
प्रभावती पवार यांचे निधन

आजरा: प्रतिनिधी
पेरणोली ता. आजरा येथील श्रीमती प्रभावती बाबासाहेब पवार (वय ८९ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी रात्री उशिरा निधन झाले.
आजरा साखर कारखान्याचे संचालक व माजी पंचायत समिती सभापती उदय पवार यांच्या त्या मातोश्री तर पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब पवार यांच्या त्या पत्नी होत .त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुले, दोन विवाहित मुली, सूना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
अंत्यविधी आज शुक्रवारी सकाळी दहा वाजता पेरणोली येथे होणार आहेत.


रामतीर्थ यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करा : मुख्याधिकारी सुर्वे
आजरा नगरपंचायतीमध्ये बैठक

आजरा: प्रतिनिधी
मार्च महीन्यात पहिल्या आठवड्यात होणाऱ्या रामतीर्थ यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी नगरपंचायत प्रयत्नशील आहे. याकरीता भक्त मंडळी व तालुकावासीयांनी सहकार्य करावे. असे आवाहन आजरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांनी केले. यात्रेच्या नियोजनातील सूचना व प्रशासनाकडून मिळालेला प्रतिसाद पाहता यात्रा दणक्यात होणार हे स्पष्ट झाले आहे.
येथील नगरपंचायतमध्ये अन्याय निवारण समिती व नगरपंचायत प्रशासनाची रामतीर्थ यात्रेसह विविध स्थानिक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर बैठक सभागृहात झाली. यावेळी सुर्वे यांनी मार्गदर्शन केले. अन्याय निवारण समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
सुर्वे म्हणाले, यात्रा कालावधीत कोणतीही खासगी वहाने यात्रा स्थळी सोडण्यात येणार नाहीत. येत्या आठवडाभरात रामतीर्थ परिसरातील मंदिरासह इतर रंगरंगोटी करून घेण्यात येईल. नव्याने बांधण्यात आलेली स्वच्छता गृहे यात्रेमध्ये खुली केली जातील. एसटी वहातुकीसाठी अडथळा ठरत असणारा महामार्गाला जोडणारा जोड रस्ता तातडीने तयार करून घेण्याबाबतच्या सूचना महामार्गच्या अधिका-यांना दिल्या आहेत. या वेळी महादेव मंदिर समोरील कुपनलिका दुरुस्त करावी अशी मागणी यशवंत इंजल यांनी केली. यात्रा स्थळी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना सुधीर कुंभार यांनी केली.
या वेळी झालेल्या चर्चेत अन्याय निवारण समिती अध्यक्ष परशुराम बामणे, गौरव देशपांडे, पांडुरंग सावरतकर, विजय थोरवत, ज्योतिप्रसाद सावंत,यशवंत चव्हाण, दयानंद भोपळे, दिनकर जाधव, जावेद पठाण, राजू विभूते आदींनी भाग घेतला. प्रशासकीय अधिकारी राकेश चौगुले , संजय यादव यासह संदिप पारळे व नागरीक उपस्थित होते.
मुख्याधिकाऱ्यांचे आभार
आजरा येथील मिळकतीची नोंदणी करण्याकरीता आकारले जाणारे शुल्क कमी करून त्याची तातडीने अंमलबजावणी केल्याबद्दल नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांचे समितीच्या वतीने श्री परशुराम बामणे यांनी आभार मानले.


वक्तृत्वातून नेतृत्व घडण्यास संधी :
डॉ .अनिल देशपांडेआजऱ्यात हिरण्यकेशी स्पोर्टस् च्यावतीने वक्तृत्व स्पर्धा

आजरा : प्रतिनिधी
वक्तृत्व स्पर्धातून विदयार्थ्यांच्यातील आत्मविश्वास दुणावतो. व्यासपीठावर वावरण्याचे धाडस येते. भविष्यातील नेतृत्व तयार होण्यास मदत होते. जीवनाला वेगळी दिशा मिळते. यासाठी वक्तृत्व स्पर्धा भरविणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन जनता शिक्षण संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ .अनिल देशपांडे यांनी केले.
आजरा हायस्कूलमधील अण्णा भाऊ सांस्कृतिक सभागृहात तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा झाल्या. हिरण्यकेशी स्पोर्टसच्यावतीने संस्थेचे संस्थापक (कै) काशिनाथ चराटी व युवा नेते अनिकेत चराटी यांच्या वाढदिवासाचे औचित्य साधून स्पर्धेचे आयोजन केले होते. डॉ .देशपांडे अध्यक्षस्थानी होते. उदयोजक महादेव पोवार, युवा नेते अनिकेत चराटी प्रमुख उपस्थित होते.
मुख्याध्यापक बी. एम. दरी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ .देशपांडे म्हणाले, वक्तृत्व स्पर्धातून अनेक नेते घडले आहेत. शालेय व महाविद्यालयीन स्तरावर अशा स्पर्धा झाल्या पाहीजेत. आजरा हायस्कूल व महाविद्यालयामध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. अनिकेत चराटी हे सांस्कृतिक, वैचारीक व साहित्यिक क्षेत्रासाठी योगदान देत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. उदयोजक पोवार म्हणाले, समाजात व्यक्त होणे महत्वाचे असते. यातून स्वतःची ओळख तयार करता येते. विद्यार्थानी विविध स्पर्धात भाग घेवून शाळा, गाव व तालुक्याचे नाव उज्जवल करावे.
रणजित कालेकर व श्री. चराटी यांनी मार्गदर्शन केले. या वेळी विजेत्यांना रोख रक्कम व मानचिन्ह देवून गौरवण्यात आले. मुग्धा अनिकेत चराटी, पर्यवेक्षक अजित तोडकर, ऋतिककुमार दीक्षित, मंगेश तिऊरवाडकर, मनिष टोपले, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सुरेश देशमुख, व्ही. टी. कांबळे यांनी परीक्षक म्हणून काम पाहीले. अनिल कांबळे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले,
हे ठरले विजेते…
लहान गट- हाजीत मोहम्मद इरफान सय्यद (व्यंकटराव हायस्कूल, आजरा), अवंती अशोक निंबाळकर (मलिग्रे हायस्कूल, मलिग्रे), सान्वी लक्ष्मण चौगुले (व्यंकटराव हायस्कूल, आजरा), आराध्या बेळगुंदकर (सरस्वती हायस्कूल, हात्तिवडे) प्रणिती प्रसाद देशपांडे (विशेष प्राविण्य) मोठा गट- निवेदिता पांडुरंग सागर (माध्यमिक विद्यालय, आरदाळ), प्रतिक्षा प्रल्हाद कांबळे (एरडोळ हायस्कूल, एरंडोळ), सोहम संतोष पाटील (पार्वती शंकर विद्यालय, उत्तूर), स्नेहल सागर इलगे (व्यंकटराव हायस्कूल, उत्तेजनार्थ)


रवळनाथ पतसंस्थेकडील महिलांच्या ठेव योजनेला उत्फुर्त प्रतिसाद…
पहिल्याच दिवशी १५ लाखांवर ठेवी जमा

आजरा : प्रतिनिधी
आज-यातील श्री. रवळनाथ पतसंस्थेत महिलांकरिता हळदीकुंकू कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला. यानिमित्त संस्थेच्यावतीने आयोजित महिलांकरीताच्या ठेव योजना उपक्रमास मोठा प्रतिसाद लाभला. एकाच दिवशी तब्बल १५ लाखांवर ठेवी जमा झाल्या.
स्वागत संस्थेच्या संचालिका माधुरी पाचवडेकर यांनी केले. प्रास्ताविकात संस्थेच्या माजी अध्यक्षा सौ. सुरेखा फडके यांनी संस्थेच्यावतीने राबविण्यात येणा-या विविध उपक्रमासह ठेव व कर्ज योजनांची माहिती दिली. यावेळी बोलताना अध्यक्षीय मनोगतात सौ.अलका शिंपी म्हणाल्या, गावगाड्यातील संस्कृती जोपासण्यासाठी महिलांनी एकत्र येण्याची आवश्यकता असून यानिमित्तानेच हळदी-कुंकू कार्यक्रम ठेवला आहे. यामध्ये मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी माजी नगरसेविका सिमा पोवार, नंदाताई घोरपडे, सौ. प्रियंका शिंपी, शोभा पटेकर, तेजस्विनी नार्वेकर, कल्पना जाधव, सौ. गिता नाईक, सौ. भैरवी सावंत, सौ. पूजा डोंगरे यासह महिला उपस्थित होत्या. आभार संचालिका सौ. अर्चना मराठे यांनी मानले.


विकास अर्बन उत्तूर च्या अध्यक्षपदी शिवराज लकांबळे
राजेंद्र ठाकूर उपाध्यक्षपदी

उत्तूर:प्रतिनिधी
विकास अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. उत्तूर, ता.आजरा, जि.कोल्हापूर या संस्थेची सन २०२४-२९ करीता पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध झाली असून श्री. शिवराज शंकरराव लकांबळे यांची चेअरमन पदी व श्री. निळकंठ/राजेंद्र त्र्यंबक ठाकूर यांची व्हा.चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली.
नुतन संचालक मंडळ
महादेव धोंडीबा शिरगुप्पे , श्री.गणपतराव दत्तात्रय यमगेकर श्री.गंगाधर रामचंद्र हराळे,श्री. संजय धोंडीबा उत्तूरकर, काशिनाथ दत्तात्रय गवस, श्री. अशोक दुंडाप्पा कांबळे,श्री. शैलेंद्र मल्लाप्पा आमणगी, श्री. सागर पांडुरंग गंगापूरे सौ.सुनिता सुहास पाटील सौ.गौरी गोपाळकृष्ण बर्डे
स्वागत व प्रास्ताविक व्यवस्थापक श्री. दत्तात्रय पाकले यांनी केले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. प्रमोद फडणीस मुख्य लिपिक सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आजरा यांनी काम पाहिले.


...अन्यथा बस स्थानकाच्या आवारात बेमुदत उपोषण

आजरा : प्रतिनिधी
आजरा एसटी आगारामार्फत आजरा तालुक्याच्या ग्रामीण भागातील एसटीच्या फेऱ्या कमी झाल्या आहेत, याचा फटका तालुकावासियांना बसत आहे. त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागात एसटीच्या फेऱ्या वाढवण्याबरोबरच सर्व मार्गावरील मुक्काम बस सुरू करण्यात याव्यात, अन्यथा ४ मार्चपासून आजरा बस स्थानकाच्या आवारात बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा आजरा तालुका एसटी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सचिन इंदुलकर यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन आजरा आगार व्यवस्थापक राजेंद्र घुगरे यांना देण्यात आले आहे.
आजरा तालुकावासीयांच्या सोईसाठी १९९८ मध्ये आजरा एसटी आगाराची निर्मिती करण्यात आली. या माध्यमातून आजरा तालुक्याच्या डोंगरकपारीत व वाड्यावस्त्यावर एसटी सेवा मिळू लागली. यातून तालुकावासीयांचा प्रवास सोईचा व सुखकर झाला. मात्र कोरोना काळ व त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप यामुळे आजरा एसटी आगाराचे कोलमडलेले वेळापत्रक अद्यापही सुरळीत झालेले नाही. याचा फटका तालुकावासीय व विशेष करून विद्यार्थी यांना बसत आहे. तालुक्यातील बहुतांश नागरिक व विद्यार्थ्यांना प्रवासासाठी एसटीवरच अवलंबून राहावे लागते. त्यातच आजरा आगारामार्फत कोल्हापूर, पुणे येथील बसच्या फेऱ्या वाढवण्यात आलेल्या आहेत. तसेच ग्रामीण भागात फेऱ्या वाढवण्यास सांगितल्यानंतर बसेसची संख्या कमी असल्याचे कारण सांगितले जाते. मुळातच तालुकावासीयांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या आजरा आगाराच्या भोंगळ कारभाराचा फटका तालुक्यातील नागरिकांना बसत आहे. त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागात १ मार्च पर्यंत पुरेशा प्रमाणात व नागरिकांची सोय होईल अशा स्वरूपात एसटीच्या फेऱ्या सुरू करण्यात याव्यात अन्यथा ४ मार्चपासून आजरा बस स्थानकाच्या आवारात बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर नाथा देसाई, राजू विभुते, आनंदा घंटे, सुयोग बेळगुंदकर, अजित आजगेकर, दयानंद भोपळे, विशाल जाधव, दत्तात्रय सावंत, नितीन गावडे, जावेद आगलावे यांच्या सह्या आहेत.


दावल मलिक ऊरुस उत्साहात

आजरा:प्रतिनिधी
हिंदू मुस्लिम सलोख्याचे प्रतिक असलेल्या आजरा येथील हजरत दावल मलिक यांचा उरूस उत्साहात पार पडला. उरुसाच्या पार्श्वभूमीवर हिंदू मुस्लिम भाविकांनी दावल मलिक देवस्थान येथे गर्दी केली होती. बुधवार दिनांक २१ रोजी संदल व गंधरात्र मिरवणूक तर गुरुवार दिनांक २२ रोजी भर उरूस व गलेफ मिरवणूक काढण्यात आली.
यात्रेचा पार्श्वभूमीवर विविध प्रकारची मिठाईची, खेळण्यांची व शीतपेयांची दुकाने थाटण्यात आली होती.



