शुक्रवार दि.१५ नोव्हेंबर २०२४

पेरणोली येथे एकाची आत्महत्या

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली ता. आजरा येथील बाळासाहेब तुकाराम दळवी या ५२ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
सदर घटना गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. दळवी यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी, मुलगा असा परिवार आहे.
याबाबतची वर्दी अशोक तुकाराम दळवी यांनी आजरा पोलिसात दिली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

अशोकअण्णा चराटी यांचा वाढदिवस उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
अण्णा भाऊ संस्था समुहाचे प्रमुख अशोक चराटी याचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, व्यापार यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून, दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. यानिमित्त आजऱ्यात चराटी गटाचा मेळावा झाला.
आमदार प्रकाश आबिटकर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे, , सुरेश डांग, डॉ.दीपक सातोसकर, रमेश कुरूणकर, विलास नाईक, माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, अंशुमाला पाटील, अनिकेत चराटी, मारुती मोरे, दशरथ अमृते ,राजाराम पोतनीस प्रमुख उपस्थित होते.
विजयकुमार पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आमदार आबिटकर म्हणाले, अशोकण्णा चराटी हे नेहमीच माझ्या पाठीची राहीले आहेत. त्यांच्यामुळे दोन वेळा विजय मिळवता आला आहे. या वेळी देखील त्यानी पाठिंबा दिला आहे. आजऱ्यात विविध विकासकामे राबविली आहेत. मी आजरेकर याच भूमिकेतून कार्यरत आहे.
श्री चराटी म्हणावे आजरा तालुका तीन आमदार निवडतो. त्यामुळे तालुक्यातील मते निर्णायक आहेत. कामाचा माणूस अशी ओळख असणारे आम. आबिटकर नामदार हवेत अशी ही अपेक्षा व्यक्त केली.
या वेळी अनिरुध्द केसरकर, राजेंद्र सावंत, डॉ. संदिप देशपांडे, असिफ पटेल, ज्योत्स्ना चराटी, सुमैय्या खेडेकर यांच्यासह विविध संस्था, अण्णा भाऊ संस्थाचे पदाधिकारी, नागरीक उपस्थित होते. पी. बी. पाटील, डॉ. अशोक बाचुळकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ .अनिल देशपांडे यांनी आभार मानले.

आमदार प्रकाश आबिटकर म्हणजेच विकास
विघ्नसंतोषी मंडळींच्या अपप्रचाराला बळी पडू नका : गोविंद गुरव

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मतदानाची वेळ जसजशी जवळ येत आहे तसतसे विरोधक भरकटू लागले आहेत. चुकीचे संदेश समाज माध्यमाद्वारे मतदारांसमोर ठेवून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये आमदार प्रकाश आबिटकर यांनी केलेल्या विकास कामांची परतफेड कृतज्ञतेच्या भावनेतून करण्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांनाच विजयी करा असे आवाहन हरपवडे येथील माजी सरपंच गोविंद गुरव यांनी केले. ते आमदार आबिटकर यांच्या आजरा जिल्हा परिषदेच्या पश्चिम भागातील प्रचार दौऱ्याप्रसंगी बोलत होते.
लिंगवाडी, शेळप, किटवडे, आल्याचीवाडी, मेढेवाडी, शेळपवाडी अंबाडेसह या भागामध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचे रान उठवले आहे मतदारांमधूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
आजरा साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र भाऊ सावंत म्हणाले, शासनाने सर्वसामान्य साठी अनेक योजना राबवलेल्या आहेत. आमदार आबिटकर यांचा विकास कामाबाबत विरोधकांनी नाद करू नये. मतदारांनी या दहा वर्षात झालेल्या विकास कामांचे माप आबिटकर यांना मतदान करून त्यांच्या पदरात टाकावे असे आवाहन केले.
यावेळी सयाजी नार्वेकर, आनंदा कुंभार, सागर पाटील, सुधाकर प्रभू यांच्यासह आबिटकर समर्थक कार्यकर्ते या दौऱ्यात सहभागी झाले होते.
आमदार आबिटकर यांना पाठींबा
नाभिक समाज, बांधकाम कामगार लालबावटा,मराठा महासंघ, गांधीनगर ग्रामस्थ, आजरा, चर्मकार समाज, ब्राह्मण समाज,लिंगायत समाज,कोरवी समाज,सिद्धार्थ नगर

अखेर माजी उपनगराध्यक्ष आलम नाईकवाडे गटाचा के.पी.पाटील यांना पाठिंबा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष आलम नाईकवाडे गटाने महाविकास आघाडीचे उमेदवार के.पी.पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून होते.
आजरा शहरातील प्रतिष्ठित मुस्लीम नागरिकांच्या बैठकीत बंटी पाटील यांच्या मार्गदर्शनाने एकमुखी पाठिंबा जाहीर करण्यात आला. तत्पूर्वी नाईकवाडे यांनी आमदार सतेज पाटील यांच्याशी चर्चा केली.
आलम नाईकवाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अब्दुल मजीद पठाण, हाजी सुलेमान दरवाजकर,अशकर लष्करे, अँड.जावेद दिडबाग, रसूल तकिलदार, सत्तार ढालाईत, हुसेन दरवाजकर, जब्बार तकिलदार, बशीर शिडवणकर, अब्दुल रहेमान दरवाजकर, अब्दुल माणगावकर, कलाम तकिलदार, अब्दुल अजीज पठाण, मन्सूर हिंग्लजकर, नासिर ढालाईत, इकबाल हिंग्लजकर, इस्माईल शेख, नवीद लमतुरे, साजिद खतीब, इम्रान पटेल, कैफ हिंग्लजकर, अमीर खेडेकर, नाजीम नाईकवाडे, फैयाज मीराबाई, अरीफ मुल्ला, हाफिज इरफान लाडजी, अब्दुल अजीज दरवाजकर, शम्स तकीलदार, अनिस नाईकवाडे, इब्राहिम तकीलदार, जावेद पठाण, इम्रान सोनेखान, मोईन शेख, अबूतल्हा नाईकवाडे उपस्थित होते.
आजरा तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनाही के.पीं.सोबत

यावेळी संघटनेचे कृष्णा पाटील, सुरेश पाटील, निवृती कांबळे, भिकाजी पाडेकर, तुकाराम कांबळे, सुरेश शिंगटे, सखाराम केसरकर, प्रेमानंद खरुडे, अभिजित मनगुतकर, हरिश्चंद्र पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते व महाविकास आघाडीचे मुकूंद देसाई, जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई, उदय पवार, संभाजी पाटील उपस्थित होते.
चंदगड, गडहिंग्लज व आजरा येथे आयटी हब करण्याचे स्वप्न : डॉ. नंदाताई बाभुळकर

चंदगड : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्या रूपाने चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यात विविध विकास कामांचा डोंगर उभा राहिला आहे. त्यांच्या वारसदार कन्या डॉ. नंदाताई बाभुळकर यांच्या मनात या उपविभागात आयटी हब निर्माण करण्याचे स्वप्न आहे. बीसीएमबीए एमसीए आयटी क्षेत्रातील तरुण तरुणी नोकरीसाठी पुणे, मुंबई, बेंगलोर अशा ठिकाणी जातात त्यांना आपल्या तालुक्यातच चांगल्या पगाराच्या नोकऱ्या यामुळे मिळतील. त्यासाठी या मतदारसंघातील मतदारांनी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून देण्याची गरज आहे. हा आयटी हब प्रत्यक्षात आणल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही महाविकास आघाडीच्या चंदगड मतदारसंघातील उमेदवार नंदाताई बाभुळकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
महाराष्ट्रातील जनतेच्या भूमिका ऐकल्या तर आपण अचंबित होतो. सध्याच्या येथील सरकारचा सर्वांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पराभव दिसू लागलेल्या विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधकांच्या कडून सुरू आहे. त्यासाठी जातीजातीत, धर्मांत भांडणे लावायचे उद्योग सुरू आहेत. या धर्मांध व जातीयवादी शक्तींना महाराष्ट्रातून हद्दपार करण्याची वेळ आली आहे. दोन दिवसात खिडकीतून आणि दारातून आमिषे देणारे येतील. पण या गोष्टीला बळी न पडता मला निवडून द्या. राज्यात सत्ता बदल होणारच आहे. नवीन सरकार आल्यानंतर विकासाचे नवे पर्व पुन्हा सुरू होईल. राज्यातील उद्योग गुजरातला पळवले त्यामुळे बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. तरुण-तरुणींच्या हाताला काम देण्याऐवजी हजार पंधराशेचे तुकडे माता-भगिनींच्या पुढ्यात टाकून आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यात गुंतवणूक करायला उद्योगपती तयार नाहीत. चंदगडच्या एमआयडीसीत विस्तार करण्यास मर्यादा असल्याने चंदगड व आजरा येथे आयटी हब करण्याचे आपले स्वप्न आहे. विरोधी मंडळी प्रतिगामी व व्यक्ती केंद्रित विचाराचे आहेत. ते सर्वसामान्य लोकांना परवडणारे नाही. ते उद्योगधंद्यांच्या नावाखाली समाजाला वेठीस धरत आहेत. अशी भूमिका पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना महाविकास आघाडीच्या उमेदवार नंदाताई बाभुळकर यांनी व्यक्त केली.
तरुणांना नोकऱ्या नाहीत, महागाईने
जनता त्रस्त आहे. धार्मिक ध्रुवीकरण
करून मते मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांचा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
आज माणगाव येथे शरद पवार यांची सभा

आज शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची जाहीर सभा नंदाताईंच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आली आहे या सभेस खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सौ. सायरा मुश्रीफ यांच्यासह मुले, सुना, मुलगी व नातवंडेही प्रचारात….
अख्ख कुटुंबच बाहेर पडलय मतदारांच्या भेटीला

कागल : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे अख्ख कुटुंबच प्रचार कार्यात उतरले आहे. त्यांच्या पत्नी सौ. सायरा हसन मुश्रीफ यांच्यासह तिन्ही मुले, तिन्ही सुना, मुलगी व नातवंडेही प्रचारात रंगली आहेत.
वेगवेगळ्या सात ग्रुपच्या माध्यमातून विविध पातळ्यांवर हा प्रचार होत आहे. उमेदवार म्हणून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा मुख्य फौजफाटा गेल्या महिन्याभरापासून प्रचारात आहे. त्यांच्यासोबत कु. सेहान आणि कु. उसेद ही दोन नातवंडे असतात. दुसरा ग्रुप आहे तो त्यांच्या पत्नी सौ. सायरा व त्यांच्या दोन नंबरच्या सुनबाई सौ. नबीला आबिद मुश्रीफ यांचा. या दोघी सासू- सून सकाळी आठ वाजता प्रचारासाठी घराबाहेर पडतात. दौऱ्यातील पहिल्या गावात पोहोचून तिथेच नाष्टा करून सुरुवात करतात. दुपारी जेवणापूरती अर्धा तास सुट्टी घेऊन पुन्हा अगदी रात्री दहा वाजेपर्यंत हळदीकुंकू, महिला मेळावे व वैयक्तिक भेटीगाठी सुरू असतात. आतापर्यंत बिद्री- बोरवडे जिल्हा परिषद मतदार संघासह उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघ त्यांनी पूर्ण करीत आणलेला आहे.
तिसरा ग्रुप आहे तो श्री. मुश्रीफ यांच्या मोठ्या सुनबाई सौ. सबिना साजिद मुश्रीफ आणि मुलगी सौ. निलोफर मतीन मनगोळी यांचा या दोघी नणंद- भावजय सकाळी आठ वाजता घराबाहेर पडतात. दौऱ्यातील पहिल्या गावातच चहा- नाष्ट्याने त्यांची सुरुवात होते. नंतर हळदीकुंकू, वैयक्तिक भेटीगाठी आणि शेत-शिवारामध्ये काम करणाऱ्या महिलांशी त्या संपर्क साधतात. आतापर्यंत त्यांनी कडगाव -गिजवणे जिल्हा परिषद मतदार संघासह सेनापती कापशी खोरा व करंबळी, धामणे परिसरात संपर्क साधला आहे. चौथा ग्रुप आहे तो सर्वात धाकट्या सूनबाई सौ. अमरीन नवीद मुश्रीफ यांचा. त्याही सकाळी आठच्या सुमारालाच मुलगा आणि मुलगी खूप आहे या ना सोबत घेऊन प्रचार दौऱ्यावर निघतात. रात्री दहापर्यंत यांचाही प्रचार सुरूच असतो.
तसेच श्री. मुश्रीफ यांची तिन्ही मुले साजिद, आबिद व नवीद आपापल्या स्वतंत्र पातळ्यांवर निवडणुकीच्या जोडण्या लावण्यात आणि प्रचार कार्यात आहेत.
मुश्रीफसाहेब आमचे कमी आणि तुमचेच जास्त……..!
या सर्वच महिला मेळावे व हळदी- कुंकूमधून एक गोड तक्रार पुढे येते. ती म्हणजे मुश्रीफसाहेब आमच्या कुटुंबीयांच्या वाट्याला फार कमी वेळ मिळतात आणि ते तुम्हा समाजाचे जास्त होऊन गेलेत. किंबहुना; मतदारसंघातील जनता जनार्दन हेच आमचं कुटुंब आणि गोतावळा होऊन गेलाय..!

किणी कर्यात भागात अप्पी पाटलांना वाढता पाठिंबा
गोपाळराव पाटील, कलाप्पा भोगण, प्रभाकर खांडेकर, मुगेरीअण्णा यांच्या सहभागाने मतदारांत चैतन्य…

कोवाडे : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
चंदगड विधानसभा मतदारसंघातील राजर्षी शाहू समविचारी आघाडीचे उमेदवार श्री अप्पी उर्फ विनायक पाटील यांनी आज किणी कर्यात भागात प्रचार दौरा केला. या दौऱ्यात त्यांच्यासोबत गोपाळराव पाटील, जि प सदस्य कलाप्पा भोगण, कॉ संपत देसाई, शिवसेनेचे प्रभाकर खांडेकर, नितीन पाटील, मुगेरीअण्णा प्रचारफेरीत सहभागी झाले होते.
यावेळी झालेल्या बैठकीत बोलतांना जीप सदस्य कलाप्पा भोगण म्हणाले की अप्पी पाटील हे अठरापगड बहुजन समाजाचे खरे प्रतिनिधी आहेत. यापूर्वी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व इथल्या उच्च जातीय घराण्यांनी केले आहे. त्यांचे वारसदार पुन्हा या निवडणुकीत उभे आहेत. मतदारसंघावर आपला सातबारा नोंदवायला निघाले आहेत. या निवडणुकीत येथील सुज्ञ जनता त्यांना जागा दाखवून देईल आणि अप्पी पाटील यांना मोठ्या फरकाने निवडून देईल.
यावेळी गोपाळराव पाटील, प्रभाकर खांडेकर, नितीन पाटील यांनीही मार्गदर्शन केले. रॅलीत कॉ. संपत देसाई, गोविंद पाटील, पी.डी. पाटील, एन. जे. सुतार, अर्जुन दिवटे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अनिरुद्ध रेडेकर शिवाजी भाऊंच्या पाठीशी

चंदगड : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिरुद्ध केदारी रेडेकर यांनी माजी मंत्री भरमुअण्णा पाटील यांच्या उपस्थितीत चंदगड विधानसभा मतदार संघांचे अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी रेडेकर म्हणाले, चंदगड मतदार संघात शिवाजीराव पाटील यांनी सत्ता नसतानाही अनेक विकासकामे मार्गी लावलेली आहेत.कामाचा माणूस म्हणून निवडून येण्याची शक्यता आहे अशी चर्चा मतदार संघात सुरु आहे. कांहीही असो ज्याच्या हाती सत्ता तो राजा असतो हेच आजचे वास्तव आहे. म्हणून निवडणूक होईल आणि नंतर कोण राजा होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे परत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिवाजीराव पाटील हे चंदगडचे आमदार असणार आहेत.असा विश्वास मतदारांमध्ये आहे .
यावेळी मल्हार शिंदे,चाळोबा देसाई, शिवसेना चंदगडविधानसभा प्रमुख मारुती नावलगी , बाबू नेसरीकर यांच्यासह सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

निर्णय चुकला तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही : आमदार राजेश पाटील

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
काही नतभ्रष्ट मंडळी तरुण पिढीला बिघडवण्याचे पाप करत आहेत. तालुक्याला बिहार बनवण्याचा प्रयत्न करत आहे. आपला निर्णय चुकला तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही असे प्रतिपादन आमदार राजेश पाटील यांनी केले.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जन आशीर्वाद दौऱ्यानिमित्त बुरुडे ता.आजरा येथे भेट देऊन जनतेशी संवाद साधला.
यावेळी आमदार पाटील म्हणाले, केलेल्या कामाची उतराई म्हणून मला पुन्हा एकदा संधी द्यावी.घड्याळासमोरील बटन दाबून महायुतीला विजयी करावे,असे आवाहन केले.
यावेळी अल्बर्ट डिसोजा, रमेश रेडेकर, राजू मुरकटे, दिगंबर देसाई, अनिल फडके, मधुकर यलगार, सुभाष देसाई, बाबुराव गिलबिले, संजय पवार, मारुतीराव देशमुख, संजय कांबळे, शामराव कांबळे, सुनील कांबळे, रमेश कांबळे, दौलती कांबळे, आनंदा कांबळे, अनिल कांबळे आदींसह गावातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मलिग्रे ता आजरा येथील जेष्ठ व अपंग मतदान प्रक्रिया सुरू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील पुर्व भागातील गावाच्या मध्ये ८५ वर्षावरील आजारी, जेष्ठ मतदार व अपंग मतदार यांचे त्याच्या राहत्या घरी जावून मतदान प्रक्रिया राबवण्यात येत आहे. गजरगाव सरबंळवाडी कानोली मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. मलिग्रे येथील सहा जेष्ठ मतदार व एक अपंग पैकी पाच मतदारांचे मतदान प्रक्रिया पूर्ण झाली दोन मतदार बाहेर गावी असल्याने घरी जावून स्थळ पाहणी करून १६ तारखेला पुन्हा ही टिम मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार असलेचे ए.बी. मासाळ निवडणूक अधिकारी यानी सांगितले.
यावेळी मतदान अधिकारी नामदेव देवळे, गजानन बैनवाड, लक्ष्मण रगडे ग्रामसेवक धनाजी पाटील, तलाठी संजय माळी,पोलिस एम. एन. टेळी, पोलिस पाटील मोहन सावंत, विजय देसाई बी. आर. भाग्यवंत, राजेश कोकितकर याच्या सह माजी सरपंच अशोक शिंदे कारखाना संचालक अशोक तर्डेकर उपस्थित होते.

घाटकरवाडी परिसरात हत्तीकडून नुकसान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
डोंगरवाडी पैकी घाटकरवाड़ी (ता. आजरा) येथील परिसरात टस्कराचा वावर सुरु झाला आहे. त्याच्या चित्काराने ग्रामस्थ भयभित झाले आहेत. सायंकाळ नंतर शेताकडे जाणे शेतकऱ्यांनी बंद केले आहे. हत्ती भात, ऊस पिकांचे नुकसान करीत आहे.
किटवडे परिसरात दोन दिवसापूर्वी असलेला टस्कर आता घाटकरवाडी पैकी डोंगरवाडी येथे आला आहे. या परिसरात त्याचा वावर सुरु झाला आहे. त्यांने रामचंद्र मटकर यांच्या शेतातील भात, ऊस पिकाचे नुकसान केले आहे. त्याच्या वावराने ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण आहे. सायंकाळ नंतर त्याच्या चित्काराने जंगल दणाणून जाते. त्याच्या भितीने ग्रामस्थांनी घराबाहेर पडणे त्याचबरोबर शेताकडे जाणेही बंद केले आहे. टस्कराला येथील वातावरण उत्तम आहे. उसासह अन्य पिक खाद्यासाठी, तर घाटकरवाडी येथे डुंबण्यासाठी तलाव आहे. त्यामुळे येथे त्याचा वावर राहणार असल्याचे ग्रामस्थ सांगतात.

व्यंकटराव मध्ये बालदिन उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा..येथील व्यंकटराव प्रशालेचे प्राचार्य आर.जी कुंभार यांचे हस्ते बालदिनानिमित्त पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना प्राचार्य म्हणाले , १४ नोव्हेंबर.स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस… हा ‘बाल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. पंडित नेहरुजींना लहान मुले खूप आवडत, त्यांच्यात रममाण होणे त्यांचे नित्याचे होते. मुले प्रेमाने त्यांना ‘चाचा’ म्हणून संबोधत असत. आपल्या लाघवी स्वभामुळे मुलांनाही ते आपलेसे वाटत. म्हणून पंडित जवाहरलाल नेहरुजींचा जन्मदिवस ‘बालदिन’ म्हणून देशभर उत्साहात साजरा केला जातो.
त्यानंतर कार्यक्रमाचे आयोजक श्री पी.व्ही पाटील व सौ. एस. वाय. देसाई यांनीही पंडित नेहरू यांचे विषयी आपले विचार मांडले.
या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

संक्षिप्त वृत्त…
..…आजरा साखर कारखान्याच्या गळीत हंगामास आज शुक्रवारी सुरुवात होत आहे.
…..आजरा परिसरात गुरुवारी रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे वीजपुरवठा खंडीत झाला होता.







