शनिवार २२ नोव्हेंबर २५



नगराध्यक्ष पदासाठी ६ तर ५८ नगरसेवक पदासाठी रिंगणात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी सहा तर १७ नगरसेवक पदासाठी ५८ इच्छुक निवडणूक रिंगणात आहेत.
त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी बहुरंगी तर नगरसेवक पदासाठी तिरंगी लढत होत आहे.
रिंगणातील उमेदवारांना बुधवारी दि. २६ रोजी चिन्ह वाटप होणार आहे.
रिंगणातील उमेदवार पुढीलप्रमाणे : (कंसात रिंगणातील उमेदवार संख्या)
नगराध्यक्ष पद (६) : मंजूर मुजावर, संजयभाऊ सावंत, श्रद्धानंद ठाकूर, अशोकण्णा चराटी, नियामत मुजावर, बाकीयू खेडेकर
प्रभाग एक (३ उमेदवार) : अश्विनी चव्हाण, भैरवी सावंत, अनसा माणगावकर
प्रभाग दोन (३ उमेदवार) : संभाजी पाटील (विद्यमान नगरसेवक), संजय इंगळे, पूजा डोंगरे
प्रभाग तीन (३ उमेदवार) : सुमय्या खेडेकर (विद्यमान नगरसेविका), रहिमतबी खेडेकर, समीना खेडेकर
प्रभाग चार (५ उमेदवार) : जावेद पठाण, नदीम मुल्ला, मुसासरफराज पटेल, बाकीयू खेडेकर, रशीद पठाण
प्रभाग पाच (३ उमेदवार) : निशांत चाँद, जस्मिन सय्यद, नाझिया खेडेकर
प्रभाग सहा (३ उमेदवार) : साधना मुरुकटे, शाहीन तकीलदार, अन्वी केसरकर
प्रभाग सात (३ उमेदवार) : कलाबाई कांबळे, बालिका कांबळे, गीता कांबळे
प्रभाग आठ (३ उमेदवार) : असिफ सोनेखान, इकबाल शेख, सुहेल काकतिकर
प्रभाग नऊ (२ उमेदवार) : रेशमा बुड्डेखान, यास्मिन लतीफ
प्रभाग दहा (४ उमेदवार) : निसार लाडजी, लहू कोरवी, सिकंदर दरवाजकर(विद्यमान नगरसेवक), आनंदा कुंभार
प्रभाग अकरा (३ उमेदवार) : गीता सावंत, स्मिता सुधीर कुंभार/परळकर, आरती हरणे
प्रभाग बारा (५ उमेदवार) : समीर गुंजाटी, दिलशाद पटेल, दत्तराज देशपांडे, समीर तकीलदार, अनिकेत चराटी
प्रभाग तेरा (२ उमेदवार) : रवींद्र पारपोलकर, परेश पोतदार
प्रभाग चौदा (३ उमेदवार) : सूर्यकांत नार्वेकर, अभिषेक शिंपी(विद्यमान नगरसेवक), सिद्धेश नाईक
प्रभाग पंधरा (२ उमेदवार) : परशराम बामणे, शैलेश सावंत
प्रभाग सोळा (७ उमेदवार) : रेशमा खलिफ, बानू तळगुले, मीनाक्षी पुजारी, आसावरी खेडेकर, अश्विनी कांबळे, श्रुती पाटील, संगीता चंदनवाले
प्रभाग सतरा (४ उमेदवार) : पूनम लिचम, स्नेहा निकम, आरती मनगुतकर, सरिता गावडे
निवडणूक रिंगणामध्ये शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, रवळनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष,काँग्रेसचे अभिषेक शिंपी, काँग्रेसच्या सुमैय्या खेडेकर, सिकंदर दरवाजकर हे चारच विद्यमान नगरसेवक उतरले आहेत. विद्यमान नगरसेवकांपैकी अशोकअण्णा चराटी हे नगराध्यक्ष पदाकरिता निवडणूक लढवत आहे. तेरा विद्यमान नगरसेवक निवडणूक रिंगणाबाहेर गेले आहेत.

चिन्ह वाटप लांबणीवर…
विना चिन्हाचे शहरभर फलक झळकले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायत निवडणुकी करता काल शुक्रवारी माघारीच्या अंतिम दिवसानंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीयकृत पक्षातून उमेदवारी घेतलेल्या उमेदवारांव्यतिरिक्त इतर उमेदवारांच्या चिन्हाचा प्रश्न बुधवारी निकालात निघणार आहे. त्यानंतर केवळ चारच दिवस प्रचाराकरीता रहात असल्याने चिन्हा व्यतिरिक्त शहरांमध्ये उमेदवारांचे डिजिटल फलक झळकू लागले आहेत.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार बुधवारी चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. माघारी नंतर सुमारे पाच दिवसांचा हा कालावधी चिन्ह न मिळाल्याने विना प्रचार घालवणे उमेदवारांच्या दृष्टीने केवळ अशक्य आहे. यामुळे चिन्ह हा विषय बाजूला ठेवून उमेदवारांनी प्रचारास सुरुवातही केली आहे. मात्र ज्या उमेदवारांनी राष्ट्रीयकृत पक्षाद्वारे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत त्यांनी मात्र चिन्हाचा प्रचार सुरू केला आहे.
चिन्हाचा वापर करून उभारले जाणारे फलक केवळ चारच दिवस लावता येणार आहेत ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी प्रचार थांबणार आहे.
यामुळे राष्ट्रीयकृत पक्ष व आघाड्यांव्यतिरिक्त इतर अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असणाऱ्या उमेदवारांची चिन्हे मतदारांपर्यंत पोहोचवताना चांगलीच दमछाक होणार आहे.

स्वच्छ व पारदर्शक कारभारासाठी अन्याय निवारण समिती बांधील
पत्रकार बैठकीद्वारे जाहीर केले उमेदवार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहर अन्याय निवारण समिती ही शहरवासीयांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे. करवाढीचा विषय असो अथवा शहराच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली सुरू असलेले विद्रूपीकरण असो जेथे चुकीचे व अन्यायकारक असेल तेथे खंबीरपणे शहरवासीयांना आधार देण्याचे काम या समितीने केले आहे. एकीकडे अन्याय निवारण समिती सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर असताना नगरपंचायतीतील सत्ताधारी मात्र सोयीस्कररित्या आप्त स्वकियांचे हितसंबंध जोपासण्यात व ढपले पाडण्यात गुंतलेली दिसत होती. शहराच्या विकासाच्या नावाखाली आलेल्या करोडोंच्या निधीची मनमानी पद्धतीने विल्हेवाट लावली आहे. शहरात ना रस्ते, ना गटर्स अशा परिस्थिमुळे संपूर्ण शहर हा चेष्टेचा विषय बनले आहे. परिवर्तनाशिवाय आता दुसरा पर्याय नाही म्हणून अन्याय निवारण समितीने नगरपंचायत निवडणूकीत नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदावर उमेदवार उभे केले आहेत. केल्या कामाची जाण ठेवत शहरवासीय निश्चितच या उमेदवारांच्या पाठीशी राहतील असा विश्वास प्रा. सुधीर मुंज यांनी व्यक्त केला. आजरा येथे आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते यावेळी अन्याय निवारण समितीचे उमेदवार जाहीर करण्यात आले.
नगराध्यक्ष पदासाठी डॉ. श्रद्धानंद ठाकूर तर नगरसेवक पदासाठी प्रभाग दोन मधून संजय इंगळे, प्रभाग चार मधून जावेद पठाण, प्रभाग ११ मधून डॉ. स्मिता सुधीर कुंभार, प्रभाग १२ मधून गौरव देशपांडे, प्रभाग १३ मधून रवी पारपोलकर, प्रभाग १५ मधून परशुराम बामणे, प्रभाग १६ मधून श्रुती पाटील व प्रभाग १७ मधून आरती मनगुतकर यांना उमेदवारी दिली असल्याचे सांगण्यात आले.
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. सदानंद ठाकूर म्हणाले, मावळत्या सभागृहातील काही नगरसेवक हळूहळू ठेकेदार बनत गेले. शंभर कोटींची विकास कामे आणली असे सत्तारुढ मंडळी म्हणत आहेत. परंतु शहराची अवस्था पहाता या सर्व कामांची चौकशी आपण लावून नेमका हा निधी गेला कुठे याचा उलगडा सत्तेत आल्यानंतर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नगरपंचायत ही सर्वसामान्यांची आहे व ती सर्वसामान्यांचीच राहील याच्याशी ही समिती बांधील आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, डॉ. स्मिता कुंभार यांनीही आपले विचार मांडले.
बैठकीस समितीच्या सर्व उमेदवारांसह स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष दयानंद भुसारी, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर कुंभार, नाथा देसाई यांच्यासह प्रमुख मंडळी उपस्थित होते.
गौरव देशपांडे यांनी आभार मानले.

आजरा कारखान्याकडे गतवर्षी गाळप झालेल्या ऊसाला प्रति मे.टन रू.७०.२९ प्रमाणे बिल आदा
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गळीत हंगाम सन २०२४-२५ मध्ये आजरा साखर कारखान्याकडे गळीतास आलेल्या २ लाख ७८ हजार ३५७ मे.टन ऊसास यापुर्वी प्रति मे.टन एक रक्कमी रू. ३१००/- प्रमाणे ऊस बिल अलाहिदा आदा केलेले आहे. सदरची रक्कम राज्य शासनाने नविन एफ.आर.पी. आदा करणेच्या धोरणानुसार ८० रूपयांनी जादा आहे. तथापी सदर धोरणास उच्च न्यायालयाने स्थगीती दिल्यामुळे पुर्वीच्या एफ.आर.पी. धोरणा प्रमाणे मागील वर्षाची तोडणी वाहतुक व साखर उतारा गृहीत धरून प्रति मे. टन रू.७०.२९ इतकी देय निघणारी रक्कम रू.१ कोटी ९५ लाख ६६ हजार संबंधीत ऊस पुरवठादार यांच्या खात्यावर वर्ग करणेत आलेले आहे. तरी संबंधीत ऊस पुरवठादारांनी बँकेशी संपर्क साधुन ऊस बिल उचलुन सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन श्री. मुकुंदराव देसाई यांनी केले आहे.

दाभिल येथे दहिकाल्यानिमित्त उद्या दशावतारी नाटकाचे आयोजन
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दाभिल येथे दहिकाल्यानिमित्त रविवार दि. २३ रोजी दशावतारी नाटकाचे
आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. श्री. देव हेळेकर दशावतार नाट्यमंडळ कारिवडे, ता. सावंतवाडी यांचा पौराणिक दशावतार नाटक सादर होणार आहे. रात्री १२ वाजता नाटकाला सुरवात होणार आहे. रविवारी रात्री १० वाजता सबिना प्रदक्षिणा होणार आहे. त्यानंतर गावातील भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. सोमवार दि. २४ रोजी सकाळी ७ वाजता दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे तरी गावातील तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.


