mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


रविवारी उद्घाटन… सोमवार पासून कुलूप…

सुनियोजित प्रकार असल्याची चर्चा

                 ज्योतिप्रसाद सावंत

        गेली पाच वर्षे रेंगाळलेल्या ‘ मृत्युंजय ‘कार शिवाजीराव सावंत स्मृती दालनाचे उद्घाटन गेल्या रविवारी समारंभपूर्वक करण्यात आले. काम पाच वर्षे रेंगाळले होते परंतु उद्घाटनाची केवळ चार दिवसातच गडबड करण्यात आली. उद्घाटनादिवशी कार्यक्रमानंतर लागलेले कुलूप आजही तसेच आहे. ढिगभर नेतेमंडळींची नावे असणारी कोनशिला तर इमारतीच्या आवारात धुळखात तशीच उभी आहे. कांही मंडळींची नावे त्यावर नसल्यामुळे कदाचित ती भिंतीवर अद्याप गेलेली नाही आणि जाईल असे वाटतही नाही. दालन उघडे ठेवायचे नसेल तर मग कशासाठी उद्घाटनाची गडबड ? असा प्रश्न आता पुन्हा एकदा साहजिकच पडू लागला आहे. दालन मुद्दामहून बंद ठेवून ते एखाद्या संस्थेला दिल्याशिवाय पर्याय नाही हे तर संबंधितांना सुचवायचे नाही ना ? अशी शंका आता येऊ लागली आहे.एकंदर प्रकार पाहता मृत्युंजयकारांच्या नावावर सुरू असलेला आणखी एक प्रयत्न फसल्याचे स्पष्ट होत आहे.

     गेल्या रविवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ व मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते व स्थानिक आमदार प्रकाश आबीटकर आणि आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. मुळातच पत्रिकेत जिल्हाभरातील आमदार, खासदार, नेते अशी ढीगभर नावे घालण्यामागचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. कारण निमंत्रण पत्रिकेत नावे असणाऱ्या ९० टक्के मंडळींनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती.

      त्यातूनही जिल्हा परिषद व स्थानिक पंचायत समितीच्या कारभा-यांनी हा कार्यक्रम पार पाडला. उद्घाटनादिवशीच अनेकांनी या दालनाच्या देखभालीचा प्रश्न उपस्थित केला होता. उपस्थित प्रमुख पाहुणे मंडळींनी याकरीता कोणताही भरीव निधी देण्यासंदर्भातील विधान करण्याचे सोयीस्करपणे टाळले.

      वृत्तपत्रातील व सोशल मीडियावरील बातम्या पाहून तालुक्यातील अनेक जण गेले आठवडाभर हे दालन पाहण्याकरता दालन परिसरात भेट देताना दिसत होते. परंतु कुलूप बंद अवस्थेतील हे दालन उघडेच नसल्याने त्यांचा भ्रमनिरास होताना दिसत होता.

      मुळातच ७० लाख रुपये खर्चून तयार करण्यात आलेले हे दालन भविष्यात उघडे राहील का? असा प्रश्न यापूर्वीचा अनुभव घेतल्यास  पडणे स्वाभाविक आहे.

अनेक प्रश्न…

१. दालनाची उभारणी करण्याचे काम ज्या ठेकेदाराने घेतली होती त्या ठेकेदाराने नंतर हे काम अर्धवट का सोडले?

२. दालनासाठी ७० लाख रुपये खर्च झाला असे सांगण्यात येत असले तरी या दालनाला नेमका खर्च किती व कसा आला?

३. हे दालन एखादी अभ्यासिका करून वापरण्यासाठी सेवाभावी संस्था, शैक्षणिक संस्था अथवा सहकारी संस्थेला द्यावयाचे असल्यास याची प्रक्रिया काय आहे.

४. ‘मृत्युंजय’ कार प्रेमींना व आजरेकरांना विश्वासात घेऊनच यापुढे दालनासंदर्भातील निर्णय घ्यावा अशी मागणी आता होत आहे.


कोवाडे व आजऱ्यानजीक आगीत नुकसान

                     आजरा: प्रतिनिधी

       आजरा तालुक्यात आग लागण्याचे प्रकार वाढले आहे. आगीमध्ये ऊस, काजूच्या बागा यासह वनसंपदेची मोठी हानी होत आहे. कोवाडे (ता. आजरा) येथे लागलेल्या आगीमध्ये पंधरा एकरातील ऊस जळाला. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर आजरा औद्योगिक वसाहतीजवळील पडीक जमिनीत लागलेल्या आगीत गवत व वनसंपदेचे नुकसान झाले आहे.

     कोवाडे येथे ऊसाचा फड पेटवतांना आग लागल्याचे ग्रामस्थ सांगतात. यामध्ये पंधरा एकरातील ऊस जळून गेला आहे. रंगराव देसाई, कुमार बाटे, सुनील डोंगरे, सतीश डोंगरे, अनिल डोंगरे, बाबूराव डोंगरे, रामा बाटे यासह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

     आजरा औद्योगिक वसाहतीजवळ (एम.आय. डी. सी.) लागलेल्या आगीत पंधरा-वीस एकराचा परिसर जळून गेला आहे. यामध्ये वनसंपदेचे नुकसान झाले आहे. सायंकाळ पर्यंत आगीच्या ज्वाळा आजरा आंबोली रस्त्यावर दिसून येत होत्या. रात्री उशिरापर्यंत ही आग सुरूच होती.

मोरांचा कळप सैरभैर

      आग लागल्याने एका झुडपात बसलेला मोरांचा कळप सैरभैर झाला. तो आगीच्या ज्वाळांनी वेढला गेला होता. मोरांनी आकाशात भरारी घेत आगीतून सुटका करून घेतली. पण त्यांचा अधिवास नष्ट झाला.

आगीचे सत्र सुरू…

       तालुक्यामध्ये दररोज कुठेतरी आग लागण्याचे प्रकार घडतच आहेत.कांही ठिकाणी शॉर्टसर्किटने तर काही ठिकाणी हेतू पुरस्सर आग लावली जात असल्याचे सांगण्यात येते. यामुळे वनसंपदेचे मात्र मोठे नुकसान होत आहे.


डोक्यावर दुष्काळाचे ढग…
हजारो लिटर पाणी गटर्सला

                    आजरा: प्रतिनिधी

       आजरा तालुक्यामध्ये एकीकडे या वर्षी पाण्याची टंचाई स्पष्टपणे दिसू लागली आहे.असे असताना नगरपंचायतीच्या जुन्या पाणीपुरवठा योजनेला गळत्यांनी ग्रासले असून हजारो लिटर पाणी अक्षरशः गटर्समध्ये वाहून जाण्याचा प्रकार वारंवार घडत असल्याने शहरवासीयांकडून संताप व्यक्त होत आहे.

        शहरात अनेक ठिकाणी सध्या पाण्याची टंचाई भेडसावत आहे महामार्ग प्राधिकरणाकडून टँकरची सुविधा करून पाणी पुरवले जात आहे. अक्षरशः आठ -आठ दिवस एकेका ठिकाणी पाणी नाही. अनेक ठिकाणच्या कुपनलिका फेब्रुवारी महिन्यातच बंद पडल्या आहेत, विहिरींच्या पाण्याने तळ गाठला आहे. असे असताना गटर्समधून पाणी वाहून जाणे कितपत योग्य आहे ? हा सवालही आता उपस्थित होत आहे.


तालुक्यातील रिक्त अंगणवाडी मदतनीस भरतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

                     आजरा:प्रतिनिधी

       एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय पंचायत समिती, आजरा विभागाकडील रिक्त असलेल्या अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रीया राबविणेत येणार असून इच्छुक उमेदवारानी दि. २६ फेब्रुवारी २०२४ पासुन दि. ११ मार्च २०२४ अखेर बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय आजराकडे आपले अर्ज सादर करावेत असे आवाहन करणेत आले आहे.

       अंगणवाडी मदतनीसांची नेमणुक करण्यात येणारी महसुली गावे पुढीलप्रमाणे : मौ. पेरणोली पैकी नावलकरवाडी, मौजे कोरीवडे पैकी नार्वेकर वस्ती, मौजे चितळे धनगरवाडा, मौजे खानापुर पैकी कासारशेत, मौजे वाटंगी शाहुवसाहत, मौजे आवंडी धनगरवाडा क्र. १, धनगरवाडा क्र. २ व धनगरवाडा क्र .३, मौजे लाटगाव पैकी सातेवाडी, मौजे होन्याळीपैकी करडेवाडी, मौजे धामणे पैकी इळकेवाडी, मौजे कोवाडेपैकी दाभेवाडी, मौजे किणे पैकी चाळोबावाडी, मौजे वेळवटी पैकी पेठेवाडी, मौजे वेळवटी क्रशर, मौजे शेळप पैकी शेळप गावठाण, मौजे हाळोली पैकी पोवारवाडी, मौ. पारपोली गावठाण इत्यादी ग्रामपंचायत अंतर्गत अंगणवाडी मदतनीस भरतीसाठी अर्ज मागविणेत आले आहेत. अटी शर्थी व अर्ज बालविकास प्रकल्प कार्यालय आजरा येथे उपलब्ध आहेत अशी माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी दिली आहे.



राष्ट्रवादी (अजित पवार गट) तालुकाध्यक्षपदी सुधीर देसाई


                     आजरा: प्रतिनिधी

       राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाली आहे. पक्षाच्या आजरा तालुकाध्यक्ष पदी जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांची निवड करण्यात आली आहे.जिल्हा कार्यकारणीमध्ये माजी पंचायत समिती सभापती विष्णूपंत केसरकर (किणे),आजरा साखर कारखाना उपाध्यक्ष एम.के.देसाई (सरोळी),काशिनाथ तेली (होन्याळी), अनिल फडके (सुळे) यांचा समावेश करण्यात आला आहे तर विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदी वसंतराव धुरे (उत्तूर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

      आजरा शहर अध्यक्षपदी निसार लाडजी (आजरा) व सेल अध्यक्षपदी अल्बर्ट डिसोझा (वाटंगी) यांना संधी देण्यात आली आहे.

कार्यकारणीत कारखाना संचालक आघाडीवर

       संधी देण्यात आलेल्या तालुका अध्यक्षपदासह जिल्हा कार्यकारणी सदस्यांमध्ये असणारे सर्वजण आजरा साखर कारखान्याचे पदाधिकारी आहेत.


संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Breaking news

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

रिक्षा चालकाचा रिक्षातच हृदयविकाराने मृत्यू

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!