mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरठळक बातम्यामनोरंजनमहाराष्ट्रराजकीयरोजगारसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

शुक्रवार   दि.२१ नोव्हेंबर २०२५

आज चित्र स्पष्ट होणार
माघारीचा अंतिम दिवस

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा नगरपंचायत निवडणूक प्रक्रियेचा आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे. आज निवडणुकीच्या एकंदर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

दोन दिवसांत २ नगराध्यक्षपदाच्या व १० नगरसेवकपदाच्या उमेदवारांनी माघार घेतली आहे. माघार घेतलेल्यांमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तकिलदार अबूताहेर अल्लाउद्दीन,
सिद्धेश विलास नाईक यांचा तर नगरसेवक पदाकरता अर्ज दाखल केलेल्या चाँद सनाउल्ला इस्माईल / प्रभाग १० लमतुरे ताहिर रहिमबक्ष/ प्रभाग १० चाॅंद उबेद जुबेर/ प्रभाग १०, फडके अनिरुद्ध आनंदा/प्रभाग १५, फडके साक्षी अनिरुद्ध / प्रभाग ११, चाॅंद इरम सनाउल्ला/ प्रभाग ५, बामणे सतीश परशराम /प्रभाग १५, मुराद शफुरा इरफान / प्रभाग १६,
दरवाजकर वासीम सिकंदर / प्रभाग १०, पटेकर जयश्री नेताजी/ प्रभाग १७ यांचा समावेश आहे.

पेरणोलीतील आयुष्यमान आरोग्य मंदीरास अखेर अधिकारी मिळाले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आयुष्यमान आरोग्य मंदीर आयुवेर्दिक दवाखाना, पेरणोली आरोग्य उपकेंद्रात डाँ. अरविंद शेनोळकर यांची नुकतीच वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

लोकनियुक्त सरपंच सौ प्रियांका जाधव म्हणाल्या, गावातील पुर्णवेळ आणि उपकेंद्रासाठी कर्तव्यदक्ष डॉक्टरांची नितांत गरज होती. अनुभवी आणि निष्ठावान वैद्यकीय अधिकारी मिळाल्याने गावातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळेल, याची खात्री आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीने ग्रामस्थांच्या आरोग्याच्या समस्या प्रभावीपणे सुटतील आणि विशेषतः महिला,वयोवृद्ध, बालकांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष दिले जाईल, अशी अपेक्षा आहे. उत्तम वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.

 आपल्या मनोगतात डॉ .शेनोळकर म्हणाले सध्या याठिकाणी एक वैद्यकीय अधिकारी व एक परिचक (श्री. दोरुगडे ) कार्यरत आहे.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ .शेनोळकर यांनी आयुर्वेद दवाखाना, पेरणोली च्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना आयुर्वेदिक औषधपचाराच्या माध्यमातून, स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम,आतुरस्य विकार प्रशमनमच!  या शास्त्र वचनानुसार सेवा देण्यास प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच संकेत सावंत, संदीप नावलकर , रणजीत फगरे, अमोल जाधव, सुषमा मोहिते, रुपाली पाईम, सुनिता कालेकर, ग्रामसेविका अमिषा देवर्डेकर , प्राथमिक शिक्षक ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

खड्डेमय रस्ते… अपघातांचा धोका वाढला; दुरुस्तीच्या मागणीसाठी युवक आक्रमक

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

उत्तूर–आजरा या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून आरदाळ ते हालेवाडी या दरम्यान अर्धा फूट खोल आणि दोन ते तीन फूट लांबीचे मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांची प्रचंड गैरसोय होत आहे. खड्डे चुकविताना समोरून किंवा मागून येणाऱ्या वाहनांशी अपघाताचा धोका वाढल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. तसेच उत्तूर – आंबेओहोळ ते आरदाळ स्मशानशेड परिसरातील अरुंद पट्टेरी गतिरोधकांमुळे लहान वाहने घसरतात, तर मोठ्या वाहनांना एक फूट बाजू टाळून मार्ग काढावा लागतो, अशी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करीत ट्रिपल ए ग्रुपच्या सदस्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विस्मित बंडगर यांना निवेदन दिले असून रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास अपघातांची सर्वस्वी जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर राहील असा इशारा दिला आहे.

निवेदन देणाऱ्यांमध्ये अभिजीत आरेकर,
पवन खवरे, राजवर्धन मांडरे, कुणाल चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, प्रमोद रामाने, शिवराज लोखंडे आणि गणेश गुरव यांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांना शालेय किट वाटप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन मार्फत महाराष्ट्रभरातील सर्व दुर्गम भागातील शालेय मुलांना शालेय वस्तूकीट वाटप करण्यात आले. याच अनुषंगाने आजरा तालुक्यातील सर्व धनगरवाड्यांवर शालेय वस्तूकीट वाटप करण्यात आले. आवंडी येथील धनगरवाडा नंबर एक, धनगरवाडा नंबर तीन येथील शालेय विद्यार्थ्यांना शालेय किट वाटप करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे प्रतिनिधी जितेंद्र भोसले, शिवसेना आजरा शहर प्रमुख विजय थोरवत, सरपंच बयाजी मिसाळ, बयाजी येडगे, आत्मा कमिटी अध्यक्ष इंद्रजीत देसाई, संजय शेणवी, साळगाव सरपंच धनंजय पाटील, संतोष भाटले, दयानंद निऊंगरे, मंदार बिरजे, शिक्षक आशा पाटील, रघुनाथ जाधव, दूंडाप्पा नाईक, शालेय समिती अध्यक्ष बिरू गावडे, उपाध्यक्ष चिंतामनी येडगे, अंगणवाडी सेविका रंजना मिसाळ, मदतनीस सुजाता येडगे व विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘बिरेश्वर’च्या आजरा शाखेचा दुसरा वर्धापन दिन उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा येथे २३१ शाखांचा विस्तार व ४६५० कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या श्री बिरेश्वर मल्टीस्टेट पतसंस्थेच्या आजरा शाखेचा दुसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी बोलताना शाखा अध्यक्ष ज्योतिप्रसाद सावंत म्हणाले, दोन वर्षांमध्ये ठेवीदार, सभासद व ग्राहकांचे चांगले सहकार्य मिळाल्याने संस्थेच्या ठेवींचा आकडा १३ कोटी ६६ लाख इतका झाला आहे. संस्थेमार्फत अमूल्या कर्ज योजनेसह सर्व प्रकारची कर्जे वितरित केली जात आहेत.

माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले माजी मंत्री विद्यमान आमदार शशिकलाताई जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा कारभार उत्तम पद्धतीने सुरू आहे असे स्पष्ट करून त्यांनी संस्थेच्या वाटचालीत योगदान दिलेल्या सर्वांचे आभार मानले.

यावेळी सुरेश मिटके, महेश कुरुणकर, तानाजी डोणकर, सुशांत निकम, अनिकेत शिंत्रे या पदरा शाखा संचालकांसह व्यवस्थापक दत्तात्रय सुतार, समीर मोरजकर, प्रा. जे. डी. दळवी यांच्यासह मान्यवर व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

पेट्रोल पंपावर कॅनमधून डिझेल व पेट्रोल देण्याची मागणी

आजरा तालुका सरपंच संघटनेचे तहसिलदारांना निवेदन

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पेट्रोल पंपावर डिझेल व पेट्रोल कॅनमधून देण्यास मनाई करण्यात आली आहे. पण, ग्रामीण भागामध्ये शेतकरी वर्गाकडे शेतीच्या कामासाठी ट्रक्टर, पॉवर ट्रेलर, जेसीबी, भात कापणी यंत्र आहेत. सध्या भात कापणी सुरू असून हे मशीन पेट्रोलवर चालते. मशीन पंपावर घेऊन येणे अशक्य असल्याने कॅनमधून पेट्रोल व डिझेल देण्यात यावे अशी मागणी आजरा तालुका सरपंच संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन आजरा तहसिलदार समीर माने यांना देण्यात आले आहे.

या मागणीची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांची बाजू समजून घ्यावी व आपली भूमिका व आपला घेतलेला निर्णय योग्य आहे परंतु अशी कोणतीही घटना घडू देणार नाही. आम्ही शेतकरी बांधव ट्रॅक्टर मालक चालक हे मजबूत प्लास्टिक कॅन मधून डिझेल व पेट्रोल घेऊन जाऊ यासाठी आम्हाला आपल्या सहकार्याची गरज असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. तरी योग्य निर्णय घेऊन सहकार्य मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर तालुकाध्यक्ष बापू निऊंगरे, भारती डेळेकर, सुषमा पाटील, सरिता पाटील, कल्पना डोंगरे, महादेव दिवेकर, विजय गुरव यांच्या सह्या आहेत.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Ajr

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!