mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शनिवार  दि.१६ नोव्हेंबर २०२४               

उत्तूर येथे एकाची आत्महत्या

           उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      उत्तूर तालुका आजरा येथे रमेश अण्णाप्पा गाडीवड्ड (वय ४२ वर्षे,रा. कळंबा/ कोल्हापूर ) याने उत्तूर येथील धामणे मार्गावर सुरू असणाऱ्या नवीन फिल्टर हाऊसच्या बाजूला असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची उघड झाले आहे.याबाबतची वर्दी तानाजी बाबुराव गाडीवड्ड रा. उतूर ता. आजरा यांनी आजरा पोलिसात दिली असून आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

       पोलीस पुढील तपास  करीत आहेत.

वस्तादांनी डाव टाकला…
फसवणूक करणाऱ्यांना पराभूत करा :शरद पवार

चंदगड : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      फसवणूक करणाऱ्या लोकांना पराभूत करून त्यांना शिक्षा द्यावी असे फर्मान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले.चंदगड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.नंदाताई बाभूळकर यांच्या प्रचारार्थ माणगांव (चंदगड) येथील विराट सभेत ते बोलत होते.

      लोकसभेत ४०० खासदार निवडून आणून संविधान बदल करण्याचा डाव भाजपचा होता मात्र हा डाव सूज्ञ मतदारांनी उधळून लावला.राज्यात महिला असुरक्षित आहेत.६२ लाख युवक बेरोजगार आहेत.शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न गंभीर बनला आहे.हे सरकार असंवेदनशील आहे. प्रश्नांकडे यांचे दुर्लक्ष आहे त्यामुळे सत्तेवर राहण्याचा त्यांना अधिकार नाही.हे सरकार शेतकरी, महिला, युवकांच्या विरोधातील आहे त्यामुळे बदल करण्याची गरज आहे.फसवणूक करणाऱ्या लोकांना पराभूत करून त्यांना शिक्षा द्यावी असे आवाहनही केले.

       डॉ.नंदाताई बाभूळकर म्हणाल्या, या सरकारने लोकशाहीची धुळधाण केली आहे.काळिमा लावणाऱ्या गोष्टी घडल्या संविधान बदलण्याचे पाप भाजप करत आहे.महायुती सरकारने युवकांच्या तोंडातील घास हिसकावून घेत उद्योगधंदे गुजरातला नेले.या जातीवादी शक्तींचा नायनाट या निवडणुकीत होणार आहे.

       १६०० कोटीचा विकास काय केला हा संशोधनाचा विषय आहे.पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचा हिशोब जनता २० तारखेला चुकता करणार आहे. हक्काचे पाणी कर्नाटकाला देण्याचा प्रस्ताव विद्यमान आमदारांनी केला.या गद्दारांना गाडण्यासाठीच शरद पवार यांनी मला उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत गुंडागर्दी, दडपशाही सुरू आहे मात्र येथील जनता खपवून घेणार नाही. निष्ठावंतांचे की गद्दारांचे सरकार हवे हे जनतेने जनतेने ठरवावे.चंदगड विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्याची संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

     यावेळी काॅ.अतुल दिघे,प्रा सुनिल शिंत्रे,एम.जे.पाटील, बाळेश नाईक आदींची भाषणे झाली.

      या सभेला खास.शाहू महाराज, माजी आम.संध्याताई कुपेकर, बाळ कुपेकर,अमर चव्हाण, रामराजे कुपेकर, रेखाताई हत्तरगी यांच्यासह महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

के. पी. पाटलांचे मानसिक संतुलन बिघडले : आमदार प्रकाश आबीटकर

         गारगोटी : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      राधानगरी मतदारसंघात प्रचंड प्रमाणात केलेली विकास कामे आणि जनतेशी ठेवलेला थेट संपर्क यामुळेच आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे मतदार पुन्हा एक वेळ वळू लागले आहेत मतदारांच्यात उस्फूर्त लाट तयार झाली आहे. त्यामुळे के. पी. पाटलांना पराभवाची चाहूल लागल्यानेच त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार आमदार प्रकाश आबिटकर यांनी कुर (ता. भुदरगड) येथील कोपरा बोलताना केले. जेष्ठ नेते बी. एस. देसाई अध्यक्षस्थानी होते.

      आ. आबिटकर पुढे म्हणाले, मतदार संघात माजी आमदार के. पी. पाटील यांनी त्यांच्या दहा वर्षाच्या कालावधीत कोणतीच विकासकामे न केल्यामुळे मतदार संघाची अवस्था भकास झाली होती. जिल्ह्यातील अविकसित असा मतदार संघ म्हणून या मतदारसंघाकडे पाहिले जात होते. महिला भगिनींच्या बरोबर एखाद्या गावातील शिष्टमंडळ निधी मागणीसाठी गेले असता कपाळावर अटी पाडून त्यांना अपमानित करून तुच्छतेची वागणूक दिली जात होती. या सर्व आठवणी आज देखील कार्यकर्त्यांच्या मनात खदखदत असुन याचा उद्रेक त्यांचा पराभव करून मतदार संघातील स्वाभिमानी जनता अपमानाचा बदला घेईल. मागील दहा वर्षांमध्ये मतदार संघातील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. अजूनही बरीचशी कामे मतदार संघाच्या विकासाच्या दृष्टीने करावयाची आहेत. मतदार संघाच्या विकासाच्या ट्रॅकवर आला आहे. पुढील काळात तुम्हा सर्वांच्या साथीने विकासाचा रथ पुढे न्यावयाचा त्यासाठी तुम्हा सर्वांची साथ हवी आहे.

      युवक नेते मदन देसाई म्हणाले, कार्यकुशल आमदार प्रकाश आबीटकर यांनी मतदारसंघात सिंचन प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबवून मतदारसंघात हरित क्रांती केली. त्यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आरोग्य समृद्धी आल्यामुळेच ते पाणीदार आमदार म्हणून शेतकऱ्यांच्यात परिचित असल्याचे सांगून कुर परिसरात कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली आहेत. २०१४ च्या निवडणुकीची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होणार असून या निवडणुकीत आमदार प्रकाश आबीटकर ५० हजार पेक्षा अधिक मताधिक्याने विजय होतील.

      यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील निवासराव देसाई, प्रवीणसिंह सावंत, सुर्याजी देसाई, कल्याणराव निकम, वसंतराव प्रभावळे, धैर्यशील भोसले-सरकार, अशोकराव भांदीगरे, तात्यासो पाटील, अजीत देसाई, प्रवीण नलवडे, विक्रम पाटील, बाबासो जठार आदींसह महिला, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गद्दारांना धडा शिकवा : के.पी.पाटील

पावसाबरोबर के.पी.ही बरसले

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      महाविकास आघाडीचे उमेदवार के.पी.पाटील यांच्या प्रचारार्थ आजरा येथे विराट सभा झाली. अवकाळी पावसामुळे व्यत्यय आला तरी उमेदवार के.पी.पाटील यांनी भिजत दमदार भाषण करत जनतेच्या विकासाच्या नावावर स्वतःचा विकास करणाऱ्या गद्दारांना धडा शिकवण्याची वेळ आली असल्याचे सांगितले.

       शिवसेनेच्या(ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी आजऱ्यात ऑनलाईन मत व्यक्त करताना म्हणाल्या, बहिणीसाठी दिलेल्या रक्कम, वस्तूची जाहिरात भाऊ कधीच करत नसतो ही आपली संस्कृती आहे.राज्यात बहिण असुरक्षित असताना मात्र या भावांनी १५०० चे भांडवल केले.बहिणींची टिंगल उडवली आहे.

       जात समुदायांना फोडण्याचे काम भाजपने केले. शिवसेनेने जातीपातीचे राजकारण कधीच केले नाही.उद्धव ठाकरे मृत्यूशी झुंज देत असताना याचा फायदा घेत कांहीनी गद्दारी केली.कपटी राजकारण केले. अशांना धडा शिकवण्याची ही वेळ आली आहे. ही निवडणूक म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे.

     राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे, महागाईने कंबरडे मोडले आहे, रोजगार नाही,पेपर फुटत आहेत, रिक्त जागा भरलेल्या नाहीत. परिवर्तन करण्यासाठी महाविकास आघाडीला विजयी करा असे आवाहन करत आघाडीची सत्ता आल्यास जुनी पेन्शन योजना, रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणार, महिलांना दरमहा ३ हजारू रुपये,३ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी अशा अनेक योजना राबविल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

      दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांना गाडण्यासाठी दोन नंबरचे बटण दाबून के.पी.पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

      यावेळी अजयकुमार देशमुख आरिफ खेडेकर संग्राम सावंत अखलाक मुजावर यांचीही भाषणे झाली.

यावेळी सभेस मुकुंदराव देसाई, युवराज पवार, संभाजी पाटील,उदय पवार, संजय येसादे, विक्रम देसाई, रविंद्र भाटले,किरण कांबळे, संजयभाऊ सावंत, जी. एम. पाटील, दत्तात्रय पाटील, समीर चाॅंद, दयानंद भोपळे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.     

खोट्या कारवाया मागे लावून मुश्रीफांसह कुटुंबीयांना छळणाऱ्या मास्टरमाईंडचा बंदोबस्त करा..!
आमदार अमोल मिटकरी यांचे आवाहन

करनूरमधील प्रचार सभेला मोठा प्रतिसाद


        कागल : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     समरजीत घाटगे म्हणजे कुटील, खुनशी, कटकारस्थानी प्रवृत्ती. खोट्या कारवाया पाठीमागे लावून त्यांनी पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अनन्वित छळ केला. या सगळ्या षडयंत्राच्या मास्टरमाईंडचा येत्या निवडणुकीत बंदोबस्त करा, असे आवाहन आमदार अमोल मिटकरी यांनी केले.

      करनूर ता. कागल येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ आयोजित विराट सभेत ते बोलत होते.

      आमदार अमोल मिटकरी म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ हे जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम करतात. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी पाठबळ दिले आणि आज त्यांच्यावर जाती-पातीचा आरोप करणाऱ्या उमेदवारांना खड्यासारखं बाजूला करा. थोर महापुरुषांना रक्ताचे वारसदार नसतात, त्यांना विचारांचे वारसदार असतात. मंत्री श्री. मुश्रीफ हे महापुरुषांच्या विचाराचे वारसदार आहेत. अहो, हे राजे ना कमळाचे झाले, ना तुतारीचे… ते फक्त फितुरीचेच होतील..! असाही त्यांचा खरपूस समाचार घेतला. श्री. मुश्रीफ निवडून येणारच आहेत आणि त्यांना गृहमंत्रीपदही मिळणार आहे. कारण; ज्यांनी त्रास दिला, त्यांचा हिशोब चुकता करायचा आहे.

     श्री. मुश्रीफ म्हणाले, विरोधी उमेदवार आम्ही विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर न देता बिळात जाऊन बसले आहेत. गेल्या पाच वर्षात मतदारसंघात सात हजार कोटी रुपयांचा निधी आणला आणि त्याचे पुस्तकरूपाने प्रत्येक घराघरात नव्हे तर विरोधकांच्या हातातही हे पुस्तक धाडसाने दिले आहे. हे करायलासुद्धा हिम्मत लागते, त्यातील एकही काम बिना मंजुरीचे असेल तर आपण आजही या निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यास तयार आहे.

      यावेळी चंद्रकांत पाटील, विजय काळे, बाळासो पाटील, मधुकर पाटील, दत्ताजीराव देसाई, यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत माजी उपसरपंच प्रवीण कांबळे यांनी केले. कार्यक्रमास सरपंच सौ. मंजिरी पाटील, उपसरपंच तानाजी भोसले, तातोबा चव्हाण, इम्रान नायकवडी, संभाजी पाटील, तानाजी कुंभार, के. डी. पाटील, बाबुराव धनगर, मोहम्मद शेख, बी. जी. पाटील यांच्यासह ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

लाय डिटेक्टर मशीनही फुटेल….!

     अंबरीशसिंह घाटगे म्हणाले, समरजीतसिंह घाटगे हे सभेतून इतके खोटे बोलत आहेत, की त्यांची लाय डिटेक्टर चाचणी केली, तर ते मशीनही फुटेल. असा घणाघात करताच टाळ्यांच्या गजरात उपस्थितांनी दाद दिली.

कोळिंद्रे जि.प. मतदारसंघात अप्पी पाटील यांना सर्वाधिक मतदान देण्याचा निर्धार

गावागावातून उत्स्फूर्त स्वागत व प्रतिसाद…

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      कोळिंद्रे जि.प. मतदारसंघात राजर्षी शाहू समविचारी आघाडीचे अप्पी पाटील यांच्या प्रचार दौऱ्यास लाकुडवाडी येथून सुरुवात झाली. वाजतगाजत उमेदवार अप्पी पाटील यांची प्रचार फेरी निघाली. गावातील नागरिकांनी पंचाहत्तर टक्के मतदान देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

        शेतीच्या पाण्याचे समन्यायी वाटप करून गडहिंग्लज, चंदगड तालुक्यातील पाण्यापासून वंचित गावांना सिंचनाचे पाणी मिळाले पाहिजे. याबरोबर आरोग्यसेवा लोकभिमुख करण्यासाठी प्रयत्न करणार, जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळा वाचल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करण्यावर भर राहणार असल्याचे अनेक बैठकात स्पष्ट करण्यात आले.

       यानंतर सुळे, हारूर, गजरगाव, कानोली, पेद्रेवाडी, कोवाडे, सरोळी, निंगुडगे, दाभेवाडी, सरंबळवाडी, कागीणवाडी, कोळिन्द्र, पोश्रातवाडी, किणे, शिरसंगी, वाटंगी, चाफवडे या गावातून प्रचरफेरी निघाली.

       या फेरीत उमेदवार अप्पी पाटील, कॉ. संपत देसाई, कॉ. संजय तरडेकर, अर्जुन दिवटे, शंकर कुऱ्हाडे, एन जे सुतार, मयुरेश देसाई यांच्यासह गावागावातील स्त्री पुरुष मोठ्या संख्येने प्रचार फेरीत सहभागी झाले होते.

विविध नेते व मंडळांचा शिवाजीराव पाटील यांना पाठिंबा

          चंदगड : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित पत्रकार परिषदेत विविध पक्षांचे नेते आणि पदाधिकारी एकत्र येत त्यांना जाहीर पाठिंबा दिला. या कार्यक्रमात शिवाजीराव पाटील यांनी आपल्या ध्येयधोरणांची मांडणी करत चंदगड मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचे वचन दिले. यावेळी तालुका अध्यक्ष शांतारामबापू पाटील उपस्थित होते .

     ज्ञपत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख अनिल दळवी, लक्ष्मण मनवाडकर, विभाग प्रमुख एकनाथ वाके, उपतालुका प्रमुख विनोद पाटील, शिवसैनिक विशाल गायकवाड, संदीप पाटील, अशोक पाटील आणि निवृत्ती वाघ उपस्थित होते. याशिवाय शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख दिवाकर पाटील, उपतालुका प्रमुख सुधीर पाटील, OBC तालुका प्रमुख मारुती पाथउट आणि कामगार सेनेचे पुंडलिक पाटील यांनीही आपला पाठिंबा व्यक्त केला.

      पत्रकार परिषदेत मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले आणि माजी संचालक नामदेव कांबळे (गोकुळ दूध संघ, कोल्हापूर) यांनी शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.

       शिवाजीराव पाटील यांनी चंदगड मतदारसंघातील शेतकरी, महिलांचे सक्षमीकरण, बेरोजगारी, शिक्षण आणि आरोग्य या प्रमुख समस्यांवर काम करण्याची ग्वाही दिली. त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत विकास हेच आपले उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले.या परिषदेत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत शिवाजीराव पाटील यांना निवडून आणण्यासाठी एकजूट दाखवली आणि मतदारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

लोकांचा पाठिंबा आहे असे भासवणाऱ्यांना पराभूत करा : आम. राजेश पाटील

         गडहिंग्लज : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     कांहीजण अपक्ष उभे राहून भाजपचा पाठिंबा आहे असे लोकांना भासवत आहेत, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्हीच आणली म्हणून सांगत आहेत. महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण आहे? लाडकी बहीण योजना कोणी आणली ? हे सर्वांना ज्ञात आहे.आणखी एकजण तर उचंगी धरण प्रकल्प आम्हीच केला म्हणून सांगत आहेत. उचंगी धरण कुणी पूर्णत्वास आणला हे जनतेला माहिती आहे.अश्या फसव्या लोकांना वेळीच आवर घाला यासाठी महायुतीचा उमेदवार विजयी करा असे आवाहन केले. नंदनवाड ता. गडहिंग्लज येथील प्रचार सभेत ते बोलत होते.

      संग्रामसिंह कुपेकर म्हणाले,आमदार राजेश पाटील यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये सर्व क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी केलेली आहे त्यामुळे राजेश पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

    यावेळी,संतोष पाटील,जयकुमार मुन्नोळी, संजय कांबळे, एन.डी. कांबळे, विजय शेरवी, दीपक पुजारी, दिनकर पुजारी, महादेव पवार, कृष्णा मगदूम, सुरेश जाधव, सुरेश वाडकर, नारायण हसुरकर, रमेश सावकार, सातवा जाधव, संतोष जाधव, नारायण पाटील, तात्यासो देसाई , मोहन गोसावी, बसवराज सुतार, राहुल बिरंजे, सौरभ जाधव, बाळू वाडकर आदींसह गावातील प्रमुख पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

‘आजरा’चे ४ लाख मे. टनावर गाळपाचे उद्दिष्ट गळीत हंगामाचा शुभारंभ

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       स्व.वसंतराव देसाई आजरा शेतकरी सह. साखर कारखान्याचा २६ व्या गळीत हंगाम शुभारंभ शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते संपन्न झाला. काटा पूजन कामगार संघटना अध्यक्ष प्रकाश सरदेसाई व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते झाले.

      अधिकारी व कर्मचारी यांच्याहस्ते मोळी पूजन करण्यात आले. जी. एम. शिंदे (प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी के.डी.सी.सी. बँक ) जावेद फरास (उपव्यवस्थापक केडीसीसी )राजू खाडे (निरीक्षक केडीसीसी ) रमेश देसाई व व्यंकटेश ज्योती (प्र. कार्यकारी संचालक, आजरा साखर ) यांचे हस्ते मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.

      यावर्षी साडेचार लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींचे नियोजन करण्यात आले आहे.३५० ते ४०० स्थानिक व बीड यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. कारखान्यात विस्तारीकरण करीत तंत्रज्ञान व यंत्रसामग्रीमध्ये आवश्यक तो बदल करुन सायलो सिस्टमचाही वापर केला जाणार असल्याने गाळप वाढण्यास मदत होणार आहे. भागात पूर्ण क्षमतेने टोळ्या घालून भागातील संपूर्ण ऊस गाळपास आणून त्यांची संपूर्ण ऊस बिले वेळेत देण्याचे जिल्हा बँकेच्या सहाय्याने नियोजन केले आहे त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस आपल्या कारखान्यास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन प्र. कार्यकारी संचालक व्यकटेश ज्योती यांनी यावेळी केले.

      यावेळी चीफ केमिस्ट संभाजी सावंत, चीफ इंजिनिअर सुरेश शिंगटे, मुख्य शेतीअधिकारी युवराज पाटील, चीफ अकाउंटंट प्रकाश चव्हाण, सिव्हिल इंजिनिअर शंकर आजगेकर,लेबर ऑफिसर सुभाष भादवणकर कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सरदेसाई, सेक्रेटरी बाळू दळवी,तसेच संघटनेचे सर्व सदस्य, उपखाते प्रमुख,कर्मचारी वाहतूकदार आदी उपस्थित होते.

 

 

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकामध्ये चराटी- शिंपी गटाचे आव्हान राष्ट्रवादीसमोर कायम

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!