गुरुवार दि.३० आक्टोंबर २०२५



दुर्दैवी…
दोन छकुल्यांना सोडून तिने घेतला जगाचा निरोप

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दीड महिन्याच्या छोट्या बालकासह दोन छकुल्यांना पतीच्या ताब्यात देऊन पेद्रेवाडी ता. आजरा येथील सौ. संचिता नितीन चव्हाण या पंचवीस वर्षीय विवाहितेने अखेर जगाचा निरोप घेतला. काल बुधवारी तिचे हृदयविकाराच्या आजाराने अखेर निधन झाले.
गेले काही महिने संचिता या हृदयविकाराशी सामना करत होत्या. महिनाभरापूर्वी त्यांनी एका अपत्यासही जन्म दिला. दीड पावणे दोन वर्षाचे एक व महिनाभरापूर्वी जन्मलेले एक अपत्य अशी दोन अपत्ये झाल्याने सुखी संसाराचे स्वप्न पाहत असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
याबाबतची नोंद आजरा पोलिसात आकस्मिक मृत्यू अशी झाली आहे. या घटनेमुळे पेद्रेवाडी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.


पावसाने धुतले…
भात पिके पाण्यात…
पंचनाम्यांसह नुकसान भरपाईची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरासहसह संपूर्ण तालुक्यात गेले काही दिवस सुरू असलेल्या अवकाळी आणि परतीच्या पावसामुळे भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून, हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून आर्थिक दिलासा देण्यात यावा मागणी होत आहे.
तालुक्यात शेतकऱ्यांच्या भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन सुगी वेळी पावसाच्या जोरदार हजेरीने शिवारात पाणीच पाणी झाले आहे. उभी भाग पिके पाण्यामध्ये आडवी झाल्याने व पावसाने उघडीप न दिल्याने कापणीसह मळणी प्रक्रियेवर मर्यादा आल्या आहेत.
यंदा तालुक्यात भात लागवडीसाठी अनुकूल वातावरण होते. भात पिक उत्तम आलेही होते. बहुतेक ठिकाणी भात पिके कापणीच्या अवस्थेत पोहोचली होती. अवकाळी आणि परतीच्या पावसाने या मेहनतीवर अक्षरशः पाणी फेरले. अनेक शेतकऱ्यांनी शेतात कापून ठेवलेले भात पिक पूर्णपणे भिजून गेले, तर काही ठिकाणी पाण्याखाली गेले. हातातोंडाशी आलेले पीक डोळ्यांसमोर नष्ट होताना पाहणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. त्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी हालचाली होण्याची गरज आहे.
ऊस गाळपाकरीता हंगाम कालावधी कमी होणार...?
पावसामुळे अनेक कारखान्यांची पेटलेली धुरांडी शांत झाली आहेत. आणखी आठ दिवस परिस्थिती अशीच राहिल्यास कारखाना गळीत हंगामाचा कालावधी कमी होऊन त्याचा परिणाम गाळपावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उत्तूरचा मुख्य रस्ता मोकळा श्वास घेणार : वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ग्रामपंचायत व पोलिसांची संयुक्त पहाणी

उत्तूर (मंदार हळवणकर)
उत्तूर येथील जुना स्टॅन्ड ते नवीन स्टॅन्ड व भुदरगड रस्ता या परिसरात दीर्घकाळापासून निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येच्या निराकरणासाठी अखेर ठोस पावले उचलली जात आहेत. आज सहाय्यक पोलिस निरीक्षक नागेश यमगर यांनी ग्रामपंचायत सरपंच किरण आमणगी, सदस्य व नागरिक यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष पाहणी केली.
अनेक गावांची बाजारपेठ, वैद्यकीय तसेच शैक्षणिक सुविधा यामुळे उत्तूरमध्ये नेहमीच मोठी गर्दी असते. मात्र, वाढत्या दुचाकी,चारचाकी वाहनांची संख्या, अतिक्रमणे, आणि अस्ताव्यस्त पार्किंग यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. परिणामी, एस.टी. महामंडळाने गावातून वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता.या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला असून, आजच्या पाहणीत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांसाठी स्वतंत्र पट्टे आखणे, मुख्य रस्त्यावर नो पार्किंग झोन निश्चित करणे, सूचना फलक लावणे, तसेच माल उतरविण्यासाठी ठराविक वेळ निश्चित करण्याबाबत चर्चा झाली.
सोमवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी सायं. ५ वाजता व्यापाऱ्यांसह बैठक घेण्याचे ठरविण्यात आले आहे. या बैठकीत वाहतूक नियमनाचे अंतिम स्वरूप निश्चित होणार असून, अतिक्रमण, बोर्ड्स, आणि पार्किंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांना ग्रामपंचायत लेखी सूचना देणार आहे.ग्रामपंचायत व पोलिसांच्या या संयुक्त पुढाकारामुळे उत्तूरमधील मुख्य रस्ता लवकरच मोकळा श्वास घेईल, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे. अनेक नागरिकांनी ग्रामपंचायतीने ठोस आणि कायमस्वरूपी पावले उचलावीत, अशी मागणी केली.
दरम्यान, मृत्युंजय महान्यूजच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेऊन प्रशासनाने ही कारवाई हाती घेतली, हे विशेष नमूद करावे लागेल. सरपंच किरण आमणगी यांनी वैयक्तिक पुढाकार घेत पोलिस विभागाशी सविस्तर चर्चा करून वाहतूक नियंत्रणाच्या उपाययोजनांना गती दिली आहे.
या पाहणीदरम्यान महेश करंबळी, संदेश रायकर, राजू खोराटे, बाळू सावंत, तसेच कॉन्स्टेबल गणेश मोरे उपस्थित होते.

गव्याच्या हल्ल्यातील मृतास तातडीने नुकसान भरपाई द्या…
पालकमंत्र्यांच्या सूचना

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वन विभागाच्या वेगवेगळ्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी कोल्हापुरचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थित शासकीय विश्राम गृह कोल्हापूर येथे बैठक पार पडली. यामध्ये अजित मारुती कांबळे या युवकाचा सहा महिन्यापूर्वी गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्याच्या परिवाराला अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नसून वनविभाग यात नियमांचे कारण दाखवून अडथळे तयार करत आहे असे संबंधिताने सांगितले.
मा. पालकमंत्री यांनी यावर नाराजी व्यक्त करत तातडीने या परिवाराला जीवितहानी संबंधी नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भात सूचना दिल्या.
त्याचबरोबर आवंडी धनगर वाडा क्र. १, २ व ३ येथे जलजीवन अंतर्गत नवीन पाईप योजनेसाठी निधी मंजूर असून वन विभागाच्या अडथल्यामुळे दोन वर्षांपासून योजनेचे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे दोन वर्षांपासून लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. येथील लोकांची गैरसोय लक्षात घेऊन ताबडतोब यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आदेश मा. मंत्रिमंहोदय यांनी वनविभागाला दिले. त्याचबरोबर वन्य प्राण्यांकडून होणारे नुकसान आणि नुकसान भरपाईसाठी वन विभागाकडून होणारी दिरंगाई यासंदर्भात काही दिवसापूर्वी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील नागरिकांनी केलेले आंदोलन यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. वन्य प्राण्यांकडून होणारी नुकसान आणि वन विभागाची उदासीनता यावर अनेक शेतकऱ्यांनी आपली गाऱ्हानी मंत्री महोदयांसमोर मांडली.
त्यानुसार येत्या आठ दिवसात तालुका स्तरावर उपवनसंरक्षक श्री. धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना मा. मंत्री महोदय यांनी श्री. पाटील यांना दिल्या.
आजरा तालुका शिवसेनेच्यावतीने या बैठकीसाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. यावेळी गव्याच्या हल्ल्यात मृत पडलेला युवक कु.अजित कांबळे यांचे वडील श्री. मारुती कांबळे व नातेवाईक तसेच आवंडी धनगरवाडा क्रमांक १, २ व ३ इथून सरपंच बयाची मिसाळ, उपसरपंच रोंगू कोकरे, गंगाराम कोकरे, बयाजी येडगे, धोंडीबा येडगे, रामा कोकरे, सुनील कोकरे ग्रामसेवक सागर किरूळकर आधी प्रमुख मंडळी उपस्थित होती. तसेच आजऱ्याच्या पश्चिम भागातून सुळेरान- घाटकरवाडीचे सरपंच श्री.शशिकांत कांबळे, किटवडे गावचे सरपंच श्री.लहू वाकर, संग्राम पाटील, जयसिंग पाटील, भास्कर पाटील, बाळकृष्ण पाटील, सागर मांडवकर, प्रविण मटकर आदी मंडळी उपस्थित होती.

छायावृत्त…
मडीलगे तालुका आजरा येथे सरपंच मित्रमंडळी,आधार ग्रुप व जगदंब बॉईज यांच्या वतीने सरपंच बापू नेऊंगरे यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.



