

देवर्डे च्या तरुणाचा मृतदेह मुंबईत लॉजमध्ये आढळला

आजरा:प्रतिनिधी
देवर्डे ता. आजरा येथील सुमंत सुरेश तानवडे या अठरा वर्षाच्या तरुणाचा मृतदेह भायकला/ मुंबई येथील लॉज मध्ये आढळून आला. तो तासगाव, सांगली येथे शिकण्यासाठी रहात होता.
याबाबत तानवडे यांच्या निकटवर्तीयांनी दिलेली माहिती अशी की…
चार दिवसांपूर्वी तासगाव येथून मुंबईला गेलेल्या सुमंत याने भायकला (मुंबई ) येथे लॉजमध्ये खोली घेतली होती. तेथेच तो राहिला होता. खोली बुकिंग केलेल्या दुसऱ्या दिवशी उशिरापर्यंत दरवाजा न उघडला गेल्याने अखेर लॉज मालकाने व व्यवस्थापककाने पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी दरवाजा तोडून पाहिले असता आत मध्ये त्याचा मृतदेह आढळला. सुमंत याच्या पश्चात आई, वडील, बहीण, आजी असा परिवार आहे. देवर्डे येथे त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रकाराचा नेमका उलगडा झाला नसून पोलीस पुढील तपास करत आहेत. प्रचंड हुशार असणाऱ्या सुमंत याच्या मृत्यूच्या घटनेमुळे देवर्डे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.


केंद्रप्रमुख पदाच्या परीक्षा केव्हा होणार ?शिक्षकांची विचारणा
पुणे आयुक्तांना पाठवले निवेदन

आजरा : प्रतिनिधी
केंद्र प्रमुख पदासाठी अर्ज भरून वर्ष उलटत आहे. पण अद्याप परीक्षा झालेली नाही. केंद्रप्रमुख पदाच्या परीक्षा केव्हा होणार आहेत. अशी विचारणा सुरेश शिंगटे रा. वाटंगी (ता. आजरा) यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेचे आयुक्तांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, माझ्यासह अनेक प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षकांनी केंद्रप्रमुख पदासाठी जून महीन्यात २०२३ मध्ये अर्ज भरले आहेत. अर्ज भरून आठ-दहा महिने होत आले तरी अद्याप परीक्षेची तारीख जाहीर झालेली नाही. काही शिक्षक या दोन-तीन महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत त्यामुळे परीक्षा केव्हा होणार? निकाल केव्हा लागणार? आणि शिक्षक रुजू कधी होणार? हा गंभीर प्रश्न आहे तरी या दोन महिन्यात परीक्षा घ्याव्यात अन्यथा भरलेली परीक्षा फी परत करावी ही विनंती केली आहे.
निवेदनावर सुरेश शिंगटे (वाटंगी, ता. आजरा)आहे यासह शिक्षकांच्या सह्या आहेत.


रमजान आला
पाणी वेळेचे नियोजन करा..

आजरा:प्रतिनिधी
मुस्लिम बांधवांचा रमजान महिना येत असून रमजानच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा वेळा व्यवस्थित करून सोयीच्या कराव्यात अशी मागणी मुस्लिम बांधवांच्या वतीने मुख्याधिकारी, नगरपंचायत आजरा यांच्याकडे करण्यात आली आहे.
याबाबतचे लेखी निवेदन मुख्याधिकाऱ्यांना देण्यात असून निवेदनावर अमानुल्ला आगलावे, निसार अडकुरे, अकबर लमतुरे ,रुपेश वाळके, आयुब पटेल, हसन बुड्ढेखान, आक्रम खेडेकर आदींच्या सह्या आहेत.


नादश्री विद्यालयाचे यश

आजरा : प्रतिनिधी
नोव्हेंबर २०२३ मध्ये अखिल भारतीय गंधर्व संगीत परिक्षा मंडळ मुंबई यांनी घेतलेल्या तबला वादन परिक्षेत येथील नादश्री विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.यामध्ये श्रीशैल चंद्रकांत कुंभार,हर्षवर्धन युवराज येसणे,आदित्य प्रकाश नेवरेकर,सुदर्शन मोहन भाईंगडे यांनी यश संपादन केले.
या सर्व विद्यार्थ्यांना गणपतराव आयवाळे यांनी मार्गदर्शन केले.


छायावृत्त…

आजरा शहर व तालुक्यामध्ये भोलानाथाचे आगमन झाले आहे.सुगी कालावधीत गावोगावी भेटी देऊन वर्षभराच्या भाकरीची जोडणा लावणारी ही नंदीबैलवाली मंडळी आता बदलत्या युगात दुरापास्त होत चालली आहेत.



