आली असताना अचानक एक चार चाकी त्यांच्या आडवी लावून त्यांना गाडीतून उतरलेल्या चौघांकडून अडवण्यात आले. त्यांना यावेळी मारहाण करून त्यांच्याकडून असणारी किरकोळ रोकड संबंधितांनी काढून घेतली यावेळी पोवार व या चौघांमध्ये बरीच धक्काबुक्की झाली सुदैवाने पोवार यांच्याकडे फारशी रोकड नसल्याने मिळेल ती रक्कम हाती घेऊन चौघांनी आलेल्या वाहनातून गडहिंग्लजच्या दिशेने पोबारा केला.
रात्रीचा दुचाकीवरून प्रवास… सावधानतेची गरज
सध्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यामुळे अत्यंत कमी वेगात दुचाकी चालवण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे दुचाकीस्वारांना सहजपणे अडवून त्यांच्याबाबत असे प्रकार घडत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून रात्रीच्या वेळी प्रवास करताना जवळ दागिने, रोख रक्कम किंवा किमती मोबाईल बाळगताना दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.


मंत्री मुश्रीफ यांनी आरोग्यसेवा घराघरापर्यंत पोहोचविली : नविद मुश्रीफ

उत्तूर : प्रतिनिधी
मंत्री हसन मुश्रीफ यांनी आरोग्यसेवा घराघरापर्यंत पोहोचविली, असे प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ यांनी केले. उत्तूर मध्ये आयोजित दिव्यांग मेळाव्यात ते बोलत होते.
या सर्व दिव्यांग नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार कृत्रिम जयपुर हात -पाय, काठी, वॉकर, व्हीलचेअर, तीनचाकी सायकल, कमी ऐकू येणाऱ्यांसाठी श्रवणयंत्रे दिली जाणार आहेत. कागल, मुरगुड पाठोपाठ गडहिंग्लज, उत्तुरमध्येही दिव्यांग आरोग्य मेळावे घेण्यात आले. तसेच; डोळ्याशी संबंधित तक्रारींच्या रुग्णांवर मोतीबिंदू, नेत्रचिकित्सा व सर्व प्रकारच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया श्री. टेके आय क्लीनिक अँड साईट सी केअरमध्ये केल्या जाणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने या मेळाव्यांचे आयोजन केले होते.
नवीद मुश्रीफ म्हणाले, ना. मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने निरंतरपणे सेवाभावी कार्य सुरूच असते. विशेषता; रुग्णसेवा आणि दिव्यांगसेवा या क्षेत्रामध्ये फाउंडेशनचे कार्य उल्लेखनीय आहे. कार्यकर्त्यांनी विविध प्रकारच्या रुग्णांसाठीचे लाभ त्यांच्या घराघरापर्यंत पोहोचवावेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची खरी ओळख ही “महाडॉक्टर” म्हणून आहे. गेली ३५ -४० वर्षे गोरगरिबांची आणि विशेषता: रुग्णांची सेवा अव्याहतपणे मोठ्या तळमळीने करीत आहेत.
यावेळी वसंतराव धुरे, काशिनाथ तेली, दिपकराव देसाई, शिरीष देसाई, मारुतीराव घोरपडे, रामदास आजगेकर, महादेव पाटील, अनिकेत कवळेकर, मिलिंद कोळेकर, युवराज येसणे, आनंदा घाटगे, सुनील देसाई गणपतराव सांगले, शिवाजी गुरव, बी टी जाधव,सौ. समीक्षा देसाई, बबन पाटील, सुरेश खोत, प्रल्हाद सावंत,टी एच ओ डॉ.यशवंत सोनवणे, डॉ सोहेल जमादार, सीपीआरचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, सुनिल रावण, रमाकांत धस आदी उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक संभाजी तांबेकर यांनी केले. सूत्रसंचालन सुनिल दिवटे यांनी केले. आभार सुधीर सावंत यांनी मानले.


आरदाळची भैरीदेवी यात्रा सुरू

उत्तूर:प्रतिनिधी
आरदाळ ता.आजरा येथील श्री भैरी देवी यात्रेचे इरडे काल रविवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी पडले असून आजपासून यात्रेला सुरुवात होत आहे.
आज सोमवारी थळ यात्रा, उद्या मंगळवार दिनांक २७ रोजी समराधना, बुधवार दिनांक २८ रोजी डुक्कर जत्रा, गुरुवार दिनांक २९ रोजी जागर याच दिवशी बळीचे बकरे, सासनकाठी मानक-यांची बळीचे बकरे, दंडवत घालणे यासारखे विविध कार्यक्रम होणार आहेत.
शुक्रवार दिनांक १ मार्च रोजी ठीक-ठिकाणी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त शनिवार दिनांक २ मार्च रोजी सकाळी विना लाठी-काठी बैलगाडी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी घोडा गाडी शर्यत आयोजित करण्यात आली असून कबड्डी स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक १ मार्च रोजी मुंबईकर ग्रामस्थ मंडळाच्या वतीने भैरीदेवी माळावर ‘झाल्या तिन्ही सांजा’ हा लावणीचा कार्यक्रम होणार आहे, तर शनिवार दिनांक २ मार्च रोजी संघर्ष व्यायाम मंडळाच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.


‘गर्जना’कडून गवसे हायस्कूलला प्रोजेक्टर प्रदान

आजरा: प्रतिनिधी
बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूल
गवसे येथे गर्जना प्रतिष्ठान वतीने घेण्यात आलेल्या करियर मार्गदर्शन कार्यक्रमाचा वेळी शाळेला ई लर्निग करीता प्रोजेक्टर गरज असल्याचे समजले यासाठी आवश्यक असणारा प्रोजेक्टर आज “गर्जना प्रतिष्ठान” चा वतीने गर्जना प्रतिष्ठान,शाखा गवसे प्रमुख श्री.सुयश लाड यांच्या हस्ते आजरा जनता एज्युकेशन सोसायटी चे संचालक मा.रमेश आण्णा कुरुणकर, येसणे सर तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.चंद्रकांत घुणे यांचे कडे सुपुर्द करण्यात आला.
शाळेला प्रोजेक्टर भेट दिल्याबद्दल मुख्याध्यापक यांच्याकडून गर्जना प्रतिष्ठानचे आभार व्यक्त करण्यात आले.


भोवताल….

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली- चौकुळ जंगलात काळा बिबट्या( ब्लॅक पँथर) चे दर्शन झाले आहे. सुमारे आठ वर्षापूर्वी आजरा येथील जंगलामध्ये वनविभागाच्या कॅमे-यात ब्लॅक पॅंथर बंदिस्त झाला होता. आता आंबोली येथे दर्शन दिलेल्या ब्लॅक पॅंथरमुळे पुन्हा एकदा आजरा तालुक्याच्या पश्चिम भागासह आंबोलीतील जैवविविधता ठळक झाली आहे.

निवड…

आनंदा आप्पा घंटे यांची मनसे आजरा तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. घंटे हे मनसेचे निष्ठावंत कार्यकर्ते समजले जातात. अनेक आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.




